Leading International Marathi News Daily
रविवार, ४ जानेवारी २००९

चित्रपट कलावंतांचे काही दुर्मीळ फोटो अचानक हाती लागतात आणि त्यांच्याशी निगडित जुन्या आठवणींचं मोहोळ अकस्मात उठतं. या स्मरणरंजनाच्या हिंदोळ्यावरील नवं सदर..
‘हे बघ रफी, गाण्यातली ही जागा तू उत्तम घेतोयस. फक्त त्यातले बारकावे अधिक स्पष्ट येऊ देत. थोडा प्रयत्न कर, निश्चित जमेल तुला..’

 


आपल्याहून किमान सात वर्षांनी लहान असणाऱ्या मोहम्मद रफीला संगीतकार सी. रामचंद्र तथा अण्णा चितळकर हेच तर सांगत नसतील? त्या दोघांच्या मुद्रेवरून तरी तसंच वाटतंय. चित्रपट संगीतातल्या या दोन मातब्बर व्यक्तींना एकत्र आणणारा हा प्रसंग होता- १९७० सालातल्या ‘रुठा न करो’ या चित्रपटातल्या गाण्याच्या रेकॉर्डिगचा! अण्णांचा हा तसा शेवटचाच चित्रपट. (त्यानंतर ‘तुलसी विवाह’ हा एकच चित्रपट त्यांच्या खाती जमा झाला.) चित्रपटांमध्ये हमखास लोकप्रिय झालेल्या गायक-संगीतकारांच्या जोडय़ांपैकी ही जोडी नव्हती. म्हणजे या फोटोत डाव्या बाजूला सी. रामचंद्र यांच्यासमोर लता असती, किंवा रफीच्या उजव्या बाजूला नौशाद, शंकर जयकिशन, एस. डी. बर्मन किंवा अगदी रवि, चित्रगुप्त यांच्यातला कुणीही संगीतकार असता, तर हे छायाचित्र कदाचित अधिक सुखावणारं ठरलं असतं. पण रफी आणि सी. रामचंद्र हे कॉम्बिनेशन? आपल्या हयातीत जवळजवळ १२० हिंदी चित्रपटांना संगीत देणाऱ्या अण्णांनी रफीकडून जेमतेम २० सोलो गाणी गाऊन घेतली. (लताच्या बाबतीत हाच आकडा दोनशेच्या घरात आहे!) वास्तविक- ‘ना जाने किधर आज मेरी नाव चली रे’सारख्या गाण्यांनी पडदा गाजवणाऱ्या अशोककुमारला पहिल्यांदा दुसऱ्या गायकाचा आवाज स्वीकारायला लावला तो सी. रामचंद्र यांनीच! तो आवाज होता रफीचा. आणि गाणं होतं- ‘हमको तुम्हारा ही आसरा, तुम हमारे हो- न हो..’ (चित्रपट- ‘साजन’) त्यानंतर दादामुनींनी अपवादानंच स्वत:साठी आपला गळा वापरला. पण याच रफीला पुढल्या काळात मात्र अण्णांकडून फारशी गाणी मिळाली नाहीत. ज्या- ज्या वेळी ती मिळाली, त्या- त्या वेळी रफीनं अण्णांच्या सुरावटींना चार चाँद लावले. मग ते ‘नौशरवाने आदिल’मधलं ‘ये हसरत थी कि इस दुनिया में’सारखं हळुवार प्रेमगीत असो वा त्यातलीच ‘भूल जाएं सारे गम्म’ आणि ‘तारों की जुबाँ पर है’सारखी युगुलगीतं असोत. आजही केवळ गाण्यांसाठी बघितल्या जाणाऱ्या ‘अलबेला’मध्ये तर रफीचा पहाडी स्वर सलामीलाच कानी पडतो. (‘मेहफिल में मेरी कौन ये दिवाना..’) पण ‘अलबेला’मधली बाकी सर्व गाणी चितळकरांनी स्वत: गायल्यानं रफीचं ते एकमेव गाणं झाकोळून गेलं. अण्णांनी आपल्या कारकीर्दीत रफीच्या आवाजाचा अधिक प्रभावीपणे वापर करून घ्यायला हवा होता, हा रफीच्या चाहत्यांचा तक्रारवजा सूर सी. रामचंद्र यांच्या समर्थकांना नामंजूर असतो, तर- अण्णांच्या चालींना न्याय देण्यात रफी कमी पडायचा, म्हणून त्यांनी रफीला फारशी गाणी दिली नाहीत, हा दावा रफीच्या भक्तांना खपत नाही. काय असेल ते असो, रफी आणि सी. रामचंद्र हे कॉम्बिनेशन खुलायला हवं तसं खुललं नाही, हेच खरं!
१९६० च्या ‘सरहद’नंतर तब्बल दहा वर्षांनी ‘रुठा न करो’साठी हे दोघे एकत्र आले तेव्हा रफी अण्णांसाठी जीव तोडून गायला. आशा भोसलेसोबतचं ‘आपका चेहरा माशाअल्ला’ असो वा हा फोटो ज्या रेकॉर्डिगचा आहे, ते ‘मेरे साकिया मेरे दिलरूबा’ हे ऑपेरा साँग असो, रफीचा आवाज काय लागला होता! दुर्दैवानं ‘रुठा न करो’ चालला नाही. त्यानंतर सी. रामचंद्र यांची कारकीर्द संपली. त्यामुळे त्या दोघांचा एकत्रित असा हा शेवटचाच चित्रपट!
सुनील देशपांडे
sunildeshpa@yahoo.co.in