Leading International Marathi News Daily                                  शनिवार, ३ जानेवारी २००९

जीवनदर्शन
अष्टांगमार्ग

बौद्ध धर्मात जातीभेदाला थारा नाही. ब्राह्मणापासून अंत्यजापर्यंत सर्व जातीच्या लोकांना व स्त्रियांनाही बुद्धाने भिक्षूसंघात प्रवेश दिला आहे. बुद्धाची शिकवण नैतिक आहे. एका माणसाने दुसऱ्या माणसाशी कसे वागावे, याबद्दलचे नियम त्यांनी घालून दिलेले आहेत. प्रज्ञा, शिल, करुणा आणि मैत्री ही त्यांची धर्माची मूलतत्त्वे मानली. दु:ख नाहीसे करण्यासाठी सम्यक् संकल्प, सम्यक् विचार, सम्यक् भावना असा अष्टांगमार्ग त्यांनी दाखवून दिला. दु:खाचे मूळ कारण तृष्णा म्हणजे लोभ व वासना हे होय. बौद्ध धर्मातील निर्वाण, ही मृत्यूनंतर प्राप्त होणारी अवस्था नाही. ‘निर्वाण’ याचा अर्थ दु:खापासून मुक्तता. माणसाने आपल्या वासनेवर विजय मिळवला तर त्याला दु:खापासून स्वत:ची मुक्तता करून घेता येते. सुखोपभोगाच्या मागे धावणारा मनुष्य स्वत:च्या आयुष्यात अधिकाधिक दु:खच निर्माण करतो. मात्र इंद्रियांना लगाम घालण्यासाठी कायाक्लेशाची आवश्यकता नाही. उपभोग आणि कायाक्लेश या दोघांनाही त्याज्य मानून निर्वाणप्राप्तीच्या उद्देशाने वैराग्याचा मध्यममार्ग अनुसरण्याचा बुद्धाने आपल्या

 

अनुयायांना उपदेश केला आहे.
जगात दु:ख आहे, ही बौद्ध धर्मातील एक मूलभूत संकल्पना आहे. जुन्या परंपरेप्रमाणे जन्म, जरा, व्याधी आणि मृत्यू ही दु:खाची कारणे मानली जातात. पण जन्म हेच तर दु:खाचे कारण मानले; तर कोणताही धर्म किंवा तत्त्वज्ञान या जगात माणसाला सुख मिळवून देऊ शकणार नाही. जरा, व्याधी आणि मृत्यू ही दु:खाची कारणे असली तरी ती नैसर्गिक आहेत. ती कुणालाही नाहीशी करता येणार नाहीत. बुद्धाने ज्या दु:खाचा विचार केला ते दु:ख नैसर्गिक कारणामुळे निर्माण झालेली नाही. त्याची कारणे सामाजिक आहेत. वर्गावर्गातील कलह हेच सामाजिक दु:खाचे मूळ कारण होय. सामाजिक अन्याय विषमता आणि संघर्ष यामधून दु:खाचा उद्भव होतो. ही कारणे नष्ट करण्याचा मार्ग बुद्धाने दाखवून दिला आहे, असा बाबासाहेबांनी बुद्धाच्या शिकवणीचा अर्थ सांगितला आहे.
नलिनी पंडित

कुतूहल
पृथ्वी फिरते का सूर्य ?

१६०९ साली गॅलिलिओने दुर्बिणीचा आकाशदर्शनासाठी वापर करून खगोल वेधात क्रांती घडवून आणली. त्याची आठवण म्हणून आज चारशे वर्षांनंतर, आपण २००९ साल हे खगोल विज्ञानाला वाहिलेले वर्ष म्हणून साजरे करतो.
दुर्बिणीचा वापर हा गॅलिलिओच्या प्रयोगांवर भर देण्याच्या प्रवृत्तीचा एक नमुना! त्याकाळी तत्ववेत्ते शाब्दिक वादांत अडकून पडायचे तर गॅलिलिओ ‘‘केवळ शाब्दिक चर्चा सोडा आणि प्रत्यक्ष पुरावा पहा’’ असे म्हणून वादाचा निकाल, योग्य प्रयोग करून, ठरवीत असे. ‘पुराव्याशिवाय विधान करू नये’ ह्य़ा मताचा तो कट्टर समर्थक होता.
कोपर्निकसच्या कार्याने त्याकाळी लोकप्रिय असलेल्या ‘पृथ्वीकेंद्रित सिद्धांता’ला धक्का बसला होता. त्यानंतर जवळजवळ शतक उलटले तेव्हा गॅलिलिओने कोपर्निकसचा पाठपुरावा करायला सुरवात केली. पृथ्वी स्थिर असून सूर्य आणि इतर खगोलीय पिंड तिच्या भोवती फिरतात हा समज म्हणजे पृथ्वीकेंद्रित सिद्धांत. तर कोपर्निकसच्या मते अंतराळात इतर ताऱ्यांच्या पाश्र्वभूमीवर सूर्य स्थिर असून पृथ्वीसकट इतर ग्रह, उपग्रह आदी त्याच्या भोवती फिरतात.
जेव्हा गॅलिलिओने कोपर्निकसचे समर्थन केले तेव्हा धर्ममार्तडांनी त्यावर आक्षेप घेतला. पृथ्वीकेंद्रित सिद्धांताला धार्मिक समर्थन होते तर सूर्यकेंद्रित सिद्धांताच्या प्रचारावर बंदी होती. ही बंदी न जुमानल्यामुळे गॅलिलिओवर धार्मिक खटला (इन्क्विजिशन) भरण्यात आला. खटल्यादरम्यान त्याला विचारण्यात आले,‘‘पृथ्वी जर फिरतेय तर तिच्या गतीचा पुरावा कोणता?’’ ह्य़ावर गॅलिलिओने दिलेले उत्तर चुकीचे होते! तो म्हणाला की समुद्राला भरती-ओहोटी येते कारण फिरणाऱ्या पृथ्वीवर तो हेंदकाळतो. वास्तविक भरती ओहोटीचे कारण चंद्र-सूर्याचे गुरुत्वाकर्षण हे आहे. पण गुरुत्वाकर्षणाचा नियम मांडला जाऊन प्रस्थापित व्हायला अजून काही दशकांचा अवधी होता. मात्र धर्ममार्तडांना गॅलिलिओच्या स्पष्टीकरणात मुळातच रस नसल्याने त्यांनी त्याच्या विधानांकडे दुर्लक्ष केले.
मग पृथ्वी फिरते, सूर्य स्थिर असतो हे कसे सिद्ध करायचे? त्याचे दोन पुरावे आज उपलब्ध आहेत. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असेल तर आज आणि सहा महिन्यांनी तिची अंतराळातली जागा बदलेल. त्याचप्रमाणे तिच्या गतीची दिशा पण उलटी होईल. या दोनही कारणांमुळे सभोवतालच्या तारामंडलातल्या ताऱ्यांची दिशा बदलते. जर पृथ्वी स्थिर असेल तर हे परिणाम शून्य असतील. गॅलिलिओच्या काळात दिशेतला सूक्ष्म बदल मापणे शक्य नव्हते. पण अठराव्या आणि एकोणीसाव्या शतकांत हे परिणाम मोजणे शक्य झाले..आणि ते शून्य नव्हते! म्हणजे पृथ्वी खरोखर फिरते आहे हे सिद्ध झाले.
जयंत नारळीकर
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दिनविशेष
डॉ. य. दि. फडके

शिवशाहीपासून सुरू होऊन पेशवाईत संपणाऱ्या महाराष्ट्राच्या इतिहासाला चौकटीतून बाहेर काढण्याचे काम करणाऱ्या डॉ. य. दि. फडके यांचा जन्म ३ जानेवारी १९३१ चा, सोलापूरातला. पत्रकार ते इतिहासकार असा त्यांचा प्रवास. ‘संयुक्त महाराष्ट्र’ हाच डॉक्टरेटचा विषय. इतिहास लेखनाची वेगळी वाट चोखाळण्याची जबरदस्त इच्छा असणाऱ्या यदिंनी पत्रकारिता आणि अध्यापन या दोन्ही क्षेत्रातून स्वत:ची लवकर सुटका करून घेत सबळ पुराव्याशिवाय लिहायचे नाही असा खाक्या अंगी बाणवत महाराष्ट्राच्या इतिहासाचे नवे दालन साकारले. जेधे, जवळकर, ??लढ्ढे?? हे बहुजनांचे नेते महाराष्ट्राला परिचित झाले ते यदिंच्या ‘२० या शतकातील महाराष्ट्र’ या आठ खंडांच्या लेखनामुळे. हा खटाटोप सार्थ करण्यासाठी पदरमोड करीत यदि महाराष्ट्रभर कागदपत्रे गोळा करीत फिरले. सीमाप्रश्नाबाबतच्या त्यांच्या भूमिकेचे पडसाद साऱ्या भारतभर गाजले. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा सन्मान त्यांना लाभला. ‘अग्निदिव्य’ हे नाटक पाहण्यासाठी गेले असतानाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने ११ जानेवारी २००८ रोजी ते गेले. महाराष्ट्राचा चालताबोलता इतिहासकाळ अनंतात विलीन झाला.
संजय शा. वझरेकर

गोष्टडॉटकॉम
जंगलातली गंमत

सुट्टीत आजोळी आलेल्या विनायक आणि राणीला आजोबा म्हणाले, ‘मी जंगलात लाकडे गोळा करायला चाललोय. येता का बरोबर? कितीतरी गमती असतात जंगलात.’ विनू आठ वर्षांचा आणि राणी होती दहा वर्षांची. राणीचा हात ओढत, उडय़ा मारत विनू ओरडला, ‘‘कित्ती मजा. चल ना ताई.’’ राणीला भीती वाटली. ‘तू जा हवं तर. मी इथेच खेळेन’, ती म्हणाली. आजोबांनी घोडागाडी बाहेर काढली. विनू एक पाय लोंबता ठेवून गाडीचा कठडा घट्ट पकडून बसला. घोडी पळू लागली. विनू कविता म्हणायला लागला आजोबांनी त्याच्या आवाजात आवाज मिसळला.
जंगली झाडांचा मंद, गोडुस वास येऊ लागला. हमरस्ता सोडून गाडी आड वाटेला वळली. प्रकाश कमी झाला. उंच झाडांची गर्दी झाली. ओढय़ाशी गाडी थांबवून आजोबांनी विचारले. ‘‘पाणी प्यायचे आहे विनू?’’ विनूने गाडीतून उडी मारली. ओढय़ाचे पाणी स्वच्छ होते. मासे सुर्रकन इकडून तिकडे जात होते. वरचे पाणी बाजूला सारून स्वच्छ पाणी ओंजळीने कसे प्यायचे ते आजोबांनी दाखवले. पण तोडांपर्यंत नेईतो त्याच्या ओंजळीतून पाणी झिरपले. घोडी पाण्यात तोंड घालून पाणी प्यायची. एक माकड झाडावरून उतरले अन् दोन्ही हात गवतात ठेवून वाकून त्यानं पाण्याला तोंड लावलं. आपण पाणी कसं प्यावं? विनू विचार करू लागला. खाचखळग्यांतून गाडी जात होती. तोल सांभाळताना विनूची त्रेधा उडाली. करडा ससा गाडीच्या आवाजाने घाबरून दूर पळाला. पक्ष्यांचा गोंधळ होता. शीळ घातल्याचा, कुजबुजीचा आवाज ऐकून विनू फार घाबरला. ‘‘अरे वाऱ्याच्या झुळुकीने फांद्या घालून होतोय तो आवाज’’ आजोबा हसून म्हणाले. एका ठिकाणी गाडी थांबवून आजोबांनी साठवून ढीग केलेली लाकडे दोघांनी गाडीत भरली. तिथे जमिनीवर विनूला अंडी दिसली. आजोबा म्हणाले, चितूर पक्षीण जमिनीत घरटं करून अंडी घालते. भुकेले प्राणी ती खाऊन टाकतात.
लाल, पोपटी, पिवळसर असे जंगलाचे रंग बघत संध्याकाळच्या गूढ वातावरणात त्यांची गाडी परतीला लागली. ‘पुन्हा याल तेव्हा मी राणीला नक्की आणेन.’- विनू म्हणाला. आपण सारे निसर्गाचाच भाग असतो. निसर्ग न्याहाळला तर खूप शिकायला मिळते. बागेत, वनात, जंगलात सहल करून निसर्गापासून काय शिकलात ते लिहा.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com