Leading International Marathi News Daily
सोमवार ५ जानेवारी २००९
भारतीय कंपन्यांनाग्लोबल इंडियन होण्याची हीच संधी
‘सत्या’चा मार्ग स्वीकारा! ‘सत्यम’चा नव्हे!!
वळणावरची खरेदी
भविष्यातील माहिती तंत्रज्ञान
व्यापारी मित्र-मराठी उद्योजकांचा आधारवड
लक्ष्मीची पावले
बँकांविषयी सर्वकाही
यशोगाथा
वाटा स्वयंरोजगाराच्या
शेअर बाजारात फिट कसे राहाल?
माधवराव भिडे
एक ‘श्रीमंत’ व्यक्तिमत्त्व

जानेवारी २००९- नवीन वर्ष! आपण टीव्हीवर चॅनेल्स बदलावीत तसे नियतीने २००८ मध्ये वेगवेगळ्या घटना घडवल्या! जे होत आहे ते चांगल्यासाठीच ही म्हण तर २००८ ने साफ खोटी ठरवली. देशांतर्गत आणि बाहेरच्या जगात खूप मोठय़ा घटना घडल्या व त्या खूप वेगाने घडल्या. काही घटनांचे विश्लेषण आपण करू शकू तर काहींचे करता येणार नाही, अशा घटना फक्त धडे शिकवण्यासाठीच होत असतात असे समजायचे आणि पुढे जात राहायचे. जगात सुरक्षित असे काहीही नाही व कुठलीही गोष्ट ही ‘कायम’ स्वरूपाची नसते!

 


९/११ नंतरचे अमेरिकेचे आर्थिक धोरण, सर्व नियम बाजूला ठेवून कर्ज देण्याचा सपाटा आणि स्वस्त दराने पैसे मिळतात म्हणून अंगात भिनलेल्या चंगळवादामुळे अमेरिकेत ‘हाऊसिंग सबप्राईम’ घडले. तिथल्या कनिष्ठ मध्यमवर्गातील लोकांनी घरासाठी मोठमोठी कर्जे घेतली. एकीकडे ती त्यांना वेळेवर परत करता आली नाहीत आणि दुसरीकडे घरांच्या किमती कोसळल्यामुळे बँकांना त्यांचे पैसे घर विकूनसुद्धा परत मिळवता आले नाहीत. या सबप्राईमची नीट माहिती जर अमेरिकेच्या व जगातल्या वित्तीय संस्थांना आणि क्रेडिट रेटिंग एजन्सीजना त्वरेने उपलब्ध झाली असती व त्या माहितीचे नीट विश्लेषण ते ताबडतोब करू शकले असते तर कदाचित थोडे चित्र वेगळे दिसले असते. किंबहुना मी तर म्हणेन की अमेरिकन बँकांना आणि इतर संबंधित लोकांना जर या माहितीवरून खऱ्या परिस्थितीची उकल करता आली असती तर कदाचित थोडय़ा प्रमाणात तरी आर्थिक अरिष्ट कमी करता आले असते. इंटरनेटमुळे जग जवळ आले, आपल्याला हवी ती माहिती आपण क्षणाताही विलंब न लावता मिळवू शकतो. पण अजूनही आपण कुठल्याही विषयाच्या ‘माहिती’चे अभ्यासपूर्ण व उपयुक्त असे विश्लेषण करत नाही.
ज्या मोठय़ा आणि चांगल्या घटना २००८ मध्ये घडल्या, त्यात (१) भारतीय अवकाशयान- चंद्रयान- १ची यशस्वी झेप, (२) बीजिंगमध्ये अभिनव बिंद्राचे सुवर्णपदक, (३) रतन टाटांची नॅनो कार, (४) अमेरिकेचे नवे अध्यक्ष म्हणून बराक ओबामांची निवड, (५) भारत-अमेरिका यांच्यात अणुकरार, (६) पाकिस्तानात निवडणुका होऊन जनरल मुशर्रफ यांची हकालपट्टी आणि (७) सात वर्षांनी बांगलादेशात पुन्हा निवडणुका. या यशाच्या आनंगावर विरजण पडले ते अमेरिकेतून सुरू झालेल्या आर्थिक मंदीमुळे आणि शेवटी मुंबईवरील अतिरेक्यांच्या हल्ल्यामुळे.
आज आपल्या देशाला मनमोहन सिंग यांच्यासारखे अत्यंत स्वच्छ प्रतिमा असलेले पंतप्रधान लाभलेले आहेत. ते उच्चविद्याविभूषित व अनुभवी आहेत. आर्थिक अरिष्ठ आल्यापासून त्यांनी देशाला व आपल्या अर्थव्यवस्थेला अजून कोलमडू दिलेले नाही. इतर देशांच्या तुलनेत फार झपाटय़ाने योग्य ती पावले उचलून भारतीय कंपन्यांचा विश्वास संपादन केलेला आहे. परिस्थिती गंभीर असली तरी गोधळून जाण्याइतपत हाताबाहेर नक्कीच गेलेली नाही आणि आपली बँकिंग सिस्टीम जगातील इतर देशांच्या तुलनेत खूप मजबूत आहे, हा एक भक्कम आधार आहे.
परदेशी भांडवल काही काळ तरी येणार नाही म्हणून पायाभूत सुविधा पुरवणाऱ्या कंपन्यांना भांडवलाची चणचण जाणावणारच आहे. त्यामध्ये वीज, रस्ते व पूल, टेलिकॉम, ऑईल व गॅस,बंदर व जहाज इत्यादींचा समावेश होतो. या कामांसाठी होणाऱ्या दिरंगाईमुळे सिमेंट व स्टील, इंजिनीअरिंग व बांधकाम अशा मोठय़ा प्रमाणात रोजगार देणाऱ्या उद्यागांवर गंभीर परिणाम दिसून येईल. म्हणून अशा उद्योगांसाठी कदाचित आपल्याला ‘आऊट ऑफ द बॉक्स’ असा विचार करावाच लागेल.
१४००० वरून २०००० चा सेंसेक्स व त्यानंतरच्या लक्षणीय वाढीला काहीही बेस नव्हता. सेंसेक्सचे नवे नवे उच्चांक ही काही आपल्या अर्थव्यवस्थेची प्रगती कधीच नव्हती, कारण सेंसेक्स म्हणजे आपली अर्थव्यवस्था नाही हे आपण प्रथम लक्षात घ्यायला पाहिजे. २००८ च्या सुरुवातीला हवेत तरंगणाऱ्या आपल्या कंपन्या आणि त्यांचे मालकवर्ग चांगलेच जमिनीवर आलेले आहेत व ८५०० च्या सेंसेक्सने तर त्यांच्या अस्तित्वालाच प्रश्नचिन्ह लावले आहे. अशा परिस्थितीत त्यांनी ‘सत्या’चा मार्ग सोडून ‘सत्यम’चा मार्ग स्वीकारला नाही तरच नवल! अशा वेळेस आत्मघातकी निर्णय न घेता कठोर आत्मपरीक्षण करण्याची व गेलेला आत्मविश्वास परत मिळवण्याची गरज आहे.
आपल्या तयार वस्त्रोद्योग, आऊटसोर्सिग, पर्यटन व्यवसाय, हॉटेल-उद्योग या उद्योगांवर परिणाम हे होणारच आहेत. काही प्रमाणात नोकर कपात ही करावीच लागेल. काहींना कदाचित त्यांचे व्यवहार बंददेखील करावे लागतील. जेव्हा जेव्हा गुंतागुंतीची, नाजूक परिस्थिती आली, तेव्हा भारतीय उद्योगाने त्याचा धैर्याने मुकाबला केलेला आहे आणि यापुढेही करेल. कुठलाही निर्णय घाईगडबडीने घ्यायची गरज नाही. पण जर वेळ आलीच तर निर्णय घ्यायला घाबरू नका. व्यवहार व भावना यांची गफलत होता कामा नये, ही काळजी घ्या.
२००९ साल हे जरी वर वर शांत दिसणारे असले तरी माझ्या मते हे साल बऱ्याच भारतीय कंपन्यांना महत्त्वाचे ठरणार आहे.
खरी गरज आहे ती आपल्या भारतीय कंपन्यांनी जरा मोठी स्वप्ने बघण्याची व थोडा वेगळा विचार करण्याची. आज कधी नव्हे ते इतक्या चांगल्या कंपन्या, युरोप, अमेरिका व जगातल्या इतर देशात खूपच स्वस्त दरात उपलब्ध आहेत. त्यांचा त्वरेने, नीट अभ्यास करून, थोडे आक्रमक होऊन त्या विकत घेतल्या पाहिजेत. या कंपन्यांकडे चांगले चांगले प्रॉडक्ट आहेत, नवीन तंत्रज्ञान आहे, मशीन्स आहेत. मुंबई शेअरबाजारात आपल्या कंपनीचा भाव किती उतरला किंवा वधारला याचा हिशोब करण्याची ही वेळ मुळीच नाही. मी तर म्हणेन की काही निवडक भारतीय कंपन्यांनी आपले मुख्य कार्यालय युरोप किंवा अमेरिकेत नेले पाहिजे. निदान ज्या कंपन्यांकडे आज पैसे उभे करण्याची ताकद आहे, त्यांनी आपले नशीब आजमावयालाच पाहिजे. जोपर्यंत आपण जगाला आपले घर समजत नाही तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने ‘ग्लोबल इंडियन’ होणार नाही.
२००८ची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आज प्रत्येक कंपनी पैसे वाचवण्याचे मार्ग शोधताना दिसत आहे. ही माझ्या मते सर्वात मोठी गोष्ट म्हणायला काही हरकत नसावी. अगदी रिलायन्स इंडस्ट्रीजनेसुद्धा ‘मिशन कुरुक्षेत्र’ हे कठीण काळाला तोंड देण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलेले आहे. इतर भारतीय कंपन्यांनी-कुणी दरवर्षांची पगारवाढ दिली नाही तर कुणी बोनस. काहींनी नवीन भरतीला पूर्णविराम दिला आहे. मार्केटिंग व व्यवस्थापनावर खर्च कमी केला जात आहे. काहींनी तर क्षुल्लक समजले जाणारे सर्व खर्च, म्हणजे बिझनेस क्लासऐवजी इकॉनॉमी क्लासने प्रवास करणे, पंचतारांकित हॉटेलमध्ये न राहता कंपनी गेस्टहाऊसमध्ये राहाणे, कागदाच्या दोन्ही बाजूने प्रिंट करणे व गरज नसेल तर प्रिंटच न करणे, टेलिफोन कॉल मॉनिटर करणे, वार्षिक पिकनिकला न जाणे, नवीन वर्षांचे कॅलेंडर न छापणे, कुठलीही भेटवस्तू न देणे हे मार्ग स्वीकारले व ते पैसे वाचवत आहेत. हे सर्व करीत असताना; प्रत्येक कंपनीच्या बॉटम लाइनवर किती फरक पडेल याचे नेमके उत्तर मिळायला अजून वेळ लागेल. पण शिस्त लागायला सुरुवात झाली आहे हेही नसे थोडके.
मराठी उद्योजकांनी गेल्या दहा वर्षांमध्ये मोठी प्रगती केली आहे. जगात आज अमेरिका, जपान, ब्रिटन, जर्मनी आणि इतर १५ देशांत मंदीची सुरुवात आहे. त्यांच्या देशात त्यांच्या प्रॉडक्टना उठाव नाही आणि भारतात अजून किती तरी चांगले प्रॉडक्टच आलेले नाहीत व ते पूर्णपणे आयात करणे कदाचित परवडणारे नाही. अ शा वेळेस जर चांगले प्रॉडक्ट तुम्हाला इतर कंपन्यांकडून परवाना तत्त्वावर मिळाले तर भारतीय बाजारपेठेत ती आणून, तुम्ही स्वत: ती बनवून त्याचे मार्केटिंग करू शकता. जर तुमची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट त्यांच्या तुलनेने कमी असेल तर तीच कंपनी तुमच्याकडून बल्क पुरवठा घेऊ शकते. आपल्या सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर, पुणे व कोंकण अशा ठिकाणी किती तरी उद्योग समूह आहेत की ज्यांनी अजूनपर्यंत संपूर्ण भारतात देखील आपली ओळख नेलेली नाही. त्यांनी किमान संपूर्ण भारतात आणि काही छोटय़ा देशात आपले अस्तित्व निर्माण करायला काहीच हरकत नाही. ज्यांची दुसरी किंवा तिसरी पिढी आज बिझनेसमध्ये आहे. निदान अशांनी तरी देशाबाहेर आपले साम्राज्य उभे करायलाच पाहिजे.
एक धडा ‘रॅनबॅक्सी’चा. गेल्या वर्षी जपानच्या दाई-इचि या सर्वात मोठय़ा कंपनीने भारतातील अग्रगण्य औषध कंपनी रॅनबॅक्सीवर ताबा मिळवला. रॅनबॅक्सी ही कंपनी पद्मश्री भाई मोहन सिंग यांनी त्यांचे चुलत भाऊ रणजित सिंग व गुरुबक्ष सिंग या दोघांच्या पहिल्या दोन अक्षरांवरून १९६१ साली सुरू केली. सुरुवात त्यांनी जपानच्या एका कंपनीचे प्रॉडक्ट भारतात वितरित करून केली व कालांतराने ती जपानी कंपनीच विकत घेतली. त्यानंतर आपल्या कंपनीचे प्रादेशिक मुख्यालय, ब्रिटन व अमेरिकेत व उत्पादन अमेरिका, ब्राझिल, जर्मनी, फ्रान्स, व्हिएतनाम, साऊथ आफ्रिका व किती तरी देशात उभारले. पूर्णपणे भारतीय मालकीची पण सर्वार्थाने एक ग्रांड मल्टिनॅशनल असलेली ही कंपनी! त्यांचा पूर्ण विस्तार हा काही योगायोग नाही. तर प्रचंड मेहनत, कल्पकता आणि धाडस यांच्या जोरावर उभे केलेले एक साम्राज्य! पण नुसते एक साम्राज्य उभे करून त्यांची भूक भागली नव्हती. म्हणून, ज्यावेळेला त्यांना वाटले की आता आपण ही कंपनी आणखी वाढवू शकत नाही व त्याची योग्य किंमत येऊ शकते, त्यांनी ती विकून टाकली आणि झपाटय़ाने दुसरे साम्राज्य उभे करायला सज्ज झाले. मुख्य म्हणजे कुठेही त्यांनी हा प्रश्न प्रतिष्ठेचा किंवा भावनेचा केला नाही. मराठी उद्योगातल्या नवीन ताऱ्यांनी, रॅनबॅक्सीचा पूर्ण प्रवास एक केस स्टडी म्हणून बघायला काही हरकत नाही.
थोडे सामान्य माणसांच्या दृष्टीने २००८ने काय चांगले दिले ते पाहू या. सगळ्यात पहिले म्हणजे जमिनीचा भाव गगनाला भिडवणाऱ्या बिल्डरांना चांगलेच जमिनीवर आणले व काही तर परिस्थितीच्या धास्तीने जमिनीखाली गेले देखील. रियल इस्टेट मार्केट आता ‘रिअल’ राहिलेले नाही. त्यांच्या शेअरचे काय होणार हे कुबेरदेखील सांगू शकणार नाही. निदान २०१० साल संपेपर्यंत नक्कीच नाही! याच बिल्डरांनी सामान्य माणसाच्या घराची कल्पना म्हणजे वन रूम किचन नष्ट केली होती. तिचे पुन्हा नव्याने आगमन झाले आहे ही आनंदाची बाब आहे व तिचा मध्यमवर्गाने पुरेपूर फायदा घ्यायला पाहिजे. हेच वन रूम किचन आता बिल्डरांना संजीवनी देण्याचे काम करणार आहे.
दुसरे चांगली गोष्ट म्हणजे जे शेअर आपण कधी स्वप्नातही घेऊ शकणार नाही अशी अवस्था २००८च्या सुरुवातीला होती, ते सगळे चांगले शेअर आता अगदी मातीमोल किमतीमध्ये मिळत आहेत. माझी खास विनंती आहे की तुम्ही जरी आजपर्यंत कुठल्याही कंपनीचा एकही शेअर घेतलेला नसेल तरी पुष्कळ वर्षांनी आज चांगले शेअर घेऊ शकता व ते तुम्हाला मोत्याचे मोल देऊ शकतात. आपल्या कुटुंबासाठी सोने घेण्यापेक्षा अशा शेअरमधील गुंतवणूक तुम्हाला कितीतरी पटीने मोबदला देईल.
२००८ सालाने एक वादळ निर्माण केले. बरीच पडझड झाली. जगभर सगळ्यांच्याच मनात अजून एक साशंकताही आहे. २००९ सालात अजून काय ‘सरप्राईझेस’ देईल कोणालाच सांगता येत नाही. भारतीय कंपन्यांना काही आव्हानांना तोंड द्यावे लागेल. आव्हानांतच संधी असते. ती सांगून कधीच येत नाही. विचार करायला वेळ देत नाही आणि गेल्यावर परतही येत नाही!
’ नितीन पोतदार, कॉर्पोरेट लॉयर
जे. सागर असोशिएट्स/९८२००५४७७