Leading International Marathi News Daily
रविवार, ४ जानेवारी २००९

सामान्य स्त्रीचे आत्मचरित्र
आशा आपराद यांचे आत्मचरित्र ‘भोगले जे दु:ख त्याला..’ हे अनेक अर्थानी वाचनीय आहे. मनोगतातच त्या म्हणतात की, हे एका सामान्य स्त्रीचे आत्मचरित्र आहे. पुस्तक वाचताना मनात आले की कदाचित म्हणूनच ते वेगळे व सच्चे झाले आहे. म्हणजे प्रसिद्ध व्यक्तींना

 

आत्मचरित्र लिहिताना अनेकदा स्वत:च्या वागण्याचे समर्थन द्यावेसे वाटते किंवा आजूबाजूच्या व्यक्ती दुखावल्या जाण्याचे भय वाटते. आपराद यांच्या आजूबाजूला कुणीही प्रसिद्ध व्यक्ती- तशा लीलाताई पाटील आहेत- नाहीत. त्यामुळे मनमोकळेपणाने जसे घडले तसे त्या सांगत गेल्या आहेत. त्यांच्या आईचा स्वकेंद्री व अकल्पनीय स्वभाव, त्यामुळे त्यांची झालेली घुसमट, वडिलांचा लवकर झालेला मृत्यू परंतु मृत्यूपूर्वीच त्यांनी आशावर केलेले संस्कार याचे चित्रण मनाला भिडेल असे झाले आहेच; परंतु सुशिक्षित वडिलांच्या प्रेमामुळे व जवळिकीमुळे त्यांच्यात असलेली शिक्षणाची जिद्द व त्यामुळे तेराव्या वर्षी आईने जबरदस्तीने लावलेल्या लग्नानंतर पाठोपाठच्या चार मुलींना जन्म देऊन मग परत शिक्षणाला सुरुवात करून प्राध्यापकीपर्यंत मारलेली मजल थक्क करणारी आहेच, परंतु हे सर्व करत असताना त्यांच्या आजूबाजूच्या समाजाचे जे चित्रण आहे ते विलोभनीय आहे.
लेखिकेचा समाज म्हणजे कोल्हापूर, सांगली, सातारा या भागातला मुस्लिम समाज. हा समाज बरीच जमीन बाळगून असणारा खेडवळ समाजही आहे व अशिक्षितपणामुळे गरिबी आलेली कुटुंबेही आहेत. तिचे कुटुंब गरिबी प्राप्त झालेले आहे. परंतु आजोळ हे दरगाहची सेवा करणारे ‘मुजावर’ कुटुंब. दरवर्षीच्या ऊरुसाचे वर्णन वाचताना प्रत्येक ठिकाणाच्या संस्कृतीमुळे विकसित झालेली संमिश्र (कंपोझिट कल्चर) संस्कृती काय असते त्याचा पट आपल्यापुढे उलगडला जातो. ऊरुसाच्या आधी सर्व मुजावरांनी ‘संदल’ चंदनाचे दाट गंध उगाळून हांडे भरावयाचे- पीराला ते माखायचे. पहिल्या दिवशी सवाष्णींनी शाकाहारी जेवण करून नैवेद्य दाखवयाचा. दुसऱ्या दिवशी बकरा कापला तरी इतर जेवण म्हणजे मसालेभात, धपाटे वाटाण्याची उसळ इत्यादी. पापड- कुरडया,ओटी भरणे वगैरे गोष्टींचे वर्णन वाचताना गंमत वाटते. त्यांची मुसलमानी भाषाही अशीच, ‘आशा आटप जल्दी. आज दस्तगीर, तू मैं, तेरे छोऱ्या जंजीर देखने जइंगे, लई भारी पिक्चर हाय, उसमें का एक गाना मुजे लई पसंत आया देक..’ त्यांचे शेजारी- पाजारी हिंदू अठरापगड जातीचे. त्यांच्याबरोबर लेखिकेवर गौरी गणपती, हादगा यांचे संस्कार झालेले. मदतीला हेच शेजारी. त्यांच्याबरोबर भावा-बहिणीचे मनापासून निभावलेले नाते- हा खरा आपला समाज. याच समाजातील काही नातेवाईक, शुद्ध शाकाहारी, खुद्द लेखिकेचा नवरा शाकाहारी त्यामुळे त्यांची तब्बेत सुदृढ. हे सर्व सहज. यातलाच एक दीर धर्माची टिंगल उडवणारा तर एक अचानक नमाजी बनलेला. इतके वैविध्य, मान्यता, धर्माचा लवचिकपणा याचे मनोरम चित्रण या आधी वाचलेले आठवत नाही.
एक स्त्री शिकली की सारे कुटुंब शिकू लागते हे आशा आपराद यांच्याकडे बघून पटते. त्यांच्या शिक्षणाच्या धडपडीला प्रचंड विरोध करणारे नातेवाईक पुढे आपल्या मुलांना शाळेत घातल्यावर त्यांचे उदाहरण देऊन, ‘आशा भाभी कैसा कष्टमें शिखे, तुमना अब्यास करनं क्या जान जातिया क्या?’ म्हणून त्यांना (मुलींनाही) शिकण्यासाठी उत्तेजन दिले. त्यांच्या चारही मुली शिकल्याच, परंतु त्यांच्या बहिणीची काही मुलेही उच्च शिक्षणाकडे त्यांच्या उदाहरणावरून वळली. आशाताई अभ्यास करत असतानाच आजूबाजूच्या शेतमजूर स्त्रियांशी जिव्हाळ्याचा संबंध प्रस्थापित केला. या स्त्रियांना बचत करायला शिकवून जोडधंदा करण्यास मदत करून त्यांना आत्मनिर्भर केले. याच स्वभावामुळे कॉलेजमधील विद्यार्थी व नंतर कोल्हापुरातील सामाजिक कामाशी त्यांनी स्वत:ला जोडून घेतले. आजही त्या स्वाधारसारख्या संस्थांत काम करत आहेत.
लेखिकेने स्वत:च्या लोकांकडून उभे केलेले अडथळे पार करत स्वत:च्या प्रगतीचा प्रवास केला. असा प्रवास आजवर अनेकांनी केला आहे. परंतु एक मुस्लिम स्त्री म्हणून समाजाने त्यांच्या मार्गात जे अडथळे आणले त्यामुळे विचार आला की सर्वसामान्य लोक समभावाने एकमेकांशी वागत असतात. हीच आपली संस्कृती आहे. परंतु स्वत:ला धर्माचे ठेकेदार समजणारे समाजात तेढ निर्माण करतात. हा समाज जो सहजतेने आपला धर्म- धारयते इति धर्म- निभवत असतो त्याला कृत्रिमतेने- ऊर्दूत शिक्षण, पोशाख वगैरे- जगायला लावतात. लेखिकेची आई व इतर स्त्रिया नऊवारी नेसत होत्या, मंगळसूत्र, हिरव्या बांगडय़ा, पाटल्या घालणे महत्त्वाचे मानत होत्या. त्यांना अलगतावादाचे धडे देऊन व हिंदूंनी त्यांच्यावर आक्रमकपणे बोलण्याने गटाने राहण्याची गरज वाटून, आपणच आपल्या समाजाच्या एकसंधपणाच्या वैविध्याच्या चिरफळ्या करत आहोत का? असो. पश्चिम महाराष्ट्रातील मुसलमान समाजाच्या जगण्याचे, त्यांच्या प्रश्नाचे व त्यावरील काही मार्गाचे लोभस चित्रण आल्याने आशा आपराद यांची आत्मकहाणी सामाजिक चित्रणही झाली आहे. या त्यांच्या समाजाविषयी अभ्यासू दृष्टिकोनातून त्यांनी आणखीही लिहावे. महाराष्ट्राच्या सामाजिक दस्तावेजीकरणाच्या दृष्टीने हे अत्यंत आवश्यक ठरेल.
वासंती दामले
vasantidamle@hotmail.com