Leading International Marathi News Daily
सोमवार ५ जानेवारी २००९
भारतीय कंपन्यांनाग्लोबल इंडियन होण्याची हीच संधी
‘सत्या’चा मार्ग स्वीकारा! ‘सत्यम’चा नव्हे!!
वळणावरची खरेदी
भविष्यातील माहिती तंत्रज्ञान
व्यापारी मित्र-मराठी उद्योजकांचा आधारवड
लक्ष्मीची पावले
बँकांविषयी सर्वकाही
यशोगाथा
वाटा स्वयंरोजगाराच्या
शेअर बाजारात फिट कसे राहाल?
माधवराव भिडे
एक ‘श्रीमंत’ व्यक्तिमत्त्व

काळाचा महिमा पाहता आपण आपल्या दृष्टिकोणातून युगाची व्याख्या करतो. कोणासाठी हे ‘प्लास्टिक युग’ आहे, कोणासाठी हे ‘आध्यात्म युग’ आहे, कोणासाठी ‘विज्ञान युग’, ‘कॉम्प्युटर युग’ तर कोणासाठी हे ‘माहिती तंत्रज्ञान युग’ आहे. युग कोणतेही असले तरी त्याकडे आपण विज्ञानाचाच एक आविष्कार या जाणिवेतून पाहात असतो आणि अनुभवत असतो, कारण ‘विज्ञान’ ही एक ‘निर्मिती’ची सूत्रांवर आधारलेली ‘घडवण्या’ची ‘कला’ आहे.
आज आपल्या जीवन परिवर्तनाच्या वेगाचा विचार केल्यास आपल्याला जाणवते की, आता ‘विज्ञान’ हे केवळ ‘विज्ञान’ राहिलेले नसून ‘विविध’ ‘ज्ञाना’ने भरलेले ‘ज्ञानाचे भांडार’ होत आहे. भौतिक, रसायन, जीव, पर्यावरण, अंतराळ, तंत्रज्ञान तसेच संशोधन यांसारख्या विविध विभागात विज्ञान पसरलेले आहे. विज्ञानाच्या कक्षाही आता खूप रुंदावत आहेत आणि गंमत म्हणजे या सर्व कक्षा एकाच कडीने जोडल्या जात आहेत, त्या

 

कडीला ‘आयटी’ किंवा ‘इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी’ आणि मराठीत ‘माहिती तंत्रज्ञान’ असे म्हणतात.
कॉम्प्युटर असो की मोबाईल, घर असो की बाजार, शिक्षण असो की व्यवसाय वा छंद असो की चर्चा ‘आयटी’ हा शब्द आता आपल्याला परवलीचा झाला आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या कक्षेतील नवनव्या विभागांपैकीच पुढील काही महत्त्वाच्या अर्टिफिशियल इंटेलिजन्स, ई गव्हर्नन्स, अ‍ॅटोमेशन, रोबोटिक्स, कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स तथा मल्टीमीडिया यांसारख्या विविध नेक्स्ट जनरेशन टेक्नॉलॉजींचा आढावा घेतल्यास भविष्यात येणाऱ्या बदलांचा वाटेकरी होण्याची संधी आपण साधू शकतो किंवा प्रत्येकातच जो एक शास्त्रज्ञ दडलेला आहे त्याला आपण वाव देऊ शकतो किंवा किमान एक सामान्य उपभोक्ता या वृत्तीने माहिती तंत्रज्ञानाची किमया जाणून घेऊ शकतो.
सर्वप्रथम आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय)चा विभाग पाहू, ज्याला आपण मराठीत ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ किंवा ‘कृत्रिम प्रज्ञा’ असे संबोधतो. कॉम्प्युटरचा मेंदू म्हणजे ‘सीपीयू’ (प्रोसेसर), याला आपण जशी आज्ञा देऊ तसे तो काम करतो. आपल्याला माहीत आहे की कॉम्प्युटरला स्वत:चा मेंदू असला तरी तो स्वत:चे डोके चालवू शकत नाही. कॉम्प्युटर एक सांगकाम्या आहे. टायपिंग, प्रिन्टिंग, पावती, बॅलेन्सशीट तयार करणे, चित्र काढणे, प्रक्रिया संचलन, माहिती व्यवस्थापन यासाठी आपण उपलब्ध असलेल्या समर्पक संगणकीय भाषा शब्द समूहातून आज्ञावली तयार करतो किंवा तयार असलेल्या आज्ञा या कॉम्प्युटरच्या प्रणालीतून वापरत आपण आपले कार्य पूर्ण करून घेत असतो, हे झाले नेहमीचे रुटीन.
काळ बदलतोय तसे सीपीयू व आज्ञावली पण प्रगत होत आहेत, ही आपणासाठी एक चांगली बाब आहे. या समंजस आणि सशक्त प्रणालीसाठी समजूतदार आज्ञावलींची निर्मिती करून कॉम्प्युटरला म्हणजे प्रोसेसरला आता स्वत:चे डोके चालवण्यास सक्षम करण्याचे म्हणजे कृत्रिम बुद्धिमता देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यात बऱ्याच अंशी यश येत आहे तसे आपल्याला नवनवीन स्मार्ट आज्ञावलींची निर्मिती करण्याची गरज निर्माण झाली आहे आणि याच बरोबर आपली या प्रणालीवर चांगले संस्कार घडवण्याची जबाबदारीपण वाढत आहे.
या ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ किंवा ‘कृत्रिम प्रज्ञा’ची घरातील उदाहरणे द्यावयाची झाल्यास, जाहिरातीमध्ये आपण पाहात आहोत की, फ्रिज चालू-बंद अथवा त्यातील थंडावा कमी-जास्त करण्यासाठी माणसाची गरज नाही. वेळ काळ आणि गरज ओळखून फ्रिज आपोआप स्वत:ला ‘अ‍ॅडजेस्ट’ करून घेतो, कारण ‘उसे पता है!’, वॉशिंग मशीन, मायक्रोव्हेव ओव्हन, डिजिटल कॅमेऱ्यातील अ‍ॅटो अ‍ॅड्जेस्ट वगैरे वगैरे..!
वैद्यकीय क्षेत्रात वापरण्यात येणाऱ्या या ‘एआय’ प्रणाली रुग्णाची माहिती आपल्या साठवलेल्या असंख्य विश्लेषणांशी ताडून बघत संभाव्य रोगांचे निदान त्याचबरोबर त्यावरील औषधांची उपाययोजना यांची माहिती देते. बांधकामविषयक प्रणाली डिझाईनपासून ते उभारणीपर्यंत बऱ्याचशा किचकट आकडे व आकृतीमोडींना फाटा देत किती तरी विविध पर्यायांसह निर्णय घेण्यासाठीचे आपले काम सुखावह करतात. उद्योग, स्वयंचालन, संशोधन, संरक्षण अशा कितीतरी क्षेत्रात या ‘एआय’ प्रणालींचा वापर होत आहे, भाषा क्षेत्रात तर याचा उपयोग बहुभाषिक भाषांतर तसेच शिक्षण यासाठी केला जात आहे. थोडक्यात सांगितले तर ‘एआय’ ही हळूहळू प्रत्येक क्षेत्राचीच गरज होत आहे.
अ‍ॅटोमेशन, स्वयंचालन हा एक सर्वच क्षेत्रात आढळणारा प्रकार असून ऑफिस अ‍ॅटोमेशन, इंडस्ट्रियल अ‍ॅटोमेशन, प्रकल्प अ‍ॅटोमेशन, होम अ‍ॅटोमेशन इ. करिता माहिती तंत्रज्ञान दिवसेंदिवस प्रगत होत आहे. इतके दिवस आपण कार्यालयीन कामात इंटरनेटच्या माध्यमातून व्हिडीओ कॉन्फरेंसिंग प्रकार ऐकून किंवा वापरून होतो तर लवकरच मोबाईल माध्यमातूनदेखील ही सोय आपल्याला घेता येणार आहे. दैनंदिन कामकाजात वापर होणाऱ्या झेरॉक्स, हजेरी, डॉक्युमेंटेशन अशा कितीतरी कामांसाठी आयटीचा वापर अनिवार्य होत आहे.
इंडस्ट्रियल अ‍ॅटोमेशन आणि प्रकल्प अ‍ॅटोमेशन हा तर नव्या पिढीतील निर्माण होणाऱ्या उद्योगाचा मूलमंत्र आहे. काच, कापड, सीमेंट, पोलाद, वाहन सारख्या विविध क्षेत्रात निर्मितीपासून ते उत्पादन व्यवस्थापनापर्यंत ‘एका क्लिक वर सर्व काही’ अशा ध्येय धर्तीवर आयटी उत्पादने वापरात येत आहेत. बसल्या जागी कारखान्यातील प्रक्रिया, देखभाल, नियंत्रण व आढावा यासाठी पीएलसी, स्कॅडा, डीसीएस इ. यंत्रणा कार्यान्वित होत आहेत.
स्वयंचलनाचा फायदा तर काटेकोर उत्पादन, कमी मनुष्यबळ, अविरत शास्त्रशुद्ध कार्य तर आहेच आहे पण त्याच बरोबर प्रक्रिया सुसंगत राहण्यासाठी यातील अनाउंसिएल यंत्रणा जेव्हा सांगते की, हा अमुक पार्ट किंवा भाग खराब होत आहे त्याला बदला, इथे हे कमी आहे किंवा तिथे ते जास्त होत आहे वगैरे वगैरे तेव्हा तर आयटीची जादू अनुभवणे ही एक अनोखी अनुभूती असते. होम अ‍ॅटोमेशन, अ‍ॅटोमेटेड सुखसुविधा असलेल्या घरांची सुरुवात तर आता पुण्यातही झाली आहे.
रोबोटिक्स ही एक स्वयंचालन प्रकारातील कॉम्पॅक्ट निर्मिती आहे. नेमून दिलेले ठराविक काम करणे हे या यंत्रणेचे कार्य आहे. यात ही यंत्रणा काही वेळेस सभोवार फिरून कार्य करण्यास स्वयंसिद्ध असते किंवा त्या प्रकाराने वापरली जाते. परग्रहावरील मातीचे नमुने गोळा करणे, छायाचित्रण करणे, मानवाला अवघड असतील अशा पर्यावरणात कार्य करणे, इ. जबाबदारी हे क्षेत्र लिलया पेलत असते.
हॉलीवूड चित्रपटांतून आपण विविध प्रकारचे रोबोट अवतार आणि याचे कार्य त्याचा आवाका बघून अचंबित होत असतो. मनोरंजनाचा भाग सोडल्यास भविष्यातील येणाऱ्या पिढींचा तो वर्तमानकाळ असू शकेल यात शंका वाटत नाही. विविध कार्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या रोबोटच्या जातीसुद्धा आहेत हे कळल्यावर तुम्हाला नक्कीच हसावे की रडावे असे वाटेल पण जसे तुम्हाला वाटले तसे इथे नाही कारण इथे आपण बरे नि आपले काम बरे असे तत्त्व बाळगले जाते, या जाती एंड्रॉइड्स, ह्युमनॉइड्स वगैरे वगैरे. माणसासारखी बांधणी व कार्यासंबंधी असणाऱ्या रोबोट्सना ह्युमनॉइड्स म्हणतात.
ई गव्हर्नन्स, इलेक्ट्रॉनिक गव्हर्नन्सबद्दल सारांशात सांगायचे झाले तर सरकारी अथवा निमसरकारी संगणकीय इलेक्ट्रॉनिक दस्तावेज तथा कार्यालयीन कामकाज, यामुळे वेळेची तर बचत होतेच त्याबरोबर कामातील पारदर्शकपणा वाढून नागरिकांना व कर्मचाऱ्यांना नेमक्या माहितीची देवाणघेवाण करणे सोपे जाते. आता भारतातदेखील दळणवळण, शिक्षण, स्वास्थ्य, प्रशासनिक सेवा, सुविधा, नागरी संरक्षण, राज्य, केंद्र, पालिका पंचायत, इ. च्या कामकाजात ई. गव्हर्नन्सचा वापर होत आहे. आपले लाइट बिल, घराचा टॅक्स, शेताचा सातबारा, परीक्षांचे निकाल, तिकीट आरक्षण, इ. सारख्या गोष्टी आपल्याला इंटरनेटच्या माध्यमातून मिळत आहेत तर लवकरच हे काळानुसार मोबाईलवर मिळणे शक्य होत जाणार आहे. उद्योग जगत आपल्या ग्राहक, कर्मचारी, व्यवस्थापन, निर्माण, वितरण, भांडार यातील समन्वय ठेवणाऱ्या सॅप तथा इआरपीसारख्या प्रणाली वापरून कामकाज सुलभ तसेच शिस्तशीर करण्याच्या पद्धतीचा अवलंब करण्यासाठी पुढे येत आहे. बँकादेखील आपल्या ग्राहकांना एनी टाईम मनी (एटीएम), इंटरनेट बँकिंग, मोबाईल बॅकिंग तथा आपल्या खात्यातील व्यवहार एका बोटाच्या स्पर्शावर आणून देत आहेत. न्यूजपेपर्स आपल्या छापील आवृत्तीसोबतच इंटरनेट आणि मोबाइल आवृत्ती प्रकाशित करत आहेत ज्यात आपल्याला काही बातम्यांचे संदर्भ व्हिडीओसुद्धा पाहता येतात, आपल्या प्रतिक्रियाही नोंदवता येतात.
कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स हा साधारणत: घरगुती उत्पादनाशी जोडला गेलेला आयटीचा शब्द प्रकार आहे. यात कॉम्प्युटर, मोबाईल, मुलांची खेळणी, टीव्ही, फ्रिज, मिक्सर, फूड प्रोसेसरपासून ते दरवाजाच्या बेल, लाईटच्या तोरणमाळेपर्यंत किंवा स्वयंपाकघरापासून ते दिवाणखाना बैठक, अंगण, बगीचापर्यंत जी काय इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने आपण वापरतो ती कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स या सदराखाली येतात. भविष्यात याबद्दल बोलायचे झाल्यास मी फक्त दोनच शब्द सांगू शकेन ते म्हणजे एक ‘अरेच्च्या’ आणि ‘अहाहा’ कारण नुकतेच पाच रुपयाला एक लॉलीपॉप घेतले, त्याला दाबले की त्याच्या चॉकलेटमध्ये लाईट लागतो तर खाऊन झाल्यावर त्याचा छोटय़ा बॅटरीसारखा काही काळ वापर करता येतो. मोबाईल तंत्रज्ञानातील माझ्या जागतिक मान्यताप्राप्त तांत्रिक आराखडय़ाच्या वापरामुळे तर दीडशेपेक्षा जास्त सोयीसुविधा असलेला, अंध अपंगांनादेखील वापरता येणारा, बॅटरी आणि सोलारवर चालणारा आणि पाहिजे त्या आकार रंग स्वरूपात मिळणारा कॅमेरा मोबाईल फोन जगात केवळ रु. २० किंवा त्यापेक्षाही कमी किमतीत लवकरच उपलब्ध होणार आहे. असंख्य उत्पादने, असंख्य क्लृप्त्या, असंख्य आकार आणि उपयोगिता यांचा सतत बदलत राहणारा हा प्रवाह आहे.
मल्टीमीडिया हे माहिती तंत्रज्ञानाचे दृक्श्राव्य माध्यम आहे. प्रिंट, केबल, नेट या त्रिसूत्रीसह चित्रपट, प्रकाशन, प्रोसेस सिम्युलेशन, खेळ, व्हिज्युअल इफेक्टस्, अ‍ॅनिमेशन यातील क्रिएटिव्ह रंगसंगती सोबत आवाज तथा संगीताचे योग्य मिश्रण वापरून मनमोहक कलाकारी आणि अदाकारी चितारण्याचा तसेच वापरण्याचा खजिना असेही म्हणता येईल. बच्चे कंपनीचे टीव्हीवरील कार्टून, उत्पादन आणि सेवा यांच्या कॅची जाहिराती, गृहिणींच्या आवडत्या सिरियल्स, लाडक्या भगिनींचे लाडके चित्रपट, बाबा- आजोबांसाठीच्या बातम्या, हवामानाचा अंदाज या प्रत्येकातच मल्टीमीडियामुळे एक जान येते.
भावी मल्टीमीडिया तंत्रात डिजिटल एन्व्हायरन्मेंटसाठी प्रगत स्टीरिओ डेटाच्या वापराने निर्मितीला त्रिमिती आयाम, थ्रीडी देऊन प्रकाश, आवाज, रंग, वातावरण यांसारख्या स्थळ, काळ आणि वेळ घडवणाऱ्या मानांकांना सोयीस्कररीत्या वापरून सत्य वाटणाऱ्या आभासी जगाची निर्मिती आणि सफर करता येईल. चित्रपटगृहात जंगलाचा देखावा पाहताना थंडी, गरमी, फुलांचा सुगंध, सूर्यकिरणांची तिरीप, पेटलेल्या शेकोटीची ऊब, पक्ष्यांचा चिवचिवाट, कोणत्याही दिशेने आलेली हाक, पाण्याच्या खळखटासह आपण जंगलातच आहोत की काय? असा हमखास भास होईल. सुरू असलेल्या चित्रपटाची कथादेखील आपल्याला आवडलेल्या पर्यायानुसार घडवता येईल यासाठी चित्रपटगृहातदेखील बरेच बदल घडून आणावे लागणार आहेत. माहिती तंत्रज्ञानामुळे मानवी जीवनात जसे चांगले बदल होत जाणार आहेत तसे याची दुसरी बाजूदेखील विचारात घ्यावी लागणार आहे. सोपस्कार उपाय म्हणून सांभाळून राहणे आणि स्वाभाविक मानवी मानसिकता योग्य रीतीने हाताळत आनंदी जीवन जगणे याची आपल्याला सवय करावी लागणार आहे. काळजी घेणे चांगले असले तरी फार काळजी करण्याची गरज नाही. आपण तर येणाऱ्या माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतिकारी पर्वाचे स्वागत करण्यास सिद्ध आहोत. जो होगा सो अच्छा ही होगा?
दिनकर बोर्डे
माजी तंत्रज्ञान सल्लागार- भारत सरकार
मो. ९४२२०५५१६०