Leading International Marathi News Daily                                  मंगळवार, ६ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

मुख्यमंत्र्यांचा विलासरावांना झटका !
मुंबई, ५ जानेवारी / खास प्रतिनिधी

नारायण राणे यांच्याऐवजी मुख्यमंत्रीपदी अशोक चव्हाण यांची निवड व्हावी म्हणून फिल्डिंग लावलेल्या माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनाच महिना उलटण्याआधीच मुख्यमंत्री चव्हाण यांनी एकापाठोपाठ एक धक्के देण्यास सुरुवात केली आहे. औरंगाबाद महसूल विभागाचे विभाजन करून लातूरला विभागीय आयुक्त स्थापन करण्याचा विलासरावांचा प्रयत्न असतानाच अशोकरावांनी
 
आपल्या गावी म्हणजे नांदेडला आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय आज घेतला. तसेच उद्योगमंत्री असताना अशोक चव्हाण यांच्या खात्यावर अंकुश ठेवण्याकरिता विलासरावांनी नेमलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जलोटा यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.
औरंगाबाद महसूल आयुक्तालयाचे विभाजन केल्यानंतर नवे महसूल आयुक्तालय नांदेड की लातूरमध्ये असावे यावरून गेले अनेक वर्षे वाद होता. लातूरसाठी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे आग्रही होते. वास्तविक महसूल आयुक्तालयासाठी नांदेड योग्य असताना विलासरावांनी त्याला विरोध करून लातूरचे घोडे पुढे दामटले होते. विभागीय आयुक्तालयाच्या विभाजनाकरिता नेमलेल्या समितीनेही नांदेडची शिफारस केली होती. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नांदेड येथे महसुली आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या आयुक्तालयात नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्य़ांचा समावेश करण्यात आला आहे.