Leading International Marathi News Daily
रविवार, ४ जानेवारी २००९

ऑस्ट्रेलिया म्हणजे १०० टक्के विजय असे समीकरण गेल्या काही वर्षांत तयार झाले होते. त्यामुळे एका बाजूला ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ तर दुसरीकडे इतर संघ असे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे जणू विभाजनच झाले होते. ‘क्रिकेट : ऑस्ट्रेलियन स्टाइल’चे फॅडही अलीकडे आले होते. पण ही परिस्थिती बदलू पाहात आहे. ऑस्ट्रेलियन संघाची सध्याची परिस्थिती पाहता ते खूळ अनेक देशांच्या मानेवरून उतरू लागले आहे. त्यांचा शेअर घसरत आहे.
‘सारी क्रिकेट दुनिया एक तरफ आणि ऑस्ट्रेलिया एक तरफ’ असं दोन

 

वर्षांपर्यंत क्रिकेटरसिक बोलायचे. सलग १५-१६ कसोटी विजयांच्या मोहिमा, मालिका ऑस्ट्रेलिया संघ जिंकायचा. गेल्या १०-१२ वर्षांत ऑस्ट्रेलिया संघाच्या या मोहिमा सतत यशस्वी झाल्या. आज मात्र चित्र झपाटय़ाने बदलत चालले आहे. लँगर, गिलख्रिस्ट, डॅमियन मार्टीन यांच्यासारखे फलंदाज निवृत्त झाले आणि फलंदाजी खिळखिळी झाली. मॅकग्रा आणि वॉर्न संघ सोडून गेले आणि ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीच्या आक्रमणाची धारच गेली. हे बदल, ही स्थित्यंतरे ऑस्ट्रेलियन क्रिकेट कुठच्या कुठे घेऊन गेली. क्रिकेटच्या शिखरावर असलेला संघ खाली घसरतोय. या दशकात ४६ पैकी ४१ कसोटी जिंकणारा ऑस्ट्रेलियन संघ आता हरायला लागला आहे. या संघाला इंग्लंडने हरविले, भारताने हरविले, आता तर दक्षिण आफ्रिकेने चक्क ऑस्ट्रेलियात येऊन मालिका जिंकली. २००६ पासून सुरू झालेली ऑस्ट्रेलियन संघाची घसरण पुढे सुरू आहे. ग्रॅमी स्मिथच्या दक्षिण आफ्रिका संघाने ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ आणि त्यांच्या क्रिकेट यंत्रणेतील कच्चे दुवे दाखवून दिले आहेत. आक्रमक क्रिकेटचा वसा घेतलेला ऑस्ट्रेलियाचा संघ आता बचावात्मक, नकारात्मक डावपेच लढविताना पाहायला मिळतो. भारतातील कसोटी मालिकेत षटकांचा वेग कमी करण्याचा प्रयत्न करतो, हे ऑस्ट्रेलियन परंपरेला शोभणारे नाही.
मोठमोठे पराभवही ऑस्ट्रेलियाच्या परंपरेला शोभणारे नाहीत. भारतात मोहाली कसोटीत अशाच मोठय़ा पराभवाला सामोऱ्या गेलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने पर्थ कसोटीपाठोपाठ मेलबर्नलाही मोठा पराभव स्वीकारला. ऑस्ट्रेलियन संघाच्या वर्चस्वाची सद्दी संपल्याचीही लक्षणे आहेत. क्लाइव्ह लॉइडच्या वेस्ट इंडिज संघाने क्रिकेट विश्वाचे सार्वभौमत्व गतशतकात उपभोगले होते. तसेच गेली दीड तपे ऑस्ट्रेलियाच्या संघाचा विजयी अश्वमेध कुणालाही रोखता आला नव्हता. पण विश्वविजेतेपद गेल्यानंतर विंडीज संघाची वाताहत झाली. एकेकाळी क्रिकेटविश्वात अव्वल स्थानावर असलेला हा संघ ब्रायन लारासारखे मातब्बर खेळाडू संघात असतानाही तळागाळात गेला. ऑस्ट्रेलियन संघाचीदेखील तशीच गत होणार का?
या प्रश्नाचे उत्तरही लवकरच मिळेल. मात्र विंडीज आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांनी तब्बल दीड तपाच्या काळात आसूया वाटावी एवढे वर्चस्व गाजविले. त्या वर्चस्वाला उतरती कळा लागली, याची कारणेही सारखीच वाटतात. विंडीजच्या सार्वभौमत्त्वाकडे सेनानी चार वेगवान गोलंदाज असायचे. लॉइड, कालिचरण, हेन्स, रिचर्ड्स, ग्रीनिज, रिची रिचर्डसन, लोगी अशा फलंदाजीच्या अभेद्य भिंती त्या काळात विंडीजकडे होत्या. ऑस्ट्रेलियन संघ वैभवाच्या शिखरावर असताना गोलंदाजीच्या आक्रमणाला धार होती. मॅक्ग्रासारखा कधीही अपयशी न ठरणारा हिरा या संघाकडे होता. अन्य संघांना कधीही न लाभलेला फिरकी गोलंदाजीचा कोहिनूर हिरा शेन वॉर्न या संघाकडे होता. त्यामुळे कोणत्याही संघाच्या फलंदाजीच्या अभेद्य भिंती या गोलंदाजीच्या आक्रमणाने नेहमी भेदल्या. या दोन संघांच्या गोलंदाजीतील आक्रमणाची भेदकता कमी झाली आणि पराभवाचे चटके या संघांना बसायला लागले. भारताने १९८३ चा विश्वचषक जिंकताना त्याचे संकेत दिले होते. याच भारताने अलीकडच्या काळात ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियातच पराभूत करून तिरंगी स्पर्धा जिंकली. ‘ट्वेन्टी-२०’ विश्वचषक जिंकला. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटला उतरती कळा लागण्याचे ते संकेत होते. वर्षभरातच ते खरे ठरायला लागले.
प्रतिथयश खेळाडूंची निवृत्ती या दोन संघांच्या यशाची समीकरणे बिघडविणारी ठरली. निवृत्ती, वाढलेले वय, दुखापतग्रस्त खेळाडूंच्या संख्येतील वाढ यामुळे हे दोन संघ आपला अजिंक्यपदाचा आब कायम राखू शकले नाहीत. लँगर, मार्टीन, गिलख्रिस्ट यांच्या निवृत्तीमुळे फलंदाजी खिळखिळी झाली. मॅक्ग्रा आणि शेन वॉर्न निवृत्त झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीच्या आक्रमणातील हवाच निघून गेली. या दोन गोलंदाजांची जागा घेणारा गोलंदाज त्यांना अद्याप मिळाला नाही. त्यामुळे निर्णायक क्षणी बाजी उलटविण्याची ऑस्ट्रेलियाची क्षमताच संपली. पर्थ कसोटीत अखेरच्या डावात भेगा पडलेल्या, चेंडूला उसळी देणाऱ्या खेळपट्टीवरही ऑस्ट्रेलियाला प्रतिस्पर्धी संघाला गुंडाळता आले नाही. मेलबर्न कसोटीत नवोदित फलंदाज डय़ुमिनी आणि गोलंदाज डेल स्टेन यांना बाद करता आले नाही. ऑस्ट्रेलियन गोलंदाजी एवढी अगतिक कधीही झाली नव्हती. जायबंदी ब्रेट ली, सायमंड्स संघाला डोईजड ठरले.
भविष्यकाळातही तीच समस्या ऑस्ट्रेलियाला भेडसावणारा आहे. दुखापतींमुळे प्रमुख गोलंदाज सातत्याने एकत्र खेळताना अभावानेच पाहावयास मिळतील. वेगवान गोलंदाजांचा भार हलका करणारा शेन वॉर्नच्या तोडीचा गोलंदाज तात्काळ शोधणे कठीण आहे. फिरकी गोलंदाज अनुभवाने परिपक्व होत असतो. ऑस्ट्रेलियाने शेन वॉर्न खेळत असताना स्टय़ुअर्ट मॅक्गिल, ब्रॅड हॉग यांच्यासारख्या गोलंदाजांना आत्मविश्वास दिला नाही. त्यांच्यावर विश्वास टाकला नाही. त्याची फळे त्यांना आज मिळताहेत. सध्याची घसरण थोपविण्यासाठी बराच काळ लागणार आहे. ‘क्रिकेट : ऑस्ट्रेलियन स्टाइल’चे फॅड अलीकडे आले होते. ऑस्ट्रेलियन संघाची सध्याची परिस्थिती पाहता ते खूळ अनेक देशांच्या मानेवरून उतरले असेल, अशी आशा करण्यास हरकत नाही.
भारतीय उपखंडातील खेळाडूंचे फलंदाजीचे तंत्र, रिव्हर्स स्वींग गोलंदाजीची कला, फिरकी गोलंदाजीची प्रभावी शैली यांनादेखील महत्त्व असल्याचे भारत, पाक, श्रीलंका या देशांनी सिद्ध केले आहे. ज्या खेळपट्टीवर भारताचे झहीर खान, आर. पी. सिंग, इशान्त शर्मा जुना चेंडू रिव्हर्स स्वींग करू शकले, त्याच खेळपट्टीवर इंग्लंड, ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज ती करामत करू शकले नव्हते. त्यामुळे भारताने विजय मिळविले होते. ज्या खेळपट्टय़ांवर ऑस्ट्रेलिया इंग्लंडची फलंदाजी ढेपाळली, त्याच खेळपट्टीवर भारताने मोठय़ा धावसंख्या उभारल्या होत्या. ऑस्ट्रेलियन वर्चस्वाचा तो पराभव होता. ती वस्तुस्थिती क्रिकेटविश्वाने आता पाहिली. झहीर खान-इशान्त शर्मा नव्या चेंडूने गोलंदाजी करणाऱ्या दुक्कलीने भारताला नेहमीच प्रारंभी विकेट मिळवून दिल्या. ऑस्ट्रेलियाला त्या मिळविता आल्या नाहीत. गंभीर-सेहवाग यांनी भारताला फलंदाजीत दणकेबाज सलामी दिली. जी ऑस्ट्रेलियाला हेडनच्या अपयशामुळे अलीकडे मिळाली नाही. या दोन गोष्टींमुळे बराच फरक पडला.
ऑस्ट्रेलियाने, वय वाढलेल्या खेळाडूंना निवृत्त करताना, त्यांच्या जागी खेळणाऱ्या खेळाडूंना अधिक संधी द्यायला हवी होती. सीनिअर खेळाडूंच्या अनुभवाचा लाभ त्यांना झाला असता. ज्युनिअर खेळाडूंना तयार होण्यासाठी अवधी लागेल. तोपर्यंत तरी ऑस्ट्रेलियाला प्रतीक्षा करावी लागणार आहे.
एखाद्या संघाच्या यशापाठोपाठ त्यांच्यातील वाईट गोष्टींचाही उदोउदो करण्यात येतो. त्या वृत्तीचा पराभव झाला आहे.
परिस्थितीनुसार प्रत्येक देशातील क्रिकेटची जडणघडण होत असते. ऑस्ट्रेलियातील यशस्वी ‘थिअरी’ भारतात यशस्वी होईलच असे नाही. ग्रेग चॅपेल यांना नेमून आपण आपल्या क्रिकेटची वाट लावून घेतली होती. न्यूझीलंडचे जॉन राइट आणि दक्षिण आफ्रिकेचे गॅरी कर्स्टन यशस्वी का ठरले याचा अभ्यास ऑस्ट्रेलियाने करण्याची आता गरज आहे.
विनायक दळवी

‘भारतीय वंशाच्या परंतु परदेशात राहात असलेल्या क्रीडापटूंना यापुढे भारताचे प्रतिनिधित्व करता येणार नाही. भारतीय संघातून खेळायचे तर तो खेळाडू भारतीयच असायला हवा,’ असा भारत सरकारने घेतलेला निर्णय नुकताच जाहीर झाला आणि भारतीय क्रीडाविश्वात थोडी खळबळ निर्माण झाली. थोडीशीच खळबळ यासाठी कारण हा निर्णय जरी सर्व खेळांना लागू असला तरी परदेशात राहून भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंची संख्या अगदी मोजक्या खेळांतच आहे. त्यामुळे हे खेळ वगळता इतर खेळांना या निर्णयाचा धक्का वगैरे बसल्याचे दिसले नाही. जे खेळ किंवा खेळाडू या निर्णयामुळे हादरले त्यात टेनिस पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर जलतरण, स्क्वॉश आदि खेळांचा समावेश आहे. भारतीय वंशाच्या पण परदेशस्थ खेळाडूंची संख्याच मुळात फारशी जास्त नाही. म्हणजेच अशा खेळाडूंमुळे मोठय़ा प्रमाणावर भारतीय खेळाडूंना एखाद्या खेळात संधी नाकारली जाते किंवा मिळत नाही, अशी अगदीच हाताबाहेर गेलेली परिस्थिती नाही. त्यामुळे हा निर्णय नेमका कोणत्या उद्देशाने घेतला गेला आणि त्याची वेळ नेमकी हीच का, असे प्रश्न पडल्यावाचून राहात नाहीत.
टेनिस संघटनेपुढे मात्र या निर्णयामुळे तूर्तास मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रकाश अमृतराज, नेहा आणि शिखा उबेरॉय या परदेशस्थ पण भारतीय वंशाच्या खेळांडूना आता भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी या निर्णयामुळे गमवावी लागणार आहे. टेनिस संघटनेपुढे निर्माण झालेला हा प्रमुख पेच आहे. आगामी डेव्हिस चषक किंवा फेडरेशन टेनिस लढतीसाठी प्रकाश अमृतराजला खेळविता येणार नाही आणि त्यामुळे भारताची बाजू कमकुवत होऊ शकते, असा युक्तिवाद त्यामुळे केला जात आहे. उबेरॉय भगिनींच्या अनुपस्थितीचाही फटका भारताला काही स्पर्धात बसेल, असा अंदाजही काहीजण व्यक्त करीत आहेत. या अटकळींवर एकवेळ नजर टाकली तर असे दिसते की, टेनिस संघटनेला किंवा इतर कोणत्याही संघटनेला या निर्णयामुळे जे प्रश्न पडणार आहेत, ते सद्यस्थितीत भेडसावणारे, कात्रीत पकडणारे आहेत, यात वाद नाही, पण जर या खेळाडूंच्या कामगिरीकडे किंवा त्यांच्या उपस्थितीमुळे भारतीय टेनिसच्या भवितव्याचा विचार केला तर फारसे आश्वासक असे उत्तर सापडत नाही. प्रकाश अमृतराज गवताच्या कोर्टवर नक्कीच चांगला खेळू शकतो. त्यामुळे डेव्हिस चषक लढतीत त्याची उपस्थिती फरक पाडू शकते. पण आगामी डेव्हिस चषक लढतींत भारताला ज्या कझाकस्तान किंवा तैपेईशी सामना करायचा आहे, त्यांच्या ताकदीचा विचार करता अमृतराजच्या समावेशामुळे भारताला फार मोठी मजल मारता येईल, अशी भाबडी आशा बाळगणे चुकीचेच ठरेल. तो संघात नसेल तर भारत पराभूत होईल आणि तो असेल तर विजय हमखास असेही चित्र नाही. त्यामुळे या निर्णयाचा फटका मोठय़ा प्रमाणावर बसेल, असे तूर्तास म्हणता येणार नाही. शिखा उबेरॉय किंवा नेहा उबेरॉय यांच्या कामगिरीकडे नजर टाकली तर तीदेखील फारशी प्रशंसनीय नाही. सानिया मिर्झाचा अपवाद वगळता इतर मुलींना आंतरराष्ट्रीय स्तरावर अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे त्यांना संधी गमवावी लागली तरी भारतीय टेनिसचे फार मोठे नुकसान वगैरे होईल, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. स्क्वॉश किंवा जलतरण या खेळातील परदेशस्थ पण भारतीय वंशाचे खेळाडू कोण असा मूलभूत प्रश्न कुणालाही पडावा. म्हणूनच त्या खेळाडूंचे वैयक्तिक नुकसान होऊ शकेल पण भारतीय संघाचे किंवा भारताच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘लौकिका’ला धक्का बसेल, असे म्हणणे योग्य ठरणार नाही.
भारतात आज अचानक हा निर्णय घेण्याचे कारण काय, असा एक प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. हा निर्णय घेण्याची प्रक्रिया कदाचित आधीपासून सुरू झाली असली तरी त्याची माहिती संघटनांना देण्यात आलेली नसावी, अन्यथा, त्यावर बरेच आधी प्रतिक्रिया उमटल्या असत्या. टेनिस संघटनेलाही या निर्णयाची आधी माहिती नव्हती. त्यामुळे अचानक जाहीर झालेल्या निर्णयामुळे त्यांचा गोंधळ उडणे स्वाभाविक आहे. एक मात्र खरे की, या निर्णयामुळे जरी प्रकाश, सुनीता राव यासारख्या खेळाडूंना संधी मिळणार नसली तरी दुसऱ्या फळीतील खेळाडूंना आता बढती मिळू शकेल. या खेळाडूंसाठी हा निर्णय म्हणजे मिळालेली एक सुवर्णसंधी आहे.
कोणतेही कारण नसताना किंवा पाश्र्वभूमी नसताना जाहीर झालेल्या या निर्णयामागे क्रीडा संघटना म्हणजेच पर्यायाने ऑलिम्पिक संघटना आणि क्रीडा मंत्रालय यांच्यातील वाद असल्याचीही चर्चा आहे. मणीशंकर अय्यर क्रीडा मंत्री असताना क्रीडा संघटनांच्या कारभारावर क्रीडा मंत्रालयाने अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या स्वायत्ततेला धक्का पोहचविला जात होता. अय्यर गेल्यानंतरही ऑलिम्पिक संघटना व क्रीडा मंत्रालय यांच्यात एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू असावेत, अशी शंका या निर्णयामुळे व्यक्त होऊ लागली आहे. संघटनांना आपल्या वर्चस्वाखाली ठेवण्याचे क्रीडा मंत्रालयाचे प्रयत्न आणि क्रीडा संघटनांचा स्वायत्ततेसाठी सुरू असलेला संघर्ष यात खेळांचे कुठेतरी नुकसान होते आहे का, याचा विचार प्राधान्याने करायला हवा आहे. दुसरी गोष्ट आज हा निर्णय जाहीर झाला असला तरी भविष्यात तो बदललाही जाऊ शकतो किंवा क्रीडा मंत्रालयात बदल झाल्यास त्यातून मार्गही निघू शकतो.
महेश विचारे

हॉकी महासंघाचा कारभार सध्या ‘आयओए’ सांभाळत असली तरी पदाधिकाऱ्यांकडे वेळ नसल्यामुळे हॉकीच्या विकासासंदर्भात आखलेल्या योजनांना मुर्त स्वरूप देता येत नाही. सिनियर राष्ट्रीय लीग स्पर्धा आयोजित होणे गरजेचे आहे. या स्पर्धेमुळे देशातील प्रतिभावान खेळाडूंना त्यांची कामगिरी सिद्ध करण्याची संधी मिळेल.
केपीएस गिल यांच्या मनमानी कारभाराच्या कचाटय़ातून मोकळी झालेली भारतीय हॉकी स्वच्छंद विहार करेल, अशी आशा होती पण, अद्याप तरी त्याला पाहिजे त्या प्रमाणात यश आलेले नाही. २१ वर्षांखालील संघाची अलीकडच्या काळातील कामगिरी भारतीय हॉकीचे भवितव्य उज्ज्वल असल्याची दाखवणारी असली तरी ८० वर्षांत प्रथमच ऑलिम्पिकसाठी अपात्र ठरलेल्या भारतीय हॉकी संघापुढे आगामी कालावधीत अनेक नवी आव्हाने आहेत. अशोक कुमार, झफर इक्बाल, धनराज पिल्ले यांच्यासारख्या दिग्गज माजी ऑलिम्पियन हॉकीपटूंचा समावेश असलेल्या हंगामी समितीकडून हॉकीप्रेमी मोठय़ा अपेक्षा बाळगून आहेत. हंगामी समितीकडे योजना आहेत पण, त्यांच्या हातात काही जादूची कांडी नाही की, एक दिवसात भारतीय हॉकीचा चेहरामोहराच बदलेल.
इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या अधिपत्याखाली काम करताना या हंगामी समिती सदस्यांच्या कार्यावर बंधने आली आहेत. त्यांच्या डोक्यात हॉकीच्या विकासासाठी अनेक कल्पना रुंजी घालत असल्या तरी त्या राबवण्याचे स्वातंत्र्य त्यांना नाही. आयओएच्या बंधनात अडकलेल्या हंगामी समितीला हॉकीच्या विकासासाठी यश आले तर गिल यांच्याविरुद्ध रणशिंग फुंकणाऱ्या या दिग्गजांचे कौतुक होईल पण, अपयश आले तर होणाऱ्या टीकेला त्यांनाच सामोरे जावे लागले. आयओएच्या पदाधिकाऱ्यांना हॉकीच्या विकासाबाबत विचार करण्यासाठी पुरेसा वेळ नसल्यामुळे भारतीय हॉकीची स्थिती आगीतून सुटल्यावर फुफाटय़ात सापडल्यासारखी होऊ नये, अशी इच्छा हॉकीप्रेमी व्यक्त करीत आहेत.
अस्थायी समितीचे सदस्य व हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचे सुपुत्र, माजी ऑलिम्पियन अशोक कुमार अलीकडेच एका कार्यक्रमाच्या निमित्ताने नागपुरात आले होते. यावेळी त्यांनी हॉकीच्या विकासाबाबत असलेल्या योजनांबाबत चर्चा केली. ते म्हणाले की, आम्ही केवळ योजना तयार करू शकतो पण, त्या कार्यान्वित करण्याचे सर्व अधिकार इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनकडे आहेत. सुरेश कलमाडी यांना सध्या हॉकीकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ नाही. आम्ही ‘बॉर्डर’वर असल्यामुळे येणारी गोळी आमचा वेध घेईल, याची कल्पना आहे पण, केवळ हॉकीच्या विकासाचा ध्यास असल्यामुळे ते सहन करण्यासाठी सज्ज आहोत. महासंघाचा कारभार सध्या ‘आयओए’ सांभाळत असली तरी पदाधिकाऱ्यांकडे वेळ नसल्यामुळे हॉकीच्या विकासासंदर्भात आखलेल्या योजनांना मूर्त स्वरूप देता येत नाही. सिनियर राष्ट्रीय लीग स्पर्धा आयोजित होणे गरजेचे आहे. या स्पर्धेमुळे देशातील प्रतिभावान खेळाडूंना त्यांची कामगिरी सिद्ध करण्याची संधी मिळेल. त्याचप्रमाणे काँग्रेसच्याच राजवटीत बंद झालेली आंतरराष्ट्रीय इंदिरा गोल्ड कप हॉकी स्पर्धा पुन्हा सुरू करण्याची योजना आहे. शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा हॉकीकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न होणे तसेच, राष्ट्रीय शालेय हॉकी स्पर्धा आयोजित होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना हॉकीकडे वळवण्यात यशस्वी ठरलो तर आमचे पहिले पाऊल यशस्वी ठरले, असे म्हणता येईल. सिनियर राष्ट्रीय लीग स्पर्धेप्रमाणे ज्युनियर (१९ वर्षांखालील) गटातही राष्ट्रीय लीग स्पर्धा आयोजित होणे आवश्यक आहे. या स्पर्धामुळे खेळाडूंना त्यांच्या कामगिरीची छाप सोडता येईल आणि राष्ट्रीय संघासाठी ‘फिड बॅक’ मिळेल. भारतातील प्रत्येक जिल्हा संघटनेने हॉकीच्या विकासाची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे. ‘हॉकीची दुनिया उम्मीद पे कायम है’ भारतीय हॉकीचे सुवर्णयुग पुन्हा परतेल, याबाबत मी आशावादी आहे.
खेळाडूंची निवड करण्याची जबाबदारी हंगामी समितीवर सोपवण्यात आली आहे. याबाबत सांगताना अशोक कुमार म्हणाले की, सध्या खेळाडूंची निवड केली जाते, असे म्हणण्यापेक्षा त्यांचे नामांकन केले जाते, असे म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल. खेळाडूंची निवड करताना त्यांची कामगिरी विचारात घेतली जाते पण, सध्या स्पर्धा होत नसल्यामुळे खेळाडूंची कामगिरी बघण्याची संधीच मिळत नाही. त्यामुळे हंगामी समितीच्या सदस्यांनी सुचवलेल्या खेळाडूंना शिबिरासाठी आमंत्रित करायचे आणि त्यानंतर संघाची निवड करायची, हेच धोरण सध्या राबवण्यात येत आहे. यामुळे प्रतिभा असूनही भारतीय संघात स्थान मिळवण्याची पात्रता असलेल्या अनेक खेळाडूंना संधीच मिळत नाही.
विदेशी प्रशिक्षक नेमण्याला माझा विरोध आहे. भारतात हरेंद्र सिंग आणि बन्सल यांच्यासारखे प्रशिक्षक असताना विदेशी प्रशिक्षकाची गरज का, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
भारतीय संघाला सध्या विजयाची प्रेरणा देणाऱ्या आक्रमक प्रशिक्षकाची गरज आहे.
दिवाकर राम, संदीप सिंग, व्ही. रघुनाथ यांच्यासारख्या पेनल्टी कॉर्नर तज्ज्ञ खेळाडूंकडून भविष्यात चांगल्या कामगिरीची आशा आहे. दिवाकर रामच्या यशाची टक्केवारी बघता भारतीय हॉकीचा सुवर्णकाळ लवकरच परतणार, असा विश्वास वाटतो. १९८० पर्यंत भारतीय हॉकीचा सुवर्णकाळ होता. त्यावेळी खेळाडूंमध्ये समर्पणाची भावना होती पण, आता मात्र खेळाडू पैशामागे धावत आहेत. यात केवळ खेळाडूंचाच दोष आहे, असे मला वाटत नाही. शासन आणि महासंघाची ध्येयधोरणे यासाठी जबाबदार आहे. देशांतर्गत स्पर्धा बंद झाल्यामुळे हॉकीकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला. तुम्हाला जर प्रतिभा दाखवण्याची संधी मिळणार नाही तर करिअर म्हणून या खेळाची निवड कशी करायची, असा प्रश्न नवोदितांना पडतो, असे मतही अशोककुमार यांनी व्यक्त केले. म्युनिक व मॉन्ट्रियल ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अशोककुमार यांनी क्वाललाम्पूर विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील अंतिम लढतीत एकमेव गोल नोंदवत भारताला जेतेपद मिळवून देण्याची कामगिरी केली होती. भारतीय हॉकीचा सुवर्णकाळ पुन्हा परतणार, असा आशावाद व्यक्त करणाऱ्या अशोककुमार यांनी वारसा हक्काने मिळालेल्या या खेळाच्या विकासार्थ अखेरच्या क्षणापर्यंत झटण्यासाठी सज्ज असल्याचा मानसही व्यक्त केला. उखळात डोके टाकले तर ते रक्तबंबाळ होईल, ही भीती न बाळगता हॉकीच्या सुवर्णकाळासाठी झटण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला
भास्कर चौधरी