Leading International Marathi News Daily                                  रविवार, ४ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

दहशतवाद नष्ट करण्यासाठी कोणत्याही टोकाला जाऊ
शिलाँग, ३ जानेवारी/पी.टी.आय.

हातात शस्त्रे घेतलेल्यांशी कोणतीही तडजोड होणार नाही आणि

 

दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आम्ही कोणत्याही थराला जाऊ, अशी स्पष्ट ग्वाही पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज दिली. पाकिस्तानी नेतृत्वात थोडा जरी समंजसपणा असेल तर त्यांनी मुंबई हल्ल्यातील संशयितांना भारताच्या हवाली करावे, अशी मागणीही त्यांनी केली. अर्थात पाकिस्तानबरोबर युद्धाची शक्यता त्यांनी फेटाळली.
मुंबई, दिल्ली आणि आसामातील दहशतवादी हल्ल्यांच्या पाश्र्वभूमीवर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. वाढता दहशतवाद आणि नक्षलवाद्यांचा उच्छाद ही चिंतेची बाब आहे. सरकार या अतिरेक्यांशी कोणतीही तडजोड करणार नाही, असे ते म्हणाले. आसामातील उल्फा अतिरेक्यांशी सरकार चर्चा करणार काय, या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, प्रथम या अतिरेकी गटांनी शस्त्रे खाली ठेवलीच पाहिजेत. आपल्या खऱ्या वा काल्पनिक प्रश्नांची सोडवणूक बंदुकीच्या गोळीने होईल, असे ज्यांना वाटते त्यांच्याशी कोणताही समझोता होणार नाही. जे शस्त्रे खाली ठेवतील अशा कोणाशीही बोलायला आम्ही तयार आहोत. भारताशी गुन्हेगार हस्तांतरणाचा करार झाला नसल्याने मुंबई हल्ल्यातील संशयितांना भारताच्या ताब्यात देण्यास पाकिस्तानने काल नकार दिला होता. त्याबाबत सिंग म्हणाले की, जगभरातील सर्वच देशांनी या गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. पाकिस्तानने राजकीय शहाणपण दाखवून या हल्लेखोरांना आमच्याकडे द्यायला हवे. अर्थात पाकिस्तानने या हल्लेखोरांवर त्यांच्याच देशात कारवाई करावी, अशी सूचना अमेरिकेने केल्याबाबत मात्र सिंग यांनी मौन बाळगले.
बांगला देशातील सत्तांतरामुळे त्या देशातून भारतातील घातपाती कारवायांना मिळणारी चिथावणी रोखता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. बेगम खलिदा झिया यांच्या सरकारने भारताला त्या दिशेने कोणतेही सहकार्य केले नसल्याचेही त्यांनी सांगितले.