Leading International Marathi News Daily                                  मंगळवार, ६ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

पुरावे सुपूर्द, आता प्रत्यक्ष कृती हवी, शब्दच्छल नको, भारताने पाकिस्तानला खडसावले
नवी दिल्ली, ५ जानेवारी/खास प्रतिनिधी

मुंबईवर २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचे कटकारस्थान पाकिस्तानात शिजल्याचे ठोस पुरावे सोपवून आज भारताने मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून इस्लामाबादवर दडपण वाढविले. या पुराव्यांनंतर मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यासाठी कारणीभूत असलेल्या अतिरेक्यांवर पाकिस्तानने आता प्रत्यक्ष कारवाई करावी, अशी मागणी भारताने केली आहे. आज भारताचे परराष्ट्र सचिव शिवशंकर मेनन यांनी पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त शाहीद मलीक यांना बोलावून मुंबईवरील हल्ल्याचे पुरावे त्यांच्या सुपूर्द
 
केले. आम्हाला आता शब्दच्छलात स्वारस्य उरलेले नसून प्रत्यक्ष कारवाईच हवी आहे, असे मेनन यांनी स्पष्टपणे बजावले. त्यानंतर या हल्ल्याशी पाकिस्तानचा संबंध असल्याचे पत्र आपण सर्व देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांना लिहिल्याचे प्रणब मुखर्जी यांनी जाहीर केले. मुंबईवर झालेला हल्ला, त्याविषयी झालेल्या तपासाची प्रगती आणि हाती लागलेले पुरावे यांचा त्यात समावेश आहे. मुंबईवरील हल्ल्याशी पाकिस्तानचा संबंध असल्याची अमेरिकेची पूर्णपणे खात्री पटली आहे. पाकिस्तानातच मुंबईवरील हल्ल्याचा कट रचण्यात आला हे अमेरिकन प्रशासनाला दाखविण्यासाठी मंगळवारी गृहमंत्री पी. चिदंबरम पुरावे घेऊन अमेरिकेला जाणार आहेत.
मुंबईवरील हल्ल्याशी पाकिस्तानचा मुळीच संबंध नसल्याचे भासविताना भारताने ठोस पुरावे द्यावे, असे तुणतुणे वाजवून पाकिस्तानने संबंधित दहशतवाद्यांवर कारवाई करण्याबाबत गेल्या चाळीस दिवसांपासून सतत चालढकल केली. पण बहाणेबाजी करून पाकिस्तान तावडीतून निसटून जाणार नाही, याची पुरेपूर काळजी घेताना आज भारताने सर्व पुरावे सादर करून इस्लामाबादची चोहोबाजूंनी कोंडी केली आहे. मुंबईवरील हल्ल्याचा संबंध पाकिस्तानशी असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालय २४ तासांच्या आत सर्व देशांनाही देणार असून त्यासाठी भारतातील सर्व देशांचे राजदूत व उच्चायुक्तांना निमंत्रित करण्यात आले आहे. भारताविरुद्ध दहशतवादासाठी आपल्या भूमीचा वापर होऊ देणार नाही, अशी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिज्ञा करणाऱ्या पाकिस्तानने आता आपल्या वचनाचे पालन करावे, असे आवाहन मुखर्जी यांनी केले. मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला अक्षम्य आहे. साऱ्या जगाला एकजूट होऊन दहशतवादाचे उच्चाटन करावे लागणार आहे, असे मुखर्जी म्हणाले.