Leading International Marathi News Daily                                    रविवार, ४ जानेवारी २००९

हे घ्या पुरावे!
पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी चिदंबरम अमेरिकेकडे

नवी दिल्ली, ३ जानेवारी/वृत्तसंस्था
मुंबईमध्ये २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमागील खरे सूत्रधार भारताच्या हवाली करण्याबाबत पाकिस्तान करीत असलेली टाळाटाळ आणि या हल्ल्यामध्ये आपल्या राष्ट्राचा कोणताही सहभाग नाही असा सातत्याने करीत असलेला कांगावा लक्षात घेऊन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम आता पाकिस्तानविरोधात असलेले सर्व पुरावे आणि कागदपत्रे घेऊन अमेरिका भेटीला पुढील आठवडय़ात रवाना होत आहेत. मुंबईवरील हल्ल्यांना पाकिस्तानच जबाबदार आहे आणि हे शेजारी राष्ट्र आपली जबाबदारी टाळत आहे हे लक्षात घेऊन पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव संघटित करण्याच्या उद्देशानेच चिदंबरम हे अमेरिकेच्या भेटीवर जात आहेत. पुढील आठवडय़ात आपण अमेरिका दौऱ्यावर जात आहोत. मात्र अजून तारखा निश्चित व्हावयाच्या आहेत, असे चिदंबरम यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितले.

दहशतवाद नष्ट करण्यासाठी कोणत्याही टोकाला जाऊ
शिलाँग, ३ जानेवारी/पी.टी.आय.

हातात शस्त्रे घेतलेल्यांशी कोणतीही तडजोड होणार नाही आणि दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आम्ही कोणत्याही थराला जाऊ, अशी स्पष्ट ग्वाही पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज दिली. पाकिस्तानी नेतृत्वात थोडा जरी समंजसपणा असेल तर त्यांनी मुंबई हल्ल्यातील संशयितांना भारताच्या हवाली करावे, अशी मागणीही त्यांनी केली. अर्थात पाकिस्तानबरोबर युद्धाची शक्यता त्यांनी फेटाळली. मुंबई, दिल्ली आणि आसामातील दहशतवादी हल्ल्यांच्या पाश्र्वभूमीवर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. वाढता दहशतवाद आणि नक्षलवाद्यांचा उच्छाद ही चिंतेची बाब आहे. सरकार या अतिरेक्यांशी कोणतीही तडजोड करणार नाही, असे ते म्हणाले.

आज मध्यरात्रीपासून वाहतूकदारांचा देशव्यापी बेमुदत संप
मुंबई, ३ जानेवारी / प्रतिनिधी

डिझेलच्या दरात लिटरमागे दहा रुपये कपात करण्याच्या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी ‘ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस’ने सोमवार, ५ जानेवारीपासून पुकारलेल्या देशव्यापी संपाला पाठिंबा देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य ट्रक-टेम्पो-टँकर्स बस वाहतूक महासंघाने आज जाहीर केला. महासंघाने या संपामध्ये उतरण्याचा निर्णय घेतल्याने संपाची तीव्रता वाढली असून, त्याचा मोठा फटका राज्यातील मालवाहतुकीला बसण्याची शक्यता आहे. ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट कॉंग्रेसने पुकारलेल्या संपाला बॉम्बे गुडस् ट्रान्स्पोर्ट असोसिशएनने आधीच पाठिंबा दर्शविला होता. मात्र बीजीटीएचे वर्चस्व मुंबईपुरते मर्यादित असल्याने राज्यभर संपाचा तितकासा प्रभाव जाणवला नसता. मात्र आज मुंबईत शिवडी येथे झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य ट्रक-टेम्पो-टँकर्स अ‍ॅण्ड बस वाहतूक महासंघाने संपात सहभागी होण्याचा निर्णय जाहीर केला.

राष्ट्रवादीला हवी आता भूमिहीन व दुर्बल घटकांसाठी कर्जमाफी!
मुंबई, ३ जानेवारी / खास प्रतिनिधी

निवडणुका जवळ आल्याने मतांसाठी काँग्रेस व राष्ट्रवादीने परस्परांवर कुरघोडी करण्याचे राजकारण सुरूच ठेवले आहे. शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्य सरकारांनी दिलेल्या कर्जमाफीनंतर आता विविध महामंडळांनी दुर्बल घटकांना दिलेले कर्ज माफ करण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे. तोटय़ातील विविध महामंडळांनी दिलेले सुमारे १८०० कोटींचे कर्ज माफ करण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या दबावामुळे झालाच तर सहावा वेतन आयोग आणि सहा हजार कोटींच्या कर्जमाफीमुळे आधीच अडचणीत आलेल्या राज्य सरकारचे दिवाळे निघाल्याशिवाय राहणार नाही. केंद्र सरकारच्या कर्जमाफीचे श्रेय राष्ट्रवादीने लाटले होते. नुकत्याच संपलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात नियमितपणे कर्जाचे हप्ते फेडणाऱ्यांनाही सरकारने सवलती दिल्या आहेत.

हिंदू दहशतवादाबद्दल महाराष्ट्र फाऊंडेशनच्या सोहळ्यात चिंता
मुंबई, ३ जानेवारी/ प्रतिनिधी

लष्करातील अधिकाऱ्यांना दहशतवादी म्हणून अटक केली जाते आणि त्यांच्यावरही काहीजण फुले उधळतात हे पाहून हा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे चालला आहे की, इतिहासात मागे जात आहे अशी शंका निर्माण होते, हा या देशापुढील मोठा धोका आहे, असे मत असंघटित कामगारांचे नेते डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केले. हिंसेच्या मार्गाकडे जाणाऱ्या तरुण वर्गाविषयी महाराष्ट्र फाऊंडेशनचे सुनील देशमुख यांनीही चिंता व्यक्त केली. महाराष्ट्र फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे आज वितरण करण्यात आले.

निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांचा ‘बुश’ करा
नाशिक, ३ जानेवारी / प्रतिनिधी

आगामी निवडणुकीत मते मागण्यासाठी पंतप्रधान व मुख्यमंत्री तुमच्यापर्यंत आल्यास त्यांचा ‘बुश’ केल्याशिवाय राहू नका, असे आवाहन शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी केले. अंतुले व शिवराज पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यांचा समाचार घेतानाच निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसकडून शेतकऱ्यांना पॅकेजचे खिरापत वाटण्यात येत असून सातबारा अजूनही कोरा करण्यात आला नाही. त्यामुळे काँग्रेसच्या भूलथापांना बळी न पडता आगामी निवडणुकीत धडा शिकवावा, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.
येथील उदोजी मराठा बोर्डिगच्या मैदानात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. ग्रामीण भागात वीज व पाणीप्रश्न, खतांचा तुटवडा, बोगस बी-बियाणे अशा प्रकारांमुळे शेतकरीवर्ग त्रस्त झाला असून काँग्रेसचे सरकार सत्तेचा खेळ खेळण्यातच व्यस्त आहे. मुंबईसह देशात जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून दहशतवादी आपल्या घरापर्यंत पोहोचले असतानाही सरकार अजून त्यांच्याविरूध्द ठोस पावले उचलण्यात अयशस्वी ठरले आहे. शिवसेना मुसलमानांविरूध्द नाही, असे स्पष्ट करताना शिवसेनेत अनेक मुसलमान नेते व कार्यकर्ते असल्याचे ते म्हणाले. मुसलमानांच्या मतांसाठी अफजल गुरूच्या फाशी विषयाचे काँग्रेसकडून राजकारण केले जात आहे. न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली असतानाही त्यास फाशी देण्याचा निर्णय सरकार का घेऊ शकत नाही, असा सवालही त्यांनी केला.

आता ‘ऑपरेशन प्रभाकरन’!
कोलम्बो, ३ जानेवारी/पी.टी.आय.

श्रीलंकेत लष्कराने ‘लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ ईलम’चा बालेकिल्ला असलेल्या किलिनोच्चीवर ताबा मिळविल्यानंतर अतिरेक्यांच्या वर्चस्वाखालील भागांत आगेकूच सुरूच ठेवली असून या संघटनेचा म्होरक्या प्रभाकरन हा मुलैथिवु या किनारपट्टीलगतच्या गावात लपल्याची खबर असल्याने त्याचा जोरदार शोध सुरू केला आहे. तामिळी अतिरेक्यांची सागरी सेना असलेल्या मुलैथिवु या किनारपट्टीवरील गावाभोवती वेढा टाकण्यास लष्कराने आता अग्रक्रम दिला आहे. याच गावात या संघटनेचा ५४ वर्षांचा म्होरक्या प्रभाकरन लपल्याची खबर आहे.

तस्लिमा नसरीन आता पॅरिसमध्ये स्थायिक होणार
पॅरिस, ३ जानेवारी/एएफपी

बांगलादेशच्या बंडखोर लेखिका तस्लिमा नसरीन या आता पॅरिसमध्ये स्थायिक होणार आहेत. नसरीन यांनी केलेल्या धर्मविरोधी लिखाणामुळे इस्लामी अतिरेक्यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. नसरीन यांना जुलै २००८ मध्ये पॅरिसचे मानद नागरिकत्व बहाल करण्यात आले. त्यांनी घरासाठी सहा महिन्यांपूर्वी अर्ज केला होता. त्यांना कलाकारांसाठी असलेले खास घर देण्यात येत असल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले. तस्लिमा यांच्या ‘लज्जा’ कादंबरीत बांगलादेशमध्ये मुस्लिमांकडून हिंदू कुटुंबाचा छळ होत असल्याचे वर्णन आहे. हे ईश्वरनिंदक कृत्य असल्याचा आरोप करून त्यांना धमकी देण्यात आली होती. युरोप, आणि संयुक्त संघराज्यांमध्ये काही काळ घालवल्यानंतर २००४ मध्ये त्या भारतात स्थायिक झाल्या होत्या.

पूँछमध्ये आणखी एक जवान शहीद
पूँछ, ३ जानेवारी/पी.टी.आय.

जम्मू आणि काश्मीरमधील पूँछ जिल्ह्यातील मेंढहर जंगलात एका चकमकीत विशेष पोलीस दलाचे अधिकारी नरेश कुमार हे शहीद झाले. या जंगलात दडलेल्या अतिरेक्यांना पकडण्यासाठी कारवाई होत असतानाच गुरुवारीच ही चकमक सुरू झाली होती. त्यात आतापर्यंत दोन जवान शहीद झाले आहेत .

 

लोकसत्ता दिवाळी अंक २००८


प्रत्येक शुक्रवारी

दिवाळी २००८