Leading International Marathi News Daily                                  रविवार, ४ जानेवारी २००९

प्रादेशिक

आमदार हरिश्चंद्र पाटील यांनी शिवीगाळ केल्याची तक्रार; प्रमिला चौधरी यांचा नगरसेवकपदाचा राजीनामा
डोंबिवली, ३ जानेवारी/प्रतिनिधी

डोंबिवलीतील चोळेगाव (प्रभाग क्र.६३) प्रभागाच्या भाजपच्या नगरसेविका प्रमिला चौधरी यांना काल दुपारी आमदार हरिश्चंद्र पाटील यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ करून ‘बघून घेईन’, अशी धमकी दिल्याने नगरसेविका चौधरी यांनी काल रात्री उशिरा रामनगर पोलीस ठाण्यात आमदार पाटील यांच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. चोळेगाव प्रभागात साईमंगल सोसायटीसमोर हा प्रकार घडला. आमदार पाटील यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून प्रमिला चौधरी यांनी आपला नगरसेवकपदाचा राजीनामा भाजपचे डोंबिवली पूर्व मंडळाचे अध्यक्ष नंदू जोशी यांच्याकडे कालच सुपूर्द केला आहे. सर्वाच्या समक्ष आपला अपमान करण्यात आल्याने आपले कौटुंबिक स्वास्थ्य बिघडल्याचे व आमदारांवर कारवाई करण्याची मागणी राजीनामापत्रात नगरसेविका चौधरी यांनी केली आहे.

‘बडय़ा उद्योग समूहांनी उभा केला आर्थिक मंदीचा बागुलबुवा’
ठाणे, ३ जानेवारी/प्रतिनिधी

सध्या भारताचा विकास दर नऊ टक्क्यांपेक्षा अधिक असूनही देशात आर्थिक मंदी निर्माण झाल्याची आवई काही बडे उद्योगपती जाणीवपूर्वक उठवीत आहेत. मंदीची भीती निर्माण करून आपल्या उद्योगांसाठी सरकारकडून जम्बो आर्थिक पॅकेज पदरात पाडून घेण्याचा त्यांचा स्वार्थी डाव आहे. मात्र जागतिक पातळीवरील आर्थिक मंदीच्या झळा भारताला बसू नयेत, यासाठी आपल्या पोळीवर तूप ओढण्याचा प्रयत्न न करता स्वत:च्या नफ्यात थोडीशी कपात करून अशा राष्ट्रीय संकटाच्या वेळी उद्योजकांनी सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ व पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव यांनी येथे केले.
शिवकृपा सहकारी पतपेढी लि. या संस्थेचे ठाण्यातील नूतन प्रशासकीय कार्यालय व व्हिडीओ कॉन्फरन्सिंग या अत्याधुनिक सेवेचे उद्घाटन शुक्रवारी डॉ. जाधव यांनी केले.

भ्रष्टाचाराच्या क्रमवारीत महाराष्ट्र पोलीस सलग दुसऱ्या वर्षी नं 1
मुंबई, ३ जानेवारी / प्रतिनिधी

सलग दुसऱ्या वर्षी सर्वाधिक भ्रष्टाचारी खात्याच्या क्रमवारीत महाराष्ट्र पोलिसांची पहिल्या क्रमांकावर वर्णी लागली असून २००८ मध्ये पोलिसांविरुद्ध भ्रष्टाचाराचे ८१ गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनंतर महसूल विभाग आणि मनपाने भ्रष्टचार खाती म्हणून अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे. भ्रष्टाचार प्रतिबंध विभागाने (एसीबी) नुकतीच भ्रष्ट खात्यांची यादी प्रसिद्ध केली. या यादीत देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, एसीबीने गेल्या वर्षभरात १०३ पोलिसांना लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे.

अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षांसाठी आता अधिक प्रवेशफेऱ्या
पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दिलासा

मुंबई, ३ जानेवारी / प्रतिनिधी

अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमात पहिल्या वर्षी नापास झालेल्या विद्यार्थ्यांमुळे रिक्त होणाऱ्या दुसऱ्या वर्षांतील जागांवरील प्रवेश आता केंद्रीभूत पद्धतीने करण्याचा तत्त्वत: निर्णय राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतला आहे. केंद्रीभूत पद्धतीने दोन फेऱ्या तर समुपदेशन पद्धतीने एक फेरी घेऊन हे प्रवेश केले जातील. या निर्णयामुळे पाच हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. पहिल्या वर्षांत नापास झालेल्या विद्यार्थ्यांमुळे दुसऱ्या वर्षांत राज्यातील विविध महाविद्यालयांमध्ये जवळपास पाच हजार जागा रिक्त राहायच्या. पण बहुतांशी महाविद्यालये या जागा संस्था स्तरावर भरायचे.

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातील
महिला कर्मचारी रस्त्यावर उतरणार

मुंबई, ३ जानेवारी / प्रतिनिधी

विविध सोयी-सुविधांचा अभाव आणि वारंवार पाठपुरावा करूनही या मागण्यांकडे करण्यात येणाऱ्या दुर्लक्षाचा निषेध करण्यासाठी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातील महिला कर्मचारी आता रस्त्यावर उतरणार आहे. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी काही महिला कर्मचारी येत्या ६ जानेवारी पासून प्राणांतिक उपोषणाला बसणार आहेत.

‘बचनालिया’तून उलगडला अमिताभचा चित्रपट प्रवास!
मुंबई, ३ जानेवारी / प्रतिनिधी

बॉलिवूडचा अनभिषक्त सम्राट अमिताभ बच्चन यांच्या चित्रपट कारकीर्दीचा इतिहास उलगडणाऱ्या ‘बचनालिया’ या छायाचित्रात्मक पुस्तकाचे प्रकाशन आज रात्री नरिमन पॉइंट येथील ‘एनसीपीए’च्या टाटा थिएटर येथे एका शानदार कार्यक्रमात झाले. अभिनेता आमीर खान याच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. बच्चन यांची आजवरची संपूर्ण चित्रपट कारकीर्द या पुस्तकाच्या माध्यमातून उलगडली गेली आहे. ‘ओशियान्स’ आणि ज्येष्ठ सिने पत्रकार भावना सोमय्या यांच्या अथक प्रयत्नातून ‘बचनालिया’ हे पुस्तक साकार झाले आहे. या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभास जया बच्चन, अभिषेक आणि ऐश्वर्या, श्वेता, खासदार अमरसिंह यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि चाहते उपस्थित होते. एखाद्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला इतक्या मोठय़ा संख्येने जमलेली गर्दी पहिल्यांदाच पाहायला मिळत असल्याचे सांगून अमिताभ आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, माझ्यावर भरभरून प्रेम करणारे चित्रपट रसिक, माझे चाहते आणि प्रेक्षकांचा मी आभारी आहे. माझ्या आजवरच्या यशात या सर्वाचा आणि माझ्या अनेक चित्रपटांच्या दिग्दर्शकांचाही समावेश असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. पुढील महिन्यांत आपण हिंदूी चित्रपट कारकिर्दीची चाळीस वर्षे पूर्ण करत असल्याचे बच्च्चन यांनी सांगताच, उपस्थित रसिकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना शुभेच्छा दिल्या.अमिताभ यांच्या समवेत झालेल्या पहिल्या भेटीचा प्रसंगाबद्दल आमीर खानने सांगितले की, खरे तर मी तेव्हा अमिताभ यांच्यापुढे ज्युनिअर आर्टीस्ट होतो. तरीही ते उठून उभे राहिले आणि माझ्याशी बोलले. यातून त्यांच्या स्वभावातील आदब, विनम्रता आणि आपण कोणी मोठे नाही, हे दिसून येते.प्रारंभी ‘ओशियान्स’चे नेव्हल टुली यांनी प्रास्ताविक केले. या वेळी मणी कौल, भावना सोमय्या यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

मुंबई काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त
मुंबई, ३ जानेवारी / प्रतिनिधी

राज्यात झालेल्या नेतृत्वबदला पाठोपाठ मुंबई विभागीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष आमदार कृपाशंकर सिंह यांनी मुंबई काँग्रेसची २५८ सदस्यांची कार्यकारिणी बरखास्त केली आहे. विभागीय काँग्रेसची नवी कार्यकारिणी येत्या १५ दिवसांत जाहीर केली जाणार असून तोपर्यंत मुंबई काँग्रेसचे पदाधिकारी पक्षाचे दैनंदिन कामकाज पाहणार असल्याचे कृपाशंकर सिंह यांनी सांगितले. या वर्षी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होणार असून तळागाळातील कार्यकर्त्यांना एकत्रित करून पक्षाला बळकटी देण्यासाठी नवी समिती काम करील, असेही ते म्हणाले. खासदार गुरुदास कामत यांनी त्यांची पाच वर्षांची मुदत संपल्यानंतर मुंबई विभागीय काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ऑगस्ट २००८ मध्ये कृपाशंकर सिंह यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती.

‘मिनव्‍‌र्हा’प्रकरणी स्थायी समिती तहकूब
मुंबई, ३ जानेवारी / प्रतिनिधी

‘मिनव्‍‌र्हा’ चित्रपटगृहाचे नवे बांधकाम नियमबाह्य आहे, या बांधकामाला स्थगिती देण्यास पालिका आयुक्त टाळाटाळ करीत आहेत, असा आरोप करून स्थायी समिती सदस्यांनी स्थायी समितीचे कामकाज प्रशासनाच्या विरोधात तहकूब केले. ‘मिनव्‍‌र्हा’ चित्रपटगृहाच्या ठिकाणी सध्या नवीन बांधकाम करण्यात येत आहे.

केशव भिकाजी ढवळे प्रकाशनाचे ग्रंथपुरस्कार जाहीर
मुंबई, ३ जानेवारी / प्रतिनिधी

केशव भिकाजी ढवळे प्रकाशनातर्फे देण्यात येणाऱ्या २००६ आणि २००७ या वर्षांतील ग्रंथपुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. राजहंस, श्रीविद्या, लोकवाङ्मय गृह, उत्कर्ष, गमभन, मॅजेस्टिक प्रकाशन आदी प्रकाशन संस्था या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. प्रत्येकी ३ हजार रुपये आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या ८ जानेवारी रोजी मुंबईत गिरगाव येथील आर्यन हायस्कूल येथे संध्याकाळी सहा वाजता पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
२००६ मधील पुरस्कार : केशव भिकाजी ढवळे पुरस्कार (धार्मिक, आध्यात्मिक, वैचारिक आणि संशोधन), ‘अरण्यवाचन’- अतुल धामणकर (श्री विद्या प्रकाशन), बाळकृष्ण गणेश ढवळे पुरस्कार (उत्कृष्ट निर्मिती मूल्य), ‘तमाशा- एक रांगडी गंमत’-संदेश भंडारे (लोकवाङ्मय गृह), धनंजय बाळकृष्ण ढवळे पुरस्कार (संस्कारक्षम बालसाहित्य), ‘हेलन केलर’-अनिता राजगुरू (गमभन प्रकाशन)
२००७ मधील पुरस्कार : केशव भिकाजी ढवळे पुरस्कार-‘लोकमान्य ते महात्मा’-सदानंद मोरे (राजहंस प्रकाशन), बाळकृष्ण गणेश ढवळे पुरस्कार- ‘अस्सल कोल्हापुरी’-विजयमाला पवार (उत्कर्ष प्रकाशन) आणि धनंजय बाळकृष्ण ढवळे पुरस्कार-‘सृष्टीत गोष्टीत’--डॉ. अनिल अवचट (मॅजेस्टिक प्रकाशन).

अनंत फंदी साहित्य पुरस्कारासाठी डॉ. अरूण मांडे, प्रा. शंकर सखाराम व काशिनाथ माटल यांची निवड
मुंबई, ३ जानेवारी / प्रतिनिधी

संगमनेर इतिहास संशोधन मंडळातर्फे देण्यात येणाऱ्या कवी अनंत फंदी साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली अलून या पुरस्कारांसाठी डॉ. अरूण मांडे (अहमदनगर), प्रा. शंकर सखाराम (नवी मुंबई), आणि काशिनाथ माटल यांची निवड झाली आहे. मांडे आणि सखाराम यांच्या अनुक्रमे ‘आपटय़ाच पान’ व ‘एसईझेड’ या कादंबऱ्यांची आणि माटल यांच्या ‘अनुबंधं’ या कथासंग्रहाची निवड करण्यात आली आहे. ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांच्या हस्ते उद्या, ४ जानेवारी रोजी संगमनेर येथे पारितोषिक वितरण केले जाणार आहे. फंदी यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या या पुरस्कारांसाठी महाराष्ट्रासह गोवा, मध्यप्रदेश या राज्यातून २८३ लेखक आणि कवींना आपल्या साहित्यकृती पुरस्कारासाठी पाठवल्या होत्या. सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून या कार्यक्रमास ज्येष्ठ विचारवंत प्रा. रावसाहेब कसबे आणि राज्याचे कृषीमंत्री बाळासाहेब थोरात हे उपस्थित राहणार आहेत.

रेल्वेची हेल्पलाईन
मुंबई, ३ जानेवारी / प्रतिनिधी

प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने मोबाईल हेल्पलाईन सुरू केली आहे. १५५२१० या मोबाईल हेल्पलाईनवर रेल्वेचे दक्षता अधिकारी आठवडय़ाचे सातही दिवस २४ तास उपलब्ध असतील. रेल्वे कर्मचाऱ्यांची लाचखोरी तसेच भ्रष्टाचाराबाबत प्रवासी अधिकाऱ्यांकडे तक्रारी नोंदवू शकतात. आतापर्यंत या हेल्पलाईनला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून बहुतांशी तक्रारींची तातडीने दखल घेऊन जलदगतीने कारवाई करण्यात आली असल्याचे केंद्र सरकारने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.

ठाणे जिल्हा न्यायालयाच्या विभाजनाविरुद्ध वकील संघटनेचे काम बंद आंदोलन
१२ जानेवारीपर्यंत काम न करण्याचा निर्णय
ठाणे, ३ जानेवारी/प्रतिनिधी

ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे विभाजन करून भिवंडी येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय स्थापन करण्यास विरोध करण्यासाठी ठाणे जिल्हा न्यायालय वकील संघटनेने आज ‘काम बंद’ आंदोलन केले. त्यामुळे ठाणे जिल्हा न्यायालयात आज दिवसभर कोणतेही न्यायालयीन कामकाज होऊ शकले नाही. १२ जानेवारीपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याची घोषणा वकील संघटनेने केली आहे.ठाणे जिल्हा न्यायालयाचे विभाजन करून भिवंडी येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय सुरू करावे, अशी भिवंडी तालुका वकील संघटनेची जुनी मागणी आहे. त्यासाठी या संघटनेने वेळोवेळी ‘काम बंद’सारखे आंदोलनही केले आहे. परिणामी, भिवंडीत न्यायालय सुरू करण्यास मंजुरी देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यावर आली असताना ठाणे जिल्हा न्यायालयातील १८०० वकिलांनी एकजुटीने त्यास विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे.ठाणे जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. गजानन चव्हाण यांनी सांगितले की, एकीकडे कोटय़वधी रुपये खर्च करून जिल्हा न्यायालयाच्या आवारात न्यायालयाच्या नव्या इमारती बांधल्या जात आहेत, तर दुसरीकडे या न्यायालयाचे विभाजन करून न्यायालयांची संख्या कमी केली जात आहे. सरकारचे नेमके धोरण काय तेच कळत नाही. जिल्हा न्यायालयाचे दहाव्या वर्षांत दोन वेळा विभाजन करण्यात आले. पालघर व कल्याण येथे नवी अति. सत्र न्यायालये सुरू झाली. आता पुन्हा त्रिभाजन करून भिवंडीत न्यायालय सुरू झाल्यास जिल्हा न्यायालयाला कोणता अर्थ राहील, असा त्यांनी सवाल केला.