Leading International Marathi News Daily                                  शनिवार, ३ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

देहूरोडमध्ये झोपडपट्टीवर कारवाई
संतप्त नागरिकांची नगरसेवकाच्या घरावर दगडफेक

 

देहूगाव, २ जानेवारी / वार्ताहर
लष्कराच्या जागेतील शितळानगर झोपडपट्टीवर देहूरोड कँन्टोन्मेंट बोर्डाने केलेल्या अतिक्रमण कारवाईत ऐंशी झोपडय़ा पाडण्यात आल्या. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी नगरसेवकाच्या घरावर केलेल्या दगडफेकीत एक मुलगा किरकोळ जखमी झाला असून वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडीयर आर. एस. राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पवार, उपाध्यक्ष अशोक शेलार व सदस्य अली शेख, संजय पिंजण, के. सी. बिडलान आदी स्वत: या कारवाईच्या वेळी उपस्थित होते.
ब्रिगेडीयर राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई पूर्वनियोजित होती. येथील सर्व रहिवाशांना आम्ही पर्वीच नोटीसा बजावल्या होत्या. त्यानुसार गेल्या आठ दिवसांपासून शितळानगर झोपडपट्टी भागात बोर्डाने ध्वनिक्षेपकावरून अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यात नागरिकांनी स्वत:हून अतिक्रमणे काढण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार काही नागरिकांनी बऱ्यापैकी प्रमाणात प्रतिसाद दिला.
सकाळी अकराच्या सुमारास ब्रिगेडियर राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू करण्यात आली.
अतिक्रमणे काढण्यासाठी बोर्डाने कचरा उचलण्याच्या डंपरचा वापर करून पत्रा शेडच्या झोपडय़ा, पक्की घरे, काही कच्ची घरेही पाडली.
काही लोकांनी मात्र आपल्या झोपडय़ांतील साहित्य स्वत:हून काढून घेतले.
कारवाई सुरू असतानाच काही झोपडीधारकांनी आपण ही जागा पाच ते दहा हजार रुपयांना विकत घेतल्याचे सांगत होते ,तर काही जणांनी जागा भाडय़ाने घेतल्याचे कबूल केले, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पवार यांना दिली.
शितळानगर झोपडपट्टी अनेक दिवसांपासून येथे वसलेली आहे, मात्र लष्कराच्या जागेवरील अतिक्रमणे काढण्याचे काम कोणत्याही अधिकाऱ्याने केलेले नव्हते. त्यामुळे येथील झोपडपट्टी दिवसेंदिवस वाढत गेली. अलीकडे काही दिवसांत झोपडय़ा वाढत चालल्या होत्या. त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.
दरम्यानच्या काळात आपली घरे पाडली जात असल्याचे पाहून येथील महिला संतप्त झाल्या. त्यांना ही कारवाई करण्यास येथील स्थानिक नगरसेवक संजय राऊत यांनी सांगितले असावे, असा संशय असल्याने राऊत यांच्या घरावर दगडफेक केली. यावेळी राऊत यांच्या घरात त्यांचे चौघे नातेवाईक होते.
सुदैवाने नगरसेवक राऊत घरात नसल्याने ते बचावले, या दगडफेकीत राऊत यांच्या घराच्या आवारातील एक मालट्रक, सुमो, आणि मोटारकारचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे काही काळ येथील वातावरण तणावपूर्ण होते. या कारवाईत देहूरोड पोलीस स्टेशनचे निरीक्षक महेश सावंत, पोलीस उपनिरिक्षक बबन मोहदुळे आणि पंचवीस कर्मचारी सहभागी झाले होते. रात्री येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस पथक तैनात केले होते.