Leading International Marathi News Daily                                  रविवार, ४ जानेवारी २००९

क्रीडा

क्लार्कने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला
६ विकेट्सच्या मोबदल्यात २६७ धावा

सिडनी, ३ जानेवारी / पीटीआय

मायकेल क्लार्कने काढलेल्या झुंजार नाबाद ७३ धावांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आजपासून सुरू झालेल्या तिसऱ्या व शेवटच्या कसोटी क्रिकेट सामन्यात दिवसअखेर ६ बाद २६७ धावांची सन्मानजनक मजल गाठता आली. दक्षिण आफ्रिकेकडून व्हाईटवॉश होण्याचे सावट पसरले असलेल्या ऑस्ट्रेलियाची एकवेळस ५ बाद १६२ अशी नाजूक अवस्था झाली असताना क्लार्कने ब्रॅड हॅडिनच्या साथीने सहाव्या गडय़ासाठी ७३ धावांची भागीदारी करत संघाला सुस्थिती गाठून दिली. दिवसअखेर मिशेल जॉन्सन १७ धावा काढून क्लार्कला साथ देत होता. वेगवान गोलंदाज डेल स्टेनने हॅडिनचा त्रिफळा उध्वस्त केला आणि सिडनी क्रिकेट मैदानावर आजपासून सुरू झालेल्या या शेवटच्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करण्याची संधी मिळवून दिली.

विंडीजची न्यूझीलंडवर मात
ख्राईस्टचर्च, ३ जानेवारी / एएफपी

अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार ठरलेल्या लढतीत रामनरेश सरवान व दिनेश रामदिन यांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर वेस्ट इंडिजने आज न्यूझीलंडचा ५ गडी राखून पराभव केला आणि पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-०ची आघाडी घेतली. मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला होता.
पावसाच्या व्यत्ययामुळे प्रत्येकी २८ षटकांच्या झालेल्या या लढतीत न्यूझीलंडने ८ बाद १५२ धावांची मजल मारली. डकवर्थ लुईस नियमानुसार विंडीजपुढे विजयासाठी १५८ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले. रामनरेश सरवान (६५चेंडू, ६७ धावा) आणि दिनेश रामदिन (१८ चेंडू, २८) यांनी विंडीजच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

क्रिकेटपटूंना नोकरीच्या संधी उपलब्ध होण्यासाठी बीसीसीआयची आंतर-कंपनी स्पर्धा
मुंबई, ३ जानेवारी / क्री. प्र.

उदयोन्मुख क्रिकेटपटूंना विविध कंपन्या व आस्थापनांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने ५० षटकांची तसेच ट्वेन्टी-२० आंतरकंपनी क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचा संकल्प भारतीय क्रिकेट बोर्डाने सोडला आहे.या आंतर कंपनी स्पर्धेतील विजेत्याला जवळपास एक कोटींचा लाभ होणार आहे. तर उपविजेत्या संघास ५० लाख व उपान्त्य फेरीत पराभूत होणाऱ्या संघांना २५ लाखांचे इनाम मिळेल. भारतीय क्रिकेट बोर्डाच्या आज येथे मुख्यालयात झालेल्या कार्यकारिणीच्या बैठीकत हा निर्णय घेण्यात आला. या स्पर्धेच्या आयोजनासाठी जी समिती स्थापन करण्यात आली आहे, त्या समितीचे अध्यक्ष म्हणून भारतीय क्रिकेट बोर्डाचे संयुक्त सचिव व माजी निवड समिती सदस्य संजय जगदाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इतर सदस्यांमध्ये के. एस. विश्वनाथन, रत्नाकर शेट्टी, चामुंडेश्वरनाथ, रणजीब बिस्वल व अनिरुद्ध चौधरी यांचा समावेश आहे, अशी माहिती बोर्डाचे सचिव एन. श्रीनिवासन यांनी पत्रकाद्वारे दिली.

सौराष्ट्रविरुद्ध मुंबईचे पारडे जड; सचिन, झहीरच्या समावेशाने मुंबईला बळकटी
चेन्नई, ३ जानेवारी / पीटीआय

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर व वेगवान गोलंदाज झहीर खान यांच्या परतण्याने मुंबईचा संघ अधिक बळकट झाला असून उद्यापासून सौराष्ट्रविरुद्ध येथे होणाऱ्या रणजी उपान्त्य सामन्यात मुंबईचे पारडे निश्चितच जड असेल.
रणजी सुपर लीगमध्ये आतापर्यंत मुंबईची कामगिरी उत्कृष्ट झालेली आहे. इतर कोणत्याही संघापेक्षा मुंबईने सर्वाधिक विजयांची नोंद केली आहे. त्याशिवाय, २००६-०७मध्ये मुंबईला विजय मिळवून देणारे सचिन आणि झहीर खान संघात परतल्यामुळे संघाचे मनोबल उंचावले आहे. या हंगामात सुरेख कामगिरी करणाऱ्या धवल कुलकर्णी व अजिंक्य रहाणेसारख्या खेळाडूंना त्यामुळे आत्मविश्वास मिळणार आहे. मुंबईचे प्रशिक्षक प्रवीण अमरे यांनीही सचिन व झहीरच्या समावेशामुळे मुंबईला आत्मविश्वास मिळेल आणि संघातील उदयोन्मुख खेळाडूंचे मनोबल वाढेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

दक्षिण आफ्रिकेतील मालिकेला स्मिथ मुकण्याची शक्यता
मेलबर्न, ३ जानेवारी/वृत्तसंस्था

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ग्रॅमी स्मिथ हा दुखापत बरी न झाल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशी होणाऱ्या मालिकेत खेळू न शकण्याची शक्यता आहे. स्वत: स्मिथ यानेच आज ही माहिती दिली.
रक्ताच्या इंजेक्शनने त्याच्या दुखापतीवर उपचार करण्यात येणार आहेत. हाताच्या दंडावरील भागातून रक्त काढून ते दुखापतग्रस्त स्नायूंमध्ये इंजेक्शनद्वारे टाकण्यात येणार आहे. अशा पद्धतीच्या उपचाराने हाताच्या कोपऱ्याला झालेली दुखापत बरी होते असा अनुभव आहे.मात्र या उपचाराचा काहीच उपयोग न झाल्याचे आढळून आले तर त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. तसे झाल्यास कांगारुंविरुद्धच्या मालिकेला त्याला मुकावे लागेल.

दिलशानचे शतक;
श्रीलंका ६ बाद ३७१

चितगाव, ३ जानेवारी/वृत्तसंस्था

तिलकरत्ने दिलशान याच्या तडाखेबंद शतकामुळे (१६५ चेंडूंत १६२ धावा) श्रीलंकेने बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत पहिल्या दिवसाअखेर ६ बाद ३७१ अशी मजल मारली.
श्रीलंकेचा कर्णधार महेला जयवर्धने याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र वेगवान गोलंदाज मशरफ मोर्तझा ( ४८ धावांत २ बळी) व शकीब अल हसन याच्या फिरकी माऱ्यापुढे श्रीलंकेची अवस्था ४ बाद ७५ अशी केविलवाणी झाली होती. अशा स्थितीत मैदानावर उतरलेल्या दिलशानने तुफान टोलेबाजी करीत आपल्या संघाला संकटातून बाहेर काढले.

विजय सातत्याचा की अनुभवाचा तामिळनाडू-उत्तर प्रदेश यांच्यातील रणजी उपांत्य लढतीतील उत्सुकता
नागपूर, ३ जानेवारी / क्रीडा प्रतिनिधी

सातत्य आणि अनुभवाच्या लढतीत कोण सरशी साधणार, याची उत्सुकता निर्माण करणारा तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश यांच्यातील प्रतिष्ठेच्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचा उपांत्य फेरीचा सामना उद्यापासून व्हीसीएच्या जामठा येथील नव्या स्टेडियमवर रंगणार आहे. तामिळनाडूच्या संघाने यंदाच्या रणजी मोसमात सातत्यपूर्ण कामगिरी केली असून उत्तर प्रदेशने साखळीतील काहीशा निराशाजनक कामगिरीनंतरही अनुभवाच्या जोरावर उपांत्य फेरीपर्यंत मजल गाठली आहे. त्यामुळेच आता विजय यंदाच्या मोसमात सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या संघाचा होणार की देशांतर्गत क्रिकेटचा तगडा अनुभव असणाऱ्या संघाचा होणार, याची उत्सुकता या लढतीत शिगेला पोहोचली आहे.

राज्य कुस्ती स्पर्धेच्या तयारीस वेग
पुणे, ३ जानेवारी/ क्री. प्र.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ८ ते ११ जानेवारी दरम्यान कडेगाव (सांगली) येथे होणार असून, या स्पर्धेच्या तयारीस वेग आला आहे.
स्पर्धा संयोजन समितीचे स्वागताध्यक्ष व भारती विद्यापीठाचे कार्यवाह विश्वजित कदम यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी सांगली जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष नामदेवराव मोहिते व महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे हेही उपस्थित होते.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केली पॉन्टिंग, हिल्डिच यांची पाठराखण
सिडनी, ३ जानेवारी / पीटीआय

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत अखेरच्या लढतीपूर्वीच पराभव स्वीकारावा लागल्यामुळे टीकाकारांचे लक्ष्य ठरलेल्या ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉन्टिंग आणि निवड समितीचे अध्यक्ष अ‍ॅन्ड्रय़ू हिल्डिच यांची क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष जॅक क्लार्क यांनी पाठराखण केली आहे. त्यांच्यावर टीका करणे चुकीचे असल्याचे क्लार्क यांनी म्हटले आहे. ऑस्ट्रेलिया संघाने दशकापेक्षा अधिक काळ जागतिक क्रिकेटवर वर्चस्व गाजवले. त्यात पॉन्टिंग आणि हिल्डिच यांची भूमिका महत्त्वाची ठरली, त्यामुळे त्यांना सहकार्य करण्याची गरज आहे, असेही क्लार्क यांनी म्हटले आहे. पॉन्टिंग १९९५पासून ऑस्ट्रेलिया संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. त्याच्याकडे २००२मध्ये एकदिवसीय संघाचे तर २००४मध्ये कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले. अ‍ॅन्ड्रय़ू हिल्डिच १९९६पासून निवड समितीत आहेत. २००६मध्ये त्यांनी निवड समितीच्या अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारली.

पीटरसन, फ्लिन्टॉफ आयपीएलमध्ये खेळणार
लंडन, ३ जानेवारी/वृत्तसंस्था

इंग्लंडचा कर्णधार केव्हिन पीटरसन, अष्टपैलू अँड्रय़ू फ्लिंटॉफ यांचा इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) दुसऱ्या हंगामात खेळण्याचा मार्ग इंग्लंड क्रिकेट मंडळाने आज घेतलेल्या निर्णयामुळे मोकळा झाला आहे.
व्यावसायिक क्रिकेटपटूंची संघटना (पीसीए) आणि इंग्लंड मंडळ यांच्यात झालेल्या करारानुसार आयपीएलमध्ये खेळू इच्छिणाऱ्या पीटरसन, अँड्रय़ू फ्लिंटॉफ आदी खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय वेळापत्रकातील १५ दिवसांचा कालावधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे हे खेळाडू आयपीएलच्या दुसऱ्या हंगामात काही सामने नक्की खेळणार हे स्पष्ट झाले आहे. इंडियन प्रीमियर लीगचा दुसरा हंगाम एप्रिलमध्ये सुरू होणार आहे. इंग्लंड-वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिका ६ मे पासून सुरू होणार आहे. त्या मालिकेत खेळण्यासाठी इंग्लंडच्या खेळाडूंना मायदेशी परतावे लागणार आहे.पीटरसन, फ्लिंटॉफ यांनी आयपीएलमध्ये खेळण्यास परवानगी देण्याची मागणी अनेकवेळा इंग्लंड मंडळाकडे केली होती. मात्र त्यांना नकार दिला जात होता. अखेर मंडळाला त्यांची मागणी मान्य करावी लागली.

श्रीलंकेविरुद्ध मालिकेचा बीसीसीआयचा विचार
नवी दिल्ली, ३ जानेवारी / पीटीआय

पाकिस्तान दौरा रद्द झाल्यामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी भारतीय क्रिकेट बोर्ड श्रीलंकेविरुद्ध छोटेखानी दौऱ्याच्या आयोजनाची योजना आखत आहे.
भारतीय क्रिकेट बोर्डाने श्रीलंकेशी यासंदर्भात चर्चा सुरू केली असून ते शक्य झाल्यास फेब्रुवारीत हा दौरा होऊ शकेल.
बोर्डाच्या सूत्रांनी यासंदर्भात सांगितले की, आम्ही श्रीलंका क्रिकेट बोर्डाशी याबाबत चर्चा सुरू केली असून संभाव्य दौऱ्याच्या कार्यक्रमाबाबतही काम सुरू आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडूनही यासंदर्भात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. बांगलादेश दौऱ्याहून परतल्यावर श्रीलंका संघ थेट या दौऱ्यासाठी भारतात येऊ शकेल.
श्रीलंकेचे क्रीडा मंत्री गामिनी लोकुगे यांनीही बीसीसीआयने हा प्रस्ताव मांडल्याचे मान्य केले आहे.

चेन्नई ओपनमध्ये सोमदेव देववर्मनची सलामी किमशी
चेन्नई, ३ जानेवारी / पीटीआय

येत्या सोमवारपासून सुरू होत असलेल्या चेन्नई ओपन टेनिस स्पर्धेत भारताचा प्रथम क्रमांकाचा टेनिसपटू सोमदेव देववर्मन याची गाठ अमेरिकेच्या केव्हिन किम याच्याशी पडणार आहे.या स्पर्धेसाठी सोमदेवला वाइल्ड कार्डद्वारे प्रवेश देण्यात आला आहे. जागतिक क्रमवारीत २०४व्या क्रमांकावर असलेल्या सोमदेवची झुंज ११७व्या मानांकित किमशी पडणार आहे. त्यामुळे सोमदेवपुढे ही लढत जिंकण्याचे कठीण आव्हान असेल. सोमदेवने जर सलामी जिंकली तर त्याची गाठ कार्लोस मोयाशी पडणार आहे.प्रकाश अमृतराजलाही वाइल्ड कार्डद्वारे प्रवेश देण्यात आला असून त्याची गाठ जर्मनीची रेनर शटलरशी पडणार आहे.