Leading International Marathi News Daily                                    सोमवार ५ जानेवारी २००९

एफबीआयनेच दिले पाकिस्तानला पुरावे
लंडन ४ जानेवारी/पीटीआय
मुंबई हल्ल्यात पाकिस्तानातील काही संशयित दहशतवादी सामील असल्याबाबतचे पुरावे एफबीआयने पाकिस्तानला सादर केले आहेत. पाकिस्तानने मात्र हे पुरावे फेटाळले असल्याचे सांगण्यात येते. दहशतवाद्यांच्या म्होरक्यांनी भारतीय कमांडो आल्याचा संदेश गोळीबार करणाऱ्या दहशतवाद्यांना दिला होता, त्याचबरोबर ते पाकिस्तानात बसून मुंबईतील हल्ल्याचे चित्रण टी.व्ही वाहिन्यांवर बघत होते, असे या पुराव्यात दिसून आले आहे. संडे टाइम्स या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार लष्कर-ए-तय्यबाचा संदेशवहन प्रमुख झरार शाह याने पाकिस्तानातील जाबजबाबात मुंबईत हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांना दूरध्वनीवर सूचना दिल्याचे मान्य केले आहे. एफबीआयने त्याबाबतचे पुरावेही दिले आहेत. दहशतवाद्यांचे पाकिस्तानात बसून नियंत्रण करणाऱ्या दहशतवाद्यांनी या भीषण हल्ल्याचे चित्रण पाहिले व मुंबईत हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांना कमांडो कारवाई सुरू होत असल्याची सूचनाही दिली होती असे या पुराव्यांवरून दिसून आले आहे.

‘एम’ व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे राजकारणाला कुपोषणाची बाधा!
संदीप प्रधान
मुंबई, ४ जानेवारी

लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी राज्यातील बहुतेक पक्षांनी आपली प्रकृती बळकट व्हावी याकरिता वेगवेगळ्या तपासण्या सुरू केल्या असून सर्वच पक्षांनी ‘एम’ व्हिटॅमिनचे प्रमाण वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र जागतिक आर्थिक मंदी व त्याचे देशात दिसू लागलेले परिणाम यामुळे बाजारात सध्या ‘एम’ व्हिटॅमिनची कमतरता निर्माण झाली आहे. अर्थातच सत्तेच्या सिरपमधून मिळेल तेच ‘एम’ व्हिटॅमिन पक्षाला पाजण्याखेरीज दुसरा पर्याय नसल्याने निवडणुकीच्या तोंडावर भ्रष्टाचाराच्या डागांचे ‘साईड इफेक्ट’ अंगावर घेऊन लोकांसमोर जाण्याची जोखीम राजकीय पक्षाच्या मंडळींना पत्करावी लागणार आहे. ‘एम’ व्हिटॅमिनचा नियमित डोस घेणारा व त्यामुळे बाळसेदार दिसणारा महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आहे.

ग्लोबल वॉर्मिगने दिली दुष्काळाची वॉर्निग
अभिजित घोरपडे
पुणे, ४ जानेवारी

ग्लोबल वॉर्मिगमुळे मान्सूनच्या पावसाचे प्रमाण वाढणार असल्याचे मानले जात असले तरी त्याची दुसरी बाजू हवामानशास्त्रज्ञांनी शोधली आहे. त्यानुसार या बदलांमुळे भारतासह मान्सूनच्या प्रदेशाला प्रदीर्घ दुष्काळाला सामोरे जावे लागण्याचा धोका आहे. आशिया खंडात प्राचीन काळी पडलेले प्रदीर्घ दुष्काळ, त्या काळात उत्तर अटलांटिक महासागराच्या तापमानात झालेले बदल यांचा अभ्यास करून हे भाकित वर्तविण्यात आले आहे.
मान्सून हा समुद्र व जमिनीवरील तापमानातील फरकामुळे निर्माण होणारा प्रवाह आहे. ग्लोबल वॉर्मिगमुळे तापमानातील ही तफावत वाढून मान्सूनचा प्रवाह अधिक तीव्र बनेल आणि भारतातील पावसाचे प्रमाण वाढेल, असे मानले जाते. पण याचबरोबर तापमानवाढीचे इतर काय परिणाम होतील याचा वेध पुण्यातील भारतीय उष्णप्रदेशीय हवामानशास्त्र संस्थेचे (आयआयटीएम) संचालक डॉ. बी. एन. गोस्वामी यांनी जगातील इतर शास्त्रज्ञांच्या सहकार्याने घेतला. त्यावरून या बदलांची दुसरी बाजू समोर आली आहे.

विमान इंधनाची तरतूद
मंत्र्यांकडून अध्र्या घासातच गट्ट!
पुणे, ४ जानेवारी/खास प्रतिनिधी

मंदीचे वारे देशभर घोंगावत असताना राज्य मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्र्यांनी गेल्या सहा महिन्यांत शासकीय विमान व हेलिकॉप्टरचा वारेमाप वापर करून सुमारे ६० लाख रुपयांच्या इंधनाचा चुराडा केला. अर्थसंकल्पात वर्षभरासाठी इंधनावर केलेली तरतूद अवघ्या सहा महिन्यांत संपल्याने नव्या मंत्र्यांसाठी पुन्हा तीस लाख रुपयांच्या जादा इंधनाची तरतूद करावी लागली आहे. शासकीय कामकाज, अतिमहत्त्वाचे दौरे, आपद्प्रसंगी घटनास्थळाला भेट, पाहणी अशा कामांसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, तसेच वेळ पडल्यास विशेष बाब म्हणून महसूल मंत्र्यांना शासकीय विमान व हेलिकॉप्टर वापरण्याची परवानगी आहे. शासनाकडे ‘व्हीटी-व्हीडीडी’ एक विमान व ‘व्हीटी-एमजीके’ हेलिकॉप्टर आहे. शासकीय कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या विमान वा हेलिकॉप्टरचा इंधन खर्च शासकीय तिजोरीतून केला जातो. यंदाच्या अर्थसंकल्पात या विमान व हेलिकॉप्टरच्या इंधनासाठी ५८ लाख ६५ हजार रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली होती; परंतु ही तरतूद फारच तोकडी असल्याचे मंत्र्यांनी केलेल्या हवाई दौऱ्यांवरून दिसून आले आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख व माजी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री आर. आर. पाटील यांना नोव्हेंबरमधील मुंबईतील दहशतवादी हल्ल्यामुळे पायउतार व्हावे लागले. नवे आर्थिक वर्ष एप्रिलमध्ये सुरू झाल्यानंतर सहा-सात महिन्यांच्या काळात झालेल्या मंत्रिमहोदयांच्या विमान प्रवासात अर्थसंकल्पामध्ये केलेली सर्व इंधन तरतूद खर्ची पडली. तशी बाब विमानचालन संचालनालयाच्या संचालकांनी राज्य शासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यासंदर्भात संचालनालयाने शासनाला ७ नोव्हेंबर रोजी पत्रही दिले. देशात मंदीचे वारे वाहत असताना आणि राज्याच्या तिजोरीत फारसा खणखणाट नसताना मंत्र्यांच्या विमानोड्डाणाला अतिरिक्त अनुदान देण्यात येणार आहे. या मान्यतेमुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तसेच अतितत्पर सेवेसाठी शासकीय खर्चाने विमान व हेलिकॉप्टर हवेत झेप घेऊ शकणार आहे.

अभियांत्रिकी परीक्षेसाठी यंदा ‘सीमोल्लंघन’ नाही
पुणे, ४ जानेवारी/खास प्रतिनिधी

अखिल भारतीय अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेसाठी (एआयईईई) महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना यंदा राज्यातील परीक्षा केंद्रेच दिली जातील, यासाठी केंद्र सरकारने आवश्यक ती खबरदारी घेतली आहे. त्यामुळेच गतवर्षीप्रमाणे ‘एआयईईई’साठी भोपाळ, अहमदाबाद, अंदमान आदी ठिकाणी सक्तीचे ‘सीमोल्लंघन’ करण्याची वेळ महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर येणार नाही. मनुष्यबळ खात्याच्या राज्यमंत्री डी. पुरंदेश्वरी यांनी आज येथे ही शाश्वती दिली. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभासाठी त्या पुण्यात आल्या होत्या. त्यावेळी ‘एआयईईई’बाबत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाबाबत पत्रकारांनी प्रश्नांचा भडिमार केला. ‘एआयईईई’साठी पुण्या-मुंबईसह राज्यातून गेल्या वर्षी सुमारे ८० हजार विद्यार्थी बसले होते. राज्याबाहेरील परीक्षा केंद्रे देण्यात शेकडो विद्यार्थी परीक्षेला मुकले, तर हजारो विद्यार्थी-पालकांना आर्थिक भरुदडासह मनस्ताप सोसावा लागला. या अन्यायाला ‘लोकसत्ता’ने वाचा फोडली होती. इतकेच नव्हे, तर भोपाळ व अहमदाबादसाठी विद्यार्थी स्पेशल रेल्वेगाडी सोडण्यासाठी पुढाकार घेतला. ‘एआयईईई’बाबत गेल्या वर्षी झालेल्या गैरसोयीबद्दल पुरंदेश्वरी यांनी प्रारंभीच दिलगिरी व्यक्त केली. ‘महाराष्ट्राबरोबरच आंध्र प्रदेशमधील विद्यार्थ्यांना राज्याबाहेरील केंद्रे द्यावी लागली होती. यंदा मात्र आम्ही अर्ज भरण्याच्या प्रत्येक टप्प्यावर, परिस्थितीवर नजर ठेवून आहोत. विद्यार्थ्यांना तीनऐवजी चार केंद्रांचे पर्याय भरण्यास सांगितले आहे. महाराष्ट्रामध्ये पुणे-मुंबई आणि नागपूर येथील परीक्षा केंद्रांव्यतिरिक्त आणखी तीन ठिकाणी केंद्रे देण्यात येणार आहेत. प्रशासकीय त्रुटींमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ दिले जाणार नाही,’ असे आश्वासन पुरंदेश्वरी यांनी दिले.

थंडीचे ६८ बळी
नवी दिल्ली, ४ जानेवारी/पी.टी.आय.

जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांत बर्फवृष्टी झाल्याने उत्तर भारतात थंडीच्या लाटेने आणखी उग्र स्वरूप धारण केले आहे. वाढत्या थंडीमुळे गारठून गेल्या २४ तासांत उत्तर प्रदेशात बाराजण तर बिहारमध्ये गेल्या दोन दिवसांत २२ बळी गेले आहेत. याचप्रमाणे जम्मू-काश्मीरमध्ये तीनजण मृत्युमुखी पडल्याने मृतांची संख्या आता ६८ झाली आहे.
जम्मूतील भारत, गंग्याल व गांधीनगर भागांत कडाक्याच्या थंडीमुळे तीनजण मृत्युमुखी पडले. श्रीनगरचे किमान तापमान ०. २ अंश सेल्सिअस एवढे होते. दिल्लीत तापमानाचा पारा आज ८.१ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला. थंडीबरोबरच धुक्याने दिल्लीला वेढा घातल्यामुळे राजधानीचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
उत्तर प्रदेशात कडाक्याच्या थंडीमुळे गारठून बलरामपूर येथे सहाजण, फत्तेपूर आणि बस्ती येथे प्रत्येकी दोनजण तर गोंडा आणि श्रावस्ती येथे प्रत्येकी एक असे एकंदर बाराजण मृत्युमुखी पडले.
बिहारमध्ये कडाक्याच्या थंडीमुळे गेल्या दोन दिवसांत किमान २२ जणांचे बळी घेतले आहेत. शुक्रवारी रात्रीपासून येथे धुक्यांनी वेढा घातला आहे, असे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले.

बडय़ा आयटी कंपन्यांना धमकीचे इ-मेल
बंगलोर, ४ जानेवारी/वृत्तसंस्था

इन्फोसिस, विप्रो या देशातीलच नव्हे तर जगात अतिबलाढय़ समजल्या जाणाऱ्या आयटी कंपन्यांना ‘तुमची इमारत उडवून देऊ’ अशी धमकी देणारे इ-मेल आल्याने येथील पोलीस यंत्रणा अत्यंत सतर्क झाली आहे. शहरातील एकूण सहा मोठय़ा कंपन्यांना असे इ-मेल आले आहेत. बंगलोरचे संयुक्त पोलीस आयुक्त बी. गोपाल होसुर यांनी दिलेल्या माहितीनुसार या सर्व कंपन्यांना दोन दिवसांपूर्वीच असे धमकीचे इ-मेल आले होते. या सगळ्यांनी तातडीने पोलिसांना त्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी त्वरेने तपासास सुरुवात केली असून सुरक्षाव्यवस्थाही कडक करण्यात आली आहे.

 

लोकसत्ता दिवाळी अंक २००८


प्रत्येक शुक्रवारी

दिवाळी २००८