Leading International Marathi News Daily                                  शनिवार, ३ जानेवारी २००९
प्रादेशिक


छत्रपती शिवाजी टर्मीनर्स स्थानकाच्या वार्षिक डागडुजीचे काम शुक्रवारपासून सुरू करण्यात आले . छाया -प्रशांत नाडकर

कर्जमाफी शेतकऱ्यांची आणि कुरघोडी काँग्रेसची..
शेतकऱ्यांना सवलत देण्याच्या निर्णयाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू

संतोष प्रधान, मुंबई, २ जानेवारी

केंद्र सरकारच्या कर्जमाफीचे श्रेय राष्ट्रवादीने घेतल्याने या योजनेपासून वंचित राहिलेल्या सुमारे ४० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीची सवलत देण्यासाठी पुढाकार घेऊन काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसवर कुरघोडी केली आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सवलत देण्याच्या निर्णयाचे श्रेय घेण्याचा पद्धतशीरपणे प्रयत्न काँग्रेसने सुरू केला आहे. नेतृत्वबदल झाल्यानंतर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कार्यपद्धतीबद्दल राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये कुरबुरी सुरू झाल्या आहेत.

विश्व मराठी संमेलनाच्या निमित्ताने अमेरिका साहित्य परिषदेची स्थापना
मुंबई, २ जानेवारी / प्रतिनिधी

फेब्रुवारी महिन्यात सॅनहोजे येथे भरणाऱ्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अमेरिका आणि जगभरात मराठी भाषा आणि साहित्याचा प्रसार करण्यासाठी अमेरिका साहित्य परिषदेची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती विश्व मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष संदीप देवकुळे यांनी आज दादर येथे पत्रकार परिषदेत दिली. जागतिक मंदीच्या पाश्र्वभूमीवर संमेलनाच्या कार्यक्रम आणि व्यवस्थेच्या गुणात्मक दर्जात आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही. मात्र तरीही हे संमेलन यशस्वी होईलच, असा दावाही देवकुळे यांनी केला.

कलाविष्कारांच्या रंगोत्सवात रंगला सांस्कृतिक पुरस्कार वितरण सोहळा
डोंबिवली,२ जानेवारी /प्रतिनिधी

सनईचे मंगल सूर, लावणीची धून, नृत्य, विनोदी नाटिका अशा विविध कलाविष्कारात आज राज्य सांस्कृतिक पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. तब्बल साडे चार तास रंगलेल्या या कलात्सोवात विविध क्षेत्रातील बारा कलाकारांचा सन्मान करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमावर उपसभापती वसंत डावखरे यांची छाप दिसत होती. सावित्रीबाई फुले रंगमंदिरात आयोजित या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, राज्यमंत्री सुरेश वरपुडकर, उपसभापती वसंत डावखरे, महापौर रमेश जाधव, आमदार हरिश्चंद्र पाटील, उपमहापौर नरेंद्र पवार, जिल्हा परिषद अध्यक्षा रेखा पष्टे, सचिव अजय आंबेकर, जिल्हाधिकारी आबासाहेब जऱ्हाड, आयुक्त गोविंद राठोड उपस्थित होते. विजय दिवाण(नाटक), प्रकाश खांडगे(लोककला), गुलाम रसूल (कंठसंगीत), शुभा जोशी(उपशास्त्रीय संगीत), भवानी शंकर (वाद्यसंगीत), दत्ता केशव (मराठी चित्रपट), रामकृष्ण बेलूरकर(कीर्तन), गंगाराम कवठेकर(तमाशा), शाहिर योगेश(शाहिरी), झेलम परांजपे(नृत्य), बाबी कलिंगण(लोककला), पांडुरंग भलावी(आदिवासी)या दिग्गज कलाकारांना आज मानपत्र, ५१ हजार रूपयांचा धनादेश, स्मृतिचिन्हाने नगरसेवक, कला प्रांतातील दिग्गजांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.शिवसेनेचे पदाधिकारी कार्यक्रमाला अनुपस्थित होते. सिडकोचे अध्यक्ष नकुल पाटील यांचे नाव कार्यक्रम पत्रिकेत नसल्याने काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करून अनेकांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती.

‘ही तो ‘श्री’ची इच्छा’ पुस्तकाची तीन वर्षांत २२ वी आवृत्ती!
मुंबई, २ जानेवारी / प्रतिनिधी

अमेरिकास्थित उद्योजक डॉ. श्रीनिवास ठाणेदार लिखित ‘ही तो ‘श्री’ची इच्छा’ या पुस्तकाच्या २२ व्या आवृत्तीचे प्रकाशन उद्या कोल्हापूर येथे केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. पुस्तकाची ही युवा आवृत्ती असून हे पुस्तक जास्तीत जास्त युवकांपर्यंत पोहोचावे यासाठी त्याची किंमत अवघी शंभर रुपये ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे या निमित्ताने डॉ. ठाणेदार हे स्वत: प्रकाशक झाले आहेत.

किरकोळ भांडणातून एकाने १८ मजल्यावरून मित्राला ढकलले!
मुंबई, २ जानेवारी / प्रतिनिधी

दारुच्या नशेत झालेल्या किरकोळ भांडणातून एकाने १८ मजल्यावरून मित्राला ढकलून दिल्याची घटना गुरूवारी रात्री नागपाडा येथे घडली. आरोपी राजेश भगत आणि मृत्युमुखी पडलेला भोलू हे दोघेही नागपाडा येथील बेलासिस रोडवरील नव्याने बनत असलेल्या ‘आर्केड इनॅक्टिव्ह’ या इमारतीवर कामगार म्हणून काम करीत होते. गुरूवारी त्यांची सुट्टी असल्याने ते आपल्या अन्य सहकाऱ्यांसोबत रात्री उशिरा इमारतीच्या १८ व्या मजल्यावर दारूची पार्टी करीत होते. नेहमीप्रमाणे कालही त्यांच्यात दारू पिऊन किरकोळ भांडणे सुरू होती. मात्र राजेश आणि भोलू यांच्यातील किरकोळ भांडणाचे रुपांतर धक्काबुक्कीत झाले व राजेशने भोलूला धक्का दिल्याने तो १८ व्या मजल्यावरून खाली पडला. या घटनेनंतर इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या अन्य कामगारांनी तात्काळ भोलूला रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी भगत याला अटक केली आहे. मात्र चौकशीत त्याने हे हेतुत: केले नसल्याचे पुढे आल्याने पोलिसांनी त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एआयईईई परीक्षेसाठी अर्ज सादर करण्याची मुदत ५ जानेवारीपर्यंत
मुंबई, २ जानेवारी / प्रतिनिधी

अखिल भारतीय अभियांत्रिकी-वास्तुशास्त्र प्रवेश परीक्षा (एआयईईई) येत्या २६ एप्रिल रोजी घेण्यात येणार असून ५ जानेवारीपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. या परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन तसेच सिंडिकेट बँकेच्या ठराविक शाखांमध्ये अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. परीक्षेच्या अर्जासहीत सर्व इत्थभुंत माहिती ६६६.ं्रीी.ल्ल्रू.्रल्ल या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. बारावीमध्ये शिकत असलेले अथवा बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतात. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेतही एआयईईई परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी १५ टक्के राखीव जागा ठेवण्यात येतात. या परीक्षेसाठी दोन वर्षांपूर्वीपर्यंत राज्यातील मराठी विद्यार्थी कमी संख्येने बसत होते. त्यामुळे राज्यातील १५ टक्के राखीव जागांवर परराज्यातील विद्यार्थी मोठय़ा संख्येने प्रवेश घ्यायचे. परंतु, गेल्या वर्षांपासून या परीक्षेसाठी राज्यातील विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. यंदाही बारावीत असलेल्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेला मोठय़ा संख्येने अर्ज भरावेत, अशी अपेक्षा तंत्रशिक्षण संचालनालयातील सूत्रांनी व्यक्त केली आहे.

पाणीचोरी रोखण्यासाठी दक्षता पथक नाहीच !
मुंबई, २ जानेवारी / प्रतिनिधी

पाणीचोरी रोखण्यासाठी दक्षता पथक स्थापन करावे, अशी सूचना तीन वर्षांपूर्वी एका नगरसेवकाने दिली होती. त्यावर आज पालिका आयुक्तांनी आपला अभिप्राय दिला. मात्र आयुक्तांचा अभिप्राय समाधानकारक नसल्याचे सांगून स्थायी समितीने हा प्रस्ताव फेरविचारासाठी आयुक्तांकडे पाठविला. त्यामुळे तीन वर्षे या प्रस्तावावर कागदी घोडे नाचत राहीले, मात्र पाणीचोरी रोखण्यासाठी दक्षता पथक स्थापन झालेच नाही. शिवसेनेचे नगरसेवक प्रकाश आयरे यांनी तीन वर्षांपूर्वी हा प्रस्ताव दिला होता. नियमाप्रमाणे हा प्रस्ताव अभिप्रायासाठी आयुक्तांकडे पाठविण्यात आला. हा प्रस्ताव पालिकेच्या विविध विभागांत फिरत राहीला आणि अखेर आज आयुक्तांनी प्रस्तावाच्या बाजूने अभिप्राय दिला. मात्र आयुक्तांनी सविस्तर माहिती दिली नाही, नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिलेली नाहीत, अशी तक्रार स्थायी समिती सदस्यांनी केली.

माजी नगरसेविका उमा भावे यांचे निधन
कल्याण, २ जानेवारी/वार्ताहर
कल्याण नगरपालिकेच्या नगरसेविका उमा शंकर भावे यांचे वृद्धापकाळाने आज पहाटे निधन झाले. त्या ८६ वर्षांच्या होत्या.
कल्याण नगरपालिकेत उमाबाई शंकर भावे या जनसंघातर्फे व एकदा अपक्ष म्हणून आधारवाडी परिसरातून दोन वेळा निवडून आल्या होत्या. त्या सुधारणावादी विचारसरणीच्या होत्या. नगरपालिकेत नगरसेविका असताना त्यांनी विकासकामे केली. नागरिकांच्या अडीअडचणी त्या आक्रमक पवित्रा घेऊन सोडवत असत. त्यांच्या निधनाने आधारवाडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

डहाणू औष्णिक ऊर्जानिर्मिती केंद्राला उद्योग महासंघाचा पुरस्कार
मुंबई, २ जानेवारी / प्रतिनिधी

डहाणू येथील रिलायन्सच्या औष्णिक ऊर्जानिर्मिती केंद्राला भारतीय उद्योग महासंघाच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा उत्कृष्ट जलव्यवस्थापनाचा पुरस्कार देण्यात आला आहे. या केंद्राने हा पुरस्कार तिसऱ्यांदा पटकावला आहे.या पुरस्काराबरोबरच सदर केंद्राला जलव्यवस्थापनासंदर्भातील सवरेत्कृष्ट सामाजिक बांधिलकी जपणारे केंद्र आणि आदर्श जलव्यवस्थापनाची सवरेत्कृष्ट केस स्टडी पुरस्कारही प्रदान करण्यात आले आहेत. नियत जलवापर, जलसंवर्धन प्रकल्प, जलनि:सारण कार्यपद्धती, पर्जन्यजल पुनर्धारण आदी निकषांमध्ये आस्थापनाच्या कार्याचे महासंघातर्फे सखोल परीक्षण करण्यात येते आणि त्यानुसार पुरस्कारांची निवड केली जाते.
यंदाच्या या पुरस्कारासाठी मोटर वाहन, औषधे, अभियांत्रिकी, कापड उद्योग, ऊर्जानिर्मिती प्रकल्प आदी क्षेत्रातील ६५ आस्थापनांनी आपले अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ५४ आस्थापनांनी अंतर्गत जलव्यवस्थापन तर उर्वरित ११ आस्थापनांनी सामाजिक बांधिलकीच्या गटांत भाग घेतला होता. त्यामधून एकूण २८ आस्थापनांची अंतिम सादरीकरणासाठी निवड करण्यात आली होती. या केंद्राला आतापर्यंत एकूण ४० राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

अल्पसंख्यांकांविषयी योजनांच्या काटेकोर अंमलबजावणीचे निर्देश
मुंबई, २ जानेवारी/प्रतिनिधी

अल्पसंख्याक विकास विभागाच्या योजनांची काटेकोर अंमलबजावणी तात्काळ करण्याचे निर्देश मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज मंत्रालयात एका बैठकीत दिले.
अल्पसंख्याक विकास विभागाच्या प्रधान सचिव टी. एफ. थेकेकरा यांच्याकडून मुख्यमंत्र्यांनी या विभागाच्या योजनांची माहिती घेऊन त्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. या बैठकीस उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, उपसचिव शाहीन काद्री उपस्थित होते. मागील वर्षी अल्पसंख्याकांच्या हितासाठी स्वतंत्र प्रशासकीय विभाग निर्माण करून १६७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. या विभागातर्फे अल्पसंख्याकांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्यात प्रामुख्याने अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना सेवा, उद्योग, व्यवसायात रोजगार मिळवून देण्यासाठी प्रशिक्षण योजना, शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व उपस्थिती भत्ता यासारख्या कल्याणकारी योजनांचा समावेश आहे. या योजना अल्पसंख्याकांपर्यंत परिणामकारकरित्या पोहोचविण्यासाठी तात्काळ प्रयत्न व्हावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.