Leading International Marathi News Daily
रविवार, ४ जानेवारी २००९

महाराष्ट्राच्या सुमारे अध्र्या आकाराचं (१,९१,७९१ चौ. कि.मी.) कर्नाटक हे आपलं शेजारी राज्य आहे! गेल्या काही दशकांत मराठी-कानडी असे राजकारणातून निर्माण झालेले वाद वर्तमानपत्रांतून वगैरे जोरदारपणे होत असले तरी कर्नाटकाशी आपलं नातं सख्खं आहे!
धारवाड-हुबळीपर्यंतचा भाग

 

राज्यपुनर्रचनेपर्यंत मुंबई इलाख्यातच होता. एके काळी नावाजलेल्या विजयनगर साम्राज्याचे अवशेष हुबळीजवळ हम्पी येथे आहेत. या राज्याच्या उत्तर भागातली बदामीची लेणी प्रसिद्ध आहेत.
कर्नाटकात तुंगभद्रा नदी ही सांस्कृतिक सीमारेषा आहे. दोन्ही ठिकाणांच्या भाषेत थोडा फरक आहे नि लोकांच्या जेवणाखाण्याच्या पद्धतीतही फरक आहे. उत्तरेकडच्या पद्धती या महाराष्ट्राशी मिळत्याजुळत्या आहेत. तिथे पोळी, भाकरी, कांदेपोहे, पुरणपोळी हे पदार्थ असतात, तर दक्षिणेला भात, रस्सम्, इडली, पायसम असे पदार्थ असतात. .कर्नाटकाचा किनारी प्रदेश कोकणासारखाच आहे! इथे भाषाही कोंकणीच! तांबडी माती, हिरवी झाडी, स्वच्छ समुद्रकिनारा, नारळी-पोफळीच्या बागा, मासेमारी. कारवार, भटकळ, गोकर्ण, कुन्दापूर, मंगळुरू असा हा सारा परिसर निसर्गसंपन्न व देखणा आहे. रवींद्रनाथ टागोर काही काळ कारवारमध्ये राहिले होते नि कारवारच्या प्रेमातही पडले होते! (मित्रांनो, कारवारला आता थेट रेल्वे जाते.. जाऊन या एकदा!)
तुंगा नदीकाठी श्रृंगेरीचा आद्य शंकराचार्यानी स्थापलेला शारदामठ आहे. श्रृंगेरीजवळच्या आगुम्बेहून दिसणारा सूर्यास्त आवर्जून बघण्यासारखा असतो! गिरसप्पा हा आशियातला सर्वात उंच धबधबा या भागातच आहे. या परिसरात दक्षिणेला श्रवणबेळगोळ आहे. इथे गोमटेश्वराचा पुतळा आहे. या पुतळ्याच्या पायथ्याशी मराठीतला एक प्राचीन शिलालेखही आहे. याच परिसरातली बेलूर, हळेबिडूची मंदिरं दगडातल्या कोरीव कामासाठी बघण्यासारखी आहेत. इथे काळ्या दगडात अक्षरश: इंच न् इंच सुबकतेनं कोरलेला आहे!
म्हैसुरू ही तर म्हैसुरू संस्थानची राजधानी होती. इथले राजवाडे, संग्रहालयं, चित्रसज्जे प्रेक्षणीय आहेत. म्हैसुरूजवळच कावेरीच्या धरणाशेजारी असलेलं वृन्दावन उद्यान तर अवश्य पाहावं असंच आहे. म्हैसुरूजवळचा भारतीय अभियंत्यांनी बांधलेला हासन-मंगळुरू लोहमार्ग फारच प्रेक्षणीय आहे. ५७ बोगद्यांच्या या लोहमार्गावरून एकदा तरी प्रवास कराच!
कावेरी नदीचा उगम ‘तलकावेरी’ला होतो. हे ठिकाण कोडगू जिल्ह्यात आहे. कोडगू जिल्हा शूर लोकांचा समजला जातो. या भागात कॉफीचे खूप मळे आहेत. मडिकेरी हे जिल्ह्याचं ठिकाण आहे. (मुंबईहून मडिकेरीला राज्य परिवहनाची थेट बस आहे.) कर्नाटकात जाऊन म्हैसुरू, बेंगळुरू ही शहरं पाहालंच, पण मडिकेरी नि तलकावेरी चुकवू नका!
अविनाश बिनीवाले

आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती आणि आंतरराष्टीय कीर्तीचे थोर शास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कलाम यांनी भारत २०२० मध्ये महासत्ता होण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. स्वप्नात पाहिलेले हे ध्येय गाठण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार, हेही त्यांनी सांगितले आहे. महासत्तेचे हे स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्यासाठी बच्चे कंपनी तयार आहात ना?
वैज्ञानिक सूत्रांच्या सहाय्याने दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारे प्रकल्प तयार करून यंदा देशभरातील अनेक बालवैज्ञानिकांनी आपल्या वसुंधरेबद्दल-अधिक जाणून घेतले. जिथे राहतो, तो परिसर, ज्या पर्यावरणात वावरतो त्याची ओळख करून घेतली.
यंदाची राष्ट्रीय बालविज्ञान परिषद २७ ते ३१ डिसेंबरदरम्यान नागालँड येथे पार पडली. या परिषदेत महाराष्ट्रातील ३० पैकी २० प्रकल्प हे ग्रामीण तसेच निमशहरी भागातील विद्यार्थ्यांचे होते. यंदा या परिषदेला राज्यभरातील शाळांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. तालुका पातळीवर झालेल्या परिषदेत एकूण २,४३२ प्रकल्प सादर झाले. त्यातून जिल्हा तसेच विभागीय परिषदांमधून राज्यस्तरावर ७५ प्रकल्प निवडले गेले. औरंगाबाद येथे सहा व सात डिसेंबरला राज्यस्तरीय परिषद झाली. या परिषदेतून राष्ट्रीय पातळीवरील परिषदेसाठी ३० प्रकल्प निवडले गेले.
या प्रकल्पांचे विषय पाहिले, की मुले पर्यावरणस्नेही जीवन जगण्यास किती उत्सुक आहेत, हे दिसून येते. नवी मुंबईतील शिक्षण प्रसारक विद्यालयाच्या मुलांनी वाढत्या बांधकाम व्यवसायामुळे होणारा मातीचा ऱ्हास रोखण्यासाठी प्लास्टिकच्या विटांचा पर्याय सुचविला आहे. नवी मुंबईतल्याच अमृता विद्यालयातील विद्यार्थ्यांनी केळ्याच्या झाडापासून रंगनिर्मिती करून दाखवली आहे.
सध्याच्या काळात अपुरे इंधन ही एक मोठी समस्या आहे. त्यावर उपाय म्हणून ठाण्यातील श्रीरंग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कोकमापासून इंधन बनविले आहे. ठाणे जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील सोनाले येथील एज्युकेशन सपोर्ट ट्रस्टच्या शाळेतील मुलांनी चक्क वेधशाळा तयार करून यंदाच्या मोसमात गावात पडलेला पाऊस मोजला. पर्जन्याची दैनंदिन नोंद ठेवली. अशा पद्धतीने कुणीही आपल्या परिसरातील पाऊस मोजू शकतो, हे या मुलांनी दाखवून दिले.
रायगड जिल्ह्यात माणगाव तालुक्यात असलेल्या उत्तेखोल येथील माध्यमिक आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी चक्क कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प यशस्वीपणे तयार केला आहे. ठाण्यातील ए.के. जोशी शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘कचरा व्यवस्थापन’ हा प्रकल्प सादर केला.
संगमनेर येथील डॉ. डी. ए. ओव्हारा विद्यालयातील बालवैज्ञानिकांनी त्यांच्या प्रकल्पाअंतर्गत विघटनशील पदार्थापासून प्लास्टिक बनविले. रायगड जिल्ह्यातील पेणच्या प्रायव्हेट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला ‘आमची माती, आमच्या गणेशमूर्ती’ तसेच बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यम शाळेतील चमूने सादर केलेला ‘बारामतीतील मुद्रा समस्या व उपाय’ हे दोन प्रकल्प तर सर्वात उल्लेखनीय ठरले. या दोन्ही प्रकल्पांत सहभागी बालवैज्ञानिकांना चार जानेवारी म्हणजे आजपासूनच शिलाँग येथे आयोजित इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये ज्येष्ठ वैज्ञानिकांसमोर त्यांचा प्रयोग सादर करण्याची संधी मिळणार आहे.
मित्रांनो, नागालँडच्या परिषदेविषयी पुढील रविवारी अधिक विस्तृतपणे आपण जाणून घेणार आहोत.
हुशार आणि यशस्वी माणसे फार काही वेगळे करीत नसतात, पण ते प्रत्येक गोष्टीचा वेगळ्या पद्धतीने विचार करतात. आपला विचार नवीन पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतात. तुम्हीही जरूर नवे प्रयोग करत राहा. तुम्ही शिकलेले विज्ञान पुस्तकांत ठेऊ नका. त्याच्या आधारे काहीतरी नवे साकारायचा प्रयत्न करत राहा.
प्रशांत मोरे

दर रविवारी या सदरातून तुम्हाला छान छान खेळणी बनवायला शिकता येणार आहेत. अगदी साध्या वस्तूंपासून सोपी खेळणी. नीट वाचा, बनवा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसमोर ऐट मिरवा. घरातल्या मोठय़ा मंडळींचीही मदत घ्या हं. विशेषत: चाकूने खाचा पाडणं वगैरे कामांसाठी मोठय़ांची मदत मस्ट.
साहित्य - पाठीमागे रबर असलेली पेन्सिल, टाचणी, जाड कागद, रबराचा तुकडा, एक छोटा चाकू
कृती -
१. पेन्सिलवर छोटय़ा चाकूच्या साहाय्याने ५ ते ६ ‘ v ’ आकाराच्या खाचा पाडा.
३. ५ सें.मी. x १.५ सें.मी.चा एक कार्ड पेपरचा चौकोनी तुकडा जुन्या ग्रीटिंग कार्डपासून कापा. त्याच्या मध्यभागी भोक पाडा. त्यात टाचणी टोचा. आता तुमचा पंखा तयार होईल.
४. पेन्सिलीच्या मागे असलेल्या छोटय़ा खोडरबरात पंखा असलेली टाचणी खुपसा.
५. टाचणीभोवती पंखा नीट फिरतो आहे, याची खात्री करा.
६. आता बॉलपेनचे जुने रिफील, वा स्ट्रॉ पेन्सिलींच्या खाचांवरून जोरात घासा.
७. असं सलग करत राहा. पंखा फिरायला लागेल.
पेन्सिलमध्ये रिफीलच्या साहाय्याने तयार झालेल्या कंपनांमुळे पंखा फिरतो. कंपनांची शक्ती किती असते बघा!
आता काही प्रयोग तुमचे तुम्ही करा-
हा पंखा उलट दिशेने फिरवता येईल का?
तुम्ही खाचेवरून बोट फिरवल्यास पंखा फिरेल का? तुमचा पंखा किती इंची असल्यास छान फिरतो? पंखा चौकोनी न कापता गोलाकार कापला तर?
अरविंद गुप्ता, आयुका

काय बालमित्रांनो, ‘बालरंग- किडस् झोन’ मध्ये नव्या वर्षांत नवं काय?
तुमचा सहभाग; मग दुसरं काय?
आम्ही तुम्हाला दर महिन्याला एकेक विषय देऊ.
तुम्ही त्यावर साधारण ए-४ आकाराच्या कागदावर चित्र काढू शकता किंवा दहा-बारा वाक्यांचा निबंध लिहू शकता.
किंवा दहा-बारा ओळींची कविता करून पाठवू शकता.
यावेळचा आपला विषय आहे- देश माझा.
देशाबद्दल तुम्हाला काय वाटतं? देशाच्या उन्नतीसीठी काय करावं असं तुम्हाला वाटतं? तुम्ही मोठे व्हाल.. तेव्हा तुमचा देश कसा असावा, याबद्दल तुम्ही काय विचार केलाय?
..हे तुम्ही व्यक्त करायचं- तुमच्या लिखाणातून किंवा चित्रातून. १३ वर्षे वयाखालील मुले या स्पर्धेत भाग घेऊ शकतात.
तुमची निवडक चित्रं आणि लिखाण आम्ही २५ जानेवारीच्या ‘बालरंग- किडस् झोन’ पानावर प्रसिद्ध करू. त्यासाठी तुमची चित्रं, निबंध किंवा कविता १० जानेवारीपर्यंत आमच्याकडे पोहोचली पाहिजेत.
पाकिटावर लिहा- ‘बालरंग- किडस् झोन’, लोकरंग पुरवणी विभाग, लोकसत्ता, एक्स्प्रेस टॉवर, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई- ४०००२१.
सो, हरी अप! हे पान सजवण्यात तुमचा सहभाग हवाच हवा.