Leading International Marathi News Daily                                  रविवार, ४ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

हिंदू दहशतवादाबद्दल महाराष्ट्र फाऊंडेशनच्या सोहळ्यात चिंता
मुंबई, ३ जानेवारी/ प्रतिनिधी

 

लष्करातील अधिकाऱ्यांना दहशतवादी म्हणून अटक केली जाते आणि त्यांच्यावरही काहीजण फुले उधळतात हे पाहून हा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे चालला आहे की, इतिहासात मागे जात आहे अशी शंका निर्माण होते, हा या देशापुढील मोठा धोका आहे, असे मत असंघटित कामगारांचे नेते डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केले. हिंसेच्या मार्गाकडे जाणाऱ्या तरुण वर्गाविषयी महाराष्ट्र फाऊंडेशनचे सुनील देशमुख यांनीही चिंता व्यक्त केली. महाराष्ट्र फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे आज वितरण करण्यात आले.
साहित्य पुरस्काराचे मानकरी होते, आसाराम लोमटे, प्रा. प्रज्ञा दया पवार, जयदेव डोळे, नीरा अडारकर, मीना मेनन, मकरंद साठे, तर जीवनगौरव पुरस्कार डॉ. बाबा आढाव आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांना देण्यात आला. समाजकार्य पुरस्कार डॉ. आनंद तेलतुकडे, कुंजविहारी, अर्जुन कोकाटे, व्यंकप्पा भोसले, सुरेश खैरनार आणि सिम्प्लीत सिंग यांना देण्यात आला.
डॉ. रावसाहेब कसबे यांनी आपल्या जीवनप्रवासाचा थोडक्यात आढावा घेऊन आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेने दिलेल्या अधिकार आणि संधीचे अपत्य आहोत, असे सांगितले. ‘बलुत’कार दया पवार यांची आठवण काढून त्यांच्यामुळेच आपण शिक्षण घेतले त्यांचा आपले आयुष्य घडविण्यात मोठा वाटा आहे, अशी भावना कसबे यांनी बोलून दाखविली.
माजी राज्यमंत्री भाई वैद्य यांनी सांगितले की, महाराष्ट्र फाऊंडेशनच्या पुरस्काराची सारा देश प्रतिक्षा करीत असतो. अर्जुन आणि छत्रपती पुरस्काराएवढेच या पुरस्काराचे महत्त्व आहे. शिवाजी मंदिरात पार पडलेल्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती मधुकरराव चौधरी होते. यावेळी संचन आणि संवादिनी या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. सुनील देशमुख यांनी प्रास्ताविक केले तर सुिनता धुमाळे, मधुकरराव चौधरी, मृणाल गोरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. सामाजिक सलोख्यासाठी काम करणाऱ्या सुरेश खैरनार यांना शहीद हेमंत करकरे यांच्या पत्नी कविता करकरे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.