Leading International Marathi News Daily                                  शनिवार, ३ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

राणेंची राजकीय वाटचाल ६ जानेवारीला स्पष्ट होणार
मुंबई, २ जानेवारी / प्रतिनिधी

काँग्रेस पक्षातून बाहेर न पडण्याबाबत माझे कुणी मन वळविण्याचा प्रश्नच येत नाही. काँग्रेस श्रेष्ठींपैकी कुणाशीही माझी चर्चा झालेली नाही तसेच माझ्याकडे कुणीही आलेले नाही, असे सांगत आज माजी महसूल मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या काँग्रेसमध्येच

 

राहण्याच्या चर्चेला एका प्रकारे पूर्णविराम दिला. आपल्या भविष्यातील राजकीय वाटचालीविषयीची भूमिका आपण ६ जानेवारी रोजी दुपारी ३.०० वाजता जाहीर करू, असेही राणे यांनी स्पष्ट केले. ‘ज्ञानेश्वरी’ या शासकीय निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना राणे यांनी आज पुन्हा एकदा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे व माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली. माणिकराव ठाकरे यांनी अलीकडेच ‘‘ज्यांची पक्षावर निष्ठा नाही ते पक्ष सोडून गेले तरी पक्षाला काही फरक पडणार नाही’’ असे विधान केले होते, त्याबाबत ते म्हणाले की, हे प्रदेशाध्यक्ष गेल्या निवडणुकीत २८ हजार मतांनी पराभूत झाले होते. येत्या निवडणुकीत किंवा यापुढेही ते कधीही निवडून येण्याची शक्यता नाही. अशा व्यक्तीने मला सल्ले कशाला द्यावेत. नागपूर येथे शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजबाबतही राणे यांनी हे पॅकेज फसवे असल्याची टीका केली. राणे म्हणाले की, या पॅकेजसाठी अर्थसंकल्पीय तरतूद कुठे केली गेली आहे? जाहीर केलेल्या पॅकेजसाठी हे सरकार पैसे कुठून आणणार, हे सरकारने जनतेला सांगायला हवे. विलासराव देशमुख यांनी आपल्याला सबुरीचा सल्ला दिला होता, त्याबाबत राणे म्हणाले की, माझ्याबाबत बोलण्याचा त्यांना कोणताही नैतिक अधिकार नाही. पक्षहितासाठी मी सबुरीने वागावे, असे विलासराव बोलतात त्यावर आपला विश्वास नाही. कॅगच्या अहवालात ज्यांच्यावर ताशेरे ओढण्यात आले आहेत, त्यांच्यावर सरकारने कारवाई केली पाहिजे.