Leading International Marathi News Daily
रविवार, ४ जानेवारी २००९

केंब्रिज या शब्दात सामावले आहे एक जागतिक कीर्तीचे विद्यापीठ, तेथील विद्वत्तेची शिखरे, तेथील प्रज्ञावंत, चॅपॅल्स आणि अनेक भारतीयांना स्फूर्तिदायी ठरणारे तेथील शैक्षणिक वातावरण.. मूळ भारतीय पण आता ब्रिटनवासी असलेल्या लेखिका सौम्या बलसारी यांनी नर्मविनोदी शैलीत लिहिलेली ‘द केंब्रिज करी क्लब’ ही कादंबरी मात्र भारतीयांना फारशा ज्ञात नसलेल्या व एका वेगळ्याच ‘केंब्रिज’ची कहाणी सांगते. ही कादंबरी सध्या ब्रिटनमध्ये खूप गाजतेय. सौम्या बलसारी यांनी आपल्या या कादंबरीच्या निर्मितीबाबत ‘लोकसत्ता’ला दिलेली ही विशेष मुलाखत-
सर्वसामान्यांना माहीत असलेल्या केंब्रिजकडे पाठ वळवून तुम्ही एका वेगळ्याच केंब्रिजवर कादंबरी लिहिण्याचे का मनात आणले?

 


- केंब्रिज विद्यापीठावर व तेथील घडामोडींवर अनेक लेखकांनी आजवर लिहिले आहे. टॉम शार्प यांची ‘पोर्टर हाऊस ब्ल्यू’ किंवा सॅबॅस्टिअन फॉल्क यांची ‘द रिसेण्ट एंजल’ या कादंबऱ्या आहेतच. केंब्रिजला ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. डार्विन, न्यूटन, मिल्टन, विग्टनस्टीन, बंट्र्राड रसेल, व्हर्जिनिया वुल्फ, रामानुजम, अमर्त्य सेन अशा अनेक विद्वत्जनांची नावे केंब्रिजशी जोडलेली आहे. या साऱ्यांना घडताना, भरघोस यश मिळविताना केंब्रिजने पाहिले आहे. त्या परंपरेच्या पाश्र्वभूमीवर आताचे चित्र जरा वेगळे आहे. वरवर शांत वाटणाऱ्या पृष्ठभागाच्या अंतरंगात अनेक तडे गेले आहेत. मला या दुभंगलेपणाचा शोध घ्यायचा होता. अर्थात त्यातही वसाहतवाद संपल्यानंतरच्या काळाचे दर्शन घडवायचे होते. या सर्व गोष्टींवर चिमटे काढत विनोदी शैलीत भाष्य करायचे असेल, तर त्यासाठी कादंबरीचा फॉर्म मला संयुक्तिक वाटला. या कादंबरीसाठी हवे असलेले वातावरण मला मिळाले मिल रोडवर. कॉस्मोपोलिटन वातावरण असलेल्या मिल रोडवर करी हाउसेस, हेअर अ‍ॅण्ड ब्युटी सलून, कॅफे, चॅरिटी शॉप असे काही कुटुंबांनी एकत्रितपणे चालविलेले उद्योग आहेत. केंब्रिज विद्यापीठामध्ये तुमच्याकडे असलेल्या ज्ञानावरून तुम्हाला जोखले जाते, पण मिल रोडवर ही व्यक्तिमत्त्व जोखण्याची भानगड नाही. तुम्ही असाल तसे सामोरे येता!
भारतातून विदेशात कधी स्थलांतरित झालात? केंब्रिजमध्ये येण्याची ओढ कशामुळे निर्माण झाली?
- १९८७ मध्ये मी भारतातून परदेशात आले. काम व प्रवासानिमित्ताने युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलियामध्ये खूप भटकंती झाली. मग १३ वर्षांपूर्वी मी केंब्रिजमध्ये आले. इंग्रजी साहित्य या विषयात मी उच्चशिक्षण घेतले आहे. जगातील सर्वोत्तम ग्रंथालयांपैकी एक असलेल्या केंब्रिज विद्यापीठ ग्रंथालयाचा मला माझ्या कामासाठी खूप वापर करता आला.
एका काल्पनिक चॅरिटी शॉपचे चित्र शब्दांकित करावे असे का वाटते? तुमची ‘द केंब्रिज करी क्लब’ कादंबरी नेमके काय सांगते?
- केंब्रिज विद्यापीठामध्ये तीन वर्षे संशोधन केल्यानंतर मी एका चॅरिटी शॉपमध्ये व्हॉलेण्टिअर म्हणून काम करू लागले. मला तिथे प्रथम घेऊन जाणाऱ्या ब्रिटिश महिलेला माझ्या नावा-गावाशी काहीही देणे-घेणे नव्हते. इतकेच नव्हे तर तिने नंतर मला ओळख देणेही बंद केले. या चॅरिटी शॉपमधील व्हॉलेण्टिअर क्षुद्र मनोवृत्तीने वागायचे. या चॅरिटी शॉपमध्ये मला पैशाचे व्यवहार पाहण्यास किंवा तेथे विक्रीस असलेल्या वस्तूंच्या किमती ठरविण्यास मनाई होती. मला चक्क फरशी पुसण्याचे, कॉफी बनविण्याचे काम करावे लागे. या शॉपमध्ये मी केलेल्या विण्डो डिस्प्ले अ‍ॅरेजमेंटस् पुढच्या पाळीतील व्हॉलेण्टिअर विस्कटून टाकत. यातून मी एक धडा शिकले, की स्वत:चा फायदा कसा होईल ही प्रत्येकाच्या मनात असलेली इच्छा व पुर्नप्रक्रिया केलेल्या वस्तूंचा अपवाद वगळता या जगातील प्रत्येक गोष्ट नष्ट होते. चॅरिटी शॉपमध्ये काम करताना मनात नोंदविलेली ही सारी निरीक्षणे मला पुढे खूप उपयोगी ठरली.
लंडन येथे मी मुक्त पत्रकार व स्तंभलेखिका म्हणून कार्यरत होते. त्या वेळची गोष्ट आहे. नवीन नाटके व नाटककारांच्या शोधात असणाऱ्या कॅली थिएटर कंपनीची जाहिरात माझ्या पाहण्यात आली आणि चॅरिटी शॉपमध्ये काम केलेल्या दिवसांच्या आठवणी माझ्या डोळ्यासमोर तरळून गेल्या. त्यापासून प्रेरणा घेऊन मी माझे पहिले नाटक ‘करी क्लब’ लिहून हातावेगळे केले. २००३ साली लंडन येथील सोहो थिएटरमध्ये या नाटकाचे पहिले वाचन झाले. या कार्यक्रमाला ‘ब्लॅक अ‍ॅम्बर’ प्रकाशनाचे प्रमुख व त्यांचे संपादक उपस्थित होते. साऱ्या गोष्टी जुळून आल्या. त्या नाटकाचे कादंबरीत रूपांतर करण्याचा प्रस्ताव प्रकाशकांनी माझ्यासमोर ठेवला. तो मला मान्य झाल्याने मी कादंबरी लेखनासाठी करारबद्धही झाले. या कादंबरीची पहिली आवृत्ती २००४ साली प्रकाशित झाली. त्यानंतर काही आठवडय़ातच ‘ब्लॅक अ‍ॅम्बर’ प्रकाशन संस्थेचे अन्य कारणांनी दिवाळे वाजले. त्या घडामोडीत माझी पहिली-वहिली कादंबरी कुठे गायब झाली ते कळलेच नाही. पुस्तक लिहिलेली, तरीही पुस्तकाविना असलेली लेखिका- अशा अवस्थेत मी त्यानंतरचे काही दिवस घालविले. त्यानंतर ही कादंबरी आर्केडिया पब्लिशर्सनी २००८ साली नव्या मुखपृष्ठाचे लेणे देऊन प्रकाशित केली.
‘द केंब्रिज करी क्लब’ या कादंबरीमध्ये मी गॉसिपिंग करणाऱ्या, बबली वृत्तीच्या तीन महिलांना (ज्या मूळ भारतीय आहेत) मुख्य पात्रे म्हणून रंगविले आहे. मूळ पुण्याच्या व कंजुष स्वभावाच्या स्त्रीरोगतज्ज्ञाशी विवाह झालेली दुर्गा पटवर्धन, एका‘बायसेक्युअल’ इंग्रज व्यक्तीबरोबर विवाहबद्ध झालेली हिरा
तसेच मूळ कोलकात्याची व ‘चॅटर्ज्ी’बरोबर सहजीवन जगणारी स्वर्णकुमारी- ही तीन भारतीय महिला पात्रे आणि त्यांच्यासोबत आहे एलीन. ही आयरिश महिला आहे. चॅरिटी शॉपची मालकीण डायना वेलिंग्टन स्मिथ ही इंग्लंडच्या साम्राज्यशाहीचा टेंभा मिरविणारी, बडेजाव जपणारी व वृत्तीने उर्मट अशी स्त्री आहे. या तिन्ही भारतीय महिलांना डायना अजिबात आवडत नसते.
‘द केंब्रिज करी क्लब’ या कादंबरीतील सारे प्रसंग एकाच दिवशी घडतात आणि ते इतर गोष्टींशी जोडले जातात. या कादंबरीच्या कथानकापेक्षा त्यातील पात्रे मला अधिक महत्त्वाची वाटत होती. कदाचित मी एखादी रहस्यमय कादंबरी लिहू शकले असते, पण मी माझ्या वाचकांना जीवनाच्या एका छोटय़ा अंगाचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न ‘द केंब्रिज करी क्लब’मधून केला. कादंबरीतील चॅरिटी शॉप हे जणू शेक्सपिअरच्या नाटकासारखे आहे, जेथे पात्र रंगभूमीवर येतात व आपली भूमिका अदा करतात.
या कादंबरीतून तुम्हाला नेमका काय संदेश द्यायचा आहे?
काही दशकांपूर्वी ब्रिटनमध्ये अन्य देशांतून आलेल्यांची पहिली पिढी स्थायिक झाली. त्यानंतर अनेक प्रश्न उभे राहिले. त्यांच्याकडे नव्या दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न ‘द केंब्रिज करी क्लब’ या कादंबरीत केला आहे. युरोपात सध्याच्या वातावरणात तुमचे कुळ-मूळ, ओळख याविषयी अनेक प्रश्न विचारले जातात. त्यातून सांस्कृतिक भेदभाव निर्माण होतो. लोकांचे परस्परसंबंध घनिष्ट होण्यात ही मोठी बाधा निर्माण झाली आहे. आशियाई महिला या परिस्थितीच्या बळी ठरत आल्या आहेत, ही पाश्चिमात्य भ्रामक समजूत निपटून काढण्याचा प्रयत्न नर्मविनोदी शैलीत लिहिलेल्या या कादंबरीच्या माध्यमातून मी केला आहे. आशियाई महिला यासुद्धा जीवनाचा पुरेपूर आनंद घेतात, त्या अजिबात दुर्बल नसतात- हे दाखविण्याचा मी प्रयत्न केला आहे.
या कादंबरीत ‘करी फीस्ट’ची वर्णने नाहीत. ही कादंबरी प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक ब्रिटिश वाचकांनी ‘रेसिपीज’ बुक समजून गलका केला. भारतीय घरांमध्ये सर्रास बनविल्या ‘दाल’चे (आमटी) वर्णन कथानकाच्या ओघात काही ठिकाणी आले आहे., एवढाच काय, तो रेसिपीजशी संबंध! या कादंबरीचे शीर्षक वसाहतवाद संपल्यानंतरच्या काळाचे प्रतीक आहे. भारतीय महिलांना कमी लेखण्यासाठी त्यांचा उल्लेख ‘करी क्लब’ या टोपणनावाने व उपहासाने केला जात असे.
‘द केंब्रिज करी क्लब’ या कादंबरीला ब्रिटन व अन्यत्र कसा प्रतिसाद मिळाला?
- अनेक बडय़ा बडय़ा प्रकाशकांनी प्रकाशित केलेल्या व खूपशी प्रसिद्धी केल्या जाणाऱ्या कादंबऱ्यांपेक्षा ‘द केंब्रिज करी क्लब’ ही कादंबरी तिच्या वेगळेपणामुळे उठून दिसते. या कादंबरीला अमेरिका, भारत व इतर देशांमध्ये वाचकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. ‘बीबीसी’ने ‘द केंब्रिज करी क्लब’ला डोक्यावर उचलून धरले आहे. ब्रिटनमधील ग्रंथालयांनी ‘राष्ट्रीय वाचन वर्षांनिमित्त’ काढलेल्या यादीत या कादंबरीची निवड केली आहे. ब्रिटनमध्ये व अन्य काही देशांमध्ये ही कादंबरी अभ्यासक्रमात लावण्यात आली आहे.
ब्रिटनमध्ये पुस्तकप्रेमींचे मोहोळच आहे. या देशात लेखक मंडळींना प्रतिष्ठा आहे. माझ्या कादंबरीचे सर्वोत्तम टीकाकार व प्रशंसक ब्रिटनमध्येच आहेत. पुस्तकातील उत्तम व हिणकस याची पारख ते फार कौशल्याने करतात. या ग्रंथप्रेमींनी माझ्या या कादंबरीवर इतके प्रेम केले, की मी ब्रिटनमधील ‘लोकल हिरॉइन’ आहे, असे मला वाटू लागले आहे! मला वाचक भेटतात. कादंबरीच्या माध्यमातून अगदी वेगळ्याच केंब्रिजचे दर्शन घडविल्याबद्दल भरभरून बोलतात. अभिनंदन करतात. ‘द केंब्रिज करी क्लब’ कादंबरीचा दुसरा भाग कधी लिहिणार, अशी विचारणा करतात. सध्या तरी मी इतकेच सांगू शकते, की आता मी दुसऱ्याच विषयावरील कादंबरीच्या लिखाणात मग्न आहे.
माझ्या आयुष्यातील सुवर्णक्षणाबद्दल सांगते- फिनलॅण्डमधील एका विद्यापीठातल्या संशोधकाने ‘द केंब्रिज करी क्लब’ या कादंबरीवर संशोधनपर लेख लिहिला व तो एका परिषदेत वाचला. हा संशोधक केंब्रिज येथे आला आणि कादंबरीत मी वर्णन केलेली ठिकाणे मिल रोडवर फिरून शोधण्याचा प्रयत्नही त्याने केला. एखाद्या लेखकाला यापेक्षा आणखी मोठी दाद काय हवी?
(‘द केंब्रिज करी क्लब’- लेखिका : सौम्या बलसारी,
email- saumya.balsari@mac.com
प्रकाशक : आर्केडिया पब्लिशर्स, मूल्य : २७५ रुपये)
शब्दांकन : समीर परांजपे