Leading International Marathi News Daily                                  मंगळवार, ६ जानेवारी २००९
विविध

ओमर अब्दुल्ला यांना जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
जम्मू, ५ जानेवारी/पीटीआय

जम्मू काश्मीरमध्ये स्थापन झालेल्या नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस युतीच्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून ओमर अब्दुल्ला यांनी आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राज्याच्या राजकारणातील तिसऱ्या पिढीचे परिवर्तन असे वर्णन केल्या जाणाऱ्या या सोहळ्यात सर्वात युवा मुख्यमंत्री जम्मू काश्मीरला लाभले.

ओमर अब्दुल्लांचा चढता आलेख..
जम्मू, ५ जानेवारी / पी.टी.आय.

‘आऊट साईडर’ असा शिक्का बसलेल्या ओमर अब्दुल्लांना अखेर काश्मिरी जनतेने स्वीकारले आणि देशातील पहिले सर्वात तरुण मुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांच्या नावे जमा झाला. शेख अब्दुल्लांसारख्या मुरब्बी राजकीय नेत्याच्या तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या ओमर अब्दुल्लांना राजकारणाचे खरे धडे त्यांचे पिता डॉ. फारुक अब्दुल्ला यांच्याकडून मिळाले. दहशतवादाने पोळलेल्या काश्मिरी जनतेच्या दु:खावर फुंकर घालण्याचा प्रयत्न करण्याची हमी त्यांनी मुख्यमंत्री होताक्षणी दिली.

इस्रायली फौजांचा गाझा शहरावर जोरदार हल्ला; मृतांची संख्या ५५०
युद्ध थांबविण्याचे जागतिक नेत्यांचे प्रयत्न चालूच

गाझा सिटी, ५ जानेवारी/पी.टी.आय.
जागतिक नेत्यांकडून युद्ध थांबविण्याचे सातत्याने होत असलेले आवाहन धुडकावून इस्रायली सैन्याने अवजड रणगाडे, तोफाघेऊन गाझा शहरावर जोरदार हल्ला चढविला असून इस्रायली विमाने व हेलिकॉप्टरही हमासच्या ठिकाणांवर हवाईहल्ले चढवीत आहेत. गेल्या आठवडय़ाभरात ५५० हून अधिक पॅलेस्टिनी या हल्ल्यांमध्ये मारले गेले आहेत.

भारत-अमेरिकादरम्यान सर्वात मोठा संरक्षण करार
नवी दिल्ली, ५ जानेवारी / पी. टी. आय.

गेल्या वर्षी मुंबईत झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारताला आपल्या काही काही उणिवांची जाणीव झाली असून, त्या दूर करण्याच्या दृष्टीने भारताने आतापर्यंतचा सर्वात मोठा संरक्षण करार अमेरिकेशी केला आहे. भारतीय नौदलाचा गुप्तचर विभाग सशक्त करण्यासाठी बोइंग कंपनीकडून आठ विमाने खरेदी करण्याचा हा करार आहे. ‘पी-८१’ जातीच्या या विमानावर टोपॅडो, पाण्यात खोलवर मारा करणारे बॉम्ब, हार्पून क्षेपणास्त्रे, पाणबुडीविरोधी क्षेपणास्त्रे अशा प्रकारची शस्त्रसज्जता असेल. भारतीय संरक्षण खात्याचे अधिकारी आणि बोइंग कंपनीचे भारतातील प्रमुख विवेक लाल यांनी ‘पी-८१’ या दूर पल्ल्याच्या मेरिटाइम रिकोनाएसन्स (एलआरएमआर) विमान खरेदीच्या करारावर १ जानेवारी २००९ रोजी सह्य़ा केल्या. २.१ अब्ज अमेरिकन डॉलरचा हा विमानखरेदी करार असल्याचे नौदल व उद्योग खात्याच्या सूत्रांनी सांगितले. नौदलाची गरज लक्षात घेऊन डिसेंबरअखेर संरक्षणविषयक कॅबिनेट कमिटीच्या बैठकीत या व्यवहार व करारासाठी हिरवा कंदील दाखविला होता. करारानुसार पहिले विमान २०१२-१३ मध्ये भारताला मिळेल व उर्वरित विमाने २०१५-१६ साली टप्प्याटप्प्याने नौदलाकडे सुपुर्द केली जातील, असे सूत्रांनी सांगितले.

विषारी दारूकांडाचे २३ बळी
कोलकाता, ५ जानेवारी/पीटीआय

विषारी दारूकांडाच्या बळींच्या संख्येत आठ व्यक्तींची भर पडली असून, ती आता २३ झाली आहे. पोलिसांनी वेस्ट पोर्ट भागातील हाइड रोड आणि किडेरपोर येथे धाडसत्र चालूच ठेवले आहे. तसेच आणखी तिघांची रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू आहे, अशी माहिती पोलीस सहआयुक्त (प्रशासकीय) पी. चॅटर्जी यांनी दिली. बळींच्या संख्येत अजून वाढ होण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. अनेक बाधित व्यक्ती पोलिसांच्या धाडींपासून वाचण्याच्या दृष्टीने धडपडत आहेत. चॅटर्जी पुढे म्हणाले की, काल रात्रीपासून पोलिसांचे धाडसत्र सुरू असून, आतापर्यंत विषारी दारूकांडप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक पोलीस स्टेशनच्या प्रमुखांची बदली करण्यात आली आहे. वेस्ट पोर्ट पोलीस स्टेशनमध्ये शहर पोलीस आयुक्त मोहन चक्रवर्ती आणि सहआयुक्त जावेद शमिम यांनी ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी काल रात्री दुर्घटनाग्रस्त भागाला भेट दिली. तसेच सदर कांडाच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली. तृणमूल काँग्रेसने दुर्घटनाग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदतही जाहीर केली. तृणमलच्या संतप्त कार्यकर्त्यांनी वेस्ट पोलीस स्टेशनला घेरावही घातला आणि पोलीस आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी केली.

श्रीलंकेच्या लष्कराची ‘एलिफंट पास’कडे कूच
कोलंबो, ५ जानेवारी / पी. टी. आय.

श्रीलंका लष्कराने आता लिट्टेचा पुरता पाडाव करण्याचा चंग बांधला असून, आज मुल्लाईतीवू हा लिट्टेचा बालेकिल्ला ताब्यात घेऊन पुढे दक्षिणेकडील एलिफंट पासकडे कूच केली आहे. गेल्या १० वर्षांच्या संघर्षांनंतर श्रीलंका लष्कराने किलिनोच्ची हे लिट्टे बंडखोरांचे मुख्यालय असलेले शहर ताब्यात घेतले असून, हेलिकॉफ्टर्सच्या छत्राखाली रणगाडय़ांसह लष्कर बंडखोरांची ठाणी ताब्यात घेत पुढे सरकत आहे. ५८ व्या तुकडीने एलिफंट पासनजीकच्या पूल क्र. ९ आणि परिसराचा कब्जा घेतला असून, लवकरच एलिफंट पास काबीज केली जाईल, असा लष्कराचा दावा आहे.

बर्फवृष्टीतून चार जणांना लष्कराने वाचविले
श्रीनगर, ५ जानेवारी/पीटीआय

जम्मू काश्मीरच्या बंदीपोरा जिल्ह्यात झालेल्या बर्फवृष्टीतून लष्कराने आज चार जणांना वाचविण्यात यश मिळविले आहे. बंदीपोरा जिल्'ाातील टय़ुलीप येथे काल बर्फवृष्टीच्या ढिगाऱ्याखाली चार जण अडकले होते. परंतु लष्कराने चौघांनाही वाचविले, अशी माहिती सूत्रांनी दिली. यापैकी जमिल लोणे या व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे.नियंत्रण रेषेनजीकच्या टय़ुलीप आणि ग्युरेझ भागाचा गेल्या महिन्यापासून काश्मीर खोऱ्याशी संपर्क तुटला असून, गेले दोन दिवस येथे मुसळधार बर्फवृष्टी होत आहे.जम्मू-काश्मीरमध्ये मोठय़ा प्रमाणावर होत असलेल्या बर्पवृष्टीबरोबरच थंडीचा कडाकाही वाढला आहे.

शेख हसिना यांचा आज शपथविधी
ढाका, ५ जानेवारी / पी. टी. आय.

बांगला देशातील सार्वत्रिक निवडणुकीत अभूतपूर्व विजय संपादन केलेल्या आवामी लीगच्या नेत्या शेख हसिना वाजेद यांच्याविरुद्धचे सर्व आरोप पोलिसांनी रद्दबातल ठरविले असून, उद्या त्या देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतील. बांगला देशचे अध्यक्ष लाजुद्दीन अहमद यांनी शेख हसिना यांना आज औपचारिकरीत्या सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण केले. उद्या ते पंतप्रधानांना ‘बंगभवन’ या अध्यक्षीय प्रासादात पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. शेख हसिना यांच्या मंत्रिमंडळात मात्र कोणाकोणाचा समावेश असणार आहे हे कळू शकले नाही. शेख हसीना यांनी मिळविलेला विजय ऐतिहासिक असल्याचे राजकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे.

काश्मीरमध्ये ६०० लिटर द्रवरुप स्फोटके जप्त
श्रीनगर, ५ जानेवारी/पीटीआय
सुरक्षा दलाने जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील एका घरातून ६०० लिटर द्रवरूप स्फोटके जप्त केली, अशी माहिती पोलीस प्रवक्त्याने आज दिली. श्रीनगरपासून ५५ किमी अंतरावरील चाना खान भागातून अब्दुल खलिक दर या इसमाच्या घरातून काल ही स्फोटके जप्त केली. दहशवाद्यांनी एक घरात मोठय़ा प्रमाणात द्रवरूप स्फोटकांचा साठा केला असल्याची माहिती मिळाल्यावर राष्ट्रीय रायफल्स, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.