Leading International Marathi News Daily                                  रविवार, ४ जानेवारी २००९

नव वर्षांचे सनदी संकल्प
संजय बापट

गतवर्षांच्या अखेरीस मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे नवीन वर्षांचे स्वागत दहशतवादाच्या सावटात थंडे-थंडेच झाले. नववर्ष म्हटले की संकल्प आलेच. प्रतिवर्षांप्रमाणे याही वर्षांत अनेकांनी वेगवेगळे संकल्प सोडले आहेत. राजकीय पक्षांनी या वर्षांत येणाऱ्या लोकसभा आणि त्यापाठोपाठ होणाऱ्या विधानसभा निवडणुका जिंकून सत्ता मिळविण्याचा संकल्प केलाय. सर्वसामान्य जनतेने दहशतवादापासून मुक्ती मिळविण्याचा संकल्प सोडलाय. मात्र राज्यकर्त्यांप्रमाणेच ज्यांच्या हाती सर्वसामान्य लोकांच्या हिताची आणि एकूणच राज्याच्या भवितव्याची जबाबदारी असते, ते सनदी अधिकारी मात्र आपले संकल्प कधीच उघडपणे मांडत नाहीत. सरकार कोणाचेही असो, जनतेचे प्रश्न काहीही असोत वा नववर्षांचे कोणाचे काहीही संकल्प असोत, सनदी अधिकारी मात्र आपले संकल्प कधीच उघडपणे मांडायला तयार नसतात.

सावित्रीच्या ठाणेकर लेकी
सिंधु पटवर्धन

स्त्री मुक्ती आंदोलनाची गंगोत्री म्हणून आपण सर्व भारतीय सावित्रीबाई फुले यांना मोठय़ा आदराने संबोधतो, त्यांचा गौरव करतो. स्वतंत्रपणे मुलींची शाळा काढणारे महात्मा ज्योतिबा फुले हे पहिले भारतीय होत. १ जानेवारी १८४८ साली पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडय़ांच्या वाडय़ात महात्मा ज्योतिराव फुले यांनी सर्व स्तरातील मुलींना मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी पहिली मुलींची शाळा सुरू केली. शाळेत शिकविण्यासाठी (स्त्री) शिक्षिका नसल्याने ज्योतिबा फुले यांनी आपली पत्नी सावित्रीबाई यांना स्वत: शिकवून शिक्षिकेचे काम दिले व सावित्रीबाईंनीही आपले कर्तव्य चोख बजावले.
पुण्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात स्त्रियांची प्रगती होत असताना आपल्या ठाणे शहरामध्ये सर्वसाधारणपणे या काळात ‘स्त्री शिक्षणा’कडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन कसा होता? मुलींसाठी प्राथमिक व विशेषत: माध्यमिक शिक्षण देणाऱ्या शाळा अस्तित्वात होत्या का? त्या शाळांमध्ये मुलींना कोणत्या प्रकारचे शिक्षण दिले जात असे? पालक-शिक्षक यांचा या मुलींकडे पहाण्याचा दृष्टिकोन कसा होता? ही माहिती मिळविण्यासाठी मी ठाण्यातील काही जुन्या पदवीधर महिलांना भेटून त्यांना त्यांचे स्वत:चे अनुभव कथन करण्याची विनंती केली.

आयएलएस : विमान धावपट्टीवर उतरवण्याची वायरलेस पद्धती
डॉ. प्र. ज. जोगळेकर

सालाबादप्रमाणे यंदाही डिसेंबर महिन्याच्या अखेरीस दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळावरील सकाळच्या वेळातील विमानांची वाहतूक कोलमडली आहे. दिल्ली आणि मुंबईच्या विमानतळांवरील इन्स्ट्रमेंट लँडिंग सिस्टीमचे (आयएलएस) आधुनिकीकरण करून त्यांना जागतिक दर्जाच्या विमानतळाच्या पंक्तीत बसवण्याच्या योजना आज बरीच वर्षे ऐकण्यात येतात. त्यांचे काय झाले? लंडन किंवा न्यूयॉर्क येथे धुके नसते का? तेथे काय व्यवस्था आहेत? त्यामध्ये एकविसाव्या शतकात काय सुधारणा झाल्या आहेत? अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे वाचकांना हवी असतात.

संगीताच्या तिन्ही अंगांचे दर्जेदार आविष्कार
सदाशिव बाक्रे

पद्मश्री गोपीकृष्ण संगीत महोत्सवाचे हे पंधरावे वर्ष. संगीताचे दर्दी, लोकसहभाग यांच्या पाठिंब्यावरच हा महोत्सव यशस्वीपणे पार पडतो आहे. संगीताचे उत्तम जाणकार व अव्वल रसिक असलेल्या देव कुटुंबाच्या पुढाकाराने हा महोत्सव होत असल्यामुळे या महोत्सवात संगीताच्या गायन, वादन व नृत्य या तिन्ही अंगांचा उत्कृष्ट मिलाफ व दर्जेदार समतोल पाहायला मिळतो. जुन्या नावाजलेल्या कलाकारांबरोबरच कलाक्षेत्रातही चांगल्या व होतकरू कलाकारांनाही हा मंच खुला असतो हे पाहून खूप बरे वाटते.
या वर्षी या महोत्सवात अशाच जुन्या मुरब्बी कलाकारांबरोबर होतकरू कलाकारांचा संगम पाहायला मिळाला. उद्घाटन समारंभानंतर डॉ. विद्याधर ओक यांच्या हार्मोनियम सोलो वादनाने या महोत्सवाची सुरुवात झाली. त्यांनी पुरिया कल्याण राग वाजविला. २२ श्रुती हार्मोनियममधून रागस्वरांच्या संवेदना श्रोत्यांपर्यंत कशा पोहोचतात ते यावेळी दिसले.

आवतण आले माहुलीचे..
सदाशिव टेटविलकर

‘दुरून डोंगर साजरे’ हा वाक्यप्रचार ज्याने प्रथम रूढ केला, तो निश्चितच माहुलीच्या वाटेला गेला असणार, सह्याद्रीच्या मूळ रांगेपासून सुटावलेला हा एकांडा शिलेदार मान उंचावून मोठय़ा रुबाबात भोवताल निरखीत उभा आहे. दुरून दिसणारा त्याचा रुबाब प्रथमदर्शनीच भुरळ पाडणारा असून, आकाशात झेपावणारे त्याचे विशिष्ट आकाराचे सुळके, चहूबाजूंनी तुटलेले उभे सरळसोट कडे, त्यातून निर्माण झालेल्या दऱ्याखोऱ्या, त्यात वाढलेले हिरवेकंच जंगल, त्याच्या आडोशाने फुललेली वन्यजीव सृष्टी, वर्षांऋतूत त्याच्या अंगाखांद्यावरून खाली झेपावणारे लहान मोठे जलप्रपात, शरद ऋतूत आकाशीच्या लालिमात रंगून गेलेले त्याचे लोभसवाणे रूप आणि ग्रीष्मात निळेभोर आकाश भेदू पाहणारे माहुलीचे विविध आकाराचे दणकट सुळके निसर्गवेडय़ा माणसाला खेचून न घेती तरच नवल.

महोत्सव, महाउत्साह!
अनिरुद्ध भातखंडे

गेल्या आठवडय़ात डोंबिवलीतील एक मित्र मला ट्रेनमध्ये अचानक भेटला. ‘काय म्हणतोय तुमचा पनवेल फेस्टिव्हल?’ त्याचा पहिला प्रश्न. मी काही उत्तर देणार तोच ‘आता कर्नाळा महोत्सव सुरू आहे ना? आणि जानेवारीमध्ये मल्हार महोत्सव! मजा आहे बुवा तुमची..’ अशी सरबत्ती त्याने केली. त्यानंतर डोंबिवलीतील उत्सवांची माहिती त्याने उत्साहाने पुरवली. प्रवास कसा संपला ते कळलेही नाही. राज्यातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये सध्या या प्रकारच्या महोत्सवांचे आयोजन होत आहे. झपाटय़ाने वाढणारे पनवेल त्यास कसे काय अपवाद असेल? माझा मित्र म्हणाला त्याप्रमाणे प्रथम ‘पनवेल फेस्टिव्हल’ (आयोजक मंडळींनो, या फेस्टिव्हलचे नामांतर करा की) त्यानंतर ‘कर्नाळा महोत्सव’ संपन्न झाले. यातून पनवेलकरांना १० दिवसांची उसंत मिळणार आहे. ११ जानेवारीपासून ‘मल्हार महोत्सव’ सुरू होत आहे.

फेरीवाल्यांची ‘राजे’शाही
भगवान मंडलिक

जगातील सर्व शाही संपुष्टात आल्या, उरलेल्या संपत चाललेल्या आहेत. मग डोंबिवलीतील फेरीवाल्यांच्या ‘राजे’शाहीचे काय? ती कोण आणि कधी संपवणार? कल्याण- डोंबिवली पालिकेच्या सत्तेत शिवशाही, आघाडीशाही येऊन त्यांच्यात बदल होत आहेत, पण फेरीवाल्यांच्या राजेशाहीला उलथून टाकण्याची हिंमत कोणातच नाही. एवढी कसली ताकद या फेरीवाल्यांच्या राजेशाहीमध्ये आहे? शिवाय या राजेशाहीमधील लोक स्थानिक गोरगरीब, गरजू लोक असते तर ठीक. गावातली माणसे गावात एक-दोन तास व्यवसाय करून आपली गुजराण करतात पण तसेही नाही. याउलट गाव परिसरातील ज्या महिला भाजीपाला लागवड करून शहरात एक ते दोन तास कोठेतरी आडोशाला बसून भाजी विक्रीचा व्यवसाय करत त्यांच्या पोटावर या फेरीवाल्यांच्या राजेशाहीने गदा आणली आहे. गेल्या दहा-बारा वर्षांपासून फेरीवाल्यांचा प्रश्न अधिक वाढत चालला आहे. हे फेरीवाले दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी आपल्यासह आपले काका, मामा, पुतणे, भाचे यांना घेऊन शहरात येऊन राहत असल्याने नवनवीन अनधिकृत चाळी या लोकांच्या निवासाने सतत भरलेल्या राहतात. पाणी, वीज व अन्य मूलभूत सुविधांवर या लोकांच्या आगमनाने ताण पडतो आणि हे लोक पाच पैशाचा कर पालिकेला अधिकृतपणे देत नाहीत. मग एवढे लाड या लोकांचे कोण आणि कशासाठी करीत आहे. अशी काय शक्ती या फेरीवाल्यांमध्ये आहे की, त्यांना जाब विचारण्याची हिंमत एकामध्येही नाही.