Leading International Marathi News Daily                                  मंगळवार, ६ जानेवारी २००९

धुळे येथे एकीकडे वाहतूक सुरक्षा सप्ताहातील कार्यक्रमांची धूम सुरू असताना दुसरीकडे तहसील कार्यालयाजवळ वारंवार निर्माण होत असलेली वाहतुकीची कोंडी दूर करायची कशी, हा प्रश्न वाहतूक पोलिसांना सतावत आहे. सोमवारी दुपारी पुन्हा वाहतुकीची कोंडी झाली आणि सर्व वाहनांच्या वेगाला ब्रेक लागला. (छाया- मनेश मासोळे, धुळे)

एका नव्या अनुभवविश्वाला प्रारंभ
प्रतिनिधी / नाशिक
‘प्रवाशांशी संवाद साधण्याच्या निमित्ताने एका वेगळ्या अनुभवविश्वाला सुरूवात झाली असून नेहमीच्या कामापेक्षा मला खूप वेगळं आणि छान वाटतयं..’ ही प्रतिक्रिया आहे, पंचवटी एक्स्प्रेसमधील ‘सिव्हिक डायरेक्टर’ प्रिया तुळजापूरकर हिची. रेल परिषद या प्रवासी संघटनेच्या माध्यमातून पंचवटी एक्स्प्रेसच्या ‘आदर्श बोगी’सह अन्य वातानुकूलीत डब्यांमधील प्रवाशांना सहकार्य व्हावे, या हेतूने एअर होस्टेसच्या धर्तीवर सिव्हिक डायरेक्टरच्या संकल्पनेला मूर्त रूप देण्यात आले. अर्थात, एअर होस्टेस पेक्षा ही संकल्पना अनेक अंगांनी भिन्न असून हे आव्हान पेलण्यासाठी पुढे आलेल्या प्रियाने हा पहिला दिवस आपल्याला समाधान देऊन गेल्याचे सांगितले. रेल परिषदेच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाबाबत असलेली उत्सुकता व त्यातच आठवडय़ाचा पहिला दिवस असल्याने ‘पंचवटी’च्या आदर्श बोगीत सोमवारी सकाळी एरवीपेक्षा अधिकच गर्दी होती. परिषदेचे अध्यक्ष बिपीनभाई गांधी यांनी यावेळी प्रियाची सिव्हिक डायरेक्टर म्हणून ओळख करून देतानाच या संकल्पनेमागचा उद्देश स्पष्ट केला. या बोगीसह ‘पंचवटी’च्या अन्य वातानुकूलीत डब्यांमधील प्रवाशांना नाशिक तसेच मुंबईतील इच्छितस्थळी जाण्यासाठी आवश्यकतेनुसार माहिती पुरविणे, प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेऊन परिषदेच्या माध्यमातून त्याबाबत रेल्वे व्यवस्थापनाकडे पाठपुरावा करणे, प्रवासी व रेल्वेची यंत्रणा यामध्ये समन्वय राखण्याचा प्रयत्न करणे आदि उद्देश त्यामागे असल्याचे त्यांनी सांगितले.

कृषिपूरक उद्योगांचीही तीच गत

नाशिकला उद्योगनगरीचा दर्जा बहाल करण्यात येथे असणाऱ्या निरनिराळ्या ऑटोमोबाईल प्रकल्पांचा मोठा हातभार आहे. तथापि, मंदीच्या पाश्वभूमीवर सध्या बहुसंख्य उद्योग संकटात सापडले असून ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला तर त्याचा तडाखा सर्वाधिक बसला आहे. परिणामी, नाशिक व परिसरातील उद्योग विश्वावर अवकळा पसरू लागली आहे. अशा परिस्थितीत स्थानिक उद्योग क्षेत्राला दिलासा देण्यासाठी नेमके काय करणे शक्य आहे, त्याबाबत कोणत्या उपाययोजना तातडीने हाती घ्यायला हव्यात याविषयी अपेक्षा व्यक्त करतानाच नाशिकच्या एकूणच उद्योग क्षेत्राचा नाशिक इंडस्ट्रीज् अँड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे (निमा) माजी अध्यक्ष अभय कुलकर्णी यांनी मांडलेला लेखाजोखा.. नाशिक परिसरातील उद्योगविश्वाची चर्चा सध्याच्या मंदीच्या पाश्र्वभूमीवर करताना काहिसा नकारात्मक सूर लागणारच.

नवापूरकरांना मेपर्यंत शुद्ध पाणी पुरवठा - नगराध्यक्ष
वार्ताहर / नवापूर
शहरातील विविध विकास कामांसाठी ११ कोटी २२ लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून शुद्ध पिण्याच्या पाणी पुरवठय़ाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार येत्या मेपर्यंत शुद्ध पाण्याचा पुरवठा शहराला केला जाईल, अशी माहिती नगराध्यक्ष गोविंद वसावे यांनी येथे दिली. नगराध्यक्ष वसावे यांनी शहराच्या विकासासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. शहर तसेच अंतर्गत येणाऱ्या वस्त्या, पाडे, आदिवासी क्षेत्रातील जनतेला मुलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी कामे सुरू केली आहेत. त्यात तिनटेंभा, काळंबा, लालबारी, देवलफळी या पाडय़ांमध्ये ट्रिमिक्स पद्धतीचे रस्ते, डांबरीरस्ते, फायबर मुताऱ्या, गटारी, पाण्याच्या बैठय़ा टाक्या, विद्यूत व सोलर पद्धतीचे पथदिवे यांचा समावेश आहे. घरकूल योजनेंतर्गत २९७१ लाभार्थी असून त्यांना सार्वजनिक सुविधा दिवाबत्ती, रस्ते, सामजिक सभागृह इत्यादीसाठी ३६ कोटी खर्च केले जाणार आहेत. नगरवासियांना शुद्ध पाण्याच्या समस्येस सामोरे जावे लागत होते. सदर काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून सुरू असून लवकरच ते पूर्ण होईल. ठक्कर बाप्पा योजनेतून, दलित वस्ती सुधार योजनेतून रस्ते, शौचालये, समाजमंदिर, पाण्याची टाकी, पाईप लाइन आदी कामे हाती घेण्यात येत आहेत, असेही त्यांनी सांगितले. रस्ता निधी अंतर्गत विविध विभागातील १३ कामे हाती घेतली असून त्यासाठी ४० लाख रुपये खर्च केला जाणार आहे. खडीकरण, डांबरीकरण, डिव्हाईडर, साईड गटार इत्यादी कामे करण्यात येणार असून त्यावर साधारणत: २० लाख खर्च करण्यात येणार आहे. २३ लाख ७० हजार रुपये एकात्मिक शहर विकास योजनेतून नेहरू उद्यानाच्या विकासासाठी खर्च करण्यात येत आहेत.