Leading International Marathi News Daily
रविवार, ४ जानेवारी २००९

मनोरंजक माहिती
२३ नोव्हेंबरच्या अंकातील ‘नाटकात अस्वल’ हा डॉ. आनंद जोशी यांचा लेख खूपच आवडला. त्यांनी अतिशय मनोरंजक माहिती त्यात दिली आहे. नाटकामध्ये एका खऱ्याखुऱ्या अस्वलाचा वापर केला गेला होता, ही भन्नाट माहिती वाचताना मन गुंगून गेले.
- मधुकर भिडे, पुणे.

व्यर्थ हे बलिदान!
अनुराधा कुलकर्णी यांचा दहशतवादी हल्ल्यासंदर्भातील अस्वस्थ करणारा लेख वाचला. लेखात व्यक्त झालेल्या संवेदना कुणालाही हलवून टाकणाऱ्या आहेत. तो वाचताना वाटलं की, आपलं सरकार खरोखरीच एवढं संवेदनशील आहे का? याचं

 

उत्तर नकारार्थीच येईल. म्हणूनच पोलीस आणि कमांडोंच्या बलिदानाला ‘व्यर्थ न हे बलिदान’ऐवजी ‘व्यर्थ हे बलिदान’ असं म्हणावंसं वाटतं.
प्रत्येक युद्धानंतर, अशा प्रकारच्या नुकत्याच घडलेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यांनंतर त्यात सहभागी झालेल्या शूर वीरांची अमाप स्तुती केली जाते. शासनाकडून व जनतेकडून त्यांच्या कुटुंबांना पैसे व अन्य मदतीची घोषणा केली जाते. परंतु त्यानंतर प्रत्यक्षात काय होतं? यासंबंधातलं वास्तव तेव्हाच कळतं- जेव्हा त्याला प्रसार माध्यमांतून वाचा फुटते. अशा अनेक जवानांच्या कुटुंबियांची यापेक्षाही अधिक दयनीय अवस्था असू शकेल. संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बलिदान केलेल्या वीरांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी ५४३ पैकी केवळे तीसएकच लोकप्रतिनिधी हजर राहतात. अशा सत्तालोलुप, संपत्तीला हपापलेल्या प्रतिनिधींच्या उदाहरणावरून शासन व सरकारी यंत्रणा किती संवेदनशून्य आहे, हे लक्षात येतं.
- यशवंत धोंगडे, विलेपार्ले.

अभ्यासपूर्ण लेख
‘पाकिस्तानी दहशतवादाचा प्रवास’ हा अभ्यासपूर्ण लेख मुस्लिम दहशतवाद व त्यातील पाकिस्तानच्या महत्त्वपूर्ण सहभागाचे विवेचन करणारा होता. वस्तुत: पाकिस्तानलाही स्वातंत्र्य मिळून भारताएवढीच वर्षे झाली. पण देशांतर्गत विकासासाठी प्रयत्न होण्याऐवजी इतरत्र लक्ष दिल्यामुळे आज पाकिस्तानात गरिबी व यादवीची चिन्हे आहेत. ज्या देशात एक राष्ट्राध्यक्ष लष्करी षड्यंत्राला बळी पडतो, सध्याच्या राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीला दहशतवादी हल्ल्यात बळी जावे लागते, तिथे दहशतवाद किती आम आहे, हे सहज लक्षात यावं. तिथल्या सामान्य जनतेचे लक्ष मुख्य प्रश्नांवरून अन्यत्र वळविण्यासाठी सरकारची ती गरज बनली आहे.
मुळात पाकिस्तानी दहशतवाद हा अमेरिकापुरस्कृत आहे. आज जरी अमेरिका पाकिस्तानवर दबाव आणू पाहत असली तरी पाकिस्तान त्याला किती धूप घालेल, हे सांगता येत नाही. पाकिस्तानातीली ‘आयएसआय’ची शिरजोरी अनेक वर्षे भारताने अनुभवली आहे. पण त्यावर उपाय योजण्याऐवजी आजही सामंजस्याचेच प्रयत्न केले जातात. आणि हेच खरे वाढत्या दहशतवादाचे कारण आहे.
- माया भाटकर, चारकोप.