Leading International Marathi News Daily                                  शनिवार, ३ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

निवडणुकांच्या तोंडावर डागाळलेली छबी सुधारण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न
पिंपरी पालिका काढणार लघुपट

 
िपपरी, २ जानेवारी/प्रतिनिधी
शहरभरात राबविण्यात आलेले विविध प्रकल्प, नागरी हिताच्या अनेक योजना, शहराचा इतिहास आणि आतापर्यंतच्या प्रवासाची माहिती एकत्रित करून जवळपास २० मिनिटांचा लघुपट तयार करण्याचा निर्णय िपपरी-चिंचवड महापालिकेने घेतला आहे. विकासाच्या नावाखाली होत असलेल्या उधळपट्टीमुळे पालिकेच्या श्रीमंतीला लागलेली घरघर आणि नको त्या उद्योगांमुळे डागाळलेली प्रतिमा सुधारून शहरविकासाची विधायक बाजू मांडण्याचा प्रयत्न या लघुपटाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडील मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे िपपरी पालिकेची सत्ता आहे. त्यामुळे िपपरी-चिंचवडच्या कारभाराकडे सर्वच पक्षातील बडय़ा नेत्यांचे बारीक लक्ष आहे. एकीकडे शहर विकासाची भरपूर कामे झाली असतानाही कोटय़वधींच्या उधळपट्टीमुळे त्यास गालबोटही लागले आहे. त्यामुळेच िपपरी पालिकेचा लघुपटाचा उपक्रम म्हणजे गेल्या काही वर्षांपासून डागाळलेली आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न मानला जात आहे. मात्र पालिकेच्या आड राष्ट्रवादीची छबी सुधारण्याचा हा प्रयोग करदात्या नागरिकांच्या पैशातूनच करण्यात येणार आहे. सहायक आयुक्त साहेबराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पालिका भवनात आज एक बैठक झाली. या लघुपटांत पालिकेच्या वतीने सध्या राबविण्यात आलेल्या सर्व प्रकल्पांचा समावेश करण्यात येणार असून, आतापर्यंतच्या विविध योजनांचाही समावेश करण्यात येणार आहे. याखेरीज शहराच्या सुरुवातीच्या काळापासून ते २००८ पर्यंतचा इतिहास अधोरेखित करण्यात येणार आहे. याविषयीचा अंतिम आराखडा आयुक्त, तसेच पालिका पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या बैठकीस जनसपंर्क अधिकारी किरण गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, समाजविकास अधिकारी उल्हास जगताप, सुहास भादरपुरे आदींसह संस्थांचे प्रतिनिधी व काही निर्मातेही या बैठकीस उपस्थित होते.