Leading International Marathi News Daily                                  शनिवार, ३ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

मोरबेचे पाणी मुंबईकरांसाठी दिवास्वप्नच!
जयेश सामंत
मुंबईकरांची तहान भागविण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणाची आस लावून बसलेल्या मुंबई महापालिकेला सध्या तरी पाणी देणे शक्य नाही, अशी स्पष्ट भूमिका नवी मुंबई महापालिकेने घेतली आहे. मुंबईसह ठाणे तसेच मीरा-भाईंदर महापालिकेनेही मोरबे धरणाचे पाणी विकत घेण्याची तयारी दाखविली आहे. असे असले तरी नवी मुंबईची सध्याची पाण्याची गरज लक्षा घेता अशा स्वरुपाचा कोणताही प्रस्ताव स्वीकारणे आम्हाला सध्या तरी शक्य नाही, अशी स्पष्ट भूमिका नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त विजय नहाटा यांनी वृत्तान्तशी बोलताना मांडली. मोरबे धरणाचे पाणी मिळावे, अशा स्वरुपाचा कोणताही प्रस्ताव अधिकृतपणे मुंबई महापालिकेने आमच्यापुढे मांडलेला नाही, तसेच अशा स्वरुपाचा प्रस्ताव मांडला गेला, तरी पुढील वर्षभर तरी त्यावर विचार करणे आम्हाला

 

शक्यच नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

ऐरोलीकरांसाठी वाचनालय आणि व्यायामशाळा
नवी मुंबई / प्रतिनिधी
ऐरोली सेक्टर १४ आणि १५ मधील रहिवाशांसाठी नवी मुंबई महापालिकेतर्फे लवकरच अद्ययावत असे वाचनालय आणि व्यायामशाळा उभारण्यात येणार आहे. या परिसरातील राष्ट्रवादी कांॅग्रेसचे नगरसेवक अशोक पाटील यांच्या पुढाकाराने या प्रकल्पांची उभारणी केली जाणार असून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत या दोन्ही कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळाही मोठय़ा उत्साहात संपन्न झाला. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर ऐरोली मतदारसंघातील महत्त्वाचे उपनगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐरोली उपनगरातील वेगवेगळ्या नागरी कामांवर सध्या सर्वच राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रित केले आहे. या पाश्र्वभूमीवर सेक्टर १४ आणि १५ येथील रहिवाशांकरिता महापालिकेच्या पुढाकाराने उभारण्यात येणारी वाचनालय तसेच व्यायामशाळेचा प्रकल्प या भागात महत्त्वाचा मानला जात आहे. सुमारे ६० लाख रुपये खर्चून हे दोन मोठे प्रकल्प उभे केले जाणार आहेत, अशी माहिती महापालिकेचे शहर अभियंता मोहन डगावकर यांनी पत्रकारांना दिली. उद्घाटनप्रसंगी ऐरोली भागातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक एम.के.मढवी तसेच अनंत सुतार हेदेखील उपस्थित होते. यावेळी प्रभागातील गरीब व गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. तसेच प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री नाईक यांनी पाटील यांच्या कार्याचा गौरव केला.

चोरीच्या घटनांत वाढ
बेलापूर/वार्ताहर
नवी मुंबई परिसरात गर्दीच्या ठिकाणी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचणे, बंद घराचे कुलूप तोडून आतील रोख रक्कम, सोने व अन्य किमती वस्तूंची चोरी करण्याच्या प्रकारात गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली आहे. या वाढत्या चोरीच्या प्रकारांमुळे पोलिसांची गस्त निष्प्रभ ठरत असल्याचे चित्र शहरात आहे. खारघर, कळंबोली, नेरुळ येथील अनुक्रमे प्रल्हाद साबळे, दीपा कंदर, सुर्योधन रेड्डी यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरटय़ांनी आतील एक लाख २७ हजार रुपयांचा ऐवज चार दिवसात चोरून नेला. तसेच नेरुळ व वाशीतील अनुक्रमे निर्मला चौधरी, लुईजा पिंटो, खुळे या रस्त्यावरून जाताना चोरटय़ांनी त्यांच्या गळ्यातील एकूण ८२ हजार रुपये किमतीची मंगळसूत्रे चोरून नेली. भरदिवसा होत असलेल्या या चोऱ्यांमुळे दागिने घालून घराबाहेर जाणे महिलांना असुरक्षित होऊन बसले आहे.

जबरी चोरी करणारी टोळी अटकेत
बेलापूर/वार्ताहर
तुर्भे औद्योगिक परिसरातील एका कंपनीत जबरी चोरी करणाऱ्या टोळीस पोलिसांनी नुकतीच अटक केली. सिमॅटिक इंजिनीअरिंग कंपनीत पहाटे शिरवणे गाव व जुईनगर येथे राहणाऱ्या पाच चोरटय़ांनी प्रवेश केला. सदर कंपनीचा रखवालदार राकेश तिवारीला चाकूचा धाक दाखवून गोदामात बांधून ठेवले. नंतर कंपनीतील चार लाख २० हजार रुपये किमतीची कॉपर केबल चोरून नेली. पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून, फरारी आरोपी जमाल व राजू यांचा शोध सुरू आहे.

आरक्षणासाठी गुज्जरांपेक्षा तीव्र आंदोलन मराठा समाजाचा इशारा
पनवेल/प्रतिनिधी
राज्य सरकारने मराठा समाजाचा ओबीसी वर्गात त्वरित समावेश न केल्यास राजस्थानातील गुज्जर आंदोलनापेक्षा उग्र आंदोलन मराठा समाज छेडेल व शक्तिप्रदर्शन करेल, असा इशारा मराठा समन्वय समितीचे रायगड जिल्हाध्यक्ष विनोद साबळे यांनी आज येथे दिला. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आमदार विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली किल्ले रायगडावरून ४ जानेवारीपासून जनजागृती संपर्क यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये साबळे बोलत होते. मराठा समाजाला आरक्षण देण्याची आवश्यकता नाही, असा अहवाल राज्य सरकारला देणाऱ्या बापट आयोगाचा आम्ही निषेध करतो. आमच्या समाजाला शिक्षण क्षेत्रात व नोकऱ्यांमध्ये २५ टक्के आरक्षण मिळावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आमची मागणी व आंदोलन सध्या लोकशाही मार्गाने आहे, परंतु सरकारने या मागण्या मान्य न केल्यास आम्हाला शक्तिप्रदर्शन करावे लागेल व त्यानंतर गुज्जर आंदोलनापेक्षा अधिक भडका उडेल, असा इशारा साबळे यांनी दिला.

ग्रामीण रुग्णालय ‘उदार’, पनवेल फेस्टिव्हलला ‘आधार’!
पनवेल/प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ पनवेलतर्फे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या पनवेल फेस्टिव्हलसाठी अत्यल्प भाडे आकारण्यात आल्याने ग्रामीण रुग्णालयाचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या पनवेल शाखेचे उपप्रमुख चंद्रशेखर सोमण यांनी केला आहे. त्यांनी याबाबत पनवेल ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षकांना पत्र लिहिले असून, रोटरी क्लबकडून अतिरिक्त भाडे वसूल करण्याची मागणी केली आहे. मात्र ग्रामीण रुग्णालयाने रोटरी क्लबकडून आकारलेले भाडे योग्य व नियमानुसार असल्याचा दावा या वैद्यकीय अधीक्षकांनी केला आहे. नगरपालिका कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या नित्यानंद मार्गावर पनवेल ग्रामीण रुग्णालयाचा आरक्षित भूखंड आहे. गेली अनेक वर्षे पनवेल फेस्टिव्हलचे आयोजन करणाऱ्या रोटरी क्लबने दोन वर्षांंपासून हा फेस्टिव्हल या भूखंडावर भरविला. मात्र १५-१६ दिवसांसाठी हा भूखंड भाडय़ाने देताना ग्रामीण रुग्णालयाने केवळ पाच हजार रुपयांची आकारणी केली. यावर ग्राहक संरक्षण कक्षाने आक्षेप घेतला असून खासगी सभागृहे व मैदाने यांचे रोजचे भाडे लक्षात घेता रोटरी क्लबकडून किमान २५ हजार रुपये भाडे आकारणे गरजेचे होते, असे सोमण यांनी म्हटले आहे. नियोजित रुग्णालयाचा भूखंड व्यावसायिक वापर करण्यासाठी देणे चुकीचे असून तरीही एखाद्या संस्थेला हा भूखंड वापरण्यासाठी दिल्यास त्यांच्याकडून व्यावसायिक दराने भाडे घ्यावे व हे भाडे रुग्णालयाच्या पी. एल. ए. फंडात (स्वीय प्रपंजी खाते) जमा करावे. हा फंड वाढल्यास दुरवस्थेत असणाऱ्या या रुग्णालयाची प्रकृती सुधारेल व गरीब रुग्णांना त्याचा लाभ मिळेल, याकडे सोमण यांनी लक्ष वेधले आहे.

एका मिनिटात ३८ पाणीपुऱ्या फस्त
पनवेल/प्रतिनिधी:

कर्नाळा स्पोर्टस् अ‍ॅकॅडमीतर्फे नुकत्याच झालेल्या १० व्या कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवातील झटपटखाना या स्पर्धेत पनवेलमधील पत्रकार वसीम पटेल यांनी एका मिनिटात ३८ पाणीपुऱ्या खाऊन स्वत:चाच विक्रम मोडला. यापूर्वी या स्पर्धेत त्यांनी एका मिनिटात ३५ पाणीपुऱ्या खाल्ल्या होत्या. या विक्रमाबाबत पटेल यांचे आमदार विवेक पाटील, बाळाराम पाटील आदी नेत्यांनी अभिनंदन केले आहे.