Leading International Marathi News Daily
सोमवार ५ जानेवारी २००९
भारतीय कंपन्यांनाग्लोबल इंडियन होण्याची हीच संधी
‘सत्या’चा मार्ग स्वीकारा! ‘सत्यम’चा नव्हे!!
वळणावरची खरेदी
भविष्यातील माहिती तंत्रज्ञान
व्यापारी मित्र-मराठी उद्योजकांचा आधारवड
लक्ष्मीची पावले
बँकांविषयी सर्वकाही
यशोगाथा
वाटा स्वयंरोजगाराच्या
शेअर बाजारात फिट कसे राहाल?
माधवराव भिडे
एक ‘श्रीमंत’ व्यक्तिमत्त्व

व्यापारी मित्र-मराठी उद्योजकांचा आधारवड
चालू जानेवारी २००९ मध्ये पुण्याच्या व्यापारी मित्र मासिकाने ६० व्या वर्षांत पदार्पण केले आहे. याबद्दल या मासिकाचे संपादकीय मंडळ व कर्मचारी वर्ग यांचे अभिनंदन, हे मासिक जी. डी. शर्मा यांनी १९५० साली सुरू केले व या मासिकाला आता ५९ वर्षे पूर्ण होऊन त्याने आता ६०व्या हीरक महोत्सवी पदार्पण वर्षांत केले आहे. हे मासिक खास करून व्यापारी, कारखानदार, धंदेवाले, दुकानदार, चार्टर्ड अका., कॉस्ट अका., करसल्लागार, दिवाणजी, करदाते, कर अधिकारी, कॉलेज, सहकारी संस्था, विमा एजंट, विद्यार्थी यांच्यासाठी उपयोगी आहे. तसे म्हणाल तर शर्मा कुटुंबीयांनी स्वत:ला या मासिकाच्या कामात पूर्णपणे झोकून दिले आहे. सध्या जीडीजी,

 

पुरुषोत्तमजी व सोहनलालजी ही त्रिमूर्ती ऊर्फ ब्रह्मा विष्णू महेश या व्यापारी मित्र मासिकाचे सर्वकाही व्यवस्थापन पाहत आहेत. म्हणून सर्वप्रथम व्यापारी मित्र मासिकाने हीरक महोत्सवी वर्षांत पदार्पण केले असल्यामुळे सर्व वाचक वर्गातर्फे व्यापारी मित्र मासिकाचे खास अभिनंदन! तसेच हे मासिक हळूहळू अमृत महोत्सवी व त्यानंतर शतक संवत्सरीत पोहोचो ही आम्हा सर्व वाचकांतर्फे शुभेच्छा!
नावावरून हे मासिक जरी व्यापारीविषयक वाटत असले तरी या मासिकात माणसाच्या रोजच्या जीवनात येणारे इतर विषय पण उत्तम तऱ्हेने हाताळलेले असतात. व्यापारी व्यावसायिक म्हटले की त्याचा लहानमोठय़ा अशा ६५ च्या पेक्षा जास्त कायद्यांशी संबंध येतो. ही बाब बऱ्याच धंदा करणाऱ्यांना माहीत पण नसते हे वास्तव आहे. पण या ६५ पेक्षा जास्त अशा लागू असणाऱ्या कायद्यांची मूलभूत व प्रारंभिक (बेसिक) माहिती व्यापारी मित्र मासिकांतून उत्तम तऱ्हेने निश्चितच मिळते. त्यामुळे त्या व्यापाऱ्याला त्या संबंधित कायद्यांचे जुजबी म्हणजेच कामापुरते ज्ञान निश्चितच प्राप्त होते. अशामुळे वाचकाला तांदळाच्या पिठापासून भाकरी व गव्हाच्या पिठापासून चपाती एवढे निश्चितच समजते. त्यापुढील त्या कायद्याच्या किचकट कार्यवाहीसाठी त्या त्या क्षेत्रांतील सल्लागार असतातच. अशी सर्व माहिती ‘व्यापारी मित्र’ आजपर्यंत नक्कीच देत आला आहे. ‘व्यापारी मित्र’ ही जी सर्व प्रकारची माहिती देतो ती अत्यंत मनमोकळेपणे व खुल्या दिलाने हातचे काहीही न राखता दिलेली असते. वाचणाऱ्यांनी या वाहत्या गंगेचा किती उपयोग/ फायदा करून घ्यावयाचा हे ज्याचे त्याने ठरवायचे असते.
व्यापारी मित्र हे मासिक शुद्ध मराठीत व खास करून मराठी व्यापारी/ व्यावसायिक यांच्यासाठीच असते. मराठी म्हणजे महाराष्ट्रीय व्यापारी. मग तो मारवाडी-गुजराथी कोणीही असो पण सर्व व्यवहार तो मराठीतच करतो. हे शर्मा कुटुंबीय मारवाडी. पण बोलणे/ वागणे मराठी माणसाच्या वरताण म्हणजेच मराठी माणसाला लाजविणारे. संपादक जीडीजीना पाहिले व त्यांच्याशी बोलले की जीडीजी सच्चे पुणेरी भटजी वाटतात. एवढे हे शर्मा कुटुंबीय मराठी मातीशी एकरूप झाले आहे. व्यापारी मित्र हे मासिक महाराष्ट्रांतील मोठेल्या शहरात सगळीकडेच जाते पण त्याशिवाय हे मासिक तालुका/जिल्हा पातळीवर महाराष्ट्रांत सगळीकडेच जाते. तसेच बाहेरील राज्यांतील बऱ्याच मोठय़ा शहरांत पण जाते. या मासिकाचे वर्गणीदार ३५ हजारांच्यावर आहेत. या मासिकाच्या संपादकीय मंडळाचा वाचक/लेखक यांच्याशी नेहमीच पत्रव्यवहार चालू असतो. वाचक कोणीही असो, व्यापारी मित्राला एखादे पत्र पाठवून काही विचारणा केल्यास पत्राचे उत्तर त्वरित येते नाहीतर फोन तरी नक्कीच येतो, हे या संपादकीय मंडळाचे खास गुण-वैशिष्टय़ आहे. कोणी आजारी असल्याचे माहिती पडल्यास व्यापारी मित्रचे संपादकीय लोक त्या वर्गणीदाराची फोनवर चौकशी करतात. हे सर्व पाहिल्यास व्यापारी मित्र मासिक व त्याचे असलेले वर्गणीदार यांच्यातील जिव्हाळा व आपुलकी निश्चितच दिसून येते.
व्यापारी मित्र मासिकांत सर्व प्रकारची माहिती व्यापारी, उद्योजक, धंदेवाईक, व्यावसायिक यांना लागणारी त्या त्या संबंधित कायद्यांची तपशीलवार माहिती असते. ती खास माहिती कोणती तर गुंतवणूक, व्यवस्थापन, लघुउद्योग, यशाचे रहस्य, आरोग्य, विक्रीकला, सामाजिक विषय, शिक्षण, नागरिक, एस.ई.झेड., शारीरिक विकार, इच्छापत्र, व्यापार प्रगती, आहार, सदनिका खरेदी, सहकार, शेती, क्रेडीट कार्डस्, नागरी बँका, व्यायाम, योग, वृद्धत्व असे किती तरी विषय उत्तम तऱ्हेने हाताळलेले असतात. याशिवाय व्यापाऱ्यांना संबंधित असणारे असे प्राप्तीकर, विक्रीकर, व्हॅट, सेवाकर, उत्पादन शुल्क अशा किती तरी कायद्यांची माहिती तपशीलवारपणे हाताळलेली असते ते वेगळेच. एवढे करून वाचकांना कायद्याचा सल्ला पण मोफत दिला जातो. यासाठी प्रश्नकर्त्यांला त्याच्या प्रश्नाबरोबर पाच रु. चे टपाल हशील उत्तरासाठी जोडावे लागते. हा कायद्याचा सल्ला देण्यासाठी व्यापारी मित्रकडे त्या त्या क्षेत्रांतील संबंधित कायद्यांचे तज्ज्ञ नेमलेले असतात. याशिवाय व्यापारी मित्र दरवर्षी निरनिराळ्या ठिकाणी साधारणपणे वर्षांतून दोन-तीन ज्ञानसत्रे भरवीत असतो. या ज्ञानसत्रांत चांगल्या तज्ज्ञांचे/ वक्त्यांचे विचार ऐकण्यास मिळतात व त्याचा फायदा ज्ञानसत्रांत भाग घेणाऱ्या उद्योजकांना नक्कीच मिळतो. तसेच व्यापारी मित्र दरवर्षी सर्व संबंधित कायद्यांची एक मार्गदर्शिका प्रसिद्ध करीत असतो. ही एकच मार्गदर्शिका चाळली की त्यामध्ये हवी असलेली सर्व माहिती त्वरित उपलब्ध होते. ही मार्गदर्शिका म्हणजे कायद्यांची मराठी रेडीरेकनर आहे. त्यामुळे या व्यापारी मित्र मासिकाचा सगळ्यानाच चांगला आधार वाटतो. कारण कायद्याची क्लिष्ट भाषा या मासिकांत अत्यंत सोपी करून दिलेली असते. एवढे निरनिराळे विषय या मासिकांत हाताळलेले असल्यामुळे इतर व्यापारी/ उद्योजक नसलेले लोकसुद्धा या मासिकाचे वर्गणीदार होतात हे या मासिकाचे खास वैशिष्टय़ आहे. तसेच किती तरी सरकारी अधिकारी वर्गणीदार आहेत. असे म्हणतात की, कायद्याच्या अथवा इतर व्यावसायिकांनी त्यांच्या क्षेत्रांतील व्यावसायिक विषयाचे रोज जरी पाऊण तास वाचन केले व त्यावर नोंदी काढल्या (नोटिंग्ज) तर त्याची व्यावसायिक फी ही कमीत कमी वर्षांला १० लाख तरी झालीच पाहिजेत. जास्त कितीही. अर्थात हा नियम ग्रामीण भागात कमी प्रमाणात लागू होईल. हे पण तेवढेच खरे. तसेच बऱ्याच क्षेत्रात शैक्षणिक पात्रता नसलेले लोकसुद्धा सल्लागार म्हणून काम करतात. अशा व्यावसायिकांनी व्यापारी मित्र मासिक वाचून त्यावर नोंदी काढल्यास त्यांचा संबंधित कायदा व त्याची कलमे/ नियम हे सर्व काही वाचून वाचून आपोआप अगदी मुखोद्गत होऊन जाते. म्हणजेच या व्यापारी मित्र मासिकाचा शैक्षणिक पात्रता नसलेल्या व्यावसायिकालासुद्धा किती उपयोग होतो पाहा. हल्ली ज्ञान नसले तरी चालते. पटवापटवीवरच सर्व सरकारी कामे होत असतात. सरकारी अधिकारी पण तसलाच असतो. त्यामुळे कुणाला निंदायला नको नि कोणाला वंदायला नको. पण तरीसुद्धा अशा लोकांनी व्यापारी मित्र मासिकाचे वाचन चालू ठेवल्यास त्याचा फायदा हा निश्चितपणे त्यांना झाल्याचा जाणवतो व त्यामुळे त्या सरकारी अधिकाऱ्याला कायदेशीरपणे मुद्दा पटवून देता येऊन त्याला खायची लागलेली भूक कमी करता येते.
वरील सर्व पाहिले की व्यापारी मित्र मासिकाने व्यापारविषयक माहितीच्या क्षेत्रांत उच्च शिखर निश्चितच गाठले असल्याचे समजते. आता व्यापारी मित्र मासिकाने ६० व्या हीरक महोत्सवी वर्षांत पदार्पण केले आहे. बऱ्याच लहानमोठय़ा व्यावसायिकांना/ उद्योजकांना या मासिकाचा चांगलाच फायदा झाला आहे. मी गेले जवळजवळ ४० वर्षे या मासिकाचा वर्गणीदार सभासद आहे. आपण ज्या झाडाची सावली खाल्ली त्या झाडाला विसरू नये या भावनेतून हा लेख कृतज्ञतेपोटी लिहिला आहे. या मासिकाचा मला चांगलाच फायदा झाला आहे. शर्मा कुटुंबीय म्हणजेच व्यापारी मित्र असेच समीकरण आहे, म्हणून सर्व वाचकवर्गातर्फे मी व्यापारी मित्र मासिकाला शुभेच्छा देतो व व्यापारी मित्र मासिकाची अशीच उत्तरोत्तर भरभराट होऊन त्याबरोबरच प्रगती होऊन त्याचा लाभ सर्व वाचकांना मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. साठावे वर्ष लागले की ‘साठी बुद्धी नाठी’ असे म्हणतात, पण या मासिकाच्या बाबतीत साठी बुद्धी मोठी असेच होत राहणार आहे. व्यापारी मित्रला विनम्र अभिवादन व खास अभिनंदन!
शरद भाटे