Leading International Marathi News Daily                                  शनिवार, ३ जानेवारी २००९


बसथांब्यात थाटले दुकान ! पुणे रेल्वेस्थानकाजवळ मालधक्का रस्त्यालगत प्रवाशांना उभे राहण्यासाठी असलेल्या बसथांब्याच्या शेडमध्ये चक्क तयार कपडय़ांचे दुकानच सुरू झाले आहे.

देहूरोडमध्ये झोपडपट्टीवर कारवाई
संतप्त नागरिकांची नगरसेवकाच्या घरावर दगडफेक

देहूगाव, २ जानेवारी / वार्ताहर

लष्कराच्या जागेतील शितळानगर झोपडपट्टीवर देहूरोड कँन्टोन्मेंट बोर्डाने केलेल्या अतिक्रमण कारवाईत ऐंशी झोपडय़ा पाडण्यात आल्या. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी नगरसेवकाच्या घरावर केलेल्या दगडफेकीत एक मुलगा किरकोळ जखमी झाला असून वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडीयर आर. एस. राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पवार, उपाध्यक्ष अशोक शेलार व सदस्य अली शेख, संजय पिंजण, के. सी. बिडलान आदी स्वत: या कारवाईच्या वेळी उपस्थित होते. ब्रिगेडीयर राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई पूर्वनियोजित होती. येथील सर्व रहिवाशांना आम्ही पर्वीच नोटीसा बजावल्या होत्या. त्यानुसार गेल्या आठ दिवसांपासून शितळानगर झोपडपट्टी भागात बोर्डाने ध्वनिक्षेपकावरून अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यात नागरिकांनी स्वत:हून अतिक्रमणे काढण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार काही नागरिकांनी बऱ्यापैकी प्रमाणात प्रतिसाद दिला. सकाळी अकराच्या सुमारास ब्रिगेडियर राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू करण्यात आली.

सर्वसाधारण कर वगळता अन्य सर्व करांमध्ये वाढीचा प्रस्ताव
पुणे, २ जानेवारी/प्रतिनिधी

आगामी आर्थिक वर्षांत सर्वसाधारण कर वगळता पाणीपुरवठा, सफाई, करमणूक, अग्निशमन आदी अन्य सर्व करांमध्ये मोठी वाढ करण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी मांडला असून मोटारी वापरणाऱ्या पुणेकरांना पुढील वर्षांपासून नव्याने दहा टक्के इतका ‘पथकर’ लावण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव आहे. सन २००९-१० या आर्थिक वर्षांसाठी मिळकत कर, करमणूक करासह अन्य करांच्या दरास कायद्यानुसार २० फेब्रुवारीपूर्वी मुख्य सभेची मान्यता घ्यावी लागते. त्यानुसार, महापालिका आयुक्तांनी कर रचनेचा नवीन प्रस्ताव स्थायी समितीला सादर केला असून समिती व मुख्य सभा त्याबाबत काय निर्णय घेते, हा आता औत्सुक्याचा विषय होणार आहे. आयुक्तांच्या कराच्या प्रस्तावात सर्वसाधारण कराचे दर चालू वर्षांप्रमाणेच (२००८-०९) ठेवण्यात आले आहेत. वार्षिक करपात्र रकमेनुसार सध्या १४ ते ३८ टक्के इतका सर्वसाधारण कर आहे. या करात कोणतीही वाढ प्रस्तावित करण्यात आलेली नाही. मात्र, इतर करांमध्ये आयुक्तांनी मोठी वाढ प्रस्तावित केली आहे.

स्वायत्ततेला चालना देण्यास आता विद्यापीठ नियमावलीत बदल
शिक्षक-शिक्षकेतर पदे, अनुदानात कपात नाही

पुणे, २ जानेवारी/खास प्रतिनिधी

राज्यातील विद्यापीठांवरील ‘बोजा’ कमी करण्यासाठी अधिकाधिक महाविद्यालयांना स्वायत्तता देण्यासाठी महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याच्या परिनियमावलीमध्ये बदल करण्यात येणार आहे. नव्या नियमावलीची अंमलबजावणी करताना शिक्षक-शिक्षकेतरांची पदे, अनुदानामध्ये प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या कोणतीही कपात करण्यात येणार नसून महाविद्यालयीन कामकाजामधील शासकीय हस्तक्षेपही कमी करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्य़ातून किमान १० महाविद्यालये-संस्थांना स्वायत्तता घेण्यासाठी प्रोत्साहन देणारी मोहीम हाती घेतली. त्यासाठी शासननिर्णयही जारी करण्यात आला; परंतु या खेपेस स्वायत्तता घेण्यास महाविद्यालये-संस्था उत्सुक का नाहीत, याचाही अभ्यास करण्यात आला.

चालू वीजमीटर बंद असल्याचा शेरा
‘महावितरण’च्या निष्काळजीपणाचा शेकडो ग्राहकांना झटका

पुणे, २ जानेवारी/प्रतिनिधी

विजेच्या बिलावर मीटरचा फोटो छापून योग्य रिडिंग घेण्याच्या उपक्रमाबाबत ‘महावितरण’ स्वतची पाठ थोपटून घेत असताना दुसरीकडे बििलगच्या यंत्रणेवर नियंत्रणच राहिले नसल्याचे दिसून येत आहे. मीटरच्या फोटोमध्ये स्पष्टपणे रििडग दिसत असतानाही संबंधित मीटर बंद असल्याचा शेरा मारण्याचे प्रकार घडत असल्याने यंत्रणेतील निष्काळजीपणा स्पष्ट झाला आहे.
विजेची बिले वेळेवर न मिळण्याची तक्रार आता नेहमीचीच झाली आहे. त्याबाबतही ‘महावितरण’ने अद्याप कोणतीही सुधारणा केली नाही. बिलांबाबत हा घोळ सुरू असतानाच चुकीच्या पद्धतीने बिलाची आकारणी करण्याचे प्रकारही सातत्याने होत आहेत.
चुकीचे रििडग घेतले जाऊ नये किंवा अंदाजे होणाऱ्या बिलाच्या आकारणीमुळे करण्यात येणाऱ्या तक्रारींमुळे ‘महावितरण’ने मागील काही महिन्यांपासून बहुतांश भागामध्ये बिलावर मीटरचा फोटो छापण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

निवडणुकांच्या तोंडावर डागाळलेली छबी सुधारण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न
पिंपरी पालिका काढणार लघुपट

िपपरी, २ जानेवारी/प्रतिनिधी

शहरभरात राबविण्यात आलेले विविध प्रकल्प, नागरी हिताच्या अनेक योजना, शहराचा इतिहास आणि आतापर्यंतच्या प्रवासाची माहिती एकत्रित करून जवळपास २० मिनिटांचा लघुपट तयार करण्याचा निर्णय िपपरी-चिंचवड महापालिकेने घेतला आहे. विकासाच्या नावाखाली होत असलेल्या उधळपट्टीमुळे पालिकेच्या श्रीमंतीला लागलेली घरघर आणि नको त्या उद्योगांमुळे डागाळलेली प्रतिमा सुधारून शहरविकासाची विधायक बाजू मांडण्याचा प्रयत्न या लघुपटाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

जिल्हा नियोजनातील १५ कोटींचा निधी अखर्चित
पुणे, २ जानेवारी/खास प्रतिनिधी

जिल्हा वार्षिक नियोजन योजनेत बिगर आदिवासी, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजनांसाठी तरतूद केलेल्या निधीपैकी सुमारे पंधरा कोटी रुपयांचा निधी अखर्चित राहिला असून, तृणधान्य, कडधान्य, पशुसंवर्धन, दुग्धविकास, मुलींचा शाळाभत्ता, समाजकल्याणचा मोठा निधी अन्यत्र वळवावा लागला. या पुनर्विनियोजनाला जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत आज मान्यता देण्यात आली. पुनर्विनियोजनामध्ये पीकसंवर्धनांतर्गत फलोत्पादन, ऊसविकास, पाणलोट क्षेत्र विकास, पशुसंवर्धन, निकृष्ट वनांचे पुनर्वनीकरण, वन दळणवळण, ग्रामीण विकास, पाटबंधारे व पूरनियंत्रण, राष्ट्रीय हिवताप निर्मूलन, उद्योजकता विकास, ग्रामीण रस्ते यावर भर देण्यात आला आहे. हा निधी मार्चअखेर खर्च करण्याचे आव्हान आता प्रशासनावर आहे.

भाडे देण्याच्या आमिषाने पावणेचार लाखांना गंडा, चौघांना अटक
पुणे, २ जानेवारी/प्रतिनिधी

दरमहा चांगली रक्कम भाडेतत्त्वावर देण्याचे आमिष दाखवून, तसेच कर्जाद्वारे घेतलेल्या गाडीचे हप्ते न भरता तीन लाख ८० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या चौघांना लष्कर पोलिसांनी अटक केली. गौतम मनोहर नवगिरे (वय २७, रा. बालाजीनगर, घोरपडी गाव), श्रीधर गोविंद सोमवंशी (वय २७, रा. मंचर, ता. आंबेगाव) आणि देविदास एकनाथ आंधळकर (वय ६४, रा. बारामती) आणि विलास अरुण मेंगडे (वय २६, रा. निरगुडसर, ता. आंबेगाव) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. त्यातील राजेश शंकरराव शर्मा हा अद्याप फरार आहे.