Leading International Marathi News Daily
रविवार, ४ जानेवारी २००९

संग्रहालय ही काळा-वेळाला, दोन संस्कृतींना जोडून ठेवणारी, वर्तमानाला दिशा देणारी संस्था! महाराष्ट्रातही अशी विविध विषयांवर तब्बल शंभर संग्रहालये आहेत. यातीलच निवडक संग्रहालयांची सफर ‘संग्रहचित्र’ सदरातून दर आठवडय़ाला ..!
‘भग्न तरीही अभंग हे अवशेष
काळाच्या कराल दाढेतून बचावलेले
पराभव पचवणारे, पराक्रम पाजळणारे!
दुरितांचे तिमीर जाळणारे अन्
उजळणारे विश्व स्वधर्म!
इतिहासाचा हा थोर वारसा

 


आरसा हा मृत्युंजय संस्कृतीचा !!’

भटकण्याच्या छंदातून काही दिवसांपूर्वी अहमदनगरच्या वस्तुसंग्रहालयाला भेट दिली आणि तिथे लावलेल्या या स्वागतओळींनी विचार करायला लावले. मानवाच्या उत्पत्तीपासून ते वर्तमानापर्यंत साऱ्यांचा शोध-बोध घेणाऱ्या या गुरुकुलांबद्दल एकदम आकर्षण व प्रेम वाटून गेले. वस्तुसंग्रहालय या कल्पनेचा उगम कुठून, कसा, कधी झाला असेल? त्याचा आपल्याकडील प्रवास व विकास कसा घडला असेल? अशा प्रश्नांचे भुंगे सतावू लागले. वस्तुसंग्रहालयांची संख्या, वैविध्य, विषय, तपश्चर्चेचे अनंत हात, संस्थांचे पाठबळ असे सारे सारे मला खुणवायला लागले आणि एका वेगळय़ाच जगात शिरलो.
संग्रहालय ही कल्पना मूळची विदेशी! ग्रीक-रोमन संस्कृतीतून जन्माला आलेली! ‘म्युझियम’ हा या रचनेचा मूळ शब्दच वरील संस्कृतीतल्या ‘म्युझ’ या देवतांनी विश्वाला भेट म्हणून दिलेला! या ‘म्युझ’ नावाच्या नऊ देवता! कला आणि साहित्यातील विविध अंगा-उपांगाचे रक्षण करणाऱ्या, त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या! ज्या संस्कृतीत कला आणि साहित्याला दैवत्वाचे स्थान मिळते, तिथे त्यातील दुर्मिळ वस्तूंनाही मग देवघर लाभते! अशा या देवघराचे नावही मग या ‘म्युझ’वरूनच तयार झाले- ‘म्युझियम’!
हा काळ होता दोन-अडीच हजार वर्षे जुना! ‘म्युझियम’चे हे पहिले कलाघर याच काळात इसवी सन पूर्व २८० मध्ये इजिप्तमधील अलेक्झांड्रिया नामक शहरात आकारास आले! त्याचा कर्ता होता पहिला टॉलेमी! या पहिल्यावहिल्या प्रयोगात त्याने मांडले ग्रीक पंडितांचे, शूरवीरांचे पुतळे, ज्योतिषशास्त्राची साधने, शल्यक्रियेतील उपकरणे, विविध ग्रंथ आणि निसर्गातील अनेक चमत्कारिक व कलात्मक वस्तू! मानवी जीवनात एका नव्या परंपरेचा उदय झाला होता. नव्या- जुन्या संस्कृतीचे धागेदोरे विणणाऱ्या दुव्यांना एक नवा आयाम मिळाला होता. पण सुरुवातीची कित्येक शतके या संग्रहालयांचा हा परीघ खासगी, ठरावीक लोकांपुरता, राजे-संस्थानिकांच्या छंद-आवडीपुरताच राहिला.
व्यावसायिक, शास्त्रीय पद्धतीने मांडणी केलेले संग्रहालय तयार होण्यास पुढची तब्बल अठराशे वर्षे जावी लागली. इसवी सन १६८३ मध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ नॅचरल हिस्टरी विभागाचे ‘अ‍ॅश्मोलियन म्युझियम’ हे जगातील खऱ्या अर्थाने पहिले संग्रहालय आकारास आले!
या खऱ्याखुऱ्या पहिल्या संग्रहालयाने या परंपरेस एक वेगळीच दिशा दिली, ज्यामुळे प्राचीन, कलावस्तूंच्या जतन-संवर्धन, प्रदर्शन आणि संशोधनास चांगलीच गती आली. त्यातून एकामागे एक जगभर संग्रहालये उभी राहू लागली. यातही पाश्चात्त्य राष्ट्रे आघाडीवर होती. भारतातही या दरम्यान दुर्मिळ कलावस्तूंचा संग्रह करण्याचा प्रवाह सुरू झाला होता. पण अद्याप त्याला व्यावसायिक अंग नव्हते. त्यांच्या खासगी कलाजीवनाचाच हा एक भाग होता. सामान्य जनता त्यापासून कोसों मैल दूर होती. या पाश्र्वभूमीवर ‘वस्तुसंग्रहालय’ या शब्दाबरहुकूम भारतातील पहिले दालन सुरू होण्यास दोन फेब्रुवारी १८१४ साल उजाडले. त्या वर्षी कोलकात्याच्या एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल संस्थेतर्फे भारतातील या पहिल्या वस्तुसंग्रहालयाची मुहूर्तमेढ रोवली गेली! ‘भारतीय संग्रहालय’ या नामछत्राखाली उभ्या राहिलेल्या या वास्तूत मानववंश, पुरातत्त्व, भूस्तर, वनस्पती आणि प्राणी आदी शास्त्रांतील दुर्मिळ वस्तूंची एकेक दालने उभी राहिली. या पाठोपाठ मग चेन्नईतही इंडिया ऑफिस लायब्ररीचे संग्रहालय सुरू झाले.
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस १८८७ मध्ये महाराणी व्हिक्टोरियाच्या राज्यरोहणाचा अर्धशतसांवत्सरिक उत्सव देशभर साजरा झाला. यानिमित्ताने चेन्नई, जयपूर, उदयपूर, राजकोट, मुंबईसह देशभर अनेक संग्रहालयांचा शुभारंभ झाला. मुंबईतील ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम’ यातलेच! पुढे ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या पुराण वस्तू संशोधन विभागातर्फे देशभर अनेक ठिकाणी संशोधन कार्याच्या जोडीने संग्रहालयांची एक साखळीच उभी राहिली. अशा रीतीने विसावे शतक उजाडेपर्यंत देशातील संग्रहालयांचा आकडा पन्नासपर्यंत पोहोचला होता.
या दरम्यान शिक्षण आणि पुरोगामित्वाचा वारसा देणाऱ्या महाराष्ट्रातही ही सांस्कृतिक वाटचाल वेग घेऊ लागली. १९०५ मध्ये प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियमचा पायारव झाला. नागपूरचे केंद्रीय संग्रहालय, कोल्हापूरचे छत्रपती, औंधचे भवानी आणि पुण्याचे राजा केळकर या संग्रहालय वास्तूंनी जगाला आपली ओळख देण्यास सुरुवात केली. पुढे शासन, संस्था, संशोधक व्यक्ती यांच्या पुढाकारातून राज्यभर अशा आधुनिक तीर्थक्षेत्रांचे एक जाळेच निर्माण झाले. पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर ही सांस्कृतिक शहरे यात आघाडीवर होती. आज महाराष्ट्रातील संग्रहालयांचा आकडा शतकाच्या उंबरठय़ावर पोहोचला आहे.
संग्रहालयांच्या या मोठय़ा साखळीला विषयांचेही वैविध्य आहे. अनेकांना त्या त्या विषयातील शिक्षण-संशोधन केंद्रांचीही जोड मिळाली आहे. अगदी सुरुवातीला यातली बहुतांश संग्रहालये ही जगाच्या नियमानुसार प्राचीन कलात्मक वस्तूंचा हात पकडूनच उभी राहिली. डेक्कन कॉलेज, भारत इतिहास संशोधक मंडळ, धुळय़ाचे राजवाडे, कोल्हापूरचे टाऊन हॉल आणि सातारा-सांगली-नाशिक-नगरची जिल्हा संग्रहालये ही या प्रकारचीच- इतिहासाच्या अंतरंगात डोकावणारी! पण मग कालपरत्वे या संग्रहालयांमध्येही वैविध्य आले. विषयांच्या कक्षा रुंदावल्या. इतिहासाच्या जोडीने भूगोल, प्राणी, वनस्पती, खगोल, समाज, मानववंश, संरक्षण आदी विभाग-विषयांनीही यात हजारी लावली. पुण्याचे आदिवासी संग्रहालय, अंजनेरीचे नाण्यांचे संग्रहालय, सिन्नरचे गारगोटी म्युझियम, कन्हेरीचे ‘ग्रामजीवन’, डेरवण-अकलूजची शिवसृष्टी, नाशिकची फाळके चित्रसृष्टी, चाळीसगावातील केकी मूस यांचे तसेच करमरकरांचे सासवणेतील शिल्पग्राम हे सारे चेहरे याच प्रकारातील!
मुंबईतील नेहरू विज्ञान केंद्र, पुणे विद्यापीठाचा मानववंशशास्त्र विभाग, भारतीय प्राणी-वनस्पती सर्वेक्षण विभाग, रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया आदी संस्थांनी मग त्यांच्या विषयातली संग्रहालयेही थाटली. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, नगरचे रणगाडा संग्रहालय आणि मेरिटाइम म्युझियममधील नौदलाचा इतिहास, यांतून आपले संरक्षणाचे विश्व साकारले गेले.
संग्रहालयांतून महाराष्ट्राचे, भारताचे आणि अनेकदा अवघ्या मानवजातीच्या जीवनाचेच दर्शन घडते. प्रगतीचे टप्पे कळतात, उत्क्रांतीच्या पाऊलखुणा सापडतात. इतिहास- भूगोल-विज्ञानातील संदर्भ मिळतात आणि कला-सौंदर्याच्या दर्शनातून चांगल्या जीवनशैलीची मूल्येही समजतात! जुन्या वस्तू टाकण्याच्या अडगळीच्या खोल्या आणि संग्रहालयांमध्ये हाच तर मूलभूत फरक आहे. समाजाला शिक्षित करणाऱ्या या शाळा आहेत, संशोधनाच्या प्रयोगशाळा आहेत, शाश्वत जगण्याचा आधार सांगणारी ही बेटे आहेत. अशा या संस्कृतीच्या गवाक्षांत आपण आजपासून दर रविवारी डोकावणार आहोत.
अभिजित बेल्हेकर
abhibelhekar@gmail.com