Leading International Marathi News Daily                                  शनिवार, ३ जानेवारी २००९
क्रीडा

ऑस्ट्रेलिया-द.आफ्रिका : तिसरी कसोटी
द. आफ्रिकेचे लक्ष्य निर्भेळ यश व ‘नंबर वन’वर बोलिंगर, मॅक् डोनाल्ड करणार ऑस्ट्रेलियातर्फे कसोटी पदार्पण

सिडनी, २ जानेवारी / पीटीआय

ऑस्ट्रेलियाविरुद्ध उद्या, शनिवारपासून सुरू होणारा तिसरा व शेवटचा कसोटी क्रिकेट सामना कुठल्याही परिस्थितीतजिंकायचाच, याच निर्धाराने दक्षिण आफ्रिकेचा संघ सिडनी क्रिकेट मैदानावर उतरणार आहे. दक्षिण आफ्रिकेने ही कसोटीजिंकली तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांचा संघ निर्भेळ यश संपादन करेल तसेच जागतिक कसोटी क्रिकेट क्रमवारीत अव्वल स्थानावरही त्यांचा संघ विराजमान होईल, या सर्व महत्त्वपूर्ण बाबींची दक्षिण आफ्रिका संघाला पुरती कल्पना असल्यामुळे या कसोटीत त्यांचे विजयासाठीच पूर्ण प्रयत्न राहणार आहेत.

ऑस्ट्रेलियाला ३-० असे हरविण्यास उत्सुक -स्मिथ
सिडनी, २ जानेवारी / पीटीआय
मालिकेतील पहिल्या दोन लढतीत विजय मिळवत मालिका विजय निश्चित झाला असला तरी ऑस्ट्रेलियाविरुद्ध निर्भेळ यश मिळवण्याची मिळालेली संधी साधण्यासाठी उत्सुक असल्याचे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ग्रॅमी स्मिथने म्हटले आहे. उद्यापासून सुरू होत असलेल्या तिसऱ्या व अखेरच्या कसोटीत विजय मिळवत मालिकेत निर्भेळ यश मिळवण्याच्या निर्धारानेच दक्षिण आफ्रिका संघ मैदानात उतरणार असल्याचे स्मिथने स्पष्ट केले. पहिल्या दोन कसोटीत विजय मिळवल्यानंतर तिसऱ्या व अखेरच्या कसोटी कामगिरीत सातत्य राखण्याचे आमच्यापुढे आव्हान आहे. पण, संघसहकाऱ्यांवर त्याचे दडपण नाही. संघातील प्रत्येक खेळाडू चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहे. प्रत्येक फलंदाज शतक झळकावण्यासाठी आणि गोलंदाज पाच बळी घेण्यासाठी सज्ज आहे. आम्ही मालिकेत ३-०ने विजय मिळवण्यास उत्सुक आहोत.

दिग्गजांना कुर्निसात!
सिडनी, २ जानेवारी/पीटीआय

माजी ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक रॉडनी मार्श हा आयसीसीचे अध्यक्ष डेव्हिड मॉर्गन यांच्याकडून मानाची कॅप स्वीकारणारा पहिला हॉल ऑफ फेम क्रिकेटपटू ठरला आहे. आयसीसीच्या क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये समावेश होणे हा मोठा सन्मान आहे. मी या यादीतील खेळाडूंची नावे पाहिली आणि स्वत:चा अभिमान दुणावला, असे मार्श यावेळी म्हणाले. आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेम म्हणजे आपल्या खेळातील महान इतिहासाला कोंदण मिळण्यासारखे आहे, असे मार्श यांनी सांगितले. ww.catchthespirit.com या आयसीसी शतकमहोत्सवानिमित्त सुरू करण्यात आलेल्या वेबसाइटवर या ५५ महान व्यक्तींच्या कारकीर्दीचा आढावा आणि जीवनचरीत्र रेखाटण्यात आले आहे. आम्ही अन्य खेळांतील हॉल ऑफ फेमचा अभ्यास करून आपले लक्ष्य गाठण्याकरिता काय करता येईल, हे पाहिले, असे लॉर्गेट यांनी सांगितले. एफआयसीएचे मुख्य कार्यवाह टिम मे यांनी आयसीसीसोबतच्या या नव्या संयुक्त उपक्रमाबाबत आनंद व्यक्त केला. खेळाला योगदान देणाऱ्या अनेक खेळाडूंचा यामुळे योग्य सन्मान होईल, असे मे पुढे म्हणाले.

धोनी यशस्वी कर्णधार ठरू शकतो -सेहवाग
नवी दिल्ली, २ जानेवारी / पीटीआय

सौरव गांगुली हा भारताचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार आहे पण, महेंद्र सिंग धोनी त्याच्यापेक्षा सरस कर्णधार ठरू शकतो, असे मत भारताचा सलामीवीर वीरेंद्र सेहवागने व्यक्त केले. धोनी डोकं शांत ठेवून विचार करणारा कर्णधार असून त्याच्यात नेतृत्व करण्याची क्षमता आहे, असेही सेहवागने सांगितले. दरम्यान, गौतम गंभीरच्या साथीने भारतीय संघाला चांगली सलामी देण्यात यशस्वी ठरलो. २००८ माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम वर्ष ठरले, असेही सेहवागने सांगितले.

‘कॅच द स्पिरिट’ वेबसाइटवर युवराज
दुबई, २ जानेवारी/पीटीआय

आपले शतकमहोत्सवी वर्ष साजरे करीत असताना आयसीसीने ‘कॅच दी स्पिरिट’(६६६.ूं३ूँ३ँी२स्र््र१्र३.ूे) ही आपली वेबसाईट तयार केली आहे. या वेबसाईटवर भारताचा डावखुरा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंग हा पाकिस्तानात खेळण्याच्या आपल्या अनुभवाचे कथन करणार आहे. युवराजबरोबरच आयसीसीचे सदस्य असणाऱ्या १०४ देशांतील सदस्यही या वेबसाईटवर सामील होणार आहेत. याच वेबसाईटवर दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस हादेखील जोहान्सबर्गमधील दक्षिण आफ्रिकेच्या ऑस्ट्रेलियावरील मोठय़ा विजयाविषयी बोलणार आहे. त्यांनी केलेल्या ४३८ धावांच्या लक्ष्याचा थरार कॅलिसच्या तोंडून क्रिकेट जगतासमोर उलगडला जाणार आहे.

कुठलीही आव्हाने पेलण्यास आयसीसी सक्षम -लॉर्गट
सिडनी, २ जानेवारी/पीटीआय
जागतिक क्रिकेटची पालक संघटना असणारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आपले शतक महोत्सवी वर्ष साजरे करीत असताना खेळातील लाचलुचपत नष्ट करणे, खेळाडूंवरील अती क्रिकेटचा ताण हलका करणे, त्यांची सुरक्षितता पाहणे आणि संघटनेच्या सदस्यांमध्ये क्रिकेट सामन्यांचा समतोल राखणे अशी आव्हाने आमच्यासमोर आहेत, असे आयसीसीचे प्रमुख कार्यवाह हरून लॉर्गट यांनी म्हटले आहे. सिडनी क्रिकेट मैदानावर उद्यापासून होणाऱ्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या आणि अंतिम कसोटीच्या पूर्वसंध्येला ते बोलत होते. यावेळी आयसीसीचे अध्यक्ष डेव्हिड मॉर्गनदेखील उपस्थित होते. लॉर्गट यांच्या मते आयसीसी ही आव्हानं पेलण्यास सज्ज आहे.

बांगलादेशची आजपासून श्रीलंकेविरुद्ध दुसरी कसोटी
चितगाव, २ जानेवारी / वृत्तसंस्था
श्रीलंकेविरुद्ध उद्या, शनिवारपासून होणाऱ्या दुसऱ्या व शेवटच्या कसोटी क्रिकेट सामन्यात पुन्हा एकदा दर्जेदार कामगिरी करण्याचा यजमान बांगलादेशचा निर्धार आहे. दर्जेदार कामगिरी करत योग्यता सिद्ध करण्यासाठी आम्ही उत्सुक असल्याचे अष्टपैलू शाकिब अल हसनने सामन्याच्या पूर्वसंध्येला सांगितले.
पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने विजयासाठी दिलेल्या ५२१ धावांच्या अशक्यप्राय आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशने निकराची झुंज दिली होती. त्यात मोहम्मद अश्रफूलने शतक झळकावले होते तर अष्टपैलू शाकिब अल हसनने झुंजार ९६ धावांची खेळी केली होती. पहिल्या डावात त्याने पाच बळीही मिळवले होते. २००८ मध्ये अप्रतिम कामगिरी करत बांगलादेशचा एक सर्वोत्तम खेळाडू म्हणून तो नवारूपाला आला आहे.
गेल्या ऑक्टोबर महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या मालिकेतील एका कसोटीत त्याने ३६ धावात ७ बळीही मिळवत बांगलादेशतर्फे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी
करणारा पहिला गोलंदाज होण्याचा मानही मिळवला होता.
दरम्यान, उद्यापासून सुरू होणाऱ्या या कसोटी सामन्यानंतर बांगलादेश संघ तिरंगी मालिकेत खेळणार असून त्यात यजमान बांगलादेशसह श्रीलंका आणि झिम्बाब्वेचा समावेश आहे. ठ

पाकिस्तान दौरा होणारच;
श्रीलंका मंडळाचा खुलासा
कराची, २ जानेवारी/वृत्तसंस्था
पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे श्रीलंका क्रिकेट मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
श्रीलंका क्रिकेट मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दुलीप मेंडिस यांनी जिओ न्यूजशी बोलताना सांगितले की, पाकिस्तान दौऱ्याची कार्यक्रम पत्रिका अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. कार्यक्रम पत्रिका निश्चित करण्यापूर्वी खेळाडूंना विश्वासात घेण्यात येईल. मात्र हा दौरा होणारच याबाबत कोणीही शंका बाळगू नये.
श्रीलंका संघातील खेळाडू पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यास तयार नसल्याने या दौऱ्याची कार्यक्रम पत्रिका तयार करण्यात विलंब होत असल्याचे वृत्त निराधार आहे, असेही मेंडिस म्हणाले. आम्ही हा दौरा निश्चितपणे करणार आहोत, असे आम्ही पाकिस्तान क्रिकेट मंडळाला कळविले आहे. आम्ही आमचा शब्द पाळणार आहोत. आम्ही दौरा रद्द करणार असल्याच्या बातम्या निराधार आहेत, असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, अजून काही गोष्टी स्पष्ट व्हायच्या असल्याने या दौऱ्याची कार्यक्रम पत्रिका तयार करण्यात विलंब होतो आहे. येत्या दोन तीन दिवसांत कार्यक्रम पत्रिका तयार होईल.
पाकिस्तान दौऱ्यात किती सामने खेळणार याविषयी श्रीलंका मंडळ आपल्या खेळाडूंशी चर्चा करीत आहे. तसेच या दौऱ्यासाठी द्यावयाच्या मानधनाबाबतही चर्चा चालू आहे. या मुळे पाकिस्तान दौऱ्याची कार्यक्रम पत्रिका तयार करण्यात विलंब होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पिटरसन-मूर ‘पॅचअप’साठी मॉरिस सरसावले
लंडन, २ जानेवारी/पीटीआय
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाचे संचालक ह्यूज मॉरिस कर्णधार केव्हिन पिटरसन आणि प्रशिक्षक पीटर मूर यांच्यातील ‘पॅचअप’साठी पुढे सरसावले आहेत.
येत्या महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणाऱ्या इंग्लंड संघात प्रशिक्षक मूर आणि अन्य निवड समिती सदस्यांनी माजी कर्णधार मायकेल वॉनचा स्थान न दिल्याबद्दल पिटरसनने राजीनाम्याची धमकी दिल्यामुळे खळबळ माजली आहे. त्यामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्डही पेचात सापडले आहे.
मुंबईतील दहशतवादी हल्ल्यांनंतर दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी पुन्हा भारतात परतण्याच्या इंग्लंडच्या निर्णयात मॉरिस यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. ‘द डेली’ वृत्तपत्रातील वृत्तात असे म्हटले आहे की, पिटरसन आणि मूर यांच्यातील संबंध कधीच चांगल होऊ शकणार नाहीत आणि वॉन प्रकरणाच्या आधीपासून त्यांच्यात बेबनाव झाला आहे.