Leading International Marathi News Daily                                    मंगळवार, ६ जानेवारी २००९


‘ग्लोबल वॉर्मिग’ उंबरठय़ावर येऊन ठेपलं असलं तरी सुदैवाने अद्याप हिमालयातील ‘कूलिंग इफेक्ट’ पूर्वीसारखाच आहे. सोनमर्ग, गुलमर्ग, रोहतांग पास आदी प्रसिद्ध ठिकाणी डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात बर्फवृष्टी होणं आणि पर्यटकांचा ओघ वाढून वर्षभराची बेगमी होणं हे या कूलिंग इफेक्टवरच अवलंबून असतं. हिमाचल प्रदेशातील चंबा व्हॅलीतील ब्रिटिशांनी शोधलेल्या डलहौसी या हिलस्टेशनचं अर्थकारणही असंच हिमवर्षांवावर अवलंबून असतं. सोमवारी तिथे दणकून बर्फवृष्टी झाल्याने परिसराने पांढरी दुलई पांघरल्याचा आभास होत होता.

मुंबईतील अतिरेकी हल्ला दाऊदकडूनच ‘लॉजिस्टिक’ सपोर्ट!
निशांत सरवणकर, मुंबई, ५ जानेवारी

मुंबईत झालेल्या अतिरेकी हल्ल्यासाठी कुविख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या टोळीनेच ‘लॉजिस्टिक’ सहाय्य केले होते, अशी माहिती गुप्तचर विभागातील सूत्रांनी दिली. कराची बंदरातून दहा अतिरेक्यांना घेऊन निघालेली नौका ‘एमव्ही अल्फा’ हीदेखील दाऊदशी संबंधित साथीदाराची असल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याचेही या सूत्रांनी सांगितले. एमव्ही अल्फातून प्रवास करीत कच्छजवळील जखाऊ येथे भारतीय नौका ‘कुबेर’वर या अतिरेक्यांनी कब्जा मिळविला. त्यासाठी एमव्ही अल्फावरील दाऊदच्या साथीदारांनीच मदत केली. इतकेच नव्हे तर जखाऊ ते मुंबईपर्यंतचे ३०० नॉटिकल मैल इतके अंतर कापण्यासाठी कुबेरला आवश्यक असणाऱ्या इंधनाची मदतही याच दाऊदच्या साथीदारांनी केल्याचे गुप्तचर विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे. मुंबईजवळ आल्यानंतर या अतिरेक्यांना कफ परेड येथील बधवार पार्क येथे येण्यासाठी रबरी बोटींची गरज होती. या अतिरेक्यांसाठी दाऊदच्या मुंबईतील साथीदाराने (बंदर परिसरातील तस्करीत माहीर असलेला) रबरी बोटीची व्यवस्था केल्याचेही या सूत्रांचे म्हणणे आहे.

काँग्रेसचे नेते वरमले; नारायण राणे नरमले!
मुंबई, ५ जानेवारी/प्रतिनिधी

काँग्रेसचे बंडखोर नेते नारायण राणे यांनी आपल्या भावी वाटचालीबाबतचा निर्णय जाहीर करण्यास ३६ तास शिल्लक असताना आज सकाळी अचानक मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेतली व त्यांच्याशी तब्बल ४५ मिनिटे चर्चा केली. या भेटीच्या पाश्र्वभूमीवर राणे यांनी उद्या बोलाविलेली पत्रकार परिषद रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने राणे काँग्रेसमधून बाहेर पडण्याची शक्यता कमी आहे, अशी चर्चा राजकीय वतुर्ळात सुरु झाली आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरू असताना नारायण राणे व अशोक चव्हाण हेच स्पर्धेत होते. अखेर ‘निष्ठावंत’ गटातील मुख्यमंत्री झाला पाहिजे या निकषावर चव्हाण यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. त्यानंतर राणे यांनी काँग्रेसश्रेष्ठी, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख व अशोक चव्हाण यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. या पाश्र्वभूमीवर राणे यांनी आज सकाळी चव्हाण यांची ‘वर्षां’वर भेट घेतली. सकाळी नऊ वाजता सुरू झालेली ही चर्चा ९.४५ पर्यंत सुरू होती.

मुख्यमंत्र्यांचा विलासरावांना झटका !
चव्हाण यांनी राणे यांची भेट घेतली त्यानंतर अवघ्या दोन तासांत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चव्हाण यांनी लातूर येथील प्रस्तावित महसूल आयुक्तालय नांदेड येथे नेण्याचा निर्णय घेतला आणि विलासराव देशमुख यांच्या पायाखालील जाजम खेचून घेतले. राणे मुख्यमंत्री होऊ नयेत याकरिता चव्हाण यांना पंखाखाली घेण्याची खेळी खेळलेल्या देशमुख यांना चव्हाण यांनी लगावलेली ही चपराक दिवसभर राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली होती. आपण देशमुख यांच्या पंखाखाली नाही हेच चव्हाण यांनी या निर्णयाद्वारे दाखवून दिल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.

मुंबई, ५ जानेवारी / खास प्रतिनिधी
नारायण राणे यांच्याऐवजी मुख्यमंत्रीपदी अशोक चव्हाण यांची निवड व्हावी म्हणून फिल्डिंग लावलेल्या माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनाच महिना उलटण्याआधीच मुख्यमंत्री चव्हाण यांनी एकापाठोपाठ एक धक्के देण्यास सुरुवात केली आहे. औरंगाबाद महसूल विभागाचे विभाजन करून लातूरला विभागीय आयुक्त स्थापन करण्याचा विलासरावांचा प्रयत्न असतानाच अशोकरावांनी आपल्या गावी म्हणजे नांदेडला आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय आज घेतला. तसेच उद्योगमंत्री असताना अशोक चव्हाण यांच्या खात्यावर अंकुश ठेवण्याकरिता विलासरावांनी नेमलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जलोटा यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.

वाहतूकदारांचा संप सरकारची हालचाल नाही
नवी दिल्ली, ५ जानेवारी/खास प्रतिनिधी

डिझेल आणि टायरच्या किंमतीत कपात करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय मोटार वाहतूक काँग्रेसने सोमवारी मध्यरात्रीपासून पुकारलेला बेमुदत देशव्यापी संप संपुष्टात आणण्यासाठी केंद्र सरकारने आज पहिल्या दिवशी कोणतीही हालचाल केली नाही. पण जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होऊन भाववाढीला चालना मिळू नये म्हणून सरकार सतर्क असून प्रसंगी ६० लाख ट्रक वाहतूकदारांच्या विरोधात जीवनावश्यक सेवा कायद्याचा वापर करण्याचाही विचार करीत आहे. हा संप अनावश्यक असून वाहतूकदारांच्या बहुतांश मागण्या राज्यांशी संबंधित आहेत, असे वाहतूक सचिव ब्रम्ह दत्त यांनी पत्रकारांना सांगितले. ट्रक वाहतूकदारांविरुद्ध जीवनावश्यक सेवा कायम राखण्यासाठी कायद्याचा प्रयोग करणे भाग पडेल, असेही दत्त म्हणाले.

पुरावे सुपूर्द, आता प्रत्यक्ष कृती हवी, शब्दच्छल नको, भारताने पाकिस्तानला खडसावले
नवी दिल्ली, ५ जानेवारी/खास प्रतिनिधी

मुंबईवर २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचे कटकारस्थान पाकिस्तानात शिजल्याचे ठोस पुरावे सोपवून आज भारताने मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून इस्लामाबादवर दडपण वाढविले. या पुराव्यांनंतर मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यासाठी कारणीभूत असलेल्या अतिरेक्यांवर पाकिस्तानने आता प्रत्यक्ष कारवाई करावी, अशी मागणी भारताने केली आहे. आज भारताचे परराष्ट्र सचिव शिवशंकर मेनन यांनी पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त शाहीद मलीक यांना बोलावून मुंबईवरील हल्ल्याचे पुरावे त्यांच्या सुपूर्द केले. आम्हाला आता शब्दच्छलात स्वारस्य उरलेले नसून प्रत्यक्ष कारवाईच हवी आहे, असे मेनन यांनी स्पष्टपणे बजावले. त्यानंतर या हल्ल्याशी पाकिस्तानचा संबंध असल्याचे पत्र आपण सर्व देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांना लिहिल्याचे प्रणब मुखर्जी यांनी जाहीर केले. मुंबईवर झालेला हल्ला, त्याविषयी झालेल्या तपासाची प्रगती आणि हाती लागलेले पुरावे यांचा त्यात समावेश आहे. मुंबईवरील हल्ल्याशी पाकिस्तानचा संबंध असल्याची अमेरिकेची पूर्णपणे खात्री पटली आहे. पाकिस्तानातच मुंबईवरील हल्ल्याचा कट रचण्यात आला हे अमेरिकन प्रशासनाला दाखविण्यासाठी मंगळवारी गृहमंत्री पी. चिदंबरम पुरावे घेऊन अमेरिकेला जाणार आहेत.

मंदीच्या मारातही भाजपची कोटीच्या कोटी उड्डाणे!
संदीप प्रधान, मुंबई, ५ जानेवारी

‘एम’ व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे महाराष्ट्रातील राजकीय पक्ष कुपोषित झाल्याची चर्चा सुरू असतानाच भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांना ११ कोटी रुपयांची, प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांना तीन कोटी रुपयांची तर विधानसभेतील भाजपचे गटनेते एकनाथ खडसे यांना दोन कोटी रुपयांची थैली देण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. मुंबई भाजपच्या वतीने लालकृष्ण अडवाणी यांना ११ कोटी रुपयांची थैली समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांना नागपूर भाजपच्यातर्फे तीन कोटी रुपयांची तर जळगाव भाजपच्या माध्यमातून विधानसभा गटनेते एकनाथ खडसे यांना दोन कोटी रुपयांची थैली देऊन मंदीच्या माहौलमध्ये कोटी कोटी उड्डाण घेण्याकरिता भाजपच्या कार्यकर्त्यांनी व देणगीदारांनी सिद्ध होण्याचा आदेश झाला आहे. मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष दिवंगत रामदास नायक यांनी सर्वप्रथम भाजपच्या केंद्रीय नेत्यांना मुंबईत समारंभपूर्वक दोन कोटी रुपयांची थैली दिली होती. देशभरात आपल्या पक्षाच्या नेत्यांना थैली देणारा भाजप हा पहिला पक्ष आहे. यापूर्वी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना पक्षाने थैल्या दिल्या आहेत. भाजपच्या घटनेनुसार नेत्यांना दिल्या जाणाऱ्या थैल्या या तात्काळ त्या देणाऱ्या विभागाच्या अथवा जिल्ह्याच्या अध्यक्षांकडे सुपूर्द केल्या जातात. निवडणुकीचा खर्च या थैल्यांच्या माध्यमातून भागवला जातो. मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी केंद्रात भाजपचे सरकार असल्याने गोपीनाथ मुंडे यांना सात कोटी रुपयांची थैली दिली होती. जागतिक मंदी व त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांपुढे ‘एम’ व्हिटॅमिनचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा आव्हानात्मक परिस्थितीत भाजपकडे ‘सत्तेचे सिरप’ नसतानाही आम्ही हे शिवधनुष्य उचलण्याचा निर्धार केल्याचे एका नेत्याने सांगितले.

आंदोलक कंत्राटी कामगारांचे विषप्राशन; दहाजण अत्यवस्थ
नाशिक, ५ जानेवारी / प्रतिनिधी

सेवेत कायम करावे, ही मागणी करणाऱ्या इपकॉस कंपनीतील कंत्राटी कामगारांना चर्चेसाठी वेळ देण्याचे नाकारल्याने संतप्त दहा जणांनी कामगार उपायुक्त कार्यालयातच विष प्राशन केल्याची घटना येथे घडली. अत्यवस्थ अवस्थेत असलेल्या या कामगारांवर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असून या घटनेस जबाबदार असलेल्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेचे प्रदेश सरचिटणीस वसंत गीते यांनी केली आहे. सातपूर औद्योगिक वसाहतीतील इपकॉस कंपनीतील कंत्राटी कामगार गेल्या २८ डिसेंबरपासून कायम करण्याच्या मागणीसाठी उपोषणास बसले होते. मनसेप्रणित कामगार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी हे आंदोलन सुरू केले होते. या कामगारांपैकी काही जणांना कंपनी व्यवस्थापनाने कामावरून कमीही केले होते. सोमवारी या कामगारांना उपायुक्तांनी चर्चेसाठी वेळ दिल्याचे सांगितले जाते. चर्चेसाठी दुपारी उपायुक्त कार्यालयासमोर कंत्राटी कामगार जमा झाल्यावर त्यापैकी यतीन ढिकले, सुनील निगुटे, निलेश लोखंडे, नवनीत कातरे, विनोद कोळी, दीपक कापडणीस, अरूण दातीर, राहुल अतीरदे, तुषार सरोदे, राजेश पाटील हे दहा जण उपायुक्तांना भेटण्यासाठी इमारतीत शिरले. परंतु मध्ये अडविण्यात आल्याने कामगार संतप्त झाले, आणि त्यांनी कार्यालयातच विष प्राशन केले. आपल्या प्रतिनिधींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समजताच इतर कामगारांनी तातडीने त्यांना जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. दरम्यान, रूग्णालय परिसरात कंपनीतील इतर कामगारही मोठय़ा प्रमाणावर जमा झाल्याने अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली. जिल्हाधिकारी एस्. चोक्कलिंगम यांनीही तातडीने रूग्णालयात धाव घेत कामगारांशी चर्चा केली. मनसेची संघटना स्थापन केल्याने काही कामगारांना कामावरून काढून टाकण्यात आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. या प्रकारास जबाबदार असणारे कामगार उपायुक्त, कंपनी मालक व सातपूर पोलीस यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी गिते यांनी केली आहे.

विकासाचा नुसताच ध्यास, बराच भाग मागासलेला!
जळगाव जिल्ह्य़ातील केळीपिकाला वादळी पावसाचा वर्षांतून किमान तीन वेळा फटका बसतो आणि शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला जातो. नित्यनेमाने कोटय़वधींचे नुकसान होते. शासकीय पातळीवरून पंचनामे होतात, पण एकाची कार्यवाही होऊन हातात नुकसान भरपाई पडत नाही, तोवर दुसरा फटका बसतो, नंतर तिसरा..! केळी, मेहरूणची बोरं, कापूस आणि भरिताच्या वांग्यांसाठी देशभर नावलौकिक असलेला जळगाव जिल्हा त्यानंतर जैन इरिगेशनच्या नावाने ओळखला जाऊ लागला. राष्ट्रपतींच्या रूपात देशाच्या सर्वोच्च स्थानापर्यंत ओळख सांगणारा हा जिल्हा मात्र विकासाच्या दृष्टीने काहीसा मागासलेलाच राहिला आहे. या जिल्ह्य़ातून केंद्र व राज्य मंत्रिमंडळात अनेकांनी मंत्रिपदे भूषविली, तरीही त्याचा र्सवकष विकास झालाच नाही.

१० लाख आदिवासी कुटुंबांना कर्जमाफी, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी १४० कोटींची योजना
समर खडस, मुंबई, ५ जानेवारी

शेतकऱ्यांपाठोपाठ आता राज्यातील सुमारे १० लाख आदिवासी कुटुंबाना देण्यात आलेले खावटी कर्ज तसेच शबरी योजनेंतर्गत देण्यात आलेले सुमारे २५० कोटींचे कर्ज माफ करण्याचा सरकारचा मानस असून येत्या महिन्याभरात हा निर्णय घेतला जाणार आहे. याबाबत कॅबिनेटपुढे प्रस्ताव मांडून त्यानंतरच काय तो निर्णय घेतला जाईल, असे सूचक उद्गार आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना काढले. आज अल्पसंख्याक कॅबिनेट उपसमितीच्या बैठकीत अल्पसंख्य विद्यार्थ्यांच्या उत्थानासाठी १४० कोटी रुपयांची नवी योजना मांडण्यात आली. मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत ती मंजूर करण्यात येणार आहे.

 

लोकसत्ता दिवाळी अंक २००८


प्रत्येक शुक्रवारी

दिवाळी २००८