Leading International Marathi News Daily                                  शनिवार, ३ जानेवारी २००९

आता सर्वसामान्यांना रेसकोर्सवर प्रवेश
बंधुराज लोणे

गर्भ श्रीमंतांसाठी प्रतिष्ठेचे म्हणून ओळखले जाणारे आणि अश्वशर्यतीसाठी कोटय़वधीची उलाढाल करणारे महालक्ष्मी यथील रेसकार्स यापुढे सर्वसामान्य मुंबईकरांसाठी खुले करावे, असा प्रस्ताव पालिका सभागृहात चर्चेसाठी आला आहे. शिवाय अश्वशर्यती आणि अन्य उत्पन्नाचा काही हिस्सा पालिकेला मिळावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. या प्रस्तावावर येत्या ५ जानेवारी रोजी पालिका सभागृहात चर्चा होणार आहे. महालक्ष्मी रेसकोर्सची जागा पालिकेने ‘रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब’ला भाडे कराराने दिलेली आहे. मात्र टर्फ क्लबने ही जागा परस्पर ‘पिगॅसेस इन्स्टिटय़ूशन’ या संस्थेला भाडय़ाने दिली. यावरून पालिकेत मोठा गदारोळ झाला होता. राज्यपाल, प्रतिष्ठित नागरिक, लोकप्रतिनिधी यांनी या संदर्भात तक्रार केली होती. पालिका प्रशासन या बाबतीत ठोस भूमिका घेत नसल्याचा आरोपही करण्यात आला होता. दरम्यानच्या काळात महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी रेसकोर्सला भेट देऊन पाहणी केली होती. मात्र नंतर हे प्रकरण थंड झाले. आता पुन्हा हा विषय चर्चेला आला आहे.

वाढदिवसानिमित्त मिळालेले पैसे तिने शहीद पोलिसांच्या कुटुंबियांसाठी दिले..
प्रतिनिधी

ऐश्वर्या रघुरामन.. वय वर्षे १५.. व्हिएन्नात वास्तव्य.. सुट्टी घालविण्यासाठी मुंबईत सायनला आजीकडे आलेली.. २६ नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्याच्या बातम्या वाचताना तिचे मन सुन्न झाले.. काही तरी करावे असे तिला वाटत होते.. त्यातच पुढील महिन्यात येणाऱ्या वाढदिवसानिमित्त आजीने कपडय़ांच्या खरेदीसाठी तिला पाच हजार रुपये दिले.. हे पैसे उधळण्याऐवजी शहीद पोलिसांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय तिने घेतला..
त्यानुसार तिने थेट पोलीस आयुक्तालय कार्यालयाशी संपर्क साधला आणि आपल्याला शहीद पोलिसांच्या नातेवाईकांना मदत करायची आहे, असे सांगितले. पोलीस आयुक्तांचे विशेष अधिकारी सहाय्यक आयुक्त राजा पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा सल्ला तिला देण्यात आला. ऐश्वर्याने पवार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि शहीद पोलिसांच्या नातेवाईकांना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. ऐश्वर्याचे म्हणणे ऐकून पवारही अचंबित झाले. त्यांनी तात्काळ पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला आणि त्यांच्या कानावर हा प्रकार घातला. आयुक्तांनाही ऐश्वर्याचे कौतुक वाटले.

पासधारकांची दादागिरी; प्रवाशाला फेकून देण्याची धमकी
गुजरात एक्स्प्रेसच्या प्रथम श्रेणीतील डब्यात घडले गुंडगिरीचे दर्शन

प्रतिनिधी

अहमदाबादहून गुजरात एक्स्प्रेसने मुंबईला येणाऱ्या प्रथम श्रेणीतील प्रवाशांना, ४९१ किलोमीटरच्या या प्रवासात पासधारकांच्या दादागिरीचे ‘दर्शन’ विविध ठिकाणी घडले. या डब्यांमध्ये असलेले टीटीईदेखील लांब पल्ल्याच्या, आरक्षित तिकीट ‘कन्फर्म’ असलेल्या प्रवाशांची बाजू घेण्याऐवजी अक्षरश: बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसून आले. या प्रदीर्घ प्रवासात तर एका प्रवाशाला ‘बोईसर आने दो, वहां क्या होता है देखो, तुमको बाहर फेंक देंगे’ अशी अत्यंत दादागिरीची भाषा ऐकण्यास मिळाली. पासधारकांच्यापुढे त्या डब्यातील प्रवाशांना हतबल होण्यापलीकडे काहीच मार्ग नव्हता. बाजू घ्यायला टीसी नाही. मदतीला पोलीस नाहीत, अशा स्थितीत पासधारकांचे टोमणे ऐकत अत्यंत अवमानकारक वातावरणात प्रवास करावा लागण्याची घटना गेल्या ३१ डिसेंबरला घडली. पासधारकांच्या अडचणी, त्यांना होणारा प्रवासाचा त्रास समजू शकतो, पण म्हणून काय त्यांनी बाकीच्यांना धमकावयाचे! प्रथम श्रेणीतील प्रवासी असा जीव मुठीत घेऊन प्रवास करीत असतील तर द्वितीय श्रेणीतील प्रवाशांची काय अवस्था होत असेल याची कल्पनाच न केलेली बरी!

मुलींचे भवितव्य काय?
प्रतिनिधी : अनन्या, टुलिका, शिनी, प्रियांका.. या सगळ्या स्पर्धक एकामागोमाग एक इंडियन आयडॉलमधून बाहेर गेल्या. पक्षपातीपणे होत असलेले मतदान आजही कायम आहे. परीक्षक चिडले, त्यांनी विनंती केली, अशा प्रकारे होत असलेल्या मतदानाचा वेळोवेळी परीक्षक व निवेदक यांनी निषेध केला, तरीही प्रेक्षकांच्या मतदानात काहीच बदल झाल्याचे दिसत नाही. ‘इंडियन आयडॉल-४’च्या सुरुवातीच्या भागांत या मुलींची क्षमता पुरुष स्पर्धकांपेक्षा जास्त असल्याचे जाणवत होते. यावेळी मुलगीच इंडियन आयडॉल होणार याबद्दल सर्वांना विश्वास वाटत होता. पण शेवटच्या १० स्पर्धकांमध्ये तीनच मुलींची निवड झाल्याने ही आशा फार काळ टिकू शकली नाही. या मतदानाच्या प्रक्रियेत विशिष्ट भागातील स्पर्धकांना मते मिळतात असे अनेकदा दिसून आले आहे. पण एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर होत असलेला भेद या ठिकाणी दिसत आहे. पुरुष प्रेक्षकांपेक्षा महिला प्रेक्षक जास्त प्रमाणात मते देत असाव्यात व त्यामुळेच पुरुष स्पर्धकांना आपल्याकडे विजयश्री खेचून आणणे सोपे जाते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पुरुष प्रेक्षक मात्र त्यांना कोणती स्पर्धक आवडते यावर बोलण्यातच समाधान मानतात, मात्र मते देत नाहीत, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

यशस्विनी अभियानाची यशस्विता
ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्टय़ा सक्षम करणे आणि त्यांच्या श्रमाला आर्थिक प्रतिष्ठा मिळवून देणे हे उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे गेल्या वर्षी ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून यशस्विनी अभियानाची सुरुवात झाली. महिला बचत गटांना बळ मिळवून देण्यासाठी अभियानने कार्य करण्याचा निर्णय घेतला. महिला बचत गटांच्या पदार्थाना शॉपिंग मॉल्समध्ये स्थान मिळवून देणे, बचत गटांना अल्प व्याजदराने कर्जपुरवठा आदि महत्त्वपूर्ण बाबी अभियानच्या माध्यमातून प्रत्यक्षात आल्या असून अभियानच्या वर्षभरातील वाटचालीचा हा आढावा..

८१ मजल्यांच्या टॉवरची कहाणी
मुंबईत सर्वाधिक उंचीची (सुमारे ८१ मजले) इमारत उभी राहणार असल्याच्या वृत्ताने गेल्या आठवडय़ात सगळ्यांचेच लक्ष वेधले गेले. अर्थातच ही उत्तुंग इमारत दक्षिण मुंबईत उभी राहणार आहे. दक्षिण मुंबईत कुत्र्याच्या छत्र्यांप्रमाणे उगवलेल्या अनेक उत्तुंग इमारती दिसतात. मात्र ही इमारत म्हणे सर्वांनाच मागे टाकणार आहे. सुमारे ३०१ मीटर इतकी या इमारतीची उंची असणार आहे. त्याआधी मुंबईतील सर्वाधिक उंच इमारतीची उंची होती १८० मीटर. बडय़ा बिल्डरांना ही सगळी करामत शक्य झाली आहे ते विकास नियंत्रण नियमावली ३३ (७) मुळे. उच्च न्यायालयाने काही आक्षेप व्यक्त करीत दिलेली स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने उठविल्यानंतर आता दक्षिण मुंबईतील उत्तुंग इमारतींचे मार्ग मोकळे झाले आहेत. ८१ मजल्याची प्रस्तावीत इमारत हा त्याचाच परिपाक आहे. दक्षिण मुंबईत तब्बल दोनशे ते तीनशे उत्तुंग इमारती येत्या काही वर्षांंत उभ्या राहणार आहेत. यापैकी किती इमारती उंचीचे नवनवीन रेकॉर्ड प्रस्थापित करणार आहेत याची माहिती नसली तरी सध्या या ८१ मजली टॉवरची चांगलीच चर्चा रंगली आहे. या इमारतीला पालिका तसेच तत्सम यंत्रणांनीही हिरवा कंदिल दिला आहे.

‘लोकसत्ता यशस्वी भव’ पुस्तिका म्हणजे हमखास यश
प्रतिनिधी : ‘लोकसत्ता यशस्वी भव’ या दहावी अभ्यास मालिका पुस्तिकेचे वितरण अंघेरी पश्चिम येथील प्रगत विद्या मंदिर प्रशालेत नुकतेच करण्यात आले. या पुस्तिकेचे वाटप विद्यार्थ्यांना केल्यानंतर ‘मस्त अभ्यास, टेन्शन खल्लास.. झाकल्या मुठीत यश हमखास! हा ‘लोकसत्ता’ने दिलेला मंत्र विद्यार्थ्यांनी जरूर स्वीकारावा असे सांगून के/ पश्चिम प्रभाग समितीच्या अध्यक्षा व बृह्मुंबई महागरपालिका शिक्षण समिती सदस्या नगरसेविका ज्योत्स्ना दिघे यांनी मुलांना ‘यशवंत व्हा, गुणवंत व्हा’ असा आशीर्वादही दिला. यावेळी जयवंत महादेव परब यांचे प्रमुख मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. प्रगत विद्या मंदिर प्रशालेच्या मुख्याध्यापिका एस. जी. कशाळकर म्हणाल्या की, जीवनाच्या पुढील वळणावर यशस्वी होण्यासाठी ‘लोकसत्ता १० वी यशस्वी भव’ची साथ विद्यार्थ्यांना अतिशय हितकारी ठरेल. त्यामुळे विद्यार्थी आपली गुणवत्ता नक्कीच सिद्ध करतील असा विश्वास आहे. प्रशालेतील गणिताच्या शिक्षिका वाडकर मॅडम यांनी ‘अभ्यासक्रम व लोकसत्ता यशस्वी भव’ अशी दोन्हींचा एकत्रितपणे अभ्यास केल्यास यशाच्या वाटा कशा निर्माण होतील याचे गमक विद्यार्थ्यांना सांगितले. प्रगत विद्या मंदिर प्रशालेच्या काही विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात मनोगते व्यक्त करून ‘लोकसत्ता’चे आभार मानले. नलावडे या शिक्षकांनी संस्थेच्या वतीने तसेच शाळेच्या वतीने उपस्थितांचे आभार मानले.