Leading International Marathi News Daily
सोमवार ५ जानेवारी २००९
भारतीय कंपन्यांनाग्लोबल इंडियन होण्याची हीच संधी
‘सत्या’चा मार्ग स्वीकारा! ‘सत्यम’चा नव्हे!!
वळणावरची खरेदी
भविष्यातील माहिती तंत्रज्ञान
व्यापारी मित्र-मराठी उद्योजकांचा आधारवड
लक्ष्मीची पावले
बँकांविषयी सर्वकाही
यशोगाथा
वाटा स्वयंरोजगाराच्या
शेअर बाजारात फिट कसे राहाल?
माधवराव भिडे
एक ‘श्रीमंत’ व्यक्तिमत्त्व

थोरामोठय़ांची जीवनचित्रे पाहणे, वाचणे लोकांना आवडते. त्यातून त्यांचे व्यक्तिगत जीवन, आम्ही असे घडलो हे जाणून घेण्याची वाचकाला उत्सुकता असते. त्यातून आताशा लहान-थोर उद्योजकांच्या यशोगाथाही प्रकाशित होत आहेत. उद्योजकता विकासाच्या दृष्टीने अशा गाथा प्रेरक ठरतात यात शंका नाही. याच वळणावरचे नवचैतन्य प्रकाशनचे ‘सेतु-माधव’ हे पुस्तक माझ्या हाती आले. माधव चिंतामण भिडे यांचे हे जीवनचित्र आहे. एवढय़ा नावाने सर्वसामान्य लोकांच्या लक्षात येणार नाही. पण तेच ‘सॅटर्डे क्लब’चे माधवराव भिडे

 

म्हणताच अरे होऽ ‘एकमेका सहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत’ हा मंत्र जपणारे भिडे नाही का! कारण सॅटर्डे क्लबच्या कार्यामुळे मराठी उद्यमशीलतेला जागतिक स्तर लाभला आणि माधवराव भिडे लोकाभिमुख होत राहिले. पण सेतु-माधव पुस्तक वाचल्यावर माधवराव कुठे नाहीत, हे सांगणे सोपे होते. कारण माधवराव यांचे सकळ संपूर्ण जीवनच हे सगुण अलंकारांनी मढलेले दिसते. ते पूल बांधणी विषयातले इंजिनीयर, वकिली पास, व्यवस्थापन, नाटय़, साहित्य, लेखन, कविता, संगीत, गाणे, उत्तम आधुनिक, सुटाबुटात राहणे, चविष्ट खाणे, धडाडीने सामाजिक कार्य करणे, जगभर प्रवास, कॉर्पोरेट क्षेत्रात एम. सी. भिडे म्हणून ओळखले जाणारे माधवराव भिडे म्हणजे एक ‘हाऊस फुल्ल’ व्यक्तिमत्त्वाचे वाटतात. सगुण अंगाने त्यांच्या जीवनपटलात एकही खुर्ची खाली दिसत नाही. असे हे ‘श्रीमंत’ व्यक्तिमत्त्व घडले कसे, वाढले कसे हे जाणून घेण्यास वाचक उत्सुक होतात.
साहित्यिक कृ. ज. दिवेकर यांनी सेतु-माधव हे पुस्तक साकारताना थोरामोठय़ांचे लेख व मुलाखतीद्वारे साकारले आहे. यात कुमार केतकर, सदानंद डबीर, ह. मो. मराठे, शंकर मोडक यांच्या आठवणीवजा लेखापासून, कृ. ज. दिवेकरांनी माधवरावांच्या आप्तइष्टांच्या घेतलेल्या आठवणीवजा मुलाखती यात दिसतात. अशा वेळी पुस्तक संपादित करताना पुनरावृत्ती होण्याची शक्यता अधिक असते, याची काळजी दिवेकरांनी घेतल्याचे जाणवते, हे त्यांचे यश म्हणावे लागेल. एकूण २२२ पानांच्या पुस्तकात चार विभाग पाडून त्यात थोरामोठय़ांच्या मिळून १७ लेखांचा समावेश आहे. शिवाय काही नामवंतांचे इंग्रजी लेखही या पुस्तकात आहेत. यातून माधवरावांचे यशस्वी जीवन उंचावत जाते. पुस्तकाच्या शेवटी कव्हरवर माहिती देताना ‘श्री. माधवराव भिडे एक बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिमत्त्व..’ असे म्हटले आहे. आपल्या वैचारिक बळावर, कामधंद्याने जीवन उंचावणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला बहुरंगी, बहुढंगी म्हणणे थोडे उथळपणाचे वाटते.
माधवरावांचे बालपण कल्याणमध्ये गेले. मध्यमवर्गीय घर, घरात विहीर व छोटा बगीचा होता. रोज शंभर बादल्या शेंदून बागेला पाणी देणे, त्यांना फुले व प्रकाश आवडतात, लहानपणापासून त्यांना पुलाविषयी ओढ होती. अशा श्रम संस्कारात फ्रीशिप, किरकोळ कामे, धडपड करीत त्यांनी बी. ई. इंजिनीयरचे शिक्षण पूर्ण केले. त्या काळात एस. पी. कॉलेजमध्ये ते हाफपँटीत जात होते हे आजच्या विद्यार्थ्यांना आश्चर्याचे वाटले. तिथून ते रेल्वेत पूल इंजिनीयर म्हणून अनेक उच्चपदे भूषविली व कोटय़वधी रुपयांची कामे केली. देशभर बदली होत राहिल्याने त्यांनी माणुसकी जाणली. एकूणच माधवरावांचे व्यक्तिमत्त्व पूल, फूल आणि मूल म्हणजे माणुसकीच्या अंगाने फुलत राहिले.
वास्तविक पाहता त्यांना नोकरी करावयाची नव्हती. त्यातून त्यांनी पोल्ट्री फार्म, इंजिनीयरिंग सव्‍‌र्हिस असे काही उद्योग करून पाहिले. संसारात गुंतले, राजीव, सुहास मुले झाली. माता-पित्यांची काळजी घेणे, त्यांच्यासाठी डोंबिवलीत घर बांधणे या सर्व धावपळीत त्यांचे उद्योजकीय मन अस्वस्थ होते. ‘काम नही तो चैन नही’ या उद्योजकीय वृत्तीमुळेच त्यांनी सेंट्रल रेल्वे कल्चरल अकादमी, साहित्य मंडळ, रेल्वेच्या कर्मचाऱ्यांतील कलावंत शोधून नाटक करणे, वाद्यवृंद उभारणे अशी कामे करीत राहिले. त्याला सामाजिक कार्याचीही जोड दिली. कारण जातीचा उद्योजक कधी स्वस्थ बसत नाही. काही तरी नव्याचा शोध घेणे, व्यस्त आणि मस्त राहणे हा त्यांचा स्वभाव असतो आणि नेमकी हीच जीवनशैली माधवरावांच्या जीवनात दिसून येते. आम्ही अखेर या अस्वस्थपणातूनच त्यांनी सेवानिवृत्ती घेऊन पूल बांधणी, आर्थिक, व्यवस्थापन, उद्योजकीय अशा विषयामधील संस्था उभारून जगभर कामे करीत राहिले. अभियांत्रिकी क्षेत्रात त्यांना पूलतज्ज्ञ मानले जाते. कॉर्पोरेट क्षेत्रात फायनान्स, मॅनेजमेंटचे सल्लागार म्हणून ते ओळखले जातात. तसेच ते एक कलासक्त व रसिक म्हणूनही ओळखले जातात. असे हे माधवरावांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व पुस्तकातल्या लेखावरून व इतरांच्या आठवणीवरून दृगोचर होते. तेव्हा वाचकाला आपण माधवरावांच्या जवळपास तरी फिरकू शकतो का, असा विचार केल्यास नवल नाही.
कुमार केतकर माधवरावांना एक झपाटलेले व्यक्तिमत्त्व मानतात. आपल्या जगभरच्या प्रवासात कुमार केतकर यांनी जो रेल्वे प्रवास केला त्याचे गाईड माधवराव आहेत हे ते सांगून जातात.
ह. मो. मराठे यांच्याशी गप्पा करताना माधवराव सहजपणे आपल्या कामाची पद्धत सांगतात. ‘केलेच पाहिजे, करणे आवश्यक व करता आल्यास..’ म्हणजे ते मॅनेजमेंटविषयी बोलतात.
कामाचा फडशा पाडण्याबाबत त्यांच्या डॉ. पत्नी इरावती भिडे म्हणतात, ‘‘भिडेनी २४ तासांचे काम १२ तासांत पूर्ण करण्याची हातोटी संपादिली आहे.’
माधवरावांच्या पहिल्या पत्नी नलिनी यांचे निधन झाल्यावर डॉ. इरावती यांच्याशी विवाह करताना त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना आत्मविश्वासात घेतले आणि पुढे राजेश आणि सुहास यांना डॉ. इरावतीत ‘आई’ दिसते. अशा काही भावविभोर आठवणी वाचकांना भावूक करतात. आज जे काही वयाच्या ७५ नंतरही माधवराव आहेत ते या आईमुळे आहेत ते प्रांजळपणे मान्य करतात.
आपल्या व्यक्तिगत संसाराला श्रीमंती देऊन माधवरावांनी आपले सार्वजनिक जीवनही श्रीमंत केले आहे. डोंबिवलीच्या गणेश मंदिर विकास, डोंबिवली पूर्व-पश्चिम जोडणारा पूल, रेल्वे कामगारांसाठी सुसज्ज हॉल, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ब्रिज इंजिनीअर्स, वडिलांच्या नावे शिष्यवृत्ती, मराठी उद्यमशीलतेसाठी सॅटर्डे क्लब अशी त्यांची कार्याची मालिका एखाद्या भव्य पुलाप्रमाणे वाढत जाणारी आहे.
या पुस्तकवाचनाने माणूस स्वयंप्रेरणेने मोठा होऊ शकतो, स्वत:चा वैचारिक बाणा दाखवू शकतो, यांचीही प्रचिती येते. राजश्री करडे आपल्या आठवणीत म्हणतात, ‘तसे ते रागीट आहेत. चुका करणाऱ्यांची खरडपट्टी करतात. पण हे सर्व तेवढय़ापुरते..’ मराठी माणसांच्या संकुचिपणावर ते कोरडे ओढतात. नामवंत साहित्यिक, सिनेनट हे काही ‘नेशन बिल्डर’ नाहीत अशी टीका करतात. म्हणून तर माधवराव कोणाचे फॉलोवर नाहीत. स्वतंत्र विचारसरणीचे आहेत.
माधवराव आजही या वयात कार्यरत आहेत. त्यांच्या जीवनपटात एक टक्के प्रेरणेचा असला तरी ९९ टक्के घामाचे आहेत. सकारात्मव सहिष्णू विचाराचा आहे. पुस्तक वाचून झाल्यावर माधवरावांनी बांधलेल्या सेतूवरून आपणही जाऊया असे वाटते. त्यासाठी या देखण्या पुस्तकाच्या पानावर ते म्हणतात, People become miserable because they Construct Walls Instead of Bridge एक श्रीमंत माणूस मराठी वाचकांसमोर ठेवल्याबद्दल कृ. ज. दिवेकरांचे अभिनंदन.
भीमाशंकर कठारे