Leading International Marathi News Daily
रविवार, ४ जानेवारी २००९

डॉ. गोविंदराव केतकर मूळचे नाशिकचे. १९६० पासून डोंबिवलीत स्थायिक झाले आहेत. भौतिकशास्त्र आणि संगीत हे त्यांचे आवडीचे विषय. या दोन विषयांच्या

 

परस्परसंबंधांवर आधारित त्यांनी संशोधन केले. स्वरांक ही संकल्पना निश्चित केली. या संशोधनावर नाशिकच्या मुक्त विद्यापीठाने त्यांना भौतिकशास्त्रातील डॉक्टरेट प्रदान केली (जून २००६). हा स्वरांक बुद्धय़ांकाशी समकक्ष आहे. कानाची स्वरांमधील सूक्ष्म फरक ओळखण्याची क्षमता किती आहे यावर हा निर्देशांक आधारित आहे. या संशोधनावर आधारित शोधनिबंध ऑस्ट्रेलियामध्ये त्यांनी शास्त्रज्ञांच्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर केला. तिथेही या संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळाला. या स्वरांक संकल्पनेबद्दल ते या लेखात सविस्तर चर्चा करीत आहेत.

संगीत क्षेत्र
संगीत हे कलावंताला आणि श्रोत्याला आनंद देत असते. कलावंत रसनिर्मितीचा आनंद घेत असतो. श्रोते त्या रसाचा आस्वाद घेत असतात. संगीतातला कोणताही प्रकार असो गायन, वादन किंवा नृत्य; आनंदाची देवाणघेवाण हेच कोणत्याही मैफलीचे उद्दिष्ट असते. उत्तर भारतीय, दाक्षिणात्य, पाश्चात्त्य किंवा इतर कोणत्याही पद्धतीचे संगीत असो, त्यांत र्सवकष तर नव्हताच पण मर्यादित स्वरूपातसुद्धा व्यक्तिनिरपेक्ष मूल्यमापन करणारा कोणताही निर्देशांक उपलब्ध नव्हता. बुद्धी ही अमूर्त असूनसुद्धा बुद्धीची पातळी दर्शविणारा बुद्धय़ांक उपलब्ध तर आहेच पण तो सर्वमान्यही आहे. मग संगीत क्षेत्रासाठी तसा एखादा निर्देशांक का नसावा? हा प्रश्न मनात घोळत होता. कित्येक वर्षे नुसता प्रश्नच होता. उत्तर सापडेल का नाही व त्याचे स्वरूप कसे असेल याचा मागमूसही नव्हता. चार पाच वर्षांच्या संशोधनाने त्या प्रश्नाचे उत्तर सापडले आहे.
निमित्त
कोणतीही गोष्ट सिद्धीस जाण्यास पूर्वतयारी, परिश्रम करण्याची इच्छा आणि अनुकूलता तर लागतेच पण एक निमित्त लागते. एक ‘ट्रिगर’ लागतो. ते निमित्त या विषयाला एका मैफलीच्या स्वरूपात लाभले. १९९५ च्या सुमाराला डोंबिवलीत डॉ. विद्याधर ओक यांचा एक कार्यक्रम होता. ‘हार्मोनियम - एक रसास्वाद’. कलाविष्काराच्या अंगाने कार्यक्रम उत्तमच झाला. पेटीचे- हार्मोनियमचे गुण दोष सांगताना त्यांनी दोन विधाने केली. एक-पेटी बेसूर आहे. शुद्ध सप्तकाशी सूर जुळत नाहीत आणि दुसरे- पेटीची लोकप्रियता गेली सव्वाशे वर्षे वाढतच आहे. दोन्हीही विधाने सत्य आहेत पण ती परस्परविरोधी आहेत. खरोखरीच बेसूर असेल तर लोकप्रिय कशी? व लोकप्रिय असेल तर बेसूर कशी? लोक स्वीकारणारच नाहीत. या विरोधाभासाचा अभ्यास करावयाचा असे मी ठरविले. आता मागे वळून पाहताना जाणवते की मला ‘निमित्त कारण’ मिळाले होते. ट्रिगर ऑपरेट झाला होता. आता गोष्टी आपोआप पुढे घडणार होत्या. स्वरांक सिद्ध होणार होता.
सूर म्हणजे काय?
भौतिकशास्त्रात आवाजाचे तीन प्रमुख गुणधर्म मानले आहेत. उत्पत्तिस्थान- बासरी, सनई, हार्मोनियम, मानवी कंठ इत्यादी. या प्रत्येकाची तरंगाकृती (Waveform) निराळी असते. त्याचा भरपूर अभ्यास झाला आहे. तरंगाकृतीवरून माणूस निश्चित ओळखण्यापर्यंत प्रगती झाली आहे. जसा ‘निशाणी अंगठा’ किंवा फिंगर प्रिंट तसे हे स्पीच रेकग्निशन. दुसरा गुणधर्म आवाजाचा लहान मोठेपणा किंवा श्’Volume याचाही खूप अभ्यास झाला आहे व मायक्रोफोन्स व अ‍ॅम्प्लिफायर्स ही त्याची फलिते आपल्याला दिसत आहेत. तिसरा गुणधर्म म्हणजे आवाजाची कंपनसंख्या. बेसूर किंवा सुरेल म्हणजे काय याचा अभ्यास करण्यासाठी हा तिसरा गुणधर्म महत्त्वाचा. आवाज म्हणजे हवेतली कंपने हे आपणास माहीत आहे. ही कंपने कानावर पडली की आपल्याला आवाजाची जाणीव होते. एका सेकंदात किती कंपने आहेत हे महत्त्वाचे आहे. हीच आवाजाची कंपनसंख्या किंवा frequency. ही कंपनसंख्या काही वेळ न बदलता तीच राहिली तर तो संगीतातला स्वर होतो (Musical note). दिवाळीतला अ‍ॅटमबॉम्ब, फटाके, दारावरची थाप ही स्फोटध्वनीची उदाहरणे होत. हे आवाज अचानक होतात आणि लगेच हवेत विरून जातात. स्फोटध्वनीचे आवाज कानाला त्रासदायक वाटतात. आपण तोंडाने घातलेली शीळ, बांबूच्या वनात सारख्या वेगाने वारा वाहत असेल तर होणारा आवाज, कोकिळेचे कूजन ही स्वराची उदाहरणे होत. हे स्वर कानाला गोड लागतात. स्वर म्हणजे काही वेळ न बदलणाऱ्या कंपन संख्येचा आवाज. स्वर म्हणजे कंपनसंख्या असे समीकरण तयार होते. कंपनसंख्या बदलली की स्वर बदलतो. या कॉम्प्युटरच्या युगात कोणत्याही आवाजाची कंपनसंख्या आपल्याला मोजता येते किंवा कोणत्याही कंपन संख्येचा आवाज निर्माण करता येतो.
शुद्ध सप्तक
कोणत्याही एका कंपन संख्येचा स्वर निर्माण झाला की त्याच्या गुणित कंपन संख्येचेही स्वर त्याच्याबरोबरच निर्माण होतात. जसे दुप्पट कंपन संख्येचा, तिप्पट कंपन संख्येचा इत्यादी. इंग्रजीमध्ये यांनाupper harmonics म्हणतात. त्यांची तीव्रता (intensity) कमी कमी होत जाते. एका कंपन संख्येचा स्वर निर्माण झालेला आहे. त्याच वेळी दुसऱ्या एखाद्या कंपन संख्येचा स्वर निर्माण झाला तर त्याचे व पहिल्या स्वराचे Harmonics सुसंगत असतील तर पहिल्या स्वराशेजारी दुसरा स्वर चांगला वाटतो. सुरेल वाटतो. जर त्याचे हार्मोनिक्स विसंगत असतील तर तो स्वर पहिल्या स्वराशी बेसूर वाटतो. सुरेलपणा किंवा बेसूरपणा हा तुलना करूनच ठरविता येतो. जेव्हा एकच स्वर उपलब्ध असतो तेव्हा तो फक्त नाद असतो. सुरेलही नसतो व बेसूरही नसतो.
ज्याला आपण संगीतातील सप्तक म्हणतो, त्या सप्तकात सा रे ग म प ध नी, हे सात स्वर असतात. या सप्तकांत आपल्याला फक्त षड्ज निवडीचेच स्वातंत्र्य असते. एकदा षड्जाची निवड झाली की पुढचे सहा स्वर गणिताने आपोआप ठरतात. म्हणूनच त्याला षड् (सहा स्वरांना) ज (जन्म देणारा) म्हणतात. एकदा सा (षड्ज) निश्चित केला की पुढचे सहा स्वर गणितच ठरवते व ते शुद्ध सप्तकांतील असतात. हार्मोनियममधील सप्तकांत जे बारा स्वर असतात तेही गणितानेच ठरविलेले असतात; परंतु ते गणित सोयीचे, तडजोडीचे असते. कोणत्याही दोन शेजार शेजारच्या पट्टय़ा काळी- पांढरी हा भेद न करता घेतल्या तर त्यांचे गुणोत्तर ठरलेले असते. डाव्या पट्टीच्या स्वराच्या कंपनसंख्येला १.०५९४६३१ ने गुणले की पुढच्या उजव्या हाताच्या पट्टीच्या स्वराची कंपनसंख्या येते. (१.०५९४६३१ हे २ चे १२ वे मूळ आहे. २) या गणिती सोयीचा फायदा असा होतो की, कोणत्याही पट्टीला षड्ज मानता येतो. पुढचे शुद्ध, कोमल तीव्र आपोआप निश्चित होतात, पण ते शुद्ध सप्तकातील स्वरांपासून थोडे सरकलेले असतात म्हणून पेटी ‘बेसूर’ आहे असे म्हटले जाते.
कान
दोन स्वरांची कंपनसंख्या निरनिराळी असावी आणि त्यांच्या कंपनसंख्येत लक्षणीय अंतर असेल तर ते कोणालाही दोन निराळे स्वरच वाटतील. पण जसजसे या कंपनसंख्येतील अंतर कमी होऊन ते जवळ जवळ येतील तेव्हा ते काही जणांना वेगळे वाटतील तर काही जणांना फरक झालेला समजणारच नाही हीच कानाची स्वर विभेदनशक्ती. अगदी जवळचे स्वर संगीतज्ञांना भिन्न वाटतील पण सर्वसामान्यांना त्यातील फरक जाणवणार नाही. हा जाणवणारा फरक स्वरांक आकडय़ांत मांडून निश्चित करतो. समजा २०० कंपनसंख्या ही वाढवीत वाढवीत २०४ केल्यावर एखाद्याला स्वर बदलल्याचे जाणवले तर असे म्हणता येईल की, २ टक्के कमीत कमी फरक असल्याशिवाय त्याला दोन स्वर निराळे वाटत नाहीत. निरनिराळ्या दहा कंपनसंख्यांना असे पर्सेन्टेज काढून त्याची सरासरी एका सूत्रात घातली जाते. उत्तर येते ते १०० पैकी गुण अशा स्वरूपात येते. जितका सूक्ष्म सूक्ष्म फरक जाणवेल तेवढे जास्त गुण मिळतात. तोच स्वरांक.
स्वरांक
संगीतज्ञांना अगदी सूक्ष्म फरकसुद्धा कानाला जाणवतो म्हणून त्यांना शंभरपैकी जास्त गुण मिळतात. म्हणजेच त्यांचा स्वरांक जास्त असतो. सर्वसामान्यांना इतका सूक्ष्म फरक जाणवत नाही म्हणून त्यांचा स्वरांक कमी असतो. हे सर्व आपल्याला पूर्वीपासून जाणवतच होते की संगीतज्ञांना सूक्ष्मतर फरक समजेल. पण तो स्वरांकांत आणल्यामुळे त्यात व्यक्तिनिरपेक्षता आली. तो एक निर्देशांक तयार झाला. ती एक वैज्ञानिक संकल्पना झाली. हळूहळू या स्वरांकाचा जगभर प्रसार होईल यात शंका नाही. या स्वरांकाचा अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट म्हणून जगभर संगीत क्षेत्राला उपयोग होणार आहे.
साधना पद्धती
विशिष्ट साधना पद्धतीने हा स्वरांक मर्यादित प्रमाणात सुधारताही येतो. या साधना पद्धतीचे वैशिष्टय़ असे की, स्वरांक तर सुधारतोच शिवाय दमसास वाढतो व रेंज ऑफ व्हॉइसही सप्तकाच्या भाषेत वाढते. प्रख्यात संगीतकार पं. यशवंत देव यांनी स्वत: या पद्धतीने साधना करून पाहिली व पूर्ण समाधान झाल्यावर या साधना पद्धतीचे ‘केतकर पद्धती’ असे नामकरण केले. कलकत्त्याला संगीत रिसर्च अकादमी आहे. केतकर पद्धतीवर प्रगत संशोधनासाठी प्रस्तुत लेखकाला अकादमीने विशेष निमंत्रण दिले आहे.
या विषयावर ‘स्वरांक आणि ओंकाराधिष्ठित स्वरसाधना केतकर पद्धती’ हे पुस्तक प्रस्तुत लेखकाने लिहिले आहे. त्याला पं. यशवंत देव यांनीच प्रस्तावना लिहिली आहे. हे पुस्तक स्वयंशिक्षक पद्धतीचे असून दोन ऑडियो सीडी साधनेसाठी पुस्तकाबरोबरच मिळतात. या साधना पद्धतीची शिबिरे दिल्ली आणि सातारा येथे यशस्वी झाली. पुढची शिबिरे पुणे आणि तळेगाव येथे योजिली आहेत. २०, २१, २२ ऑक्टोबर २००८ रोजी सुरत येथे अखिल भारतीय संगीत शिक्षक संघाचे त्रवार्षिक अधिवेशन झाले, त्यामध्ये खास निमंत्रणावरून प्रस्तुत लेखकाचे या विषयावर सप्रयोग व्याख्यान झाले, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. ५ डिसेंबर २००८ ला SNDT विद्यापीठ येथेही निमंत्रित वक्ता म्हणून सप्रयोग व्याख्यान झाले.
प्रसार
स्वरांक आणि साधनेची केतकर पद्धती ही जगातील कोणत्याही संगीत पद्धतीला उपयुक्त आहेत. संगीत शिकणे सुरू करण्यापूर्वीचा हा ‘फाऊंडेशन कोर्सच’ आहे. संगीताच्या वर्गाला प्रवेश देण्यापूर्वी केतकर पद्धतीचा हा एक महिन्याचा वर्ग प्रत्येक शिष्याला अत्यावश्यक केल्यास वर्गचालकांनाच ते जास्त सोयीचे ठरेल. कारण त्याचा दमसास आणि आवाजाची रेंज आपोआप वाढलेली असेल. नट, गायक, वक्ते व सर्वसामान्यांनाही आरोग्यासाठी ही साधना पद्धती उपयोगी आहे.
संपर्क- डॉ. गो. का. केतकर
govind.ketkar@rediffmail.com

नागरी विमान व्यवसायात सर्वत्र गांभीर्य आणि फक्त गांभीर्यच असते असे नाही. प्रशिक्षण, गुणवत्ता, चाचणी परीक्षा यांमुळे जसे पावलोपावली कौशल्य दिसते तसेच प्रासंगिकतेने हलकेफुलके क्षणही निर्माण होतात. या हलक्याफुलक्या प्रसंगांतून खसखस पिकणे, हास्य निर्माण होणे किंवा कोणा एकाची ‘टर’ उडवण्यासाठी जबरदस्त कारण मिळणे हे घडत असते. मनुष्य म्हटला की नजरचूक, विसराळूपणा, घाईगर्दी इ. गुण त्याच्याबरोबर असतातच. विमान व्यवसायात ‘मनुष्या’जवळचे हे गुण कधीमधी डोके वर काढतात आणि खसखस पिकते. या सर्वाच्या जोडीनेच व्यवसायातील सहकारी व्यक्तींची, कनिष्ठांची-वरिष्ठांची थोडी गंमत करणे, टोपी उडवणे असे बुद्धी चलाखीचे प्रकार असतातच.
एकदा एका विमानतळ हवाई वाहतूक नियंत्रकाला त्याच्या संवादयंत्रणेतून एका वैमानिकाची हाक ऐकू आली. याला इंग्रजीत ‘कॉल’ करणे असे म्हणतात. त्या वैमानिकाने आपले विमान विमानतळापासून किती मैलांवर आहे, किती उंचीवर आहे, किती मिनिटांनी विमानतळावर पोहोचेल ही माहिती दिली. आपण तुमच्या विमानतळावर उतरणार आहोत, हेही त्याने सांगितले. हवाई वाहतूक नियंत्रकाने आपली सर्व यंत्रणा या येणाऱ्या विमानासाठी कार्यरत आहे ना, हे तपासून पाहिले. थोडय़ा वेळाने वैमानिकाने संवादयंत्रणेद्वारा सांगितले की, त्याचे विमान विमानतळाच्या अगदी जवळ आले असून त्याला धावपट्टी दिसू लागली आहे. वाहतूक नियंत्रकाला मात्र ते विमान दिसत नव्हते अथवा नियंत्रण कक्षातील यंत्रणाही विमान जवळ आल्याची सूचना, संकेत देत नव्हते. शिवाय मघापासूनच्या संवादातून समजलेले अंतर, वेळ, वेग याचे गणितही जमत नव्हते. नियंत्रकाने वैमानिकाला हे सर्व सांगितले व त्याची माहिती तपासून बघायची विनंती केली. त्यावर वैमानिकाने परत एकदा सर्व बरोबर आहे, असे सांगितले. धावपट्टी दिसत असून इंधन संपत आले आहे तेव्हा उतरण्याची परवानगी द्या, अशी विनंती केली. नियंत्रकाने धावपट्टी सुरक्षित असून उतरायला परवानगी देत आहोत, पण आपण आम्हाला अजूनही दिसत नाही हे परत एकदा सांगितले. त्यावर वैमानिकाचा हसण्याचा आवाज आला व तो म्हणाला, विमान धावपट्टीवर उतरल्यावर- अजून एक मिनिटाने- आपल्याला नक्कीच दिसेल. नियंत्रक डोळ्यांना दुर्बीण लावून पाहत होता. चांगली दोन-चार मिनिटे गेली तरी विमान काही धावपट्टीवर वा हवेत दिसले नाही. नियंत्रकाने वैमानिकाला बऱ्याच वेळा हाका मारल्या, पण उत्तर आले नाही. पुढील कारवाया प्रत्येक स्तरावर सुरू झाल्या. अध्र्या तासाने नियंत्रण कक्षातील दूरध्वनी वाजला. बोलणारा एक तहसीलदार होता. तो सांगत होता, त्याचा गाव या विमानतळापासून सत्तर-ऐंशी मैल लांब होता. गावाजवळ आता दुर्लक्षित झालेली, पण दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी वापरात असलेली एक धावपट्टी होती. त्या धावपट्टीवर एक विमान उतरले आहे. विमान व वैमानिक सुरक्षित आहेत. फक्त विमानात इंधन नाही. विमानाभोवती पहारा लावून वैमानिकाला सरकारी वाहनाने तुमच्याकडे पाठवत आहोत. ती उपयोगात नसलेली धावपट्टी या विमानाच्या संभाव्य मार्गापासून बरीच दूर होती. वाईट हवामानामुळे अथवा वैमानिकाने विमानचालनात दुर्लक्ष केल्याने अथवा फुगलेल्या अतिआत्मविश्वासाने ‘त्या’ धावपट्टीला आपल्या उद्दिष्टाच्या विमानतळाची धावपट्टी समजण्यात आले. संवाद विमानतळाशी चालू होता; पण विमान भलत्याच जागी होते. आता विमानतळ आलाच अशा समजाने वैमानिक महाशयांनी इंधनसाठा संपवला होता. शिवाय आपण भरकटलो आहोत हेच त्याच्या लक्षात आले नव्हते. संबंधित वैमानिक त्याच्या खडूसपणासाठी व शिष्टपणासाठी प्रसिद्ध होता. विमान व्यवसायातील अनेकांना त्याने स्वत: स्वत:च्या टिंगलीसाठी हे एक उत्तम कारण दिले, शिवाय व्यावसायिक शिस्तीचा बडगा त्याच्या पाठीत बसलाच.
मोठाल्या विमानात प्रत्येक प्रवासी आसनाच्या वर एक थंड हवेच्या झोताची व दुसरी गरम हवेच्या झोताची सोय असते. प्रत्येक प्रवासी आपल्या प्रकृतिधर्माप्रमाणे ती वापरतो. एकदा अशा विमानप्रवासाच्या वेळी गरम चहा व कॉफी देण्यात आली. एका प्रवाशाला ती फारच गरम वाटली. बशीत ओतून, फुंकरून पिण्याचीही सोय नव्हती; कारण कॉफी उभ्या आकाराच्या पेल्यात देण्यात आली होती. या प्रवासी महाशयांनी आपले चातुर्य वापरले व आपल्या आसनावरील थंड हवेचा झोत वाढवला. आपल्या हातातील कॉफीचा पेला उंच धरून त्या झोताच्या नळीच्या तोंडाच्या जवळ नेण्याचा प्रयत्न केला. एवढय़ा जवळून तो हवेचा झोत कॉफीच्या पेल्यात गेल्याबरोबर ती कॉफी थंड होतानाच मस्तपैकी आजूबाजूच्या प्रवाशांवर पावसाप्रमाणे पडली. हे सर्व क्षणातच घडले. हे चतुर महाशय ओशाळले- खजील झाले. आजूबाजूच्या लोकांनी ‘बावळट’, ‘मूर्ख’ अशा शब्दांची उधळण मुक्तहस्ते केली. प्रवासीकक्ष सेविकेने सर्वाचे कपडे साफ करायला मदत करायचे नाटक केले. तिला बिचारीला मोकळेपणे हसताही येत नव्हते. त्या चतुर प्रवाशाला दुसरी कॉफी घेण्याची विनंती केली; पण त्याने ती नाकारली. हा किस्सा वैमानिक व इतर कर्मचाऱ्यांना कळला तेव्हा ते डोळ्यांत पाणी येईपर्यंत हसले. त्यांच्या अंगावर कॉफीचा सडा पडला असता तर ते हसले नसते.
एका विमानवाहतूक संस्थेचा व्यवस्थापकीय संचालक म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टर किंवा एम. डी. हा अतिशय कुप्रसिद्ध होता. अरेरावी, कटकारस्थाने इ. करून संस्थेतील अधिकाऱ्यांना जास्तीत जास्त पिडणे हा त्याचा आवडता छंद होता. याच संस्थेची दोन विमाने एका विमानतळावरून उडाली आणि मार्गक्रमण करू लागली. जमिनीवरील वाहतूक नियंत्रण व वैमानिक यांच्यात योग्य तो संवाद सुरू होता. अचानक एका विमानाच्या वैमानिकाने ‘हे भगवान! (माय गॉड) माझ्या विमानात एक विषारी नाग एका आसनाखालून बाहेर आला आहे आणि प्रवाशांची तारांबळ उडाली आहे.’ असा संदेश दिला. हा संदेश तेव्हा विमानउड्डाण करणाऱ्या सर्वाना ऐकू गेला होताच. हे ऐकल्यावर त्या संस्थेच्या दुसऱ्या विमानाचा वैमानिक शांतपणे रेडिओवर बोलला की, ‘बाबा रे, तू नशीबवान आहेस. तुझ्या विमानात फक्त सर्पच आहे. माझ्या विमानात मात्र आपला एम. डी. बसलाय!’ ज्या मंडळींना तो एम. डी. म्हणजे काय चीज होती हे माहीत होते त्यांनी अशा गंभीर प्रसंगातही या विनोदाला दाद दिली.
काही प्रवासीकक्ष सेविका नोकरीस नव्या लागल्या होत्या. प्रशिक्षण संपवून त्यांची हवाईसेवा सुरू झाली होती. विमानउड्डाण सुरू असताना प्रवाशांना चहा-कॉफी देऊन झाल्यावर त्या नव्या सेविकेला विमानातील इंटरकॉमवर दुसऱ्या ज्येष्ठ सेविकेने सूचना दिली की, ‘कॅप्टनसाहेबांना (मुख्य वैमानिकाला) चहा द्यायची वेळ झाली आहे. त्यांना चहा कसा आवडतो हे तुला माहीत आहे ना?’ यावर त्या नव्या सेविकेने म्हटले, ‘मला माहीत नाही. तुम्हीच सांगा, त्यांना कसा चहा आवडतो ते.’ यावर त्या ज्येष्ठ सेविकेने सांगितले की, ‘त्यांना बिनदुधाचा चहा, त्यात साखर नको, तो ग्लासात दे आणि ग्लासात कमीत कमी चार आइसक्युब्ज घालायला विसरू नकोस.’ नव्या सेविकेने सूचनेप्रमाणे चहा तयार करून कॅप्टनसाहेबांकडे नेला. हे कॅप्टनसाहेब दिसायला फारच रुबाबदार, देखणे आणि दुसऱ्याची थट्टामस्करी करण्यात फारच पटाईत होते. कॅप्टनसाहेबांनी हातात आलेले चहाचे विचित्र रसायन पाहून या नवीन मुलीच्या हातून कोणीतरी आपली फिरकी घेतलीय हे ओळखले. चेहऱ्यावर काहीही बदल न दाखवता त्या नव्या मुलीला धन्यवाद दिले आणि खिशातून सिगारेटचे पाकीट काढून त्या मुलीकडे देऊन ‘हे तुमच्या ज्येष्ठ सेविकाबाईंना नेऊन दे; त्यांना या ब्रॅण्डची सिगारेट फारच आवडते हे लक्षात ठेव,’ असे सांगितले.
महाकाय विमाने जेव्हा नवीन होती, तेव्हा त्या विमानांच्या स्वच्छतागृहातून ओडिकोलनच्या बाटल्या, पावडरचे डबे, दाढीचा साबण यांची लहान लहान आकाराची पाकिटे ठेवलेली असायची. ज्या ज्या प्रवाशांना त्या गोष्टींवर हात मारता येईल ते प्रवासी आपला खिसा भरून घ्यायचे. विमानसंस्थेच्या व्यवस्थापनाच्या मते या वस्तूंची किंमत अतिशय नगण्य असल्याने आणि प्रवाशांना दुखवायचे नाही म्हणून या श्रीमंत लोकांच्या उचलेगिरीकडे दुर्लक्ष केले जायचे.
कॅप्टन आनंद जयराम बोडस

देवघरात लंगडा बाळकृष्ण का ठेवतात?
प्रश्न १) मंदिरात भगवान श्रीकृष्ण व राधेची मूर्ती असते पण घरच्या देवघरात लंगडा बाळकृष्ण का ठेवतात?
प्रश्न २) हनुमानाची पूजा मंदिरातच करतात? घरी मूर्ती ठेवून पूजा का नसते?
प्रश्न ३) ‘भीमरूपी महारुद्रा’तील ‘अणूपासोनी ब्रह्मांडाएवढा होत जातसे’ या ओळीप्रमाणे त्या काळी अणूचा सिद्धांत होता का? ज्ञानी लोकांना अणूची संकल्पना माहीत होती का?
ऋता गोखले
प्लॉट क्र. १४, महर्षी भृगू अपार्टमेंट, लक्ष्मीनगर, नागपूर.
दूरध्वनी- २२३३ ६४६

माळेमध्ये १०८ मणीच का असतात?
प्रश्न १) पूजा, आराधना, जप किंवा अनुष्ठान करतेवेळी हिंदू लोक आसन का टाकतात?
प्रश्न २) माळेमध्ये १०८ मणीच का असतात?
प्रश्न ३) हिंदू लोक पूजापाठ किंवा अन्य शुभवेळी स्वस्तिक चिन्ह का काढतात?
प्रश्न ४) पत्नी पतीच्या डाव्या बाजूला केव्हा केव्हा बसते? उजव्या बाजूला पत्नीला कोणत्या वेळी बसले पाहिजे?हा डावा आणि उजवा यांचा अर्थ काय?
प्रश्न ५) श्राद्ध कशाला म्हणतात? श्राद्ध करतेवेळी पित्तर दिसतात का?
अशोक परब
ए/१०२, तळमजला, श्री साई दत्तगुरू अपार्टमेंट
पाटीलवाडी, सावरकर नगर
ठाणे (पश्चिम)- ४०० ६०६

जुन्या मराठी कवितांसंबंधी
मी एक सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक असून जुन्या मराठी कवितांचा एक चाहता आणि अभ्यासक आहे, त्यांतील पुष्कळशा कविता हृदयस्पर्शी व कल्पनाशक्तीने बहरलेल्या वाटतात. खाली लिहिलेल्या एका जुन्या कवितेच्या चार ओळी आहेत. ती पूर्ण कविता जर कोणाजवळ असल्यास माझ्या पत्त्यावर कळवावे.
निसर्गाचा सोपान सिद्ध केला
जगन्नाथे तो दिला मानवाला
देवमंदिर आपुले गणी जाते
जगी उपमा कोणती त्या गृहाते

तसेच सुमारे ७०-७५ वर्षांपूर्वी मॅकमिलन कंपनीची मराठी पाठय़पुस्तके त्या काळच्या इंग्रजी पहिली-दुसरीच्या वर्गासाठी असत. कोणाजवळ तेव्हाच्या इंग्रजी पहिलीचे पुस्तक असेल तर कृपया मला कायमस्वरूपी विकत किंवा थोडे दिवस परत बोलीवर द्यावे किंवा झेरॉक्स काढून पाठवावे. झालेला सर्व खर्च मी देईन.
माधव गांगल
चंद्रवदन हौसिंग सोसायटी,बिल्डिंग नं. ब्लॉक सी-२८
पाचपाखाडी, ठाणे (पश्चिम)
दूरध्वनी - २५४० ७९ ८०

हे ‘की जय’ महाराष्ट्रात केव्हा अवतरले?
गेला दीर्घ-प्रदीर्घ काळ संपूर्ण महाराष्ट्रात (मराठी भाषा- प्रदेशात) कोणाचाही जयजयकार करताना ‘की जय’चा प्रयोग होतो. गल्लीपासून राष्ट्रीय पातळीवरच्या सर्व क्षेत्रांतल्या सर्वच पुढाऱ्यांचा जयजयकार ‘की जय’ने होतो. हे लोण राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक, धार्मिक क्षेत्रांतही पोचले आहे.
‘की जय’ हे मूळ हिंदी भाषेतील. ते म्हणजे ‘चा विजय असो’, ‘चा जयजयकार’ अशा घोषणांचा हिंदी तर्जुमा. कुतूहल असे वाटते की, हे ‘की जय’ महाराष्ट्रात नेमके केव्हा आले?
बाळकृष्ण भागवत
४०१, उपक्रम सोसायटी,प्लॉट नं. ४५, राजयोग मार्ग
गोराई, बोरिवली (प.),मुंबई- ४०००९१
दूरध्वनी- २८६० ९६ ८३

लंकेची पार्वती का व कशी?
लंका एक ऐश्वर्यसंपन्न नगरी, लंकापती रावणाची ही सोन्याची नगरी म्हणून प्रसिद्ध, तर पार्वती ही साक्षात जगत्जननी, आदिमाया, विश्वमाता, आदिशक्ती असे असूनही एखाद्या लग्नसमारंभात किंवा पूजा वगैरे असताना एखाद्या स्त्रीच्या अंगावर दागिने नसतील किंवा फक्त मणीमंगळसूत्र असेल, तर लगेच लंकेची पार्वती बनून आली आहे, फुटका मणीसुद्धा अंगावर नाही, असं तिच्याबद्दल बोललं जातं, याचं कारण काय असावं? हा विरोधाभास का?
प्राजक्ता ओक
२०४/ भालचंद्र सदन, टंडन रोड, दत्तनगर, डोंबिवली - पूर्व
दूरध्वनी- २४३ २२ ६३

जाधवांची वंशावळ हवी आहे
वंशावळी लिहिणारे भाट पूर्वी असायचे. हे भाट कुठे राहतात, ती माहिती हवी आहे. परभणी जिल्ह्यातील पुसेगावमधील जाधवांची (भावसार क्षत्रिय) वंशावळ हवी आहे. तसेच सत्यनारायण व्रतकथा असलेले स्कंदपुराण कुठे मिळेल याची माहिती खालील दूरध्वनी क्रमांकावर कळवावी.
अनुराधा भिडे
दूरध्वनी- ९५२५० २३२ ४३ २१