Leading International Marathi News Daily                                  मंगळवार, ६ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

काँग्रेसचे नेते वरमले; नारायण राणे नरमले!
 
मुंबई, ५ जानेवारी/प्रतिनिधी
काँग्रेसचे बंडखोर नेते नारायण राणे यांनी आपल्या भावी वाटचालीबाबतचा निर्णय जाहीर करण्यास ३६ तास शिल्लक असताना आज सकाळी अचानक मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेतली व त्यांच्याशी तब्बल ४५ मिनिटे चर्चा केली. या भेटीच्या पाश्र्वभूमीवर राणे यांनी उद्या बोलाविलेली पत्रकार परिषद रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने राणे काँग्रेसमधून बाहेर पडण्याची शक्यता कअशी चर्चा राजकीय वतुर्ळात सुरु झाली आहे.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरू असताना नारायण राणे व अशोक चव्हाण हेच स्पर्धेत होते. अखेर ‘निष्ठावंत’ गटातील मुख्यमंत्री झाला पाहिजे या निकषावर चव्हाण यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. त्यानंतर राणे यांनी काँग्रेसश्रेष्ठी, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख व अशोक चव्हाण यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. या पाश्र्वभूमीवर राणे यांनी आज सकाळी चव्हाण यांची ‘वर्षां’वर भेट घेतली. सकाळी नऊ वाजता सुरू झालेली ही चर्चा ९.४५ पर्यंत सुरू होती.
राणे यांच्याशी काँग्रेस श्रेष्टींनी पुन्हा जुळवून घेऊ नये याकरिता देशमुख व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे प्रयत्नशील आहेत. मात्र त्याच वेळी केंद्रातील प्रणब मुखर्जी व ए. के. अॅन्टोनी तसेच मुख्यमंत्री चव्हाण हे राणे यांनी काँग्रेस सोडून जाऊ नये याकरिता प्रयत्न करीत आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावरून राष्ट्रवादी काँग्रेसमधील आर. आर. पाटील प्रभृती मुख्यमंत्र्यांची कोंडी करण्याकरिता टपून बसले आहेत, मंत्रिमंडळातील काँग्रेसमधील काही मंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे निष्ठा वाहिलेले आहेत तर प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे देशमुख यांच्या खिशात आहेत. अशावेळी नारायण राणे यांच्यासारखा लढवय्या, मुरब्बी नेता आपल्यासोबत असल्यास मुख्यमंत्रीपदावरील आपली कारकीर्द आणि येणारी लोकसभा व विधानसभा निवडणूक पार पडणे सोयीचे होईल, असा विचार चव्हाण करीत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. राणे यांनी महसूलमंत्री या नात्याने घेतलेल्या व माजी मुख्यमंत्री देशमुख यांनी रोखून धरलेल्या काही महत्वाच्या निर्णयांबाबत राणे-चव्हाण यांच्या बैठकीत चर्चा झाल्याचेही समजते.
अशोक चव्हाण हे उद्या दिल्लीला जात असून नारायण राणे हेही येत्या एक-दोन दिवसांत दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. दिल्लीत राणे यांच्या दृष्टीने समाधानकारक चर्चा झाल्यास ते काँग्रेसमध्ये थांबू शकतील, असे बोलले जात आहे. दरम्यान, काही कारणांमुळे उद्या मुंबईबाहेर जात असल्यामुळे उद्याची पत्रकार परिषद रद्द करीत असल्याचे राणे यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. आता येत्या १० जानेवारी रोजी राणे यांनी ही पत्रकार परिषद बोलावली आहे. ताज्या घडामोडींमुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी बोलाविलेली आजची पत्रकार परिषद रद्द करण्यात आली.