Leading International Marathi News Daily                                  शनिवार, ३ जानेवारी २००९
त्रिकालवेध्

अस्तित्वाच्या ज्ञानाचा वेध

या स्तंभातून ‘फ्युचरॉलॉजी’चे ज्ञान-परिमाण आम्ही वाचकांना सादर करू इच्छितो. वाचकांनी त्यावर प्रतिक्रिया द्याव्यात, इतर संदर्भ द्यावेत, नव्या संशोधनाची माहिती द्यावी, योग्य तेव्हा चर्चा वा वादही घालावेत. कारण विश्वाप्रमाणेच ज्ञानही अथांग आहे.
पूर्वी असे गृहीतच धरले जात असे, की भूतकाळ हा ‘निश्चित’ आहे. म्हणजे भूतकाळ बदलू शकत नाही; परंतु भविष्य मात्र

 

अनिश्चित आहे. परंतु दोन-अडीचशे वर्षांत इतिहासशास्त्रात आणि इतिहास संशोधन पद्धतीत इतका ‘विकास’ झाला आहे, की आता भूतकाळही निश्चित असल्याचे गृहीत धरता येत नाही. मग तो इतिहास रामायण-महाभारताचा असो, की दुसऱ्या महायुद्धाचा; पेशवाईचा असो वा फाळणीचा. इतिहासाची इतकी पुस्तके असण्याचे खरे तर कारणच नाही. कारण जे सर्व घडून गेले आहे त्याचीच इतिहासात नोंद होते. त्याच घटनांची उजळणी. मतभेद होतात ते त्या घटनांचा कार्यकारणभाव, कारणमीमांसा आणि प्रसंग-संगती ठरविताना. मग हळूहळू इतिहासातील घटनांची आमूलाग्र पुनर्माडणी केली जाऊ लागते. त्यातूनच न संपणाऱ्या वादांचे मोहोळ उठते. असे म्हणतात, की वर्तमानातील प्रत्येक क्षण भूतकाळात जमा होत असतो आणि येणारा क्षण ‘भविष्या’तून येतायेताच वर्तमानातून इतिहासजमा होत असतो.
आपण करीत असलेली प्रत्येक कृती त्या अमूर्त ‘भविष्या’ला आकार देत असते. मग ती कृती व्यक्तिगत असो वा कौटुंबिक, सामाजिक असो वा राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय! सर्व देश राज्यघटना तयार करतात ती ‘भविष्या’चा आराखडा डोळ्यासमोर ठेवूनच. जगातील कोणत्याही देशात संपूर्ण विषमतानिर्मूलन झालेले नाही. त्याचप्रमाणे संपूर्ण स्वातंत्र्यही जनतेला बहाल केले गेलेले नाही. न्याय आणि बंधुत्वभावही कुठेही प्रस्थापित झालेला नाही. पण ही सर्व उद्दिष्टे ‘भविष्या’त साकारता येतील, या विश्वासाने राज्यघटना बनविल्या जातात. ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठी विविध प्रकारच्या संघटना, पक्ष, संस्था उभारल्या जातात. त्या भविष्याचे ‘स्वप्न’ ठेवूनच अनेक प्रकारच्या व प्रकृतीच्या व्यक्ती त्या संस्थेत, संघटनेत, पक्षात वा चळवळीत सामील होतात. त्या व्यक्ती इतिहासजमा झाल्या तरी संस्था राहतात. त्यातूनच ‘भविष्या’ची हमी वाटू लागते. किंबहुना तशी हमी वा किमान आशा नसेल तर कुणीही काहीच करणार नाही.
माणसे बचत करतात वा देश गंगाजळी जमवितात, ती त्या भविष्यासाठीच. नाहीतर प्रत्येकाला हे माहीतच असते, की तो वा ती मर्त्य आहे! मग ती व्यक्ती अब्जाधीश उद्योगपती असो वा सामान्य मध्यमवर्गीय कर्मचारी. शेतकरीसुद्धा भविष्यातील ‘बाजारा’चा अंदाज घेऊनच पिके लावतो. कधी तो अंदाज चुकतो, कधी बरोबर येतो. दीर्घ काळ अंदाज चुकत राहिला आणि त्यामुळे कर्जाचा बोजा वाढत गेला, की भविष्य ‘अंधारमय’ दिसू लागते आणि आशाच संपली, की उमेदही हरपते आणि ती व्यक्ती आत्महत्या करते. परंतु एक माणूस हताश होऊन आत्महत्या करील, ‘समाज’ व ‘संस्था’ एकाच वेळेस कधीही आत्महत्या करीत नाहीत. संस्था कालबाह्य़ होतात तेव्हा बंद पडतात, पण तीच किंवा नवी उद्दिष्टे घेऊन नव्या संस्था निर्माण होतात. परंतु समाज हतबल झाला तरी तो सामूहिकरीत्या आत्महत्येचा निर्णय घेत नाही. याचे मुख्य कारण त्या अमूर्त भविष्याबद्दल आशा असते म्हणून. परंतु तशी आशा असणे म्हणजे खात्री असणे नव्हे.
नियोजन आयोग असोत किंवा कॉर्पोरेट प्लॅनर्स असोत, त्यांना ‘वर्तमानातील’ घटकांचा, भूतकाळातील संदर्भाचा / अनुभवांचा आधार घेऊनच भविष्याचे नियोजन करावे लागते. नियोजन आयोग वा कॉर्पोरेट प्लॅनर्स वा मिलिटरी स्ट्रॅटेजिस्ट्स त्यांच्या भविष्याचा आलेख काढताना हस्तसामुद्रिकाला वा कुंडलीतज्ज्ञाला विचारीत नाहीत. त्यापैकी एखाद्याचा तशा भाकीत शास्त्रावर म्हणजे ज्योतिषावर विश्वास असेलही; पण कोणतेही बोर्ड ऑफ डायरेक्टर्स किंवा प्लॅनिंग कमिशन वा युनोसारखी संस्था ज्योतिषाचा आधार घेत नाहीत. त्यांना आधारभूत असतात ते वर्तमानातील घटक आणि भूतकाळातील अनुभव.
भूगोल, लोकसंख्या, हवामान, अर्थस्थिती, उपलब्ध तंत्रज्ञान, नवतंत्रज्ञानाच्या शक्यता, जनमानस, समाजातील अंतर्विरोध, पूरक व प्रतिकूल घटक, आरोग्य, परंपरा, संभाव्य धोके, आपली शक्तिस्थाने, उणिवा, परिस्थितीतून निर्माण झालेल्या संधी हे व असे अनेक संदर्भ विचारात घेऊन भविष्य-नियोजन केले जाते. भविष्य वेध आणि भविष्य नियोजन यात फरक आहे. काय काय होऊ ‘शकते’ हे भविष्य वेधशास्त्र (फ्युचरॉलॉजी) सांगते आणि काय काय ‘करता येईल’ हे भविष्य नियोजनशास्त्र सांगते. जगातील सर्व सैन्यदलांमध्ये ‘पॉसिबल सिनारिओ बिल्डिंग’ केले जाते. म्हणजे युद्ध झाल्यास केव्हा होईल, कोणकोणत्या टप्प्यातून ते युद्ध जाईल, किती काळ ते लढता येईल, त्यातून काय साध्य होईल, की माणूसहानी होईल, इतर नुकसान काय होऊ शकेल, त्याचे काय व किती दूरगामी परिणाम होतील या व अशा गोष्टींचा विचार त्या संभाव्य ‘सिनारिओज्’मध्ये केला जातो. त्या सर्व शक्यता असतात. युद्ध झालेच नाही तर नुसताच ‘सिनारिओ’ राहतो. पण ‘सिनारिओ’च नसेल तर आकस्मिकपणे युद्ध सुरू झाल्यावर, म्हणजे आक्रमण एकदम आल्यावर गोंधळ उडेल. (जसा गोंधळ बऱ्याच प्रमाणात मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला तेव्हा झाला!)
परंतु अशा शक्यता किंवा असे ‘सिनारिओज्’ फक्त युद्धासंबंधातच असतात असे नाही. दैनंदिन व्यक्तिगत जीवनातही आपल्याला सिनारिओंचा विचार करावाच लागतो. लग्न करणे, नोकरी मिळणे, धंदा सुरू करणे, मोठी गुंतवणूक करणे, जागा घेणे, घर बांधणे- अशा सर्व बाबींमध्ये भविष्य वेधशास्त्र आणि भविष्य नियोजनशास्त्रच आपण वापरत असतो. जाणीवपूर्वक वा अजाणता.
जेव्हा ते जाणीवपूर्वक, उद्दिष्ट ठरवून, विशिष्ट कालमर्यादेत साध्य करण्याचा विचार होतो तेव्हा त्याचे नाव भविष्य नियोजन हे असते अशा प्रकारचे / काळ विभाजन (म्हणजे भूतकाळ, वर्तमान, भविष्यकाळ) हे मानवी व्यवहाराला अत्यावश्यक आहे. त्याशिवाय, ज्याला आपण ‘विकास’, ‘प्रगती’, ‘व्यवहार’ या गोष्टी शक्य नाहीत त्या गोष्टी नसतील तर आपल्या जीवनात आणि जीवसृष्टीतील इतर प्राणिमात्रात काहीच फरक नसेल. वाघ-सिंहांना, हत्ती-ऊंटांना वा चिमणी-कावळ्यांना असे काळवेळाचे भान नसते. त्यांना काल-आज-उद्या, किंवा गेल्या वर्षी, पुढील वर्षी, २५ वर्षांनी असे कालमापन करता येत नाही.
तसे पाहिले तर आपल्या विश्वरचनेचा इतिहास अभ्यासतानाही आपल्याला या कालमापनपद्धतीचा उपयोग होतो. हे विश्व साडेतेरा अब्ज वर्षांपूर्वी जन्माला आले, असे आज गणिताने सिद्ध झाले आहे. अशी अनेक विश्व आहेत हेही सिद्ध झाले आहे. परंतु हे विश्व काळातीत आणि अवकाशातीत आहे. म्हणूनच खगोलशास्त्राच्या अभ्यासात व संशोधनात या काळातीततेलाच काळाचे परिणाम (व गणित) देऊन त्याचा अभ्यास करावा लागते. या अथांग विश्वाचा अभ्यास करण्यासाठी, जे उपग्रह, दुर्बिणी आणि विविध शास्त्रीय उपकरणे आपण अवकाशात, अगदी आपल्या सूर्यमालिकेपलीकडे, त्या अचाट विश्वव्यवस्थेचा शोध घेण्यासाठी पाठवितो, त्या संशोधनाचे नियोजन या भूतलावर होते. त्या एकूण अर्थकारणाचाच तो भाग असतो. म्हणजेच मला अथांगाचा शोध घेण्यासाठी ‘थांगा’चे भान आवश्यक असते. आणखी पाच अब्ज वर्षांनी आपला सूर्य (या जीवसृष्टीचा निर्माता, तारणकर्ता) जळून जाणार आहे. सूर्याच्या या ‘अंता’चे भान त्या सूर्याला नाही, पण आपल्याला आहे.
आपल्याला ते भान येण्यासाठी ज्या प्रकारची अर्थरचना, समाजकारण, राजकारण करावे लागते त्यातूनच आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञान व्यवस्थापनाचा आशय आणि आकार ठरतो. त्यातूनच ‘फ्युचरॉलॉजी’ या ज्ञानशाखेचा जन्म झाला. ‘फ्युचरॉलॉजी’ म्हणजे भविष्यवेध शास्त्रामुळेच आपल्याला ज्वालामुखी, भूकंप, सुनामी, झंझावात, धूमकेतू, उल्कापात आदी गोष्टी कळतात. म्हणजेच ‘ज्ञान’ही या र्सवकष समाजकारणावर अवलंबून आहे. थोडक्यात, ‘फ्युचरॉलॉजी’ हा विषय सर्व ज्ञानशाखांना वेढणारा आणि व्यापणारा आहे. या जगातील हा ‘पुत्र’ पराधीन (लौकीक अर्थाने) राहायचा नसेल तर हे भविष्य वेधाचे र्सवकष शास्त्र समजावून घेणे आवश्यक आहे.
‘फ्युचरॉलॉजी’च्या अभ्यासातून फक्त विश्वरचनेचे ज्ञान होत नाही तर आपल्या कुटुंबव्यवस्थेचे, आपल्या आदर्शाचे, मूल्यांचे, विचारांचे, भाव-भावनांचे- आपल्या अस्तित्वाचेच ज्ञान व्हायला मदत होते.
या स्तंभातून ते ज्ञान-परिमाण आम्ही वाचकांना सादर करू इच्छितो. वाचकांनी त्यावर प्रतिक्रिया द्याव्यात, इतर संदर्भ द्यावेत, नव्या संशोधनाची माहिती द्यावी, योग्य तेव्हा चर्चा वा वादही घालावेत. कारण विश्वाप्रमाणेच ज्ञानही अथांग आहे.
कुमार केतकर