Leading International Marathi News Daily
रविवार, ४ जानेवारी २००९

नव्या युगाच्या नव्या कथा ुवाचकांना वाचायला मिळाव्यात, या हेतूने हे नवे सदर सुरू करीत आहोत. या सदरात दर रविवारी वेगवेगळ्या कथाकारांनी खास ‘लोकसत्ता’साठी लिहिलेली ताजी लघुकथा प्रसिद्ध करण्यात येईल. योगायोगाने श्रेष्ठ नवकथाकार पु. भा. भावे यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्ताने नामवंत तसेच नव्या लेखकांच्या दर्जेदार लघुकथा या सदरातून वाचकांना देण्याचा आमचा हा प्रयत्न-
‘उठि उठि गोपाला..’

 


भूपाळीचे प्रसन्न स्वर रेडिओवर उमटत होते. रायगडावरील पहाटेच्या गारव्यात धुक्याचे लोळ एकमेकांवर कडी करत ओसंडून वाहत होते. साडेसहाचा सुमार. कुमार गंधर्वाचे लाडिक स्वर पूजेची आळवणी करीत होते. रोप-वेच्या स्टाफ क्वार्टरमध्ये प्रसाद तयार होत होता. प्रसाद देशपांडे मूळचा कोल्हापूरचा. न्यू कॉलेजमधून बी.ए. केल्यावर तो पुण्यात स्थायिक झाला. देवळेसरांच्या आग्रहामुळे मराठी घेऊन प्रसादनं एम.ए. केलं खरं, पण त्याचा जीव खरा रमायचा इतिहासात! त्याचं इतिहासाचं वाचन दांडगं होतं. शिवछत्रपती हे तर त्याचं आराध्यदैवत होतं. आप्पा दांडेकरांविषयी त्याला विशेष आदर. त्यांच्या ‘भ्रमणगाथे’पासून ‘माचीवरल्या बुधा’पर्यंत सारं साहित्य त्यानं अनेक वेळा वाचून उजळणी केलेलं. आप्पांच्या शैलीचं त्याला खास अप्रूप वाटे. प्रसादला इतिहासाचं इतकं वेड, की पुण्या-मुंबईत चांगली लठ्ठ पगाराची नोकरी करायची सोडून तो बनला रायगडावरील गाईड. गडावर येणाऱ्या पर्यटकांना रसाळ वाणीने इतिहास ऐकवताना लोकही भारावून जायचे. गडावरील कोपरा न् कोपरा प्रसादला पाठ होता.
शनिवारच्या गर्दीच्या धास्तीने प्रसादची धांदल उडाली होती. गारठय़ाच्या दुलईतून उमटणाऱ्या धुरांच्या रेषा रायगडाला जाग आणत होत्या. मुंबईहून बोरीवलीचा एक ग्रुप येणार होता आणि ‘प्रसादच गाईड हवा’, असा त्यांचा आग्रह होता. तसं त्यांचं पत्रही आलं होतं.
दुपार टळून गेली होती. ‘महाराजांचं जगदिश्वरावर विशेष प्रेम. कुठलीही नवी मोहीम, सण, महत्त्वाचा प्रसंग असो, महाराज प्रथम जगदिश्वरापुढे विनम्र होऊन आशीर्वाद घेणार..’ भरघोस दाढीमिश्या, विरळ होत जाणारे केस, करारी मुद्रा. प्रसादच्या कपाळावर घर्मबिंदू उमटले होते. वीसएक जणांचा ग्रुप देवडीत विसावला होता. समाधीकडे तोंड करून प्रसाद मोठय़ा तन्मयतेने बोलत होता. त्याच्या ओघवत्या वक्तृत्वाने गडावरील चिरा न् चिरा बोलका होत असे. आणि श्रोत्यांच्या मनात इतिहास जिवंत होत असे. ग्रुप रसिक असेल तर प्रसाद अधिकच रस घेऊन माहिती सांगताना रंगून जाई. पाल्र्याची, बोरीवलीची मंडळी इतिहासात रंगून गेली होती.
पश्चिमेच्या आकाशाला लाली येऊ लागली. सावल्या लांब होऊ लागल्या. भणाणारा वारा अधिकच बोचरा झाला. प्रसादची गडप्रदक्षिणा संपत आली होती. मेणा दरवाजातून बाहेर पडून ग्रुप डावीकडच्या उंचवटय़ावर पोचला. समोर पोटल्याचा फितूर डोंगर दिसत होता. यावरूनच तर इंग्रजांनी गडावर तोफा डागल्या. उजवीकडे पश्चिमेला काळसर जांभळ्या डोंगरांच्या रांगा पत्त्यांच्या उलगडत जाणाऱ्या कॅटप्रमाणे पसरल्या होत्या. त्यांच्या एकमेकांत मिसळत जाणाऱ्या अनेकविध रंगछटा आणि त्यावर भडकत, पेटत जाणारं लाल आकाश. निसर्गाच्या त्या अफाट, असीम रूपापुढे सारेच स्तब्ध झाले होते.
प्रसाद ग्रुपकडे वळून हलक्या आवाजात म्हणाला,
‘मित्रहो, तुम्ही गोनीदांची ‘रानभुली’ वाचली आहे?’ नकळत साताठजणांनी माना डोलावल्या.
‘त्या कादंबरीची नायिका मनी पळून जाते. कुणालाच सापडत नाही. शेवटी आप्पांना इथेच खाली दडलेल्या एका अवघड, दुर्गम गुहेत मनी सापडते. त्या कथेला एक वेगळीच कलाटणी या ठिकाणी मिळते..’ प्रसादच्या आवाजातील उत्साह संसर्गजन्य होता. समोर बसलेले सरवटेकाका पुढे सरसावले. म्हणाले, ‘मी बोरीवलीत श्रीकृष्णनगरमध्ये राहतो. आमच्या इथे एक पेन्शनर कुळकर्णीकाका राहतात. गंमत अशी की, ‘रानभुली’मधील ते बँक मॅनेजर!’
‘अहो, काय सांगताय काय?’ शेजारीच बसलेल्या एक काकू चिवचिवल्या.
‘मध्ये ते सांगत होते की, ही मनी आजही हयात आहे. इथेच कुठेतरी.. पायथ्याच्या एका वाडीत!’ - इति सरवटेकाका.
प्रसाद अचानक गप्प झाला. ग्रुपचा निरोप घेतानाही तो तसा अबोलच होता. पश्चिमेकडून धुकं तरंगत वर येत होतं. गर्दी ओसरत होती. तारका लुकलुकू लागल्या होत्या. मेणा दरवाजापाशी प्रसाद एकटाच हरवल्यागत बसून होता. ‘मनी जिवंत आहे आणि जवळच कुठेतरी आहे,’ ही कल्पनाच अंगावर काटा आणणारी होती. गालावर खळी पाडणारी नक्षत्रासारखी मनी केव्हापासून त्याच्या मनात रुतून बसली होती. तिचं गडावरील प्रेम, धाडस, मनस्वीपणा.. सारंच मोहून टाकणारं. दाटून येणाऱ्या अंधारात झपझप पावलं टाकत प्रसाद खोलीवर आला. ट्रंकेच्या तळाशी असलेली ‘रानभुली’ धूळ झटकून त्याने बाहेर काढली आणि पुन्हा एकदा तिच्या पारायणात तो हरवून गेला.
एरवी सुटीत नियमितपणे पुण्याला जाणारा प्रसाद त्या मंगळवारी तडक गडावरून खाली उतरला आणि पायथ्याच्या पाचाड गावापासून अवकीरकरांच्या मनीचा शोध सुरू झाला. जुने संदर्भ, माणसं आणि त्यांची स्मृतीदेखील पुसट झाली होती. प्रसाद मात्र झपाटल्यासारखा मिळेल त्या वाहनाने, कधी तंगडतोड करत दोन दिवस वणवण फिरला.
छत्रीनिजामपूरकडे उतरून वाकणकोंडीच्या डोहापर्यंत साताठ वाडय़ा त्याने पिंजून काढल्या. एकच प्रश्न- ‘गडावरच्या अवकीरकरांची मनी ठाऊक आहे?’ अनेकांनी प्रसादला वेडय़ात काढलं. मनी कदाचित आता हयातही नसेल, अशी शंकाही बोलून दाखवली. पण प्रसाद आता हट्टाला पेटला होता. मनीचं मोकळ्या आभाळाखाली खुललेलं रूप, तिची जिद्द, हट्टीपणा, पहिलं मूल गेल्यावर आलेलं हळवेपण.. असं सारं काही प्रसादच्या डोक्यात तरळत होतं. कपडे चुरगळलेले, मळलेले, खाण्या-पिण्याची आबाळ; पण त्याला हे काहीच जाणवत नव्हतं. त्याचा उत्साह, आवेग इतरांना कळत नव्हता. बुधवारच्या संध्याकाळी पहिलं यश मिळालं. करमरवाडीतल्या एका पांगळ्या म्हाताऱ्याला मनी आठवली. रावजी, साऊ- मनीचे आई-वडील आठवले. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. मनीचं पूर्ण नाव आता होतं- मनी धोंडिबा होगाडे. आणि आता ती लामाजेवाडीत राहत होती. अखेर पत्ता सापडला होता. थकल्याभागल्या अवस्थेत पाचाडला देशमुखांच्या हॉटेलात बाकडय़ावर तो झोपून गेला. ‘पघा की आप्पा! नारायेन कसा ग्वाऽऽड दिसतो!’ गालाला खळी पाडत म्हणणारी मनी प्रसादला स्वप्नात दिसत होती.
सकाळच्या पहिल्या गाडीने महाडला जाऊन एक भारीपैकी नऊवारी साडी आणि मिठाईचा पुडा घेऊन प्रसाद पाचाडला परतला. तसाच जीपने पुनाडेवाडीला निघाला. लामाजेवाडीचा पत्ता विचारत प्रसादला होगाडय़ांचं घर अखेर सापडलं. पोरगेलासा तरुण सामोरा आला. मनीचंच घर असल्याची खात्री करून, सारवलेल्या अंगणात समोरच टाकलेल्या कांबळ्यावर प्रसाद विसावला. दोनच मिनिटांत कुडाच्या भिंतीचा आधार घेत, कपाळावरचा पदर सावरत एक म्हातारी घरातून बाहेर आली.
‘का हो, तुमचं मनीकडे काय काम आहे?’ प्रश्नात एक अंधुक भीती होती. म्हातारी सत्तरीच्या आसपास असणार. वार्धक्याच्या रेषा तिचं मूळचं सौंदर्य झाकू शकत नव्हत्या. प्रसादनं आप्पांची ओळख दिली, तेव्हा कुठे म्हातारी मोकळेपणानं बोलू लागली. रापलेला तांबूस वर्ण. बोलके पिंगट डोळे. आयुष्यभर काबाडकष्ट केलेल्या तिच्या हातांची लांबसडक बोटं नजरेत भरत होती. एकातून दुसरी अशा आठवणी निघत गेल्या. मनीला आप्पांबद्दल अफाट आदर. तिच्याबद्दल लिहिल्याचंही तिला ठाऊक नव्हतं. आधी कावीळ, मग मलेरिया झाल्यानं मनी थकून गेली होती. पण तरीही गडाबद्दल भरभरून बोलत होती. कुणीतरी आपली आठवण काढत भेटायला आल्याचा आनंद तिला झाला होता. तिच्या वागण्यात एक प्रेमळ अगत्य होतं. प्रसादनं तिला मिठाई, साडी दिली. खळ्यावर मळणीसाठी गेलेला धोंडिबा परत आला. जेवणाचा आग्रह झाला. प्रसादनेही आढेवेढे न घेता गरमागरम पिठलं-भाकरीचं पोटभर जेवण केलं. तसं गेले दोन दिवस तो उपाशीच होता. गप्पांतून अनेक गोष्टी उलगडत गेल्या. मोबाईलच्या कॅमेऱ्यात प्रसादनं मनीची छबी साठवून घेतली. मनीच्या हाताचे ठसे त्याने ‘रानभुली’च्या पहिल्या पानावर उमटवून घेतले. कल्पनेतल्या आवडत्या नायिकेला प्रत्यक्षात भेटल्याचा अपार आनंद त्याला झाला होता. खूप काही मिळाल्याचं समाधान लाभलं होतं.
पाचाडला जाणाऱ्या एस्टीवर सोडायला मुलाला सोबत घेऊन हळूहळू चालत मनीही आली होती. बस आली. प्रसादचा पाय निघत नव्हता. बसमध्ये चढताना प्रसादने बळेच पाचशेची एक नोट मनीच्या हातात कोंबली. ‘आवो, हे कशाला?’ - इति मनी. ‘नातवंडांच्या खाऊसाठी!’ असं म्हणत तो पटकन् बसमध्ये चढला आणि खिडकीपाशी येऊन बसला. ‘मनूताई, तब्बेतीला जपा हो!’ बस निघाली. तेवढय़ात मनी लगबगीने हातवारे करत येताना दिसली. प्रसादने कंडक्टरची विनवणी करून बस थांबवली. मनीची क्षीण कुडी धपापत होती. मनी बसपाशी आली. कनवटीची एक पुरचुंडी काढून तिने प्रसादला दिली. ‘हे काय?’ प्रसादने गोंधळून विचारले.
‘असू दे! माझी आठवण म्हणून!’ असं म्हणून मनी पटकन् वळून काहीशी खुरडत घराकडे निघाली. घाई करणाऱ्या कंडक्टरने जोरात घंटी दिली आणि भर्रकन् धुरळा उडवत बस निघाली.
हादरणाऱ्या बसमध्ये अलगद हातांनी प्रसादने एका मळकट कापडाच्या तुकडय़ाची ती पुरचुंडी उघडली. विस्मयाने प्रसादचे डोळे विस्फारले. सोन्याच्या जाड वळ्यात मढवलेलं एक वाघनख होतं. तसं जड होतं. नक्कीच मूल्यवान असणार. प्रसादसाठी तर ती अनमोलच भेट होती. मनीने किती सहजतेने दिली होती.
काहीही मिळालं तर त्याची परतफेड करण्याची मध्यमवर्गीय, शहरी धडपड आठवून प्रसाद स्वत:शीच खजील झाला. खडखडणाऱ्या बसने आता वेग घेतला होता. मोकळ्या, स्वच्छंद आभाळाखाली वाढलेल्या मनीच्या निव्र्याज मनाचं मोठेपण त्याला लाजवून गेलं. अंधारून येणाऱ्या लालसर संधिप्रकाशात आसमंत विरघळून जात होता. काळसर, महाकाय, स्थितप्रज्ञ रायगड हळूहळू जवळ येत होता.
वसंत वसंत लिमये