Leading International Marathi News Daily                                  शनिवार, ३ जानेवारी २००९
विविध

इस्रायलचे हल्ले सुरूच; मृतांची संख्या ४२०
गाझा, २ जानेवारी/वृत्तसंस्था

सलग सहाव्या दिवशी इस्रायल आणि गाझा पट्टीतील हमास संघटनेतील धुमश्चक्री सुरूच असून इस्रायलच्या लढाऊ विमानांनी डागलेल्या दोन क्षेपणास्त्रात हमासचा कट्टर नेता निसार रायन याचे घर उद्ध्वस्त झाले. या माऱ्यात निसार, त्याच्या चार पत्नी आणि १० मुले तसेच दोन शेजारी मृत्युमुखी पडले. हमासनेही इस्रायलवर रॉकेटचा मारा केला. इस्रायलच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता ४२० वर तर जखमींची संख्या दोन हजारांपुढे गेली आहे. इस्रायल आणि हमासने धुमश्चक्री थांबवावी म्हणून आंतरराष्ट्रीय प्रयत्नही सुरू आहेत. मात्र दोन्ही बाजूंनी या प्रयत्नांना धूप न घालता आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे. हमासने केलेल्या रॉकेटच्या माऱ्यात इस्रायलमध्ये चारजण ठार झाले तर दहाहून अधिक जखमी झाले. इस्रायलच्या क्षेपणास्त्र माऱ्यात निसारच्या घराबरोबरच आणखी दहा-बारा घरे बेचिराख झाली. जबालियातील एक मशिदही इस्रायलने उद्ध्वस्त केली असून हमासच्या रॉकेटच्या साठय़ासाठी तिचा वापर केला जात असे.

मुंबई हल्ल्यानंतरचे केंद्राचे प्रयत्न ही निव्वळ धूळफेक - नरेंद्र मोदी
गांधीनगर, २ जानेवारी/पी.टी.आय.

मुंबईवरील हल्ले हे देशावरीलच हल्ले असून पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत प्रत्त्युत्तर द्यायला हवे, असे ठामपणे नमूद करीत या हल्ल्यांनंतर राष्ट्रीय तपास संस्था स्थापण्याचे व कायद्यांमध्ये दुरुस्ती करण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न म्हणजे निव्वळ धूळफेक आहे, अशी टीका गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केली.
या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत आगामी लोकसभा निवडणुकीत दहशतवादाच्या मुद्दय़ाला प्रचारात मोठे स्थान लाभण्याचे संकेतही त्यांनी दिले. मुंबईवरील हल्ल्यानंतर भाजपने निवडणूक प्रचारात हा मुद्दा वापरला तरी त्यांचा दिल्ली आणि राजस्थानात पराभव झाला. त्यामुळे दहशतवादाच्या मुद्दय़ाला लोकांचा तितकासा पाठिंबा नाही, हे निरीक्षण त्यांनी नाकारले.
मुंबईवरील हल्ले म्हणजे पाकिस्तानने भारतावर केलेले आक्रमणच आहे. त्याला केंद्र सरकारने त्याच भाषेत उत्तर द्यायला हवे, अशी सर्वसामान्य माणसाची इच्छा आहे. अमेरिकेप्रमाणे दहशतवादाबाबत आपणही कठोर कारवाईची भूमिका घ्यायला हवी, असेही त्यांनी नमूद केले.

काश्मीरमधील चकमकीत दोन जवान शहीद ; दोन अतिरेकी ठार
पूँछ, २ जानेवारी/पी.टी.आय.

जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्तानलगत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगतच्या परिसरात गेले दोन दिवस सीमा सुरक्षा दल आणि जैश ए महम्मदच्या सहा अतिरेक्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकींत आज लष्कराचे दोन जवान शहीद झाले.

नेपाळी माओवाद्यांनी
पशुपतीनाथमधील पूजा थांबविली..
काठमांडू, २ जानेवारी/पी.टी.आय.

नेपाळच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पुरातन पशुपतीनाथ मंदिरात नेमण्यात आलेल्या पुजाऱ्याला संरक्षण देण्यासाठी नेपाळच्या माओवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी दुपारी चार वाजता मंदिरात घुसून तेथे २५० वर्षांंपासून भारतीय पुजाऱ्याच्या हस्ते चालू असलेली नित्य पूजा थांबविली. मागील २५० वर्षांंत नित्य पूजेत खोडा घालण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. पशुपतीनाथ मंदिरात गेली ३०० वर्षे पूजेचा मान चालविणाऱ्या पारंपरिक भारतीय ब्राह्मण वर्गाला बदलून सर्वोच्च न्यायालयाने नव्या नेपाळी पुजाऱ्याची नेमणूक केली होती. या नव्या पुजाऱ्याला सोबत घेऊन माओवादी मंदिरात घुसले आणि त्यांनी महादेवाच्या नित्य पूजेत विघ्न आणले. या कृत्याचा मंदिराच्या पारंपरिक ब्राह्मण समाजाकडून निषेध करण्यात आला. पशूपतीनाथ परिसरात राहणाऱ्या इतर रहिवाशांनीही या माओवाद्यांच्या आंदोलनाचा निषेध केला आहे.

कंधमालप्रकरणी भाजपच्या चौघांना ‘रासुका’
भुवनेश्वर, २ जानेवारी/पी.टी.आय.

ओरिसातील तणावग्रस्त कंधमाल जिल्ह्यातील भाजपच्या चार स्थानिक नेत्यांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या नेत्यांमध्ये भीमसेन प्रधान, अनिल रथ, गंदाधर साहू आणि सरत साहू यांचा समावेश आहे. हे सर्व उदयगिरी आणि टीकाबली या भागात राहणारे आहेत. त्यांना याआधी दंगल, लूटमार व इतर आरोपांवरून अटक झाली आहे. विश्व हिंदू परिषदेचे नेते स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांची २३ ऑगस्ट २००८ रोजी हत्या झाल्यानंतर या चौघांना अटक झाली होती. त्यांना आता जामीन मिळण्याची शक्यता असल्याने त्यांच्यावर आता ‘रासुका’खाली गुन्हा नोंदण्यात आला आहे. यामुळे या चौघांना खटल्याशिवाय वर्षभर तुरुंगात ठेवता येणार आहे, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. सरस्वती यांच्या हत्येनंतर उसळलेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी तब्बल ८०० जणांना अटक केली होती. त्यानंतर अनेकांना जामीन मिळाला असला तरी या चौघांचा हिंसाचारात हात असल्याने त्यांची इतक्यात सुटका होऊ नये, असा पोलिसांचा प्रयत्न आहे.

इंजिनीअरच्या हत्येत सहभागी झाल्याची आमदाराची कबुली
लखनौ, २ जानेवारी/पी.टी.आय.

सार्वजनिक बांधकाम अभियंत्याच्या हत्येप्रकरणी अटक झालेले उत्तर प्रदेशातील सत्ताधारी पक्षाचे आमदार शेखर तिवारी यांनी आज अखेर हत्येतील सहभागाची कबुली दिली. औरिया जिल्ह्यातील अभियंत्याच्या हत्येत आपण सहभागी होतो असे त्याने चौकशीत सांगितल्याचे, अतिरिक्त पोलीस आयुक्त ब्रिजलाल यांनी सांगितले. प्राथमिक चौकशीत या आमदाराची पत्नी आणि औरियामधील सरपंच विभा तिवारी याही हत्येत सामील असल्याचे उघड झाले आहे. विभा तिवारी यांनी या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे नष्ट केले असून त्या सध्या फरारी असल्याचे पोलीस म्हणाले. मुख्यमंत्री मायावती यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी निधी देण्यास नकार दिल्यामुळे तिवारी आणि त्यांच्या साथीदारांनी सार्वजनिक बांधकाम खात्यातील अभियंत्याची हत्या करण्यात आली होती.

काश्मिरातील मतदारसंघांच्या फेररचनेची मागणी
जम्मू, २ जानेवारी/पी.टी.आय.

जम्मू आणि काश्मीरमधील मतदारसंघांची फेररचना करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित आमदार चमनलाल गुप्ता यांनी आज केली. नॅशनल कॉन्फरन्सच्या आधीच्या राजवटीत २०२६ पर्यंत अशा फेररचनेस आडकाठी करणारा कायदा संमत झाला आहे. त्यामुळे जम्मू प्रांतावर अन्याय झाला आहे. काश्मीर खोऱ्यापेक्षा जम्मूत लोकसंख्या जास्त असून तसेच त्याचे क्षेत्रफळ जास्त असूनही जम्मूत केवळ ३७ विधानसभा मतदारसंघ आहेत तर काश्मीर खोऱ्यात ४६ मतदारसंघ आहेत. जम्मूवरील अन्याय दूर करण्यासाठी सरकारने आधी केलेला कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला पाहिजे व राज्यातील मतदारसंघांची फेररचना झालीच पाहिजे, असे ते म्हणाले. जम्मू आणि काश्मीर विधानसभेत भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड ४ जानेवारीला होईल, असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, केंद्राकडून येणाऱ्या निधीवाटपात जम्मूवर अन्याय होत असल्याच्या आरोपांची दखल घेऊ व योग्य न्याय देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आधीच दिले आहे.

पुण्यात भारतीय द्राक्ष प्रक्रिया मंडळ स्थापणार
नवी दिल्ली, २ जानेवारी/खास प्रतिनिधी

भारतातील वाइन उद्योगाला चालना मिळावी, या उद्देशाने पुणे येथे करून भारतीय द्राक्ष प्रक्रिया मंडळ स्थापन करण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीच्या बैठकीत घेण्यात आला. हे मंडळ स्थापन करण्यासाठी सरकारने पुढील तीन वर्षांंसाठी ५ कोटी ९३ लाख रुपयांची तरतूद केली आहे. देशात सर्वाधिक द्राक्ष उत्पादन महाराष्ट्रात होत असल्यामुळे या मंडळाचे मुख्यालय पुणे येथे ठेवण्यात आले आहे. १८६० च्या सोसायटी नोंदणी कायद्यान्वये स्थापन करण्यात येत असलेल्या या मंडळाचे स्वरुप स्वायत्त असेल. जागतिक मापदंडांनुसार द्राक्षांचे उत्पादन व दर्जा वाढविण्यासाठी हे मंडळ द्राक्ष उत्पादकांना मार्गदर्शन करेल.