Leading International Marathi News Daily                                  शनिवार, ३ जानेवारी २००९


धुळे बाजार समितीत तुरीची आवक मोठय़ा प्रमाणावर होत असून ग्रामीण भागातून बैलगाडी तसेच ट्रॅक्टरमधून येणारा माल बाजार समितीत उतरविण्यात आल्यानंतर पोत्यांमध्ये मजुरांकरवी धान्य भरण्यात येते.
छाया : मनेश मासोळे, धुळे

पर्यावरण अन् संस्कृतीशी नाळ जोडणारे शिक्षण गरजेचे
वार्ताहर / जळगाव
जग आता एक खेडे बनले आहे. जागतिकीकरणाची स्पर्धा केवळ उद्योग व्यवसायापुरती मर्यादित राहिली नसून शिक्षणक्षेत्र देखील ढवळून निघत आहे. यातून सावरण्यासाठी मग पाश्चिमात्य शिक्षणप्रणालीचे अंधानुकरण करण्यापेक्षा पर्यावरण आणि संस्कृतीशी नाळ जोडणारे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळणे गरजेचे आहे, असे आग्रही मत डॉ. भवरलाल जैन यांनी ‘वृत्तान्त’ शी बोलताना व्यक्त केले. डॉ. जैन यांनी दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘अनुभूती’ या निवासी शाळेतील विद्यार्थ्यांनी अल्पावधीतच पर्यावरणासंदर्भात आपली चुणूक दाखवत अखिल भारतीय पातळीवरचा ‘ग्रीन स्कूल’ बहुमान शाळेला प्राप्त करून दिला. त्या पाश्र्वभूमीवर बोलताना जैन यांनी प्रचलीत शिक्षणाबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली.

जळगाव जिल्ह्य़ात सोनोग्राफी केंद्रांवर छापे
दोन केंद्रांना सील, ४० डॉक्टरांना नोटीस

वार्ताहर / जळगाव

जिल्ह्य़ातील मुलींचे घटलेले प्रमाण पाहता आणि या गंभीर विषयावर राष्ट्रपतींकडून चिंता व्यक्त करण्यात आल्यानंतर जिल्हाअधिकारी कुणाल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्य़ातील १५० सोनोग्राफी केंद्रांवर एकाच वेळी छापा टाकण्यात आला. या कारवाईत जळगाव आणि चोपडय़ातील दोन केंद्रांना सील ठोकण्यात आले असून ५१ केंद्रांसह ४० डॉक्टरांना नोटीस बजाविण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. नववर्षांच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासन, जिल्हा रुग्णालय, पोलीस आणि जिल्हा परिषदेच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले. आढावा बैठक असावी असा साऱ्यांचा अंदाज असताना जिल्हाधिकाऱ्यांनी १५ पथकांमध्ये अधिकाऱ्यांची विभागणी केली.

मंदीच्या लाटेतही कामगार संघटनांचा ‘उद्योग’ तेजीत
नाशिकला उद्योगनगरीचा दर्जा बहाल करण्यात येथे असणाऱ्या निरनिराळ्या ऑटोमोबाईल प्रकल्पांचा मोठा हातभार आहे. तथापि, मंदीच्या पाश्वभूमीवर सध्या बहुसंख्य उद्योग संकटात सापडले असून ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला तर त्याचा तडाखा सर्वाधिक बसला आहे. परिणामी, नाशिक व परिसरातील उद्योग विश्वावर अवकळा पसरु लागली आहे. अशा परिस्थितीत स्थानिक उद्योग क्षेत्राला दिलासा देण्यासाठी नेमके काय करणे शक्य आहे, त्याबाबत कोणत्या उपाययोजना तातडीने हाती घ्यायला हव्यात याविषयी अपेक्षा व्यक्त करतानाच नाशिकच्या एकूणच उद्योग क्षेत्राचा नाशिक इंडस्ट्रीज् अँड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे (निमा) माजी अध्यक्ष अभय कुलकर्णी यांनी मांडलेला लेखाजोखा..

केवळ सप्ताहाची औपचारिकता नको!
नाशिक, मालेगाव असो, जळगाव असो वा धुळे, उत्तर महाराष्ट्रातील या बडय़ा शहरांमधील वाहतुकीच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. कोणत्याही शहराच्या उद्योग व औद्योगिक क्षेत्रात वाढ होत असेल तर त्याचा शहराची कायदा व सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्था, पाणी पुरवठा अशा सर्वच व्यवस्थांवर प्रतिकूल परिणाम होत असतो. दुर्देवाने शहरांची वाढ झपाटय़ाने होत असली तरी वाढीचा हा बोजा सहन करण्यासाठी अशा व्यवस्था बळकट करण्याकडे वेळीच लक्ष दिले जात नाही. त्यामुळे या समस्या अधिकच उग्र होत जातात. या समस्या कशा सोडवाव्यात, या चक्रव्यूहातून बाहेर पडणे यंत्रणेलाही अशक्य होत जाते. मग वर्षांतून एखाद्या सप्ताहाचे आयोजन करून तात्पुरत्या स्वरूपाची डागडुजी करण्यावरच धन्यता मानण्यात येते.

नाशिकमध्ये ‘तांदूळ महोत्सव’
प्रतिनिधी / नाशिक

अखिल भारतीय ग्राहक पंचायती मार्फत ग्राहक संपर्क अभियानातंर्गत ग्राहकांना दर्जेदार व रास्त किंमतीत तांदूळ उपलब्ध करून देण्यासाठी ९ ते १८ जानेवारी या कालावधीत येथील जुन्या पंडित कॉलनीतील लायन्स क्लब हॉलमध्ये ‘तांदूळ महोत्सव २००९’ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात नवा कोहिनूर, बासमती, दुबार, तिबार, आंबेमोहोर, कालीमुच्छ, दूधमलाई, सुरती कोलम, इंद्रायणी, कोळपी, हातसडी, चिनोर, कमोद अशा अनेक प्रकारांसोबत नवीन तूरडाळ फटाका, तूरडाळ, कोकणी, मूगदाळ आणि ग्राहकांच्या मागणीवरून उडदाची डाळ खास एक किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विक्री दुपारी तीन ते सायंकाळी साडेआठ या वेळेत होणार आहे. अधिक माहितीसाठी ेसंपर्क : ९३२५३८३०६५, २३११४१२.