Leading International Marathi News Daily                                  रविवार, ४ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

आज मध्यरात्रीपासून वाहतूकदारांचा देशव्यापी बेमुदत संप
मुंबई, ३ जानेवारी / प्रतिनिधी

 

डिझेलच्या दरात लिटरमागे दहा रुपये कपात करण्याच्या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी ‘ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस’ने सोमवार, ५ जानेवारीपासून पुकारलेल्या देशव्यापी संपाला पाठिंबा देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य ट्रक-टेम्पो-टँकर्स बस वाहतूक महासंघाने आज जाहीर केला. महासंघाने या संपामध्ये उतरण्याचा निर्णय घेतल्याने संपाची तीव्रता वाढली असून, त्याचा मोठा फटका राज्यातील मालवाहतुकीला बसण्याची शक्यता आहे. ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट कॉंग्रेसने पुकारलेल्या संपाला बॉम्बे गुडस् ट्रान्स्पोर्ट असोसिशएनने आधीच पाठिंबा दर्शविला होता. मात्र बीजीटीएचे वर्चस्व मुंबईपुरते मर्यादित असल्याने राज्यभर संपाचा तितकासा प्रभाव जाणवला नसता. मात्र आज मुंबईत शिवडी येथे झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य ट्रक-टेम्पो-टँकर्स अ‍ॅण्ड बस वाहतूक महासंघाने संपात सहभागी होण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे संपाची तीव्रता वाढली असून, राज्यभर त्याचा परिणाम दिसण्याची शक्यता वाहतूक क्षेत्रातील सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे. उद्या रविवारी मध्यरात्रीपासून वाहतुकदारांच्या देशव्यापी बेमुदत संपाला सुरूवात होणार आहे. या संपातून जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला वगळण्यात आले आहे. परिणामी सर्वसामान्यांना फारशी झळ सोसावी लागणार नाही तरी, मालवाहतूक क्षेत्राला मोठी झळ बसण्याची शक्यता आहे.
महासंघाच्या बैठकीत वाहतुकदारांच्या मागण्यांबाबत झालेल्या चर्चेनंतर महासंघाचे अध्यक्ष प्रकाश गवळी यांनी वाहतुकदारांच्या देशव्यापी संपाला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले. महाराष्ट्रातील सुमारे चार लाख वाहतूकदार या संपात सहभागी होतील, असेही स्पष्ट केले. या संपाचा अत्यावश्यक सेवेवर परिणाम होणार असल्याचे विचारले असता गवळी म्हणाले की, वाशी येथील शेती उत्पादक बाजर समितीही संपात उतरणार आहे. मात्र जीवनावश्यक वस्तुंचा मुंबईत पुरवठा केला जाईल. महाराष्ट्र हेवी गुड्स व्हेहिकल असोसएिशन’ने या संपाला पाठिंबा असल्याचे असोसिएशनचे सचिव मोहिंदरसिंग घुरा यांनी सांगितले.
डिझेलच्या दरात लिटरमागे १० रुपयांनी कपात करण्याच्या आणि वाहतूक उद्योगासाठी ‘बेलआऊट’ पॅकेज जाहीर करण्याच्या प्रमुख मागण्यांबाबत गेल्या आठवडय़ात वाहतूक मंत्र्यांसोबत झालेली चर्चा फोल ठरली होती. त्यानंतर ५ जानेवारीपासून वाहतुकदारांचा देशव्यापी बेमुदत संप पुकारण्याचे जाहीर करण्यात आले होते. डिझेलचे दर मोठय़ा प्रमाणात वाढल्यानंतर सेवा कर विभागाने टोल टॅक्स कमी न केल्याने वाहतुकदारांनी जुलै २००८ मध्ये दोन दिवसांची निदर्शने केली होती. आधी २० डिसेंबर रोजी हा करण्यात येणार होता. मात्र काही कारणास्तव तो पुढे ढकलण्यात आला.