Leading International Marathi News Daily                                  शनिवार, ३ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

हसन अलीला ५० हजार कोटी प्राप्तिकर भरण्याचा आदेश
मुंबई, २ जानेवारी / प्रतिनिधी

पासपोर्ट घोटाळ्याप्रकरणी आरोप ठेवण्यात आल्यानंतर आता पुण्यातील व्यावसायिक आणि स्टड फार्मचा मालक हसन अली खान हा कर चुकवेगिरीच्या विळख्यात अडकण्याची चिन्हे दिसत आहेत. आयकर खात्याने हसन अली खान याला एका महिन्यांत ५०

 

हजार कोटी रुपयांहून अधिक प्राप्तिकर थकबाकी भरण्यास फर्मावले आहे. दरम्यान, बोगस दस्तऐवजाच्या सहाय्याने बेकायदेशीररीत्या दोन पासपोर्ट बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या खान याची शिवडीच्या सत्र न्यायालयाने दोन लाख रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली आहे.
प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी खान याने किती प्राप्तिकर थकविला आहे, त्याचे निर्धारण बुधवारी पूर्ण केले असून थकबाकीची रक्कम भरण्याबाबत खान याच्या पुणे आणि पेडर रोड येथील घरांवर नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. जानेवारी २००७ मध्ये अधिकाऱ्यांनी खान यांच्या घरावर छापे टाकले असता स्वित्र्झलड येथील बँकेत ३६ हजार कोटी रुपये असल्याचे आढळले. अंमलबजावणी संचालनालय अधिकारी खान याचा परकीय चलन व्यवस्थापन कायद्यान्वये तपास करीत आहेत. इतक्या मोठय़ा प्रमाणावरील बेहिशोबी पैसा हा राजकीय नेते आणि बडय़ा व्यावसायिकांचा असल्याचा संशय व्यक्त केला जात असला तरी चौकशी अधिकाऱ्यांना त्याबाबतचा कोणताही पुरावा मिळालेला नाही. परकीय बँकेत असलेल्या ३६ हजार कोटी रुपयांवरील कराबाबतची ३७.७ टक्के या दराने मोजणी करण्यात आली. त्यामध्ये अधिभार आणि शिक्षण उपकराचा समावेश आहे. कराच्या रकमेवर ३०० टक्के दंड आकारण्यात आला आहे. कराच्या रकमेवर दोन वर्षांसाठी दरमहा एक टक्का व्याज भरण्याचे आदेशही खान याला देण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. जवळपास ५० हजार कोटींहून अधिक असलेल्या कराच्या रकमेचा भरणा एका महिन्यांत खान याने न केल्यास त्याच्या मालमत्तेवर टाच आणून ती वसूल करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सूचित केले. खान याच्यापुढे आयकर आयुक्त (अपील) यांच्याकडे करनिर्धारण आदेशाला आव्हान देण्याचा पर्याय आहे. मात्र जोपर्यंत त्याला स्थगिती मिळत नाही तोपर्यंत त्याच्या मालमत्तेवर टाच आणण्याच्या प्रक्रियेत कोणतीही बाधा येणार नाही, असेही अधिकाऱ्याने सांगितले.