Leading International Marathi News Daily                                  मंगळवार, ६ जानेवारी २००९

नवी मुंबई पोलिसांना भाडय़ाच्या नौकेचा आधार
नवी मुंबई/प्रतिनिधी : मुंबईवर सागरी मार्गाने झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर अगदी उरणपासून थेट दिघा-ऐरोलीच्या किनारपट्टीवर गस्तीसाठी एखाद्या अद्ययावत अशा स्पीड बोटीच्या प्रतीक्षेत असलेल्या नवी मुंबई पोलिसांना सध्या दुधाची तहान ताकावर भागवावी लागत असून या किनारपट्टीच्या गस्तीसाठी पोलिसांनी स्थानिक मच्छिमारांच्या तीन नौका भाडय़ाने घेतल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे अतिशय कमी क्षमतेच्या अशा या नौकांमधून किनारपट्टीवर गस्त ठेवताना पोलिसांची दमछाक होत असून या लहानशा बोटींना दररोज लागणाऱ्या डिझेलचा खर्च करायचा कुणी, असा प्रश्न आतापासूनच सतावू लागला आहे.

जेएनपीटी बंदराच्या कंटेनर्स हाताळणीच्या क्षमतेत घट
उरण/वार्ताहर

जुनाट अकार्यक्षम केन्स आणि अत्याधुनिक साधनसामुग्रीच्या अभावामुळे जेएनपीटी बंदराची कंटेनर्स हाताळणीची क्षमता मोठय़ा प्रमाणात घसरली आहे. यामुळे यावर्षी जेएनपीटीला सुमारे १०० कोटी रुपयांचे प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागेल, अशी माहिती जेएनपीटी कामगार ट्रस्टी भूषण पाटील यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

झोपडय़ा पाडल्याच्या निषेधार्थ पालिकेवर मोर्चा
पनवेल/प्रतिनिधी

काँग्रेसच्या तिरंग्याविरुद्ध तमाम विरोधी पक्षांचे झेंडे एकवटले असल्याचे चित्र आज नगरपालिका कार्यालयासमोर पहायला मिळाले. पालिका प्रशासनातर्फे वाल्मिकीनगरमधील १० झोपडय़ा तोडल्याच्या निषेधार्थ आज पनवेल तालुका झोपडपट्टी वसाहत सेवा संघातर्फे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चेकऱ्यांना शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना- भाजप, आरपीआय या युतीने पाठिंबा दिल्याने मोर्चात लाल, भगवे, निळे झेंडे तिरंग्याविरुद्ध उभे ठाकल्याचे चित्र दिसले.

आगरी - कोळी महोत्सवास चांगला प्रतिसाद
बेलापूर/वार्ताहर

अखिल आगरी-कोळी समाज प्रबोधन ट्रस्टच्या वतीने सारसोळे (नेरुळ) येथे आयोजित आगरी-कोळी महोत्सवास नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. सिडको संचालक व नगरसेवक नामदेव भगत संस्थापक असलेल्या उपरोक्त ट्रस्टतर्फे आयोजित या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी माजी खासदार रामशेठ ठाकूर, सिनेअभिनेत्री नीलम शिर्के व अन्य मान्यवर उपस्थित होते.
२ जानेवारीपासून सुरू झालेल्या या महोत्सवात पारंपरिक नृत्यांच्या तालावर व संगीतावर बेभान झालेले तरुण-तरुणी येथे दृष्टीस पडतात. लहान मुलांसह तरुण वर्गातील कलागुणांना वाव मिळावा, म्हणून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल येथे आहे. या महोत्सवात ७४ स्टॉल्स लावण्यात आले असून, मासळी, मटण, भाकरी आदींची लज्जत चाखावयास मिळणार आहे. या महोत्सवाचे आकर्षण एक आगरी-कोळी समाजाचे अस्तित्व जतन करणारे ‘घर’ निर्माण करण्यात आले आहे. या घरात डोमणा, काठी, गळ, नांगर आदी साहित्यांचा समावेश असून, पुंडलिक पाटील यांनी हे जतन करण्यास विशेष मेहनत घेतली आहे.