Leading International Marathi News Daily                                  शनिवार, ३ जानेवारी २००९

दाऊद आणि परेशमध्ये साधम्र्य काय?
तीस वर्षांपूर्वी रेल्वेत पोर्टर असणारा परेश बरूआ आज धनाढय़ उद्योगपती झाला आहे! तो राहातो ढाक्यात; पण स्फोट घडवतो गुवाहाटीत. बांगलादेशातील दहशतवाद्यांशी तर त्याचे साटेलोटे आहेच आणि चीनमधील काही गटांचाही पाठिंबा आहे. हे सगळेजण एकत्र काम करीत असताना त्यांना त्यांचा धर्म आडवा येत नाही. परेश हिंदूू असल्यामुळे ‘आयएसआय’च्या त्याच्या मुस्लिम मित्रांना तो परका वाटत नाही किंवा चीनमधील कडव्या डाव्यांनाही त्यामुळे फरक पडत नाही. कारण त्या सर्वाना जे करायचे आहे, ते धर्माच्या पलीकडे आहे. ‘दहशतवाद’ हा एकच ‘आदर्शवाद’ या सर्वाना ठाऊक आहे आणि त्याच्या जोरावर स्वत:च्या पोळ्या कशा भाजून घ्यायच्या हेही नीट समजलेले आहे. त्यामुळेच तर ‘उल्फा’चा परेश बरूआ एलटीटीईच्या प्रभाकरनची गुप्त भेट घेऊ शकतो किंवा चंद्रपूर-गडचिरोलीतील नक्षलवाद्यांना छुपा संदेश पाठवू शकतो. दाऊद इब्राहिम कराचीत कसा मस्त उंडारतो हे ठाऊक असणाऱ्यांनी परेशच्या ढाक्यातील घराचे वर्णन एकदा वाचावे! म्हणजे मग दाऊद आणि परेश यांच्यात असणारे समान सूत्र लक्षात येते. दहशतवादाची परिभाषा मग खऱ्या अर्थाने समजते. आपण दहशतवादाला जात-धर्म-वंश वगैरे चिकटवत असतो. मात्र, ही सगळी लेबल्स किती तकलादू आहेत, हे लक्षात येण्यासाठी तरी उल्फा, नक्षलवादी, एलटीटीई, आयएसआय, तालिबान यांचा एकदा अभ्यास करायला हवा!

गरज चित्रपट शिक्षणाची
आपण सगळेच चित्रपट पाहत असतो. मुलांना कळू लागतं तेव्हा त्यांना गाण्यांच्या ओळी, कलाकारांची नावं कळतात. एखादं छायाचित्र पाहून मुलं ते कोणत्या चित्रपटातलं आहे ते ओळखू लागतात. मुलांच्या ‘दृश्य स्मृती’ आणि ‘श्रवण स्मृती’ तयार होण्याचा हा काळ म्हणजेच ‘प्राथमिक समज’ तयार होण्याची प्रक्रिया असते. पुढे मुलांचं शिक्षण, ज्ञान, समज, आकलन जसं जसं वाढत जातं तसं त्यांची स्वत:ची एक दृष्टी तयार होते. ही ‘दृष्टी’ म्हणजेच त्या त्या व्यक्तीची अभिरुची असते. ‘अभिरुची’ या शब्दांचा सोपा अर्थ जरी आवड असा असला तरी व्यापक अर्थानं ‘अभिरुची’चा संदर्भ जोडला जातो तो कलांच्या, वाचनाच्या आस्वादनाशी. ‘आस्वादनाची पातळी’ म्हणजे अभिरुची असं म्हणता येईल. व्यक्ती म्हणून जडणघडण होताना जे वातावरण लाभतं, जी मित्रमंडळी लाभते, जे मार्गदर्शन लाभतं त्यातूनच आपली अभिरुची तयार होते.

अनधिकृत बांधकामांच्या कॅन्सरवर समित्यांची मात्रा बेअसर!
अनधिकृत बांधकामाच्या कॅन्सरची ठाणे जिल्ह्याला लागण झाली आहे. त्याच्या उपचारासाठी राज्य शासनाने अनेक समित्या नेमल्या. परंतु उपचार करतेवेळी समित्यांनी सुचविलेल्या कडक पथ्याकडे शासनाने अनेक वर्षे पाठ फिरविल्याने अनधिकृत बांधकामाचा रोग असह्य झाला आहे. राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी शासकीय चौकशी समित्या या फार्स ठरू लागल्या आहेत. त्यात ठाण्यासाठी नुकत्याच नेमलेल्या नगरविकास सचिव बेंजामिन समितीची भर पडली आहे. या समित्या आणि अनधिकृत बांधकामांचा आढावा घेतला असता या बांधकामांवर नियंत्रण मिळविणे शक्य नसल्याचे दिसून येते.