Leading International Marathi News Daily                                  शनिवार, ३ जानेवारी २००९
राज्य

राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या बडय़ा नेत्यांवर ‘कॅग’चा ठपका
नागपूर, २ जानेवारी/ प्रतिनिधी

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासह तत्कालीन उद्योगमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि महसूल मंत्री पंतगराव कदम या सत्ताधारी पक्षातील बडय़ा नेत्यांवर विविध प्रकरणात नियंत्रक व महालेखापरीक्षकांनी त्यांच्या (‘कॅग’)अहवालात ठपका ठेवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नागपूर येथे नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी ३१ मार्चला संपलेल्या वर्षांतील महालेखापरीक्षकांचा अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात आजी-माजी मुख्यमंत्र्यांसह विद्यमान महसूल मंत्र्यांवरही ठपका ठेवण्यात आला आहे.

गुदमरलेल्या कृषी साहित्याला संमेलनाने दाखवली समृद्धीची वाट!
मधु मंगेश कर्णिक यांचे प्रतिपादन
राजगोपाल मयेकर, दापोली, २ जानेवारी

आतापर्यंत उपेक्षित राहिलेली शेती आणि शेती जीवनशैली शब्दांत मांडणाऱ्या वाङ्मयाला स्वतंत्र ओळख, अस्तित्व निर्माण करण्याची गरज आहे. विविध साहित्य प्रवाहात ‘गुदमरलेल्या’ या कृषी साहित्याला आता वेगळे साहित्य संमेलन आयोजित करून समृद्धीची दिशा देण्याचा अनोखा उपक्रम आज कोकण कृषी विद्यापीठाने सुरू केला. बहुधा संपूर्ण जगात एकमेव ठरणाऱ्या या कृषी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष होण्याचा मान कोकणचे सुपुत्र व ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना मिळाला असून, या उपक्रमाला कायमस्वरूपी अस्तित्व मिळण्याची आशा त्यांनी व्यक्त केली.

अकराव्या पंचवार्षिक योजनेअखेर वीज समस्या संपुष्टात- शिंदे
कोल्हापूर, २ जानेवारी / विशेष प्रतिनिधी
देशात सध्या तुटवडा असलेल्या २५ हजार मेगाव्ॉट विजेच्या तुलनेत ९० हजार मेगाव्ॉट वीजनिर्मितीचे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. यामुळे ११ व्या पंचवार्षिक योजनेअखेर वीज ही समस्या देशापुढे राहणार नाही असा विश्वास केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार िशदे यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला. जागतिक मराठी अकादमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘शोध मराठी मनाचा’ या संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी िशदे यांचे शुक्रवारी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी येथे आगमन झाले. त्यावेळी शासकीय विश्रामधामात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

औषधी वनस्पतींचा योग्य वापर आरोग्याला उपकारक
दापोली, २ जानेवारी/खास प्रतिनिधी

आपल्या प्रदेशात असलेल्या विविध औषधी वनस्पतींचा योग्य प्रमाणात वापर केल्यास उत्तम आरोग्य राखणे शक्य होईल, असा विश्वास प्रसिद्ध आयुर्वेदीय वैद्य य. गो. जोशी यांनी व्यक्त केला. येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये आयोजित पालवी कृषी उत्सवामध्ये निरामय आरोग्यासाठी आयुर्वेद या विषयावर आज परिसंवाद झाला. त्यामध्ये बोलताना आपल्या प्रदीर्घ वैद्यकीय कारकीर्दीतील अनुभवांच्या आधारे वैद्य जोशी यांनी विविध वनस्पतींचे औषधी गुणधर्म आणि त्यांचा मानवी शरीरावर होणारा लाभदायी परिणाम याचे विस्तृत विवेचन केले. ते म्हणाले की, आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार चाळिशीनंतर तेल-तुपाचे प्रमाण आहारामध्ये कमी करण्याचा सल्ला दिला जातो, पण सांधेदुखीसारख्या विकारावर ते अतिशय गुणकारी ठरते. रिफाइन्ड तेल प्रकृतीला अपायकारक असते, पण शुद्ध शेंगदाणा तेल अतिशय गुणकारी ठरते, असा अनुभव आहे.

कर्जतमधील नाटय़महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद
कर्जत, २ जानेवारी/वार्ताहर : कर्जतमधील अभिनव ज्ञानमंदिर संस्था आणि अभिनव ज्ञान प्रबोधिनी एज्युकेशनल ट्रस्ट या दोन शैक्षणिक संस्थांच्या आर्थिक मदतीसाठी कर्जतमध्ये स्थापन झालेल्या नाटय़महोत्सव समितीच्या वतीने आयोजिण्यात आलेल्या तीन दिवसांच्या नाटय़महोत्सवास नाटय़रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनिल गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या नाटय़महोत्सव समितीमध्ये डी. एस. शिंदे (उपाध्यक्ष), सविता मुजुमदार (कार्यवाह), अर्चना मुकादम (सहकार्यवाह), सुधाकर वैशंपायन (खजिनदार) आणि विनायक चितळे (सहखजिनदार) यांचा समावेश होता. अभिनव ज्ञानमंदिर संस्था आणि अभिनव ज्ञान प्रबोधिनी एज्युकेशनल ट्रस्ट या दोन्ही शैक्षणिक संस्थांना भरीव स्वरूपाची आर्थिक मदत उपलब्ध व्हावी, याच हेतूने या नाटय़महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

खोटय़ा दस्तावेजाआधारे फसवणूक करून जमीन गिळंकृत
धनगर कुटुंबाचे आमरण उपोषण

अलिबाग, २ जानेवारी/ प्रतिनिधी

सरकारी अधिकाऱ्यांची बेकायदा कारवाई, खोटे दस्तावेज आणि त्या आधारे फसवणूक करून आपली शेतजमीन गिळंकृत करण्याच्या प्रकाराविरोधात, नववर्षांच्या पहिल्याच दिवशी पेण तालुक्यांतील वरवणे-दिवाणमाळमधील धनगरवाडीतील केशव खताळ, भगवान खताळ, गंगाराम खताळ, गणपत खताळ, लीलाबाई खताळ या धनगर कुटुंबास येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी आंदोलनास बसावे लागले आह़े

साडेपाच हजारांची लाच स्वीकारताना वनपालास अटक
वाडा, २ जानेवारी/वार्ताहर

वाडा पश्चिम वनविभागामधील सोनाशीव बीटचे वनपाल नामदेव शिंदे यांना आज लाचलुचपत विरोधी पथकाने वाडा वन कार्यालयासमोरच साडेपाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. दहिवली कुंभिस्ते येथील लाकडी फर्निचर बनविण्याचा व्यवसाय करणारे रामचंद्र बरतड हे बनविलेले फर्निचर टेम्पोमधून वाडा बाजारपेठेमध्ये घेऊन येत असताना १४ सप्टेंबर रोजी वनपाल शिंदे यांनी पकडले होते. हे फर्निचर परत देण्यासाठी शिंदे यांनी बरतड यांच्याकडून ५० हजाराची मागणी केली होती, परंतु १० हजार रुपयांवर तडजोड होऊन त्याच दिवशी शिंदे यांना ४५०० रुपये देण्यात आले. उर्वरित रकमेसाठी शिंदे यांनी बरतड यांच्यामागे तगादा लावला होता. अखेर बरतड यांनी आज राहिलेल्या रकमेतील ५५०० रुपये शिंदे यांना देताना लाचलुचपत विरोधी पथकाने रंगेहाथ पकडले. लाचलुचपत विरोधी पथकाचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त महेंद्र भोकरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक एम. एम. विसपुते, पोलीस निरीक्षक एस. डी. चौहान यांनी ही कारवाई केली. ठ

भटके विमुक्त आणि बंजारा समाजाचा सोमवारी आझाद मैदानावर मोर्चा!
बदलापूर, २ जानेवारी/वार्ताहर

बंजारा आणि विमुक्त भटक्या समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सोमवार, ५ जानेवारी रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर बंजारा क्रांती दलाच्या वतीने मोर्चा आयोजित करण्यात आल्याची माहिती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष राकेश जाधव यांनी दिली. भटक्या तसेच बंजारा समाजातील प्रत्येकाला न्याय मिळावा या हेतूने तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पहिल्या आयोगाची निर्मिती केली होती. या आयोगाच्या सदस्य सचिवपदी खा. हरिभाऊ राठोड यांची नियुक्ती केली होती. राठोड यांच्या नियुक्तीमुळे बंजारा समाजाला न्याय मिळणार असे वाटत होते. तथापि त्यांनी सदस्यपदाचा राजीनामा दिला. यामुळे समाजाचा भ्रमनिरास झाला आणि गेली काही वर्षे नुकसान झाल्याबद्दल जाधव यांनी तीव्र चीड व्यक्त केली. दोन्ही समाजबांधवांच्या हितासाठी नेमलेल्या रेणके आयोगाच्या शिफारसी त्वरित लागू कराव्यात, याशिवाय माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा आणि राज्यातील कृषी विद्यापीठे आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांना स्व. नाईक यांचे नाव द्यावे, संसद भवनासमोर लाखा बंजारा यांचे स्मारक उभारावे या आणि इतर मागण्यांसाठी पारंपरिक वेषभूषेतील ४२ जमातींचे हजारो समाजबांधव मोर्चात सहभागी होणार आहेत. भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे यावेळी भाषण होणार आहे.

तर सुरेश जैनही पुन्हा मंत्री झाले असते - ईश्वरलाल जैन
जळगाव, २ जानेवारी / वार्ताहर
भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नवाब मलिक यांचा मंत्रीमंडळात पुन्हा समावेश झाल्याने आ. सुरेश जैन हे गप्प राहिले असते तर नक्कीच पुन्हा मंत्री झाले असते. त्यांनी राष्ट्रवादीला संपविण्याची भाषा करून स्वत:चेच नुकसान करून घेतले, असा टोला जिल्हा बँक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ईश्वरलाल जैन यांनी हाणला आहे. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येत सुरेश जैन व त्यांच्या आघाडी विरोधात रणशिंग फुंकले आहे. या पाश्र्वभूमिवर जिल्हा राष्ट्रवादी कार्यालय परिसरात आयोजित शेतकरी मेळाव्यात ईश्वरलाल जैन बोलत होते. खा. वसंत मोरे, जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष रवींद्र पाटील, काँग्रेसचे अध्यक्ष संजय गरूड यावेळी उपस्थित होते. बाजार समितीचे विद्यमान अध्यक्ष भिला सोनवणे यांच्याकडून नकळत काही चुका झाल्या असतील, त्याची त्यांनी माफी मागितली आहे. सुरेश जैन यांची साथ सोडून योग्य मार्ग त्यांनी निवडला असल्याने त्यांना विजयी करण्याचे व गर्विष्ट भाषा करणाऱ्यांना जागा दाखविण्याचे आवाहनही ईश्वरलाल जैन यांनी केले. आ. जैन यांना आपण राष्ट्रवादीची शक्ती वाढणार म्हणून पक्षात आणले. परंतु सुरेश जैन यांनी आपला स्वभाव काही सोडला नाही. मला मंत्री करा, केले नाही तर पक्ष संपवेल, अशी गर्जना त्यांनी केली व पक्षाचा रोष ओढवून घेतला, असेही ते म्हणाले.