Leading International Marathi News Daily                                  रविवार, ४ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

हे घ्या पुरावे!
पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी चिदंबरम अमेरिकेकडे
नवी दिल्ली, ३ जानेवारी/वृत्तसंस्था

 

मुंबईमध्ये २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमागील खरे सूत्रधार भारताच्या हवाली करण्याबाबत पाकिस्तान करीत असलेली टाळाटाळ आणि या हल्ल्यामध्ये आपल्या राष्ट्राचा कोणताही सहभाग नाही असा सातत्याने करीत असलेला कांगावा लक्षात घेऊन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम आता पाकिस्तानविरोधात असलेले सर्व पुरावे आणि कागदपत्रे घेऊन अमेरिका भेटीला पुढील आठवडय़ात रवाना होत आहेत. मुंबईवरील हल्ल्यांना पाकिस्तानच जबाबदार आहे आणि हे शेजारी राष्ट्र आपली जबाबदारी टाळत आहे हे लक्षात घेऊन पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव संघटित करण्याच्या उद्देशानेच चिदंबरम हे अमेरिकेच्या भेटीवर जात आहेत. पुढील आठवडय़ात आपण अमेरिका दौऱ्यावर जात आहोत. मात्र अजून तारखा निश्चित व्हावयाच्या आहेत, असे चिदंबरम यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितले.
या दौऱ्यामागील उद्देशांबाबत अधिक माहिती विचारली असता चिदंबरम म्हणाले की, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने मुंबई हल्ल्यांमधील पाकिस्तानच्या असलेल्या थेट सहभागाबद्दल ठोस पुरावे आणि कागदपत्रे गोळा केली असून अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हे पुरावे दाखविण्यात येणार आहेत. अर्थात यापेक्षा याबाबत अधिक प्रकाशझोत टाकता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. या दौऱ्यात चिदंबरम अमेरिकेचे अंतर्गत सुरक्षा मंत्री मायकेल चर्टाफ आणि परराष्ट्र मंत्री कोंडोलिझा राइस यांची भेट घेणार आहेत. ओबामा यांच्या नेतृत्वाखाली आता अमेरिकेत डेमोक्रॅटिक पक्षाचे सरकार सत्तारुढ होत आहे. त्या सरकारमध्ये या पदांवर बसणाऱ्या मंत्र्यांशीही ते चर्चा करणार असल्याचे समजते. अमेरिकेमध्ये ११ सप्टेंबर २००१ रोजी झालेले हवाई दहशतवादी हल्ल्यांपासून आतापर्यंत भारतात असे झालेले भीषण हल्ले याविषयी या भेटीमध्ये चिदंबरम सविस्तर चर्चा करणार असल्याचे समजते.
मुंबई हल्ल्यांमध्ये सहभागी असलेला व जिवंत पकडण्यात आलेला दहशतवादी अजमल कसाब याने लष्कर-ए-तय्यबाच्या कार्यपध्दतीविषयी पोलिसांना दिलेला कबुलीजबाब, कराचीमधून ज्या बोटीने दहशतवादी भारतीय समुद्री हद्दीत पोहोचले त्या बोटीवरील लॉग बूकमधील नोंदी, दहशतवाद्यांनी मुंबईतून मोबाइल दूरध्वनीवरून पाकिस्तानात केलेले संभाषण, त्याखेरीज कराचीमधून मुंबईत पोहोचण्यासाठी दहशतवाद्यांनी वापरलेल्या इतर अनेक क्लुप्त्या याविषयी विस्तृत पुरावे परराष्ट्र खात्याने तयार केले असून अमेरिकेतील मंत्री आणि अधिकाऱ्यांना ते दाखविण्यात येणार आहेत.