Leading International Marathi News Daily
रविवार, ४ जानेवारी २००९

आर्थिक मंदी, महागाईचं संकट आणि काय काय असं गेलं वर्षभर वैशालीताईंच्या कानावर येत होतं. परंतु त्यांना त्याची झळ बसली नव्हती. वैशालीताईंचे पती विलासराव यांची नोकरी गेली आणि मग वैशालीताईंना कळले की, ‘आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर.’ विलासराव आजही नेहमीप्रमाणे उठले आणि इस्त्री केलेले कपडे शोधू लागले, तेव्हा त्यांना आपले कपडे अजून दोरीवर वाळत आहेत, असं दिसलं. ते वैतागून बायकोला म्हणाले, ‘अगं, हे काय, माझे कपडे इस्त्रीला नाही दिलेस?’ ते ऐकून वैशालीताई फणकाऱ्यानं म्हणाल्या, ‘रोज कपडे धुणं आणि इस्त्रीला टाकणं परवडणार नाही आता. दोनदा घालत चला कपडे आता. आणि ते जॅकेट ठेवून द्या कपाटात. दिसलं थोडं पोट, तर काही बिघडत नाही.’ जरा नाराजीनंच विलासराव मग जेवायला बसले.

 

वैशालीताईंनी गरमागरम दुपोडी पोळी तव्यावरून त्यांच्या ताटात टाकली. विलासरावांनी पोळीची घडी उकलली आणि तुपाची धार पडण्याची वाट पाहू लागले. वैशालीताई म्हणाल्या, ‘तूप नाही. गिळा तसेच आता. जरा सवय करा आणि तूप खाणं या वयात बरं नाही.’ तेव्हा विलासरावांनी चिडून डाव्या हातानं ताट बाजूला ढकललं. वैशालीताईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्या समजावत म्हणाल्या, ‘अहो, जरा समजून घ्या. तुमची कमाई नाही आता. आणि अमितही घरी बसलाय तुमच्यामुळं. रितू बिचारा एकटा रात्रंदिवस काम करून चार पैसे कमावतोय, तर त्याच्या पोळीवर तूप नको का?’ वैशालीताईंनी डोळ्यांना पदर लावला तेव्हा विलासराव म्हणाले, ‘बरं बरं, ठीक आहे. त्या अहमदकडे माझे बरेच पैसे बाकी आहेत. त्याच्याकडून मागून घेतो. तेवढाच जरा आधार होईल!’ हे ऐकून वैशालीताई म्हणाल्या, ‘अमितनं कालपासून चार वेळा फोन केला त्याच्या अहमदकाकाला; पण ते फोनच उचलत नाहीत!’ मग उदास मनानं विलासराव चार घास खाऊन उठले आणि म्हणाले, ‘बघतो काही जमतं का ते. काही दिवस भागवून घे.’ आणि मग वृत्तपत्र घेऊन ते पलंगावर पहुडले.

नारायणराव रागाने धुमसतच घरी आले, तेव्हा नीलमताईंनी ओळखलं की, आज काहीतरी बिनसलं आहे. नीलमताईंनी नारायणरावांच्या पांढऱ्या शुभ्र सदऱ्यावर चिकटलेले चार धुळीचे कण टिचकीने उडवले आणि म्हणाल्या, ‘काय झालं आज? तुम्हाला इन्क्रीमेन्ट नाकारलं का साहेबांनी?’ नारायणराव गेली तीन र्वष नीलमताईंना सांगत होते की, ‘माझं प्रमोशन होणार, मला इन्क्रीमेंट मिळणार, माझा पगार वाढणार.’ रोज सकाळ-संध्याकाळ जेवणाच्या ताटावर नारायणरावांच्या त्याच गोष्टी चालत. ‘आज मॅडमशी बोललो,’ ‘आज त्या फोनवर हसून बोलल्या,’ ‘आज त्यांनी माझं कौतुक केलं’.. तरी नीलमताई त्यांना सतत सावध करीत होत्या, ‘अहो, बाई हसून बोलल्या म्हणजे तुमचं काम होईल असं नाही. तुम्हाला कळत नाही बायकांचं राजकारण.’ मग नारायणराव हिरमुसले होत. त्यांची समजूत घालण्यासाठी नीलमताई भाकरीवरून पाण्याचा हात फिरवता फिरवता सांगत, ‘अहो, चांगली चालली आहे ना नोकरी तुमची? मग कशाला प्रमोशनची घाई करता? आणि तुमचा साहेब कधीतरी रिटायर्ड होईलच ना! तोवर जरा धीर धरा.’ पण नारायणरावांनी आपल्या सर्व मित्रांना आणि नातेवाईकांना सांगून ठेवलं होतं की, त्यांच्या प्रमोशनचं लेटर तयार आहे, फक्त सही व्हायची आहे.’ ‘जोवर प्रत्यक्ष पत्र हाती येत नाही, तोवर काही सांगू नकोस,’ असं नारायणरावांच्या आईनेसुद्धा त्यांना सांगून पाहिलं. परंतु नारायणराव हट्टालाच पेटला होता आणि आज त्यांचा मूड पाहून काहीतरी बिनसल्याचं नीलमताईंनी ओळखलं. नारायणराव गहिवरून म्हणाले, ‘माझी नोकरी गेली. आता तुला काटकसरीनं संसार करावा लागेल.’ नीलमताई म्हणाल्या, ‘काही काळजी करू नका, तुम्ही दुसरी नोकरी शोधा, मी बघते घरातलं.’ नारायणराव जरा सावरले आणि म्हणाले, ‘पोरं जेवलीत का?’ नीलमताई म्हणाल्या, ‘हो. जेवली आणि तुम्हीही हात-पाय धुवून ताटावर बसा. अहो, मंदी काय फक्त आपल्याच घरी आहे का? ती तर जगभर आहे. काळजी नका करू!’ डोळ्यांत आलेलं पाणी पांढऱ्या सदऱ्याच्या बाहीनं पुसत नारायणराव हात-पाय धुवायला गेले.

सहज जाता जाता म्हणून विलासराव, नारायणराव यांच्या घरांचा फेरफटका मारून २००८ नं आपली बॅग भरली. त्याची, काळाच्या उदरात गडप होण्याची वेळ जवळ आली होती. आर्थिक मंदीनं आपलं नाव खूपच खराब करून ठेवलं, हे पाहून २००८ अस्वस्थ होतं. ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री २००९ चं स्वागत करताना २००८ म्हणालं, ‘काय रे बाबा? तुझं आयुष्य ३६५ दिवसांचंच आहे ना?’ २००९ प्रश्नार्थक चेहरा करून म्हणाला, ‘का रे बाबा? तुला शंका का आली?’ तेव्हा २००८ म्हणालं, ‘आर्थिक मंदीची झळ तुझ्या आयुष्यालाही बसली की काय, अशी भीती वाटत होती मला!’ एकमेकांना ‘शेकहँड’ करून २००९ नं सूत्रं स्वीकारली, तेव्हा त्याचा हात थरथरत होता.