Leading International Marathi News Daily                                  मंगळवार, ६ जानेवारी २००९
मराठी चित्रपट संगीताचा हद्य मागोवा..
झपाटा या कॅसेट कंपनीचे मालक वसंत खेर मराठी रसिकांसाठी त्यांच्या जुन्या काही ध्वनिफितींचा आविष्कार आता सीडी रुपामध्ये सातत्याने करून देत आहेत. १९८९ साली पहिले जागतिक मराठी साहित्य संमेलन पार पडले. त्यावेळी मराठी सांस्कृतिक वैभव टिकविण्यासाठी आणि त्याला उजाळा मिळण्यासाठी अनेक उपक्रम राबबिले गेले. पहिला देशी कॅमेरा बनविणारे आणि मूकपटांपासून चित्रपटसृष्टीत कार्यरत असणारे बाबूराव पेंटर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्याचवेळी खास पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. चित्रमहर्षी व्ही. शांताराम यांचे बाबूराव पेंटर हे एका अर्थाने गुरूच होते. सावकारी पाश या भारतातील पहिल्या वास्तवदर्शी मूकपटात बाबूरावांनी शांताराम यांनाच प्रमुख भूमिकेत चमकविले होते. त्यावेळी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक व कवी कुसुमाग्रज यांच्या हस्तेही एका पुस्तकाचे प्रकाशन झाले होते. मात्र झपाटाने जे ध्वनिमुद्रण आता सीडी रुपात लोकांसमोर आणले आहे ते सुधीर मोघे आणि सुधार गाडगीळ यांनी त्यावेळी सादर केलेल्या मराठी चित्रपट संगीताच्या इतिहासाच्या खास दोन तास कार्यक्रमाचे. सहा ते सात गायकांसह वादकांचा ताफा असलेल्या या कार्यक्रमात रसिक प्रेक्षकांची तुडुंब गर्दी होती आणि गाडगीळ आणि त्यांच्या सहनिवेदिका
 
शैला मुकुंद यांनी आपल्या निवेदनाने त्यात गहिरे रंग भरीले होते. या जुन्या ध्वनिमुद्रणाचे ही व्हीसीडी पाहताना मराठी चित्रपट संगीताचा गेल्या ६० वर्षांंच्या इतिहासाचा सहज कालपट नजरेसमोरून जातो आणि सध्या पुन्हा उर्जितावस्थेला येत असलेल्या या चित्रपटसृष्टीमध्ये किती प्रतिभावंत असामींचे श्रम कारणी लागले आहेत, याचा अंदाजही रसिकांसमोर येतो. ‘स्मरणयात्रा’ असे या व्हीसीडीचे नाव असून एकूण दोन भागात या सर्व घडामोडींचा धांदोळा घेण्यात आला आहे.
‘अयोध्येचा राजा’ या पहिल्या बोलपटापासून अगदी ‘जैत रे जैत’ आणि ‘महानंदा’ या संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांच्या चित्रपटांपर्यंत मराठी रसिक यांत मस्त गुंगून जातो. ‘जय जय राजाधिराज’ असे हरिश्चंद्र, तारामती आणि त्यांच्या मुलाचे वर्णन करणारे गुणगान सिनेमाच्या चित्रफितीद्वारे दाखविण्यात आले आहे. आणि मुख्य म्हणजे या चित्रपटामध्ये हरिश्चंद्राची भूमिका त्याचे संगीतकार व प्रसिध्द हार्मोनियम वादक गोविंदराव टेंबे यांनीच साकारली होती. जुन्या काळात ‘प्रभात’ आणि ‘प्रभात’बाहेर निर्माण होणाऱ्या चित्रपटांमध्ये संगीतकार गोविंदराव टेंबे, अण्णासाहेब माईणकर आणि दादा चांदेकर या तीन संगीतकारांचे प्रभुत्व होते. पण पुढ प्रभातचे कुंकु, माणूस आणि संत तुकाराम हे चित्रपट रसिकांसमोर आल्यानंतर केशवराव भोळे हे प्रयोगशील संगीतकाराचे नाव लोकांसमोर आले. ‘कुंकू’मधील ‘मन शुध्द तुझे गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल रे गडय़ा तुला रे भीती कुणाची, पर्वा कुणाची’ या गाण्याचे चित्रण दाखवून त्यातील खास पेटीवाला म्हणजे संगीतकार वसंत देसाई असल्याची माहिती यात देण्यात येते. केशवराव भोळे यांचे रामशास्त्रीमधील ‘दोन घडीचा डाव, याला जीवन ऐसे नाव’ हे गाणेही या व्हीसीडीत खास सादर करण्यात आले आहे. शेजारीमधून मा. कृष्णराव फुलंब्रीकर हे नाव सामोरे येते आणि ‘लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया’ हे त्यांचे अजरामर गाणेही सामोरे येत. ‘ब्रॅन्डीची बाटली’ आणि ‘ब्रह्मचारी’ या चित्रपटांचे संगीतकार दादा चांदेकर यांचाही खास उल्लेख होतो आणि ‘यमुनाजळी खेळू शेळ कन्हैय्या का लाजता’ हे त्यावेळचे वादग्रस्त गाणेही दाखविले जाते. ‘जय मल्हार’ या चित्रपटापासून कवी गदीमा यांनी मराठी संगीताला रासवट वळणाची गाणी देण्याची प्रथा पाडली आणि ग्रामीण पाश्र्वभूमीचे चित्रपट यशस्वी होऊ लागले, असेही यांत सांगितले गेले आहे. पुलंचे ‘दूधभात’, ‘गुळाचा गणपती’ आणि ‘वंदे मातरम’ किंवा ‘कुबेर’ यांचाही या निमित्ताने उल्लेख होऊन जातो. आचार्य अत्रेंपासून पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कादंबरीकार वि. स. खांडेकर हेही एका काळी मराठी चित्रपटसृष्टीशी पटकथाकार आणि गीतकार म्हणून सहभागी होते याचाही उल्लेख होतो. गायक मृदुला दाढे जोशी, मुकुंद फळसणकर, अनुराधा मराठे, रवींद्र साठय़े, त्यागराज खाडिलकर आणि रंजना जोगळेकर या सर्वांचे दर्शन या व्हीसीडीमध्ये होते. गायक सुरेश वाडकर यांनीही येऊन खास दोन गाणी इथे सादर केली आहेत. गायक व संगीतकार सुधीर फडके, संगीतकार दत्ता डावजेकर, यशवंत देव (कामापुरता मामा) आणि संगीतकार श्रीनिवास खळे (जिव्हाळा) यांच्या गाण्यांचा उल्लेखही यानिमित्ताने येतो. सुधीर फडके यांचे मैलाचे दगड म्हणून मानल्या गेलेल्या ‘जगाच्या पाठीवर’ आणि ‘सुहासिनी’ या चित्रपटांच्या गाण्यांच्या फिती दाखविण्यात आलेल्या नाहीत, पण ‘हा माझा मार्ग एकला’मधील राजा परांजपे आणि बालकलाकार सचिन याच्यावर चित्रित झालेले शीर्षक गीत मात्र खास करून दाखविण्यात आले आहे. या व्हीसीडीत मराठी चित्रपट संगीताच्या मागील ६० वर्षांंचा धांदोळा उत्कृष्टरीत्या घेण्यात आला आहे.
या सर्व वाटचालीत काही संगीतकार किंवा काही गाणी दाखविण्याचे राहून गेल्यास रसिकांनी त्याचे वैषम्य वाटून घेऊ नये, कारण हा मराठी चित्रपटसृष्टीच्या संगीताचा ढोबळ आढावा आहे, असे सुरुवातीलाच गीतकार सुधीर मोघे यांनी म्हटले आहे. स्मरणरंजन आणि मागील इतिहासाचा खास आढावा घेण्यासाठी ही व्हीसीडी रसिकांनी जरूर पाहण्याजोगी.
दत्तमाऊली
झपाटा कंपनीनेच क्षी दत्तगुरूंच्या लीलांचे वर्णन करणारी आपली जुनी ध्वनिफीत आता सीडी रुपामध्ये सादर केली असून यात संगीतकार नंदू होनप यांनी संगीतबध्द केलेली दत्तगीते गायक अजित कडकडे यांनी उत्तमरीत्या साकार केली आहेत. ‘गुरुचरणी शरण आलो रे’, ‘दत्तगुरू ध्यान लागले दत्तगुरू’, ‘कृष्णाकाठी भजन करा’, ‘दत्ता दिगंबरा या हो’ अशी काही कवी प्रवीण दवणे यांनी रचलेली गाणी यांत साकार झाली आहेत. पहिले ‘गुरुचरणी शरण आलो रे’ हे गाणे एका प्रसिध्द नाटय़गीतावर बेतल्यासारखे जरूर वाटते. पण ‘दत्ता दिगंबरा या हो’ या गाण्याची चाल मात्र आवर्जून बदलण्यात आली आहे. संगीतकार नंदू होनप हे एका काळी खूप संख्येने भक्तीगीते आणण्यासाठी प्रसिध्द होते. सध्या त्यांचे काम फार दिसत नाही. पण झपाटाच्या या सीडीमुळे त्यांच्या दत्तावरील पूर्वीच्या गाण्यांना मात्र पुन्हा उजाळा मिळाला आहे.
कृष्णबावरी राधा-उत्तम संगीत आणि काव्याचा मिलाफ
कवयित्री वृंदा भांबुरे आणि संगीतकार अभिजीत राणे या दोघांच्या मेहनतीचा आविष्कार असलेली ही सीडी फाऊंटन म्युझिकने सादर केली असून वैशाली सामंत, साधना सरगम आणि स्वप्निल बांदोडकर या गायकांनी या मूळातील चांगल्या चाली उत्तमरीत्या खुलविल्या आहेत. ‘सखे गं, मंदिरी आले श्याम’ ही यातील सर्वात उत्कृष्ट रचना असून ‘यमुनेच्या तीरी कृष्ण खेळे होळी गं’, ‘कृष्णबावरी राधा’ आणि ‘राधे, चल कुंजवनी’ ही अन्य तीन गाणीही दादरा व केरवा तालात चांगली बांधण्यात आली आहेत. कवयित्री वृंदा भांबुरे यांनी मुळातच ही सर्व कृष्णगीते चांगली रचली असल्याने संगीतकारानेही मेहनत घेऊन ती खुलविण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. मराठी भावगीतांमध्ये सध्या काही नवे प्रयत्न होत नाहीत असे म्हणणाऱ्यांनी ही सीडी आवर्जून ऐकण्याजोगी आहे. कारण प्रत्येक काव्य चांगल्या वृत्तामध्ये आणि चांगल्या चालींमध्ये बांधण्यात आली आहेत. संगीतकार अभिजीत राणे यांनी यापूर्वीही तसे प्रयत्न केले आहेत. या सीडीतील कृष्णगीतेही उत्तम आहेत.
वैभवलक्ष्मी व्रतकथा
कृणाल म्युझिक या कंपनीने दोन व्हीसीडींचा समावेश असलेली ही वैभवलक्ष्मी व्रतकथा केवळ ४५ रुपयांत उपलब्ध करून दिली आहे. या व्हीसीडीमध्ये चांगली कथा गुंफण्यात आली असून सध्याच्या कलीयुगाचा महिमाही गाण्यात आला आहे. शशीराज या माणसाचा स्वत:चा उत्तम व्यवसाय असून त्याचा बंगला आणि मोटारगाडीही आहे. त्याची पत्नी लक्ष्मीची भक्त असून ती नेहमी तिच्या भक्तीत रममाण असते. मात्र कली महाशयांचा या कुटुंबाकडे वाईट नजर पडते आणि त्यांचा वाईट काळ सुरू होतो. पैसे दुप्पट करण्यासाठी शशीराज आपले धन एका गुलाबराव माणसाच्या ताब्यात देतो आणि त्याचे वाईट दिवस सुरू होतात. पण लक्ष्मी व्रतामुळे या कुटुंबावरील अरिष्टाचे कसे निवारण होते याचा दाखला या व्हीसीडीत देण्यात आला आहे. अभिनय आणि कथेची मांडणी खूपच सदोष आहे, मात्र या व्हीसीडीमागचा उद्देश मात्र जरूर सफल होतो, असे ती पाहून म्हणावे लागते.
श्री सत्यनारायण कथा, पूजा आणि आरती
ही साडी कृणाल कंपनीनेच सादर केली असून यामध्ये अर्थातच सत्यनारायणाचा महिमा गाण्यात आला आहे. पूजेची पूर्वतयारी कशी करावी याचेही साद्यंत वर्णन यात करण्यात आले आहे. उपाध्ये गुरुजी यांनी सत्यनारायणाची कथा सांगितली आहे. ऐका सत्यनारायणाची कथा हे गाणे गायक प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजात महाराष्ट्रात खूप प्रसिध्द आहे. ते या सीडीत आवर्जून घेण्यात आले आहे. या सीडीमागील उद्देशही ती ऐकून पूर्ण झाल्यासारखे वाटते. सुंदर ते ध्यान आणि सुखकर्ता दु:खहर्ता ही आरती मात्र वैशाली सामंत यांच्या आवाजात आहे.
satpat2007@rediffmail.com