Leading International Marathi News Daily                                  मंगळवार, ६ जानेवारी २००९


९९गान यक्षाचे..
दिल्ली पब्लिक स्कूलतर्फे पुण्यात सोमवारी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात यक्षगान हा पारंपरिक कन्नड नाटय़प्रकार सादर करताना विद्यार्थिनी नीलिमा हेगडे आणि नित्यासा मिश्रा.

कॉलेजकट्टा की गुंडांचा अड्डा?
पुणे शहर हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. बाहेरच्या राज्यातून-देशातून शिकायला येणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. येथील महाविद्यालयांना सामाजिक आणि सांस्कृतिकतेची किनार लाभलेली आहे. आमचा मुलगा स. प.मध्ये शिकतो किंवा आमची मुलगी फग्र्युसनमध्ये शिकते, असे सांगण्यामागे हीच ती किनार लपलेली असते!

‘श्रीमंत’ िपपरी पालिका काढणार ४०० कोटींचे कर्ज
िपपरी, ५ जानेवारी / प्रतिनिधी

विकासाच्या नावाखाली झालेल्या प्रचंड उधळपट्टीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या िपपरी-चिंचवड महापालिकेला अखेर श्रीमंतीचे सोंग बाजूला करून कर्ज घ्यावे लागणार असल्याचे आज स्पष्ट झाले. शहरातील ‘बीआरटी’ साठी महिनाअखेरीपर्यंत पालिकेला ४०० कोटी रुपये कर्जस्वरूपात उपलब्ध करून दिले जाणार आहेत, अशी माहिती आयुक्त आशिष शर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. जम्मू-काश्मीरच्या निवडणुकांसाठी गेलेले आयुक्त शर्मा आज महिनाभरानंतर रुजू झाले. वेगवेगळ्या बैठका घेऊन दिवसभर त्यांनी मागील कामाचा आढावा घेतला. सायंकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुभाष डुंबरे उपस्थित होते. ‘बीआरटी’साठी ४०० कोटी रुपयांचे कर्ज घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याबाबत जागतिक बँकेकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत, त्यावर चर्चा करून या महिनाअखेरीस अंतिम निर्णय होईल, असे ते म्हणाले.

डायस प्लॉटमधील आगीत २० झोपडय़ा भस्मसात
पुणे, ५ जानेवारी / प्रतिनिधी

गुलटेकडी येथील डायस प्लॉट येथील झोपडपट्टीतील झोपडय़ांना आज दुपारी लागलेल्या आगीत वीस झोपडय़ा जळून खाक झाल्या. तर दोन झोपडय़ांना आगीची झळ बसली आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नसून रात्री उशिरापर्यंत नुकसान झालेल्या झोपडय़ांची माहिती घेण्याचे काम सुरू होते. गुलटेकडीच्या डायस प्लॉटमध्ये एकमेकांना जोडून अशा अनेक झोपडय़ा आहेत. तेथे साधारण दोन ते तीन हजार लोकसंख्येची वस्ती आहे. आग लागल्याची अग्निशामक दलास एक वाजून सहा मिनिटांनी माहिती मिळाली होती. त्यानंतर तातडीने तेथे अग्निशामक दलाचे दहा बंब आणि चार पाण्याचे टॅंकर घटनास्थळी पोहोचले. दलाच्या जवानांच्या तत्परतेमुळे ही आग अवघ्या पाऊण तासात विझविण्यात यश आले. पहिल्यांदा आगीत चार झोपडय़ा जळाल्या. त्यानंतर त्यातील तीन सिलेंडरचे स्फोट झाले.

राज्य वीज नियामक आयोगाकडून आज ‘पुणे मॉडेल’बाबत सुनावणी
पुणे, ५ जानेवारी/ प्रतिनिधी

तीन महिन्यांपासून वेगवेगळय़ा कारणांमुळे रखडलेली अखंड वीजपुरवठय़ाच्या ‘पुणे मॉडेल’बाबतची सुनावणी उद्या (मंगळवारी) मुंबई येथे राज्य वीज नियामक आयोगाकडून होणार आहे. आयोगावर सध्या अध्यक्षांची नियुक्ती झाली असल्याने या प्रकरणी सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

वाहतूकदारांच्या संपाचा बाजारावर परिणाम
पुणे, ५ जानेवारी/ प्रतिनिधी

वाहतूकदारांनी सुरू केलेल्या बेमुदत संपामुळे अन्नधान्य, बांधकाम व इतर साहित्याच्या बहुतांश गाडय़ा शहरात येणे बंद झाले आहे. भाजीपाला व दुधाच्या गाडय़ांना बंदतून वगळण्यात आले असल्याने ही वाहतूक सुरळीत होती. एकूणच बंदमुळे बाजारातील सुमारे ६० ते ७० टक्के व्यवहारावर परिणाम झाला. डिझेलच्या व टायरच्या किमतींमध्ये कपात करण्याच्या मुख्य मागणीबरोबरच वाहतूकदारांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट काँग्रेसने देशव्यापी संप पुकारला आहे. त्याला पाठिंबा देत दी पुना डिस्ट्रीक ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने बंदमध्ये सहभाग घेतला आहे. काल मध्यरात्रीपूर्वी शहरात दाखल झालेल्या विविध ट्रक सकाळी रिकाम्या करून जागेवर उभ्या करण्यात आल्या आहेत. उद्यापासून (मंगळवार) माल भरणे व उतरविण्याचे काम पूर्णपणे थांबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. असोसिएशनचे अध्यक्ष दत्तात्रय आळंदे म्हणाले, ‘‘राष्ट्रीय पातळीवरील मागण्यांबरोबरच आम्ही स्थानिक मागण्यांसाठीही आग्रही आहोत. मार्केट यार्डमध्ये जाण्यासाठीचे जवळचे रस्ते वाहतूक शाखा व कॅन्टोन्मेंट बोर्डाने ट्रकसाठी बंद केले आहेत. त्यामुळे मोठा वळसा घालून गाडय़ांना जावे लागते. त्यामुळे वेळ व डिझेलही मोठय़ा प्रमाणावर खर्च होते. अतिरिक्त टोलही भरावा लागत असल्याने मोठा भरुदड पडतो. याबाबत आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार केला मात्र, कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. बंदमुळे आज बाजारावर ६० ते ७० टक्के परिणाम जाणवला.

वीजकपातीला आज सुट्टी
पुणे, ५ जानेवारी / प्रतिनिधी
टाटा पॉवर कंपनीकडून पुरेशा प्रमाणात अतिरिक्त वीज उपलब्ध होणार असल्याने पुणे व िपपरी-चिंचवड शहरामध्ये उद्याही (मंगळवारी) वीजकपात होणार नसल्याचे ‘महावितरण’कडून कळविण्यात आले आहे. रविवार, सोमवारपाठोपाठ मंगळवारीही शहराला अखंड वीज मिळणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे. टाटा पॉवर कंपनीकडून सुमारे दोनशे मेगावॉटपर्यंत वीज उपलब्ध होत आहे. त्याचप्रमाणे वीजवापरही काही प्रमाणात घटला असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.