Leading International Marathi News Daily                                  शनिवार, ३ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

सर्वसाधारण कर वगळता अन्य सर्व करांमध्ये वाढीचा प्रस्ताव

 
पुणे, २ जानेवारी/प्रतिनिधी
आगामी आर्थिक वर्षांत सर्वसाधारण कर वगळता पाणीपुरवठा, सफाई, करमणूक, अग्निशमन आदी अन्य सर्व करांमध्ये मोठी वाढ करण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी मांडला असून मोटारी वापरणाऱ्या पुणेकरांना पुढील वर्षांपासून नव्याने दहा टक्के इतका ‘पथकर’ लावण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव आहे.
सन २००९-१० या आर्थिक वर्षांसाठी मिळकत कर, करमणूक करासह अन्य करांच्या दरास कायद्यानुसार २० फेब्रुवारीपूर्वी मुख्य सभेची मान्यता घ्यावी लागते. त्यानुसार, महापालिका आयुक्तांनी कर रचनेचा नवीन प्रस्ताव स्थायी समितीला सादर केला असून समिती व मुख्य सभा त्याबाबत काय निर्णय घेते, हा आता औत्सुक्याचा विषय होणार आहे.
आयुक्तांच्या कराच्या प्रस्तावात सर्वसाधारण कराचे दर चालू वर्षांप्रमाणेच (२००८-०९) ठेवण्यात आले आहेत. वार्षिक करपात्र रकमेनुसार सध्या १४ ते ३८ टक्के इतका सर्वसाधारण कर आहे. या करात कोणतीही वाढ प्रस्तावित करण्यात आलेली नाही. मात्र, इतर करांमध्ये आयुक्तांनी मोठी वाढ प्रस्तावित केली आहे.
पाणीपुरवठा करणारी आवश्यक सामग्री, रसायने, औषधे, तसेच विजेच्या दरात वाढ झाल्यामुळे पाणीपुरवठा खर्चातही वाढ झाली आहे. परिणामी, सरसकट वार्षिक करपात्र रकमेच्या प्रमाणात संपूर्ण शहरात पाणीपट्टीच्या दरात वाढ सुचविण्यात आली आहे. याबरोबरच जुन्या मिळकतींना दिल्या जात असलेल्या सुविधा लक्षात घेऊन अशा मिळकतींना सध्या जी ५५० रुपये इतकी पाणीपट्टी आकारली जाते, ती ७५० करण्याचा प्रस्ताव आहे. पूरग्रस्त वसाहतींची (धनकवडी, बिबवेवाडी पुनर्वसन, तसेच झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत विकसित झालेल्या मिळकती) पाणीपट्टी एकवट ३०० वरून ४५० प्रस्तावित करण्यात आली आहे.
पाणीपुरवठा व मलनिस्सारण विषयक विकासकामे, तसेच त्यावरील देखभाल-दुरुस्तीचा खर्च विचारात घेऊन जललाभ कर व जलनिस्सारण कराच्या दरातही वाढ सुचविण्यात आली आहे. जललाभकर दोन वरून चार टक्के, तर जलनिस्सारण कर चार वरून आठ टक्के करण्याचा प्रस्ताव आहे, तसेच सफाईपट्टी १३ टक्क्य़ांवरून १५ टक्के प्रस्तावित करण्यात आली आहे.
वार्षिक करपात्र रकमेवर सध्या ०.७५ टक्के इतका अग्निशामक कर आहे, तो दोन टक्के करण्याचा आयुक्तांचा प्रस्ताव आहे. वृक्षकर एक टक्का असून तो आहे इतकाच ठेवण्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. शहरातील मिळकतींवर नव्याने ‘शिक्षण उपकर’ लावण्याचाही प्रस्ताव असून तो वार्षिक करपात्र रकमेच्या २ टक्के इतका असेल. माहिती तंत्रज्ञान विषयक कंपन्यांना सध्या कराचा दर दोन रुपये ६० पैसे इतका आहे. तो तीन रुपये ३६ पैसे इतका प्रस्तावित करण्यात आला आहे.
समाविष्ट गावांतही करवाढ
महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या तेवीस गावांनाही करवाढीचा फटका बसणार असून गावांच्या पाणीपट्टीत वाढ सुचविण्यात आली आहे. करपात्र रकमेनुसार, निवासी मिळकतींकडून सध्या ९०० ते २,५०० इतकी पाणीपट्टी आकारली जाते. ती १,३५० ते ३,८०० इतकी वाढविण्याचा प्रस्ताव आहे. तर बिगर निवासी मिळकतींची पाणीपट्टी ५०० ते १,००० वरून ७५० ते १,५०० करण्याचा प्रस्ताव आहे. ज्या भागांत पाणीपुरवठाविषयक कामे झालेली नाहीत, तसेच जेथे टँकरमार्फत पाणीपुरवठा केला जातो, अशा भागातील मिळकतधारकांकडून ५७५ रुपये इतकी पाणीपट्टी घेतली जाते, ती ८६० इतकी करण्याचा प्रस्ताव आहे.
करमणूक करातही वाढ
चित्रपटगृह, नाटय़गृह, बहुपडदा चित्रपटगृह, वातानुकूलित चित्रपटगृह, संगीत जलसे यांना सध्या प्रतिखेळ ४० ते १०० रुपये इतका करमणूक कर आकारला जातो. तो ६० ते २०० रुपये प्रस्तावित करण्यात आला आहे.
हॉटेल, रेस्टॉरन्टस्, मंगल कार्यालये, रुग्णालये यांच्याकडून मिळकतीच्या वार्षिक करपात्र रकमेवर विशेष सफाई कर आकारला जातो. ज्यांची करपात्र रक्कम ५००० वा त्यापेक्षा अधिक आहे, त्यांच्याकडून किमान २००० हजार रुपये वा १५ टक्के (यापैकी जास्तीची रक्कम) कर आकारण्याचा प्रस्ताव आहे.