Leading International Marathi News Daily
रविवार, ४ जानेवारी २००९

जगाच्या नकाशावर अँटिगुआ, बम्र्युडा, मालदीव, पलाऊ, किदिबाती, बहरीन, अरुबा, ग्रेनडा.. असे कितीतरी छोटे, टिकलीएवढंच अस्तित्व असलेले देश आढळतात. या टिकलीएवढय़ा देशांचा परिचय करून देणारं नवं सदर!
भूगोलाचा अभ्यास केलेल्या आणि थोडंसं जागतिक राजकारण समजणाऱ्या माणसाला साधारणपणे ठाऊक असतात ते खंड.. त्या खंडांत समाविष्ट असलेले महत्त्वाचे देश.. किंवा त्याहीपलीकडे गेल्यास क्रिकेट, फूटबॉल किंवा ऑलिम्पिक स्पर्धामध्ये सहभागी होणारे शंभर-सव्वाशे देश. पण या शंभर-सव्वाशे देशांच्याही पलीकडे अंशत: वा पूर्ण स्वतंत्र असणाऱ्या छोटय़ा छोटय़ा देशांचंही एक वेगळं विश्व आहे. एखाद्या खंडप्राय देशाशी तुलना करता यातल्या अनेक देशांचं क्षेत्रफळ एक वा दोन टक्के एवढं नगण्य आहे. तरीही त्यांना स्वतंत्र अस्तित्व आहे.
१ जानेवारी हा इंग्रजी वर्षांचा पहिला दिवस. पण ४ जानेवारीला ‘लोकरंग’चा

 

नव्या वर्षांचा पहिला अंक प्रसिद्ध होत आहे. या चार दिवसांत जन्माला आलेल्या छोटेखानी देशांमध्ये प्रामुख्यानं नावं घ्यावीत असे दोनच देश- ब्रुनाई आणि सामुआ. ब्रुनेईची स्थापना १ जानेवारी १९८४ ची! त्यामुळे यंदाचं वर्ष हे स्वतंत्र ब्रुनाईचं रौप्यमहोत्सवी वर्ष. त्यामुळे या स्तंभाची सुरुवात ब्रुनाईपासूनच करू..
ब्रुनाई! १ जानेवारीला रौप्यमहोत्सवी वर्षांत पदार्पण केलेलं एक स्वतंत्र, तरी सुलतानशाही असणारं इस्लामिक राज्य! इथली सुलतानशाहीदेखील घटनात्मक. सुलतान हसनल बोलकेह हा ब्रुनाईचा सध्याचा घटनात्मक प्रमुख. तो इथला सर्वेसर्वा.
अर्वाचीन जगाला ब्रुनाईची ओळख आहे ती त्याच्या गर्भश्रीमंतीमुळं. आपणापैकी अनेकांच्या मेलबॉक्समध्ये या सुलतानाच्या खासगी विमानाची, त्याच्या आलिशान राजवाडय़ाची, त्यांच्या अंतर्बाह्य सजावटीची, त्यातल्या सोन्याच्या बेसिनची, टॉयलेट सीटची असंख्य छायाचित्रं आपोआप येऊन पडलेली असतात. ब्रुनाईची ओळख जशी सुलतानाच्या श्रीमंतीमुळे आहे, तशीच ती ‘सर्वाधिक दरडोई उत्पन्न असणारं आशियातलं पहिल्या क्रमांकाचं राष्ट्र’ अशीही आहे. ब्रुनाई भारताच्या तुलनेत आहे अक्षरश: टिकलीएवढा. पण ब्रुनाईवर एका डॉलरचंही विदेशी कर्ज नाही. कारण खनिज तेलाचं तिथे रोज जेवढं उत्पादन होतं, त्याच्या एक-दशांशाचाही वापर प्रत्यक्ष ब्रुनाईत होत नाही. जवळपास ९० टक्के खनिज तेल ब्रुनाईतून निर्यात होतं.
ब्रुनाईला तसा फारसा प्राचीन इतिहास नाही. इथला ज्ञात इतिहास सहाव्या शतकापासूनचा. बोर्निओ बेटांच्या वायव्येला वसलेलं, उत्तरेकडे दक्षिण चिनी समुद्राचा तब्बल १६० किलोमीटर लांबीचा किनारा लाभलेलं आणि तीन दिशांनी मलेशियाच्या साबाह आणि सारावाक राज्यांच्या भूभागानं वेढलेलं असं हे राष्ट्र.
तसे इ.स. ५१८ पासूनच ब्रुनाईचे चिनी व्यापाऱ्यांशी संबंध होते. पण व्यापाराचा फायदा चीननं सत्ता प्रस्थापित करण्यासाठी तेव्हा उचललेला नव्हता. ७ व्या ते १३ व्या शतकांच्या दरम्यान सुमात्राच्या श्रीविजय राजघराण्याची आणि जावातल्या मजपहित राजघराण्याची सत्ता ब्रुनाईवर होती. या दोन्ही राजघराण्यांवर भारतीय संस्कृतीची छाप होती. १५ व्या शतकात या राजघराण्यांचा अस्त झाला. ब्रुनाईचं मोठय़ा प्रमाणावर इस्लामीकरण होत गेलं, सुलतानशाही स्थापन झाली आणि युरोपियनांची सत्ता येईपर्यंत ती टिकूनही राहिली.
मधल्या काळात पोर्तुगीज, डच, स्पॅनिश आले. त्यांनी केलेल्या आक्रमणांमुळे एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी सुलतानाची सत्ता जेमतेम सारायाकलगतच्या काही भागापुरतीच मर्यादित राहिली. १८९८ ते १९५९ या ६० वर्षांत सुलतानाचं स्थान अक्षरश: दुय्यम बनलं. १९३१ च्या सुमारास या डोंगराळ भूप्रदेशात तेल-उत्पादनास सुरुवात झाली. पाठोपाठ दुसरं महायुद्ध झालं आणि या भूप्रदेशावर जपाननं कब्जा मिळवला. इथल्या तेलविहिरींचं आणि रबराच्या मळ्यांचं त्यात अतोनात नुकसान झालं. युद्ध संपताच या भूप्रदेशावर ऑस्ट्रेलियानं कब्जा मिळवला. ब्रिटिश नागरी प्रशासनाची सुरुवात झाली.
परंतु १९५९ च्या सुमारास पुन्हा सुलतानाचं निर्विवाद वर्चस्व इथं प्रस्थापित झालं. पुढल्या २५ वर्षांत अनेक घडामोडी घडल्या. नवी घटना तयार झाली. घटनेनुसार पहिली निवडणूक झाली. ग्रेट ब्रिटननं ब्रुनाईला अंतर्गत प्रशासनाचा अधिकार देऊ करताना परराष्ट्र व्यवहाराची, संरक्षणाची जबाबदारी स्वत:कडेच ठेवली. प्रशासनाच्या जोडीनं सुलतानानं प्रिव्ही कौन्सिल, कार्यकारी परिषद, विधान परिषद, धार्मिक परिषद, उत्तराधिकार परिषद अशा परिषदांची आणि न्यायालयांची स्थापना केली.
सुलतान हसनल बोलकेह हा इथल्या राजवटीचा सध्याचा प्रमुख. ब्रुनाईच्या सल्तनतीची स्थापना ज्या शरीफ अलीनं केली, ज्यानं इस्लाम सर्वप्रथम इथं आणला, त्याचा हा वंशज. पंधराव्या शतकापासून हेच घराणं ब्रुनाईच्या सल्तनतीची धुरा वाहतं आहे. इथली सुलतानशाही र्सवकष आहे. स्वत:च बनवलेल्या घटनेनं त्यानं स्वत:कडे अर्निबध, र्सवकष सत्ता ठेवली आहे. ब्रुनाईचं क्षेत्रफळ जेमतेम पावणेसहा हजार चौरस कि.मी. इतकंच आहे. भारतातल्या हरयाणापेक्षाही छोटय़ा आकाराचं हे राष्ट्र. बांदार सेरी बगावन ही ब्रुनाईची राजधानी. ब्रुनाईच्या चार लाख लोकसंख्येपैकी सव्वा लाख या राजधानीत राहणारे. टेंबुयँग या पूर्वेकडच्या पर्वतीय जिल्ह्याची लोकसंख्या अगदी विरळ- जेमतेम १० ते १५ हजार इतकीच. उरलेली सारी वस्ती पश्चिमी ब्रुनाईमध्ये एकवटलेली. ४ जिल्हे आणि ३८ मुकिम (तालुके) ही इथली प्रशासकीय रचना. इथं बाराही महिने पाऊस. डिसेंबर-जानेवारीत तो अगदीच मामुली पडतो. जून ते ऑगस्ट हा इथला पावसाळ्याचा मोसम.
ब्रुनाईत वैद्यकीय शिक्षणाची सुविधा नाही. त्यामुळे इथे डॉक्टर्स आयात करावे लागतात. सार्वजनिक इस्पितळं अनेक. त्यांतून नागरिकांना मोफत वैद्यकीय सुविधा मिळते. लोकसंख्येत ६६ टक्के मलय, ११ टक्के चिनी, मूलवासी ४ टक्के आणि इतर १९ टक्के. त्यामुळे ब्रुनाईची अधिकृत भाषा आहे- मलय. इस्लाम हा मुख्य धर्म. इतर धर्मीयांमध्ये १३ टक्के बौद्ध, तर १० टक्के ख्रिश्चन. ६७ टक्के इस्लामधर्मी वगळता उरलेले १० टक्के मूलनिवासी मूलधर्मी असावेत. इस्लामला मंजूर नसल्याने मद्यविक्री आणि सार्वजनिक जागी मद्यसेवन करण्यावर बंदी आहे. विदेशी नागरिक आणि बिगर इस्लामींना बियरचे काही कॅन्स आणि मद्याच्या दोन बाटल्या घेऊन येण्याची तेवढी परवानगी आहे. २००७ मध्ये ही परवानगी थोडी शिथिल करण्यात आली. ब्रुनाईतल्या प्रत्येक प्रवेशावेळी असे कॅन्स वा बाटल्या आणण्यास परवानगी देण्यात आली. पुढे ती- दर ४८ तासांनी एकदा प्रवेश व त्यावेळी कॅन्स-बाटल्यांची आयात- एवढी शिथिल करण्यात आली.
रॉक गायिका अदिआना रहीम, शिकागोचा क्रेग अॅडम्स, पॉपस्टार आयडॉल आणि बँड फॅरनहीटचा वू चून, टीव्ही स्टार झुल एफ हे सारे ब्रुनाईचेच. ‘अल्लाह पेरिइराकन सुलतान’ (‘परमेश्वरा, सुलतानावर कृपा कर’) ही ब्रुनाईची राष्ट्रीय प्रार्थना. १५ जुलै १९४६ हा सध्याच्या सुलतानाचा- हख्सनल बोलकेह यांचा जन्मदिवस. तेच ब्रुनाईचे पंतप्रधानही. हख्सनल यांना एकूण तीन बायका. पैकी एक घटस्फोटित. पेनिग्रान अनक सालेह ही प्रथम पत्नी आणि अझदिनाझ मझहर हकीम ही तिसरी (सध्याची दुसरी पत्नी); तर पेनिग्रान इस्तेरी मरियम ही घटस्फोटिता. ती रॉयल ब्रुनाई एअरलाइन्सची हवाईसुंदरी. २००३ मध्ये तिचा घटस्फोट झाला आणि २००५ मध्ये सुलतानाचं लग्न झालं मलेशियन टीव्ही- ३ ची अँकर अझदिनाझशी. ती सुलतानापेक्षा अवघी ३३ वर्षांनी लहान आहे. पहिल्या पत्नीपासून झालेला पुत्र अल महतादि बिल्लाह हा ब्रुनाईच्या गादीचा अधिकृत वारस.. राजपुत्र. सुलतानाला तीनही पत्नींपासून झालेली एकूण १२ मुलं. त्यातले ५ मुलगे आणि ७ मुली.
सुलतानाचं शालेय शिक्षण झालं क्वालालंपूरमध्ये. त्यानंतर त्याचं सँडहर्स्टच्या रॉयल मिलिटरी अॅकॅडमीत शिक्षण झालं. पण औपचारिक पदवी प्राप्त करण्याआधीच सुलतानपदाची सूत्रं स्वीकारावी लागल्यानं त्याने शिक्षण अर्धवट सोडलं. सुलतानपदी आरूढ होताच जगभरातल्या असंख्य विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय पदव्या आणि डॉक्टरेटस् दिल्या, त्या वेगळ्या. सुलतानाला गाडय़ांचा विलक्षण शौक. दहा वर्षांपूर्वी ‘ऑटोकार’ या ब्रिटिश नियतकालिकानं सुलतानाच्या मोटारींवर कव्हर स्टोरी केली होती. फेरारी, बेंटलेसह सुमारे ३६०० मोटारी सुलतानाच्या ताफ्यात असल्याचं त्यात म्हटलं होतं. त्यांची एकत्रित किंमत त्यावेळी चार बिलियन डॉलर्स एवढी होती. गिनीजच्या नोंदीप्रमाणे त्यांच्या खासगी संग्रहात ५०० रोल्सरॉईस गाडय़ा होत्या. १९९० मध्ये तर सुलतानाकडे असलेल्या रोल्सरॉईस गाडय़ांची संख्या जगभरातल्या एकूण रोल्सरॉईसच्या निम्मी- एवढी होती. २६ ऑक्टोबर २००७ ला लंडनच्या ‘डेली मिरर’नं सुलतानाच्या गाडय़ांवर नव्यानं स्टोरी केली. त्यात उल्लेख होता ५३१ मर्सिडिझ बेन्झ, ३६७ फेरारी, ३६२ बेंटले, १८५ बीएमडब्ल्यू, १७७ जग्वार, १६० पोर्शे, १३० रोल्सरॉईस आणि २० लॅम्बोर्गिनी गाडय़ांचा. चारशेजण बसू शकतील अशा क्षमतेचं बोइंग ७४७ विमान सुलतानाच्या खासगी दिमतीला असतं. त्याची किंमत आहे- २३३ दशलक्ष डॉलर्स. त्याची अंतर्गत सजावट व फर्निचरवरील खर्च आहे- तीन दशलक्ष डॉलर्स. सारं फर्निचर- अगदी सिंकसकट- सोन्यानं मढवलेलं आहे. याखेरीज सुलतानाची ६ छोटी विमानं आणि २ हेलिकॉप्टर्स आहेत, ती वेगळीच!
‘इस्तानानुरूल इमान’ हे त्याच्या आलिशान राजवाडय़ाचं नाव. दोन लाख चौरस मीटर क्षेत्रफळावर (२१ लाख ५२ हजार ७८२ चौ. फूट) उभा असलेला हा प्रासाद जगातला सर्वात मोठा राजप्रासाद ठरावा. या राजप्रासादात १७८८ दालनं, २५७ प्रसाधनगृहं, ५ स्विमिंग पूल, २०० घोडय़ांचा वातानुकूलित तबेला, ११० मोटारी ठेवता येतील इतकं मोठं गॅरेज, ४००० जण बसू शकतील एवढा मोठा बँक्वेट हॉल, १५०० जण नमाज पढू शकतील इतकी मोठी मशीद, ५६४ विद्युत झुंबरं, ४४ जिने, १८ लिफ्टस् आहेत. सण किंवा सरकारी समारंभांसाठी राजप्रासाद वापरला जातो. नागरिकांसाठी तो खुला असतो वार्षिक सणांच्या वेळी. विशेषत: रोजे सुटताना. जवळपास सव्वा लाख नागरिक तेव्हा राजप्रासादाला भेट देतात.
ब्रुनाईच्या राजघराण्यात भांडणंही कमी नाहीत. ती कोर्टात जातात आणि सुटतातही. ब्रुनाईमध्ये व्यक्तिगत वा कॉर्पोरेट टॅक्सेस नाहीत. वॉल स्ट्रीट जर्नल आणि द हेरिटेज फौंडेशनतर्फे दरवर्षी ‘इंडेक्स ऑफ इकॉनॉमिक फ्रीडम’ हे वार्षिक प्रकाशन प्रसिद्ध केलं जातं. यंदाच्या वार्षिकांकात जगभरातील १५७ देशांचा समावेश आहे. एखाद्या देशाची अर्थव्यवस्था किती खुली आहे, किती नियंत्रित आहे, याचा अभ्यास करून हा अहवाल तयार केला जातो. त्यात त्या- त्या देशाचं दरडोई उत्पन्न, बेकारी, चलनवाढदर, विदेशी गुंतवणूक, विदेशी कर्ज, आयात-निर्यातीचे आकडे हे सारे तपशीलही असतात. परंतु २००८ च्या प्रकाशनात गर्भश्रीमंत ब्रुनाईचा उल्लेखही नाही. हे काय गौडबंगाल आहे, ते उलगडत नाही.
सुधीर जोगळेकर
sumajo51@gmail.com