Leading International Marathi News Daily                                  शनिवार, ३ जानेवारी २००९

गोविंदच्या अपंगत्वाला मिळाला ठाणे विद्यादान मंडळाचा आधार!
सुभाष हरड
शहापूर :
दोन्ही पायाने अपंग असलेल्या गोविंद बांगर या ११ वीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षण घेण्यासाठी चाललेल्या धडपडीला ठाणे येथील विद्यादान सहाय्यता मंडळाने प्रोत्साहन दिले असून, त्याच्या संपूर्ण शिक्षणासाठी सर्वतोपरी सहाय्य करून पालकत्व स्वीकारले आहे. ठाणे वृत्तान्तमध्ये ‘दोन्ही पाय लुळे, तरीही शिक्षणासाठी परिस्थितीशी दोन हात..’ अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. गोविंद बांगर हा जन्मजात दोन्ही पायांनी अपंग असलेला विद्यार्थी मूळचा शहापूर तालुक्यातील टाकीपठार या अतिदुर्गम भागातील टिकबायचा पाडा या गावातला. सध्या तो पद्मश्री अण्णासाहेब जाधव संचालित सरळगाव येथील वसतिगृहात राहतो. व सरळगाव (ता. मुरबाड) येथील कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीत कला शाखेत शिकत आहे.

 


ठाण्यातील अनधिकृत बांधकामांच्या चौकशीसाठी समिती
० दोन महिन्यांत अहवाल ० आयुक्त जंत्रे अडचणीत
ठाणे/प्रतिनिधी
ठराविक दुकानातून कपडे, पुस्तके खरेदी करण्याची शाळांनी सुरू केलेली सक्ती बंद करावी, अन्यथा राष्ट्रवादी विरोध करेल, असा इशारा आव्हाड यांनी शाळा व्यवस्थापनाला दिला आहे. प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या निष्क्रियेतेमुळे ठाण्याला अनधिकृत बांधकामांनी विळखा घातला असून, अधिकारी केवळ गरिबांच्या बांधकामांवर कारवाईत करतात, असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील अनधिकृत बांधकामांची चौकशी नगरविकास सचिव बेंजामिन यांची समिती करणार असल्याचे सांगितले.

फेरीवाल्याची गाडी सोडविण्यासाठी शिवसेना नगरसेवकाची सुरक्षारक्षकांना दमदाटी
ठाणे/प्रतिनिधी
पालिकेच्या ग प्रभागातील अधिकाऱ्यांनी जप्त केलेली फेरीवाल्यांची एक हातगाडी शिवसेनेच्या डोंबिवलीतील सुदेश चूडनाईक या नगरसेवकाने सुरक्षारक्षकांना दमदाटी, शिवीगाळ करून पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या आवारातून पळवून नेली आहे. काल रात्री उशिरा ही घटना घडली आहे. यामुळे फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

श्रमजीवी महिलांचा आज मोर्चा
ठाणे/प्रतिनिधी
ठाणे जिल्ह्यातील आश्रमशाळांतून शिकणाऱ्या मुला-मुलींना शौचालये आणि स्वच्छतागृहांच्या अभावी उघडय़ावर बसावे लागत असून या मुलींना सुलभ शौचालयांच्या धर्तीवर ही सुविधा उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी येत्या ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आदिवासी प्रकल्प विभागाच्या कार्यालयावर श्रमजीवी संघटनेच्या आदिवासी महिला धडक देणार आहेत.
जिल्ह्यातील सर्वच आश्रमशाळांतून राहणाऱ्या मुला-मुलींना प्रात:र्विधी व आंघोळीसाठी उघडय़ावर बसावे लागते, असे श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी दिलेल्या भेटीतून उघड झाले आहे. ज्या मोजक्या आश्रमशाळांतून शौचालयांची व्यवस्था आहे, ती शौचालये पूर्णत: नादुरुस्त व अस्वच्छ झाली आहेत. त्यामुळे विशेष करून आदिवासी मुलींची मोठी कुचंबणा होत आहे.
शासन आश्रमशाळांसाठी दरवर्षी कोटय़वधी रुपये देत असूनही आदिवासी प्रकल्प विभागातील अधिकाऱ्यांची मनमानी आणि भ्रष्ट कारभारामुळे आदिवासी मुलींचे हाल सुरू आहेत. हा स्त्रीत्वाचा अपमान असून या मुलींनाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, परंतु स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी अधिकारी गरीब आदिवासी मुलांची छळवणूक करीत असल्याचा आरोप पंडित यांनी केला आहे.
झोपडपट्टय़ा व चाळीतून राहणाऱ्या शहरी लोकांसाठी आलिशान स्वच्छतागृहे बांधून सरकार त्यावर कोटय़वधी रुपये खर्च करीत आहे, पण ग्रामीण भागातील आदिवासी मुलांच्या आरोग्याची आणि हक्काची मात्र पायामल्ली करीत या मुलांना आंघोळीसाठी साधे न्हाणीघरही बांधून देण्यास टाळाटाळ करीत आहे. अनेक वेळा मागणी करूनही या अत्यावश्यक सुविधेकडे दुर्लक्ष होत असल्याने आदिवासी महिलांतून संताप व्यक्त होत आहे. या सोयीसाठी सरकारचा कितीही पैसा खर्च झाला तरी चालेल, पण येत्या दोन महिन्यात सर्व आश्रमशाळांच्या परिसरात सुलभ शौचालयांच्या धर्तीवर शौचालये व स्नानासाठी व्यवस्था करावी, अशी संघटनेची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

१० वर्षांत बनली नाही अभियंत्यांची ज्येष्ठता-यादी !
ठाणे/प्रतिनिधी
पदवीधारक आणि पदविका यांच्यातील वादामुळे ठाणे महापालिकेतील कनिष्ठ अभियंता, उपअभियंता यांची सेवाज्येष्ठता यादीच गेल्या दहा वर्षांपासून तयार करण्यात न आल्याने महत्त्वाच्या खात्यांमधील पदे रिक्त आहेत. त्याचा फायदा उचलून काही ठराविक अभियंत्यांना प्रभारी कार्यभार सोपविण्याची खेळी करीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इतर अभियंत्यांवर अन्याय करण्यास सुरुवात केली आहे.
याचा परिणाम म्हणून महापालिकेच्या पाणी विभागात ५० पदे रिक्त असल्याचे विदारक चित्र स्थायी समितीच्या मागील सभेत प्रशासनाकडून रंगविण्यात आले होते. विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे, सेनेचे राम फडतरे यांनी या प्रकरणाला वाचा फोडून प्रशासनाला धारेवर धरले. मुंब््रयातून वर्तकनगर प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तपदी नियुक्त झालेले मनीष जोशी आणि उपायुक्त आकाशी यांच्याकडे सोपविण्यात आलेला मुंब्रा व माजीवडा प्रभाग समितीचा कार्यभार यावरून आजच्या सभेत चर्चा झाली. तेव्हा सहाय्यक आयुक्तपदाची पाच, उपायुक्त चार आणि कार्यकारी अभियंत्याची पाच पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. कार्यकारी अभियंता ही पदे २००३ पासून रिक्त का आहेत, अशी सदस्यांनी विचारणा केली असता पदवीधर आणि पदविका यांच्यातील वादामुळे पदोन्नत्या रखडल्या असल्याची माहिती कार्मिक अधिकारी दीक्षित यांनी दिली, तर प्रत्येक प्रभाग समितीला उपनगर अभियंता नियुक्त करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविण्यात आला असून त्यासंबंधी तीन वर्षांपासून पाठपुरावा केला जात असल्याची अतिरिक्त माहिती नगर अभियंता के.डी. लाला यांनी दिली. महापालिकेत एकाच अधिकाऱ्याला अनेक विभागांची जबाबदारी दिली जात असल्याने कामावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे प्रभारी कार्यभार न देण्याची विनंती सदस्यांनी केली. तसेच पदविधारक आणि पदविका यांच्यातील वाद मिटविण्यासाठी शनिवारी स्थायी समिती सभापतींच्या दालनात बैठक बोलाविण्याचा निर्णय घेण्यात आला.
तत्कालीन आयुक्त टी. चंद्रशेखर यांनी १९९७ मध्ये पदविधारक असलेल्या ४० कनिष्ठ अभियंत्यांना महापालिका सेवेत घेतले. न्यायालयीन लढाई जिंकल्यानंतर स्थळ पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱ्या त्या कनिष्ठ अभियंत्यांना २००३ मध्ये सेवेत कायम करण्यात आले. दरम्यान २००१ मध्ये आणखी नियम पायदळी तुडवित ४० कनिष्ठ अभियंत्यांची भरती करण्यात आली. या भरतीमध्ये पदविकाधारकांचा समावेश करून त्यांनाही कायम करण्यात आले. त्यामुळे १९९७ च्या कनिष्ठ अभियंत्यांपेक्षा २००१ च्या अभियंत्यांना सेवाज्येष्ठता मिळाली. यास १९९७ मधील अभियंत्यांनी आक्षेप घेत प्रशासनाकडे फक्त सेवाज्येष्ठतेची मागणी केली आहे. हा चिघळलेला वाद सोडविण्यात प्रशासनास रस नसल्याने ते मर्जीतील कनिष्ठ अभियंत्यांकडे प्रभारी कार्यभार सोपवून इतरांवर अन्याय करीत असल्याची भावना निर्माण झाली आहे.

मुंबईचा ‘ट्रॅफिक सेन्स’ ठाणेकरांनी घ्यावा-ढेरे
ठाणे/प्रतिनिधी
सर्वच बाबतीत ठाणेकर मुंबईचे अनुकरण करताना दिसतात. मात्र मुंबईकरांप्रमाणे आपल्याला ट्रॅफिक सेन्स नाही. त्याचे अनुकरण झाल्यास कितीही वाहने वाढली तरी रस्त्यावरून सहजपणे चालता येईल आणि वाहनेही चालविता येतील, असा सल्ला पोलीस आयुक्त अनिल ढेरे यांनी ठाणेकरांना दिला. राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन करताना त्यांनी हा सल्ला दिला. व्यासपीठावर जिल्हाधिकारी आबासाहेब जऱ्हाड, प्रादेशिक परिवहन अधिकारी एल. पी. खाडे, पोलीस अधीक्षक नवल बजाज, वाहतूक उपायुक्त सुधीर दाभाडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत पाटील, संजय राऊत आदी उपस्थित होते. पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात वर्षांला सुमारे ३४० जणांचे अपघातात बळी जातात, त्यामुळे या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून, सुरक्षा सप्ताहाच्या माध्यमातून जी माहिती मिळेल, त्याचे सर्वांनी वर्षभर अनुकरण करावे, असे आवाहन ढेरे यांनी केले, तर युरोपीयन देशात माणसांच्या जिवाला फार मूल्य आहे, आपल्याकडे मात्र माणसाच्या जिवाला किंमत नाही. बेदरकार वाहन चालविण्याची प्रवृत्ती बदलण्याची गरज असून, त्याची सुरुवात प्रत्येकाने आपल्यापासूनच करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जऱ्हाड यांनी केले. ठाण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कोपरी, कासारवडवली तसेच डोंबिवली (प) येथे वाहतूक शाखेची युनिट्स सुरू करण्यात येणार असल्याचे दाभाडे यांनी सांगितले, तर जिल्ह्यात दररोज ६०० नव्या वाहनांची भर पडत असल्याचे खाडे म्हणाले.

बेदरकार वाहनचालकांकडून दीड कोटीचा दंड वसूल कल्याण परिसरात धडक कारवाई
कल्याण/प्रतिनिधी
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून बेदरकारपणे वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांकडून वाहतूक शाखेच्या कल्याण- डोंबिवली विभागाने १ कोटी ४४ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. ६५ हजार १२३ निष्काळजी वाहनचालकांविरुद्ध कायदेशीवर कारवाई केली आहे. ६ हजार ५७१ चालकांच्या विरुद्ध न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत. वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन जुईकर यांनी वाहतूक विभागाची सूत्रे हातात घेतल्यापासून बेदरकार वाहन चालकांविरुद्ध कारवाई करण्याची मोहीम त्यांनी हाती घेतली आहे. कामचुकारपणा करणाऱ्या वाहतूक पोलिसांवर त्यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
दारू पिऊन वाहने चालविणाऱ्या ५८५ चालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. या चालकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे तपासणीत उघड झाले आहे. गेल्या वर्षी २४३ मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई करून सुमारे ४५ लाखाचा महसूल जमा करण्यात आला होता. त्यावर्षी ५१ अपघात कल्याण परिसरात झाले होते, यावेळी ५४ अपघात झाले आहेत.
अनधिकृत रिक्षाचालकांवर आरटीओंच्या सहाय्याने कारवा़ई करण्यात येत आहे. अनधिकृत रिक्षा वाहनतळ बंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कल्याण रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे.
शहरात मारुती ओम्नी व मॅक्सी कारला परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी मिळणार आहे. कल्याण-डोंबिवली पालिका प्रशासन सिग्नल यंत्रणा सुरळीत होण्यासाठी सहकार्य करीत नसल्याने शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न चिघळला आहे. वाहतूक सिग्नल सुरू करून ते वाहतूक विभागाकडे हस्तांतरित करण्याची जबाबदारी पालिकेची आहे, पण प्रशासन, लोकप्रतिनिधी याबाबत कमालीचे उदासीन असल्याची खंत वाहतूक विभागाचे अधिकारी व्यक्त करीत आहेत.

लाचखोरांच्या शर्यतीत महसूल विभाग अव्वल
ठाणे/प्रतिनिधी
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या वर्षभरात भ्रष्टाचाराविरोधात राबविलेल्या मोहिमेत सात राजपत्रित अधिकाऱ्यांसह ६५ कर्मचाऱ्यांना गजाआड केले. वर्षभरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोरांविरोधात ४३ सापळे रचले. त्यात वर्ग एकच्या सात अधिकाऱ्यांचा समावेश असून मोठय़ा लोकसेवकांनाही अटक करण्यात आली. लाचेच्या सापळ्यात महसूल विभागाचे १६, पोलीस खात्यातील १४, वनविभागाचे तीन व इतर विभागांच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

आदिवासी मेळाव्याद्वारे भाजपचे रविवारी मुरबाडमध्ये शक्तिप्रदर्शन
शहापूर/वार्ताहर
आदिवासींच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी व त्यांच्या न्याय्य हक्कासाठी भाजपच्या मुरबाड तालुका आदिवासी आघाडीतर्फे आदिवासी बांधवांचा भव्य मेळावा रविवारी ४ जानेवारी रोजी वैशाखरे येथे आयोजित केला आहे. आदिवासी ठाकूर, कातकरी महादेव कोळी या आदिवासींची एकजूट करून त्यांना भाजपच्या झेंडय़ाखाली आणून जोरदार शक्तिप्रदर्शन करून भाजपने तालुक्यात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सकाळी ११ वाजता हा मेळावा आयोजित केला आहे. या आदिवासी मेळाव्यास प्रदेश सरचिटणीस आ. विनोद तावडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, तर मेळाव्याचे अध्यक्षस्थान ठाणे विभाग अध्यक्ष जगन्नाथ पाटील भूषविणार आहेत. या मेळाव्यास आमदार संजय केळकर, आ. विष्णू सवरा, आ. हरिश्चंद्र पाटील, आ. रामनाथ मोते, बदलापूरचे नगराध्यक्ष राम पातकर, कल्याणचे उपमहापौर नरेंद्र पवार, भाजपचे कल्याण जिल्हा अध्यक्ष दिनेश तावडे, कामगार आघाडीचे प्रदेश चिटणीस शरद म्हात्रे आदी उपस्थित राहणार आहेत. मेळाव्याचे आयोजक सुभाष घरत यांनी ही माहिती दिली. मुरबाड तालुक्यातील सह्याद्री डोंगराच्या कडय़ाकपारीत राहत असलेल्या कातकरी, महादेव कोळी, ठाकूर या आदिवासींना वर्षांनुवर्षे दारिद्रय़ात खितपत पडावे लागले आहे. त्यांच्यापर्यंत वीज, पाणी, रस्ते या मूलभूत सुविधा व शासनाच्या विविध योजना पोहचत नसल्याने आदिवासींची एकजूट करून शासनाकडे आवाज उठविण्यासाठी आदिवासींचा मेळावा आयोजित केल्याचे घरत म्हणाले.

अंबरनाथ आणि बदलापूर शहरांसाठी नव्या पाणीपुरवठा योजना मंजूर
बदलापूर/वार्ताहर
अंबरनाथ आणि बदलापूर शहरांची भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन अंबरनाथसाठी १७ कोटी ६५ लाख रुपये, तर बदलापूर शहरासाठी २६ कोटी ६५ लाख रुपयांच्या नव्या पाणी योजनेला शासनाची मंजुरी मिळाली असून, येत्या काही दिवसांत या कामांना प्रत्यक्षात सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली. नागपूर येथे अलीकडेच झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये या दोन्ही शहरांप्रमाणेच मतदारसंघातील विविध कामांसाठी केलेल्या प्रयत्नाची माहिती देण्यासाठी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. बदलापूर शहराच्या पाणी वितरण व्यवस्थेत वाढ होण्यासाठी पूर्वीच्या १३ कोटी ८९ लाख रुपयांच्या दुसऱ्या टप्प्यातील योजनेमध्ये २६ कोटी ६५ लाख रुपयांपर्यंतच्या योजनेत आवश्यक त्या ठिकाणी जलकुंभाची निर्मिती करणे, ३८ कि.मी. लांबीच्या जुन्या जलवाहिन्यांच्या ठिकाणी नव्या जलवाहिन्या टाकणे, नवे फिल्ट्रेशन प्लॅन्ट उभारणे या कामांचा अंतर्भाव आहे, असे आमदार कथोरे म्हणाले. अंबरनाथ शहरातही ३४ कि.मी. नव्या जलवाहिन्या टाकणे, भेंडीपाडा, नारायणनगर येथे जलकुंभ उभारणे या कामांना प्राधान्य देण्यात येणार आहे. ९० टक्के शासनाचा निधी आणि जीवन प्राधिकरणाच्या १० टक्के निधीद्वारे ही कामे केली जाणार आहेत. या कामांखेरीज उल्हासनदीतून जादा २० दशलक्ष लिटर पाणी उचलण्यास जलसंपदामंत्र्यांनी परवानगी दिली आहे. अंबरनाथ-बदलापूर, तसेच ऑर्डिनन्ससाठी सध्या ७० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. यात आता सुधारणा होऊन ८५ त ९० दशलक्ष लिटर पाणी मिळेल, असा विश्वास आमदार कथोरे यांनी व्यक्त केला. जावसई आणि फुलेनगरला व्यवस्थित पाणीपुरवठा व्हावा, म्हणून ३९ लाख रुपयांची स्वतंत्र योजनाही राबविण्यास मंजुरी मिळाल्याचे कथोरे म्हणाले. सुधारित कामांमुळे पाणी गळती थांबवून पाणीपुरवठा सुरळीत होणार यात वाद नाही, असे त्यांनी नमूद केले.राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शरद तेली, नगरसेवक संभाजी शिंदे ,संजय गायकवाड यावेळी उपस्थित होते.

भाजप नगरसेविकेला शह देण्यासाठी शिवसैनिकांचे फलकयुद्ध
डोंबिवली/प्रतिनिधी
पेंडसेनगर प्रभागात सुरू असलेले विकासकामांचे श्रेय व सुरळीत नागरी विकासाच्या कामकाजाचे श्रेय घेण्यासाठी शिवसैनिकांनी या प्रभागात फलकयुध्द सुरू केले आहे. यामुळे व्यथित झालेल्या भाजपच्या या प्रभागातील नगरसेविका डॉ. हर्षां घाग यांनी या प्रकरणी महापौर रमेश जाधव, शहरप्रमुख शरद गंभीरराव यांच्याकडे संबंधित शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची तक्रार केली आहे. घाग यांनी निवेदनात म्हटले आहे, पेंडसेनगर प्रभागात यापूर्वी नियमित फवारणी केली जात नव्हती. त्यामुळे संबंधित आरोग्य निरीक्षकावर कारवाई करण्याची मागणी सातत्याने पालिकेत करीत होते. संबंधित अधिकारी मानकर यांच्याकडून आरोग्य विभागाचा कार्यभार आरोग्य निरीक्षक धोत्रे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. आरोग्य अधिकारी डी. पी. कांबळे यांच्या सहकार्यामुळे प्रभागात नियमितपणे धूरफवारणी, स्वच्छता केली जात आहे. नागरिकांच्या तक्रारींची तात्काळ सोडवूणक करण्यासाठी प्रयत्न केले जातात. परंतु, या प्रभागातील शिवसैनिक राजीव अंधारी, दिनेश अचलकर, शुभदा चव्हाण यांनी प्रभागात फलक लावून, प्रभागात डेंग्यूचा फैलाव झाला आहे, त्या नागरिकांना कोणाकडूनही न्याय मिळणे शक्य नसून अशा पीडितांना फक्त शिवसेनाच न्याय देईल. डेंग्यूची बाधा झालेल्या नागरिकांनी शिवसेनेच्या प्रभागातील कार्यालयाशी वैद्यकीय अहवालासह संपर्क साधण्याचे आवाहन फलकांद्वारे करण्यात आले आहे. या फलकांवरील अतिरंजित माहितीमुळे प्रभागातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. घाग या डॉक्टर असल्याने त्यांचे प्रभागातील आरोग्य विषयाकडे लक्ष नाही, हे दाखविण्याचा प्रयत्न शिवसैनिकांकडून केला जात आहे, असे कार्यकर्त्यांनी सांगितले.